ज्या गावात माझं बालपण गेलं होतं. जिथला प्रत्येक रस्ता, गल्ली, बोळ मी पायाखाली तुडवला होता. प्रत्येक गल्लीत तोंडाने नुसतं टिक टॉक आवाज केला तरी मित्रच मित्र जमा व्हायचे. आज त्याचं गावात मी, मी पणाला पारखा झालो होतो. मी जो विचार करून आलो होतो. हे सगळं मला अनोळखी होतं. मला ओळखणारं इथं कोणीच नव्हतं. जुने मित्र शोधायचे होते. पण इथं तर मित्रच काय पण माझं सगळं गावच हरवून गेलेलं दिसतं होतं. गाव सोडून मी काय कमावलं होतं आणि काय गमावलं होतं हेच मला कळेना. असा मी व्याकुळ व्याकुळ होऊन गेलो.
शाश्त्री टॉवरवरून सरळ रस्त्याने खाली जायला लागलो. आणि बळीराम पेठ लागली. तसं मनातल्या मनात एकदम हसू फुटलं. आमचं गाव म्हणजे पेठांचं, गल्ल्यांचं, वाड्यांचं बनलेलं. बळीराम पेठ, शनिवार पेठ वगैरे. एक पेठ तर आमच्याच नावाची होती. जोशी पेठ. मला त्याचं प्रचंड अप्रूप वाटायचं. बळीराम पेठ आठवल्या बरोबर एक प्रदीप नावाचा मित्र आठवला. हा मित्र छान गब्दुल्ला, गुटगुटीत होता. का कुणास ठाऊक मला शाळेत मिळतं असलेल्या मार्कांमुळे आणि सततच्या पहिल्या नंबरामुळे वर्गातल्या बहुतेक सगळ्या मुलांना वाटायचं की यानं आपल्या घरी अभ्यासाला यावं. म्हणजे त्या निमित्ताने आपलाही अभ्यास होईल. आणि मी मात्र कोणाकडे काय फायदा होईल याचा अभ्यास करून जायचो. आता हा प्रदीप, त्याच्या कडे अभ्यासाला जायचं एक कारणं होतं की त्याची आई चहा एकदम अफलातून बनवायची. तोही पूर्ण दुधात. पाणी न घालता. रात्रं रात्रं अभ्यास करत आम्ही जगायचो. आणि दर दोन तीन तासांनी ती माऊली आम्हाला चहा बनवून द्यायची. आज त्या पेठेत जिथं त्याचं घर होतं तिथं तर एक मोठ्ठी बिल्डिंगच उभी होती. मला मात्र तिथं गेल्यावर त्याच्या घराचे दरवाजे स्पष्ट दिसतं होते. तिथं क्षणभर उभा राहिलो. वाटलं आता जर आत मध्ये प्रदीप असेल तर काय करत असेल. कसा असेल. नक्कीच त्याची आई मला बघितल्या बरोबर लगेच चहा ठेवेल याची मला इतकी खात्री झाली की क्षणभर माझ्या ओठांवर त्या चहाची चव जणू तरंगून गेली. मी ओठांवरून न कळत जीभ फिरवली. प्रदीप आठवला, त्याची आई आठवली त्या बरोबर त्याचे वडीलही आठवले. एक गडद काळी सावली पुन्हा झाकोळून टाकते आहे की काय असं वाटलं. एक अहंकार माणसाला विनाशाच्या कुठल्या टोकावर नेवून पोहोचवते याचं प्रदीपचे वडील जिवंत उदाहरण होतं. मी तेंव्हा खूप लहान होतो. प्रदीपकडे अभ्यासाला गेलो तेंव्हा वातावरण गंभीर होतं. त्याचे वडील आराम खुर्चीवर बसून अस्वस्थपणे मागे पुढे डोलत होते. आईने डोक्याला घट्ट कपडा गुंडाळलेला होता. त्या दोघांनीही माझ्याकडे बघितलं पण नाही. मला बघताच प्रदीप बाहेर येऊन म्हणाला,
"अरे आज तू घरी जा. बाबांची नोकरी गेली आज "
" का रे, काय झालं " मी विचारलं.
" मला नीट समजलं नाही. बाबा म्हणत होते की त्यांनी सुट्टीचा अर्ज देऊनच सुट्टी घेतलेली होती. आणि त्यांच्या बँक मॅनेजरच म्हणणं होतं. अर्ज न देता सुट्टी घेतली म्हणून त्यांनी रीतसर माफी मागावी "
आणि या बाणेदार माणसाने केवळ माफी मागावी लागू नये म्हणून आणि सत्याचा विजय होतो या चिरंतन सत्यावर प्रचंड विश्वास ठेवत, नोकरी सोडावी लागली तरी चालेल पण माफी मागणार नाही. असं म्हणून नोकरी सोडून दिली. त्या नंतर त्या बँकेवर केस दाखल केली.नंतर त्या नांदत्या घराचे वासेंच फिरले. नोकरी नाही. पैसा नाही. वर केसचा खर्च सुरु झाला. त्या साठी त्याच्या वडिलांना हळूहळू एकेक वस्तू विकाव्या लागल्या. प्रदीपच्या घरी अभ्यासाला जाणं माझं जवळ जवळ बंदच झालं. काही दिवसांनी समजलं की अनेक वर्ष केस चालून निकाल त्यांच्या विरुद्ध लागला. भर कोर्टात, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते म्हणतं त्याचे वडील खदाखदा हसायला लागले. ते इतकं भेसूर होतं की सगळ्यांना त्यांची भीतीच वाटायला लागली. नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. शॉक ट्रीटमेंट द्यावी लागली. प्रदीपची आई नंतर घरोघरी पोळ्या बनवायला जायला लागली. प्रदीप पण कित्येक दिवस शाळेत आलाच नाही. नंतर तर सगळे जणं त्याला विसरूनही गेले. हे सगळं आठवलं आणि काळीज नुसतं भरून आलं. सकाळी सकाळी डोळ्यातल्या पाण्यामुळे अंधुक अंधुक दिसायला लागलं. वाटलं अरे आपल्याला संपूर्ण चाळीस वर्षात हा साधा मित्र आठवणीत राहू नये. खरंच काय करत असेल, कुठं असेल तो. असा मी त्याच्या आठवणीने कोसळून गेलो.
माझं गाव कुठं हरवलं होतं ते माझं मलाच समजेना. गाव जरी जमीनी अस्माना पर्यंत बदलेलं होतं तरी रस्ते मात्र तेच होते. आणि प्रत्येक रस्त्याची एक एक आठवण काळजावर कायमची कोरली गेली होती.
बळीराम पेठ दिसताच तिथं कोपऱ्यावर असलेलं एक नाईक सायकल मार्ट मला स्पष्ट दिसायला लागलं. आता तिथं एक मोठी बिल्डिंग झाली होती. जवळच एक छान हॉटेल उभारलेली होती. माझ्या डोळ्यासमोर मात्र असंख्य सायकलींचे सांगाडे, पायडली, चैन्स, सीट, कुलूप, अनेक स्क्रू, डायनमे, समोरचे लाईट्स या सगळ्या ढिगाऱ्यात पाण्यात ट्यूब बुडवून पंक्चर शोधणारा, तर कधी ब्रेक दुरुस्त करून देणारा नायकांची आकृती दिसतं होती. त्या काळी कोणतीही जाहिरात नसतांना अशा गोष्टी प्रसिद्ध होऊन जातं.
कधी कधी काय बऱ्याच वेळा, तू आणि मी दोघंही कितीतरी वेळा याच दुकानाची जागा ठरवून भेटायचो. कारणं दोन होती. ठिकाण चुकामुक न होणार म्हणजे, पक्क होतं. दुसरी गोष्ट होती की तिथं भाड्याने पण सायकली मिळायच्या. मग तिथून भाड्याने आपण सायकली घ्यायचो. तिथून शनीपेठेतुन सरळ ममुराबाद रोडने लांबवर फिरायला जायचो. तू भेटायच्या आधी खूप काही ठरवलेलं असायचं पण प्रत्यक्षात सामोरं आली की काहीच बोलायचो नाही मी. तुझीही अवस्था सेम व्हायची. कितीतरी वेळा, या रस्त्याला कोणीच जास्त नसायचं, आजूबाजूच्या निव्वळ घनदाट झाडी आणि नितांत शांतता. त्यात शांततेत आपण दोघं नुसतेच सायकल चालवत चाललो आहोत. कशा साठी मी तुला बोलावत होतो. आणि तू देखील कशाला बरं एव्हढी मोठी रिस्क घेऊन माझ्या सोबत येतं असायची तेच समजतं नसायचं. पण तुझं ते नुसतं सोबत असणं किती मोलाचं होतं मलाच सांगता येतं नसे.
बघ आता या वयात हे काय व्हायला लागलं बरं. कशावरूनही तू आठवायला लागलीस की . किती दिवस झाले. दिवस काय वर्षा मागून वर्ष उलटली. आयुष्याचा अर्धा प्रवास तर संपलाय. कोणी सांगावं. अर्धा संपलाय की जवळ जवळ सगळाच संपत आलाय कोणास ठाऊक . इतर कोणी भेटो ना भेटो. तुझा शोध घ्यायचाच घ्यायचा.
आणि मन भरकटायला लागलं. अगदी सगळ्या नव्या बिल्डिंगा, मॉल, डी -मार्ट, मोठं मोठे कॉम्प्लेक्सेस सगळं सगळं नाहीसं झालं. आणि प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक मार्गांवर तुचं दिसायला लागलीस. कोणाला खरं देखील वाटणार नाही. पण माझ्या न कळत मी तुझाच
शोध घेत होतो. हे खरच मला देखील समजत नव्हतं.
कशी असंशील तू. मुख्य म्हणजे मला जसे ते आपले दिवस आठवताहेत तसेच तुला देखील ते दिवस आठवतील का. कसले वेड्या सारखे वागलो होतो तेंव्हा आपण. तूझ्या माझ्यात जे काही होतं ते काय होतं. प्रेम.. की अजून काही होतं माहिती नाही. पण आयुष्याचा केव्हढा मोठा कालखंड तू व्यापून पुन्हा अजूनही तू शिल्लक राहिलीच होती. ही चिरंतन ओढ नेमकी कोणती होती. कशाची होती. माझ्या जवळ प्रश्न तर कायमचेच होते. पण आता मला उत्तरं नको होती. मला तुला कसंही करून भेटायचं होतं बसं. आणि मी पुढे निघालो.
शोध घेत होतो. हे खरच मला देखील समजत नव्हतं.
कशी असंशील तू. मुख्य म्हणजे मला जसे ते आपले दिवस आठवताहेत तसेच तुला देखील ते दिवस आठवतील का. कसले वेड्या सारखे वागलो होतो तेंव्हा आपण. तूझ्या माझ्यात जे काही होतं ते काय होतं. प्रेम.. की अजून काही होतं माहिती नाही. पण आयुष्याचा केव्हढा मोठा कालखंड तू व्यापून पुन्हा अजूनही तू शिल्लक राहिलीच होती. ही चिरंतन ओढ नेमकी कोणती होती. कशाची होती. माझ्या जवळ प्रश्न तर कायमचेच होते. पण आता मला उत्तरं नको होती. मला तुला कसंही करून भेटायचं होतं बसं. आणि मी पुढे निघालो.
दिवसा प्रचंड गर्दी मुळे ओलांडता देखील न येणारा तो रस्ता सकाळी सकाळी खूप सूना होता. त्या चौकात तू ज्या डौलाने सायकल चालवत असायची ते तुझं रूप मी आठवून व्याकूळ झालो. एक पाटी पाहून, क्षणभर पावलं रेंगाळली. नंतर सगळं अंधूक अंधुक झालं. त्या चौकाला तुझं नावं दिलेलं होतं. कारणं त्या रस्त्यावर तुझा अपघात झाला होता. तूझ्या नावा आधी लागलेलं कै नावं माझ्या अश्रूमध्ये दिसेनासं झालं होतं.
माझा रस्त्यावरचा प्रवास रस्त्यावरच संपला होता.
( समाप्त )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा