Login

रस्ता ( भाग दुसरा)

नियती माणसाला फिरवते, कधी नीट मार्गाला लावते तर कधी रस्त्यावर आणते. योग्य रस्ता दाखवणारा मिळाला तर प्रवास योग्य होतो अन्यथा भटकंती सुरूच राहते.


रस्ता ( भाग दुसरा )

रस्ता....

आज कितीतरी दिवसांनी मी गावी गेलो होतो. किती म्हणजे अगदी विचार करून करून थकलो तरी नेमका दिवस आठवणं खूप अवघड होतं.  हातात एक छोटीशी सुटकेस घेऊन मी स्टेशनवर उतरलो.पहाटेची वेळ होती.कधी नव्हे तो थंडीचा स्पर्श मला अनोखा वाटतं होता कारणं थंडी हा प्रकारचं मुंबईच्या लोकांना माहिती नाहीये. म्हणून अशा अंग गारठवून टाकणाऱ्या थंडीचं मला अप्रूप वाटत होतं. गावाकडचे लोक कानाला पांढरं उपरणं गुंडाळून बसलेले होते. तर बायाबापडया डोक्यावरून पदर घेऊन कान झाकून बसल्या होत्या. काही जणीनी पोरांना पदराखाली घेतलेलं होतं. अजून धड उजाडलं देखील नव्हतं. तरी स्टेशनचा परिसर  पूर्वी  रात्रंदिवस जागा असायचा तसाच आताही होता . एक दोन पान टपऱ्या सुरुच होत्या. काही मंडळी तिथं सिगारेट पीत उभी होती. हवेत धूर सोडत होती. स्टेशनच्या बाहेर जी मोकळी जागा होती . तिथं रिक्षांच्या रांगा लागलेल्या होत्या. रिक्षांच्या मागे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हॉटेली  होत्या. काही छोटया, काही मोठया. हॉटेली सामोरं बऱ्याच चहा वाल्यांनी टेबल खुर्च्या लावून चहाच्या टपऱ्या टाकलेल्या होत्या. एक चहावला सतत चहा उकळवत होता. त्याच्या हातातल्या पळीने चहा सतत खालीवर करत तो हवेत चहाची धार नेत असे पुन्हा उकळत्या भांड्यात टाकतं असे. मध्येच पळीने चहाचा एखादी थेंब हातावर घेऊन त्याची चव घेत असे. इतक्या सकाळी देखील गाडीतून उतरलेले बरेच गिऱ्हाईक चहाची वाट पाहात होते. प्रत्येक दुकानदाराने पहिल्या बनवलेल्या चहाचा कप रस्त्यावर टाकलेला होता. काही भटकी कुत्री इतक्या पहाटे पण त्या टाकलेल्या चहाला चाटत होती. अजून एकदोन जणांनी एका हात गाडीवर पोह्यांचा ढीग बनवून त्यावर कांद्याच्या कापा, लिंबाच्या फोडी आणि हिरव्या मिरच्या खुपसलेल्या होत्या. काहीजण सकाळी सकाळी कागदाच्या डिश मध्ये पोहे घेऊन कागदाच्याच चमच्यानी नाश्ता करत होते. सकाळच्या त्या वेगळ्या वातावरणात गरमा गरम पोहे आणि गरमा गरम चहा याचा संमिश्र वास वेगळ्याच वातावरणात घेऊन जातं होता. अगदी खरं सांगायचं तर इतक्या पहाटे देखील भूक चाळवली जातं होती. आणि मुंबईला नाश्त्याची सवय नसलेला मी अगदी विनासंकोच तोंड बिंड धुण्याची फॉर्मॅलिटी न पाळता त्या कागदी डिशमध्ये पोहे घेऊन कागदी चमच्याने खायला लागलो. नंतर छान वाफाळलेला चहा पिलो . क्षणार्धात रात्रभर केलेल्या प्रवासाचा थकवा नाहीसा झाला.मनाला एकदम तरतरी आली.

अचानक मला ती हॉटेल दिसली आणि काळजात एक भलीमोठी कळ उठली. त्या हॉटेल मध्ये माझा सख्खा काका वेटर म्हणून कामाला होता. मला ते दृश्य आज किती वर्ष झाली तरी जसच्या तसं आठवतंय. मीच आता पन्नाशीचा झालोय. या गोष्टीला नक्कीच चाळीस वर्ष तर सहज झाली असावी. त्या वेळी काकाच चाळीशीचा असेल. वडील तेंव्हा सांगत असतं जर तुम्ही शिकला नाहीत तर काका सारखं हॉटेल मध्ये भांडी घासावी लागतील. पण तरीही मला हा काका आवडतं असे.कारणं एकदम सोपं होतं. मला माझा काका तिथं काम करतो म्हणजे ती हॉटेल माझ्या बापाचीच वाटत असे. त्या मुळे मी तिथं गेलो की तो मला काकाच्या नात्याने गुपचूप हवं ते खाऊ घाली. माझी डिश देखील जास्त खाद्यपदार्थांनी भरून टाकी. आणि बिल द्यायच्या वेळी मालकाला त्याच्या नावावर लिहून ठेवायला सांगत असे. तेंव्हा मला तो एखाद्या कर्त्या पुरुषा सारखा वाटायचा. पण कुठलेही पाश त्याने मागे लावून घेतलेले नव्हते. लग्न केलेलं नव्हतं. तसंही त्याला कोणी मुलगी दिलीच नसती असं वडील म्हणायचे. मनाला वाटेल तसं तो जगत होता. आपल्या मुळे एखाद्याच्या सुसंस्कृत घराण्याच्या अब्रूला धक्का लागतं असेल तर त्याचा नाईलाज होता. तो कधी नात्याचा दावा सांगायला आला नाही की कुठं हिस्सा मागायलाही आला नव्हता. घरातल्या कोणाला माहिती होतं की नाही माहित नाही पण मी या काकाचं मीठ खाल्लेलं होतं हे मात्र नक्की. कॉलेजच्या मित्रांसोबत एकदा या हॉटेल मध्ये, सिगारेट प्यायला येऊन बसलो असतांना अचानक वडिलांसारखा दिसणारा फक्त तब्येतीने थोडासा खुरटलेला, दाढीची खुंट वाढलेला, डोक्यावर पांढरी टोपी घातलेला काकाच सामोरं दिसल्या बरोबर मला एकदम लाजल्या सारखं झालं होतं. पण काकाने तेंव्हा मोठया मनाने माफ करून टाकलं होतं. उलट तोंडाचा वास जावा म्हणून थोडी शोप आणि एक लवंग आणून दिली होती. आज अचानक मला त्या ठिकाणी माझा सख्खा रक्ताचं नातं असलेला काका दिसायला लागला. आणि मन एकदम कासावीस झालं. कुठ असेल बरं हा काका .तशी या काका बद्दल कोणालाच काही माहिती नव्हती. कोणाला त्याची गरजही वाटली नव्हती.

नंतर मागे काही दिवसांनी ज्या दिवशी मला पूर्ण बिलं भराव लागलं होतं जेंव्हा त्याने हॉटेल सोडल्याच समजलं होतं. मालकाला जुजबी चौकशी केली तेंव्हा त्याने सांगितलं की त्याच्या अंगावर गरम तेल पडलं होतं. म्हणून त्याने नोकरी सोडली होती. पण मग तो कुठं गेला होता. त्याने कुठं ट्रीटमेंट घेतली होती सगळेच प्रश्न अनुत्तरीत होते. ज्याच्या बद्दल घरात कोणालाही आस्था नव्हती अशा काका सोबतचचे माझे संबंध हा निशिद्ध प्रकार होता. ज्याच्या बद्दल कोणी कधीही चांगलं बोलत नसे असा हा काका मला मात्र खूप जवळचा वाटायचा.

एकदिवस अचानक मला तो बसं स्टॅण्डवर एका भिंतीला टेकून एका कपड्यावर सगळे देव मांडून बसलेला दिसला. आता या वेळी त्याने कपाळावर कुंकवाचा टिळा लावलेला होता. सगळ्या देवांना त्याने राजरोस उघड्यावर मांडून ठेवले होते. त्याच्या जवळ एक दोन जूनी पंचांग ठेवलेली दिसतं होती.काही गावाकडची खेडुत मंडळी त्याच्या आसपास भविष्य पाहायला बसलेली होती. स्वतःलाच कोणतेही भविष्य नसलेला हा काका मलाच समजेनासा झाला. कधी नव्हे त्याने एकदा मला पाच रुपये मागितले. माझ्या खिशात तेंव्हा बरेच पैसे होते. तसं मी पन्नास रुपयेही देऊ शकलो असतो. पण माझीच कृपणता आड आली. मी त्याला त्याने मागितले तेव्हढेच पाच रुपये दिले. त्या बरोबर त्याने मला त्याचं पैशात सत्तर पैशाचं बिड्याचं बंडल आणि माचीस आणायला सांगितली. त्या दिवशी त्याने आणि मी दोघांनी बिड्या पिल्या. तो मला बऱ्याच गोष्टी समजावून सांगत होता. त्या दिवशी जणू आम्ही दोघं मित्र झालो होतो. तो मला म्हणाला,

" बच्चू, तू नीट अभ्यास कर. खूप शिक खूप मोठा हो. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुला सांगून ठेवतो. ही गोष्ट तुला कोणीही कधीच सांगणार नाही. तूला मुलगा हो अथवा मुलगी, त्या मुलांना निव्वळ अभ्यासावरून किंवा संगतीवरून कधीच घालून पाडून बोलतं जावू नकोस. म्हणजे तुला अक्कल नाही. तू कधीच पुढे येणारं नाही. तू जन्माचाच कर्मदरिद्री आहेस, तुला खायची मोताद होईल वगैरे वगैरे. काय आहे ना वळचणीला बसून सटवाई  हे ऐकतं असते आणि त्या बाळाचं आयुष्य तसंच घडतं जातं रे. माझंच उदाहरण घे. जन्मल्या पासून मी बिनकामाचा म्हणूनच जन्मलो आहे हे मला सतत ऐकवलं गेलं आहे आणि असं ऐकून ऐकून मी खरोखरचं बिनकामाचा झालो आहे. आता सगळं संपलंय रे. सगळ्या नातेवाईकांत तू बघतोस ना मला कोणी उभं पण करत नाही. मला एक वचन देशील का रे, नक्की सांग. " मला वाटत होतं तो पैसे मागतो की काय अजून. म्हणून मी गप्प राहिलो.

" मला तूझ्या कडून काहीच नको. फक्त मी मेल्यावर मला अग्नी तुचं  द्यावा अशी माझी ईच्छा आहे " मला माझ्या क्षुद्र वृत्तीची लाज वाटायला लागली. हा माणूस माझ्या कडून अंतिम अग्नी डाग दान मागत होता आणि मी खिशातल्या पैशाचा विचार करत होतो. मी काकाचा हात घट्ट हातात धरून ठेवला आणि त्याला आश्वासन दिलं.तो म्हणाला निश्चिन्त होऊन म्हणाला, "मी आता मरायला मोकळा झालो."

नंतर माझं शिक्षण झालं. मी मुंबईला स्थायिक झालो. अधून मधून काका आठवतं राही. कधी माझ्या मनात विचार येई या काकाला आपल्या जवळ घेऊन यावं. पण त्याच्या बद्दल चौकशी करणं देखील कोणालाच आवडतं नसे.ते या गोष्टीला मान्यता देतील हे शक्यच नव्हतं. का कुणास ठाऊक इतर आत्या मंडळींचाही त्याच्या वर विश्वास नव्हता.

नंतर कामाचा व्याप वाढला. काकाच्या भेटी कमी कमी होतं गेल्या नंतर एक दिवस काका नाहीसा झाला. कुठं गेला. कधी गेला कळलंच नाही. आज इतकी वर्ष झाली कुठं असेल, कसा असेल, असेल का नसेल हेही माहिती नाही. पण मला मात्र ही जाणीव सतत बोचत राहिलं की मी माझ्या काकाला दिलेलं अंतिम वचन पूर्ण करू शकलो नाही. त्याला बेवारशी मरायचं नव्हतं. पण कुठंतरी संवादाचा अभाव झालेला होता. आज मी या हरवलेल्या काका बद्दल कितीही शोक केला तरी त्याचा काही उपयोग होणार नव्हता. त्या हॉटेलकडे बघताना असा माझा बेवारशी नाहीसा झालेला काका मला आठवला. त्याच्या नष्ट होण्याचं कोणालाच काही वाटलं नव्हतं कारणं त्याला कोणी हिशोबातच धरलेल नव्हतं. किंवा मी त्याला अग्नी दिला नाही याबद्दलही मला कोणी बोलणार नव्हतं. कारणं त्याचा आणि माझा हा गुप्त करार झालेला कोणालाच ठाऊक नव्हता. पण मी तो करार पाळला नव्हता . ही गोष्ट माझ्या मनाला नेहमी लागून राहणारं होती. माझं आणि त्याचं नातंच वेगळं होतं. जे घरात माहिती नव्हतं. कुणास ठाऊक त्याला माझा अभिमानही वाटत असेल, पण त्या वेळी अशी बोलून दाखवण्याची पद्धत नव्हती. मी बाहेर चोरून सिगारेट पितो ही गोष्ट घरात माहिती नव्हती पण काकाला माहिती होती आणि त्याने त्या गोष्टीचा सहज पणे स्वीकार केला होता.
उतरल्या उतरल्या ते हॉटेल दिसल्या बरोबर असा काका आठवून गेला.

दूर कोपऱ्यात एक शेकोटी पेटलेली होती. त्या भोवती दोनचार लोक हातपाय शेकत गोलाकार बसलेले होते.मला त्यांच्या त्या निवांतपणाचा हेवा वाटला. मला सुटकेस घेऊन बाहेर पडतांना पाहून रिक्षावाल्यांनी मला गराडा घातला.

" चला साहेब, चला.. कुठंही जा.. पंधरा रुपये सीट.. चला साहेब.. "

कोणी सुटकेस हिसकावत होतं तर कोणी मला ओढत होतं.

" महाबळ, मेहरूण, खाजामिया, जुने गाव, एमजे कॉलेज रोड, त्र्यंबकनगर, मोहाडी फाटा पंधरा रुपये सीट. "

तसं पाहिलं तर माझा जन्मच या गावाला झालेला. पण या गावात आता माझं कोणीच राहात नाही. त्यामुळे मला कुठं जायचं होतं बरं हेच मला माहिती नव्हतं. मी गाव सोडलं होतं तेंव्हा वेगळं होतं. आता सगळं सगळं बदललेलं होतं. रिक्षात बसून मी कुठं जाणार होतो हेच मला समजेना. आता हळूहळू पहाटेचा प्रकाश पसरायला लागला होता. म्हणून ठरवलं जरा पायीचं फिरू या. जिथं बालपण घालवलं होतं त्या घराकडे जाऊन पाहू या. म्हणून पायीचं पुढे चालायला लागलो.

स्टेशनंच्या थोडं पुढे कोपऱ्यावर एक गोवर्धन नावाची डेरी होती. त्या डेरीमध्ये जे साजूक तूप बनत असे. ते इतकं दाणेदार आणि शुद्ध असे की स्टेशनच्या थोडं पुढे आलं की शुद्ध तुपाचा एक स्नीग्ध वास त्या परिसरात पसरलेला असे. त्या काळात साजूक तूप एक चैन होती पण या वासाने बहुतेक सगळ्यांनाच तृप्तता दिली होती.त्या मुळे ती डेरी आणि तिथलं तूप बहुतेक सगळ्या गावाला चांगलंच माहित होतं. डेरीवरून उजव्या हाताने जाणारा रस्ता श्यामाप्रसाद मुखर्जी नावाच्या बगीच्या वरून पुढे जिल्हा परिषदेवरून बळीराम पेठेमधून गावात जातं असे. तिथल्या चौकावर एक मारुतीचं मंदिर होतं. मंदिराच्या मागे पोलीस स्टेशन होतं.

डेरीच्या बाजूलाच कॉलेज मधली मुलगी राहात होती. तिचं नावं नाही आडनाव माहिती होतं. ती आमच्या आर्टस् कॉलेज मध्ये होती. तिचं आडनाव राजपूत होतं. आमचा कधीही संबंध आला नाही की कधी बोलणंही झालं नव्हतं. पण नाकी डोळी नीटस असलेली ही मुलगी दिसली की आमचा दिवस खूप चांगला जातं असे. ती नेहमीच दिसायची असं नाही. त्या साठी बरेच दिवस पाळत ठेवून मी अभ्यास करून अचूक निष्कर्ष काढले होते . साधारण आठ ते साडे आठच्या दरम्यान ती रस्त्यावर सडा टाकायला येतं असे. आणि ते सडा टाकण्याचं अभूतपूर्व दृश्य दिसावं म्हणून मी अकराचं कॉलेज होतं तरी सकाळी घरातून लवकर बाहेर पडे. मग एखाद्या रसिक मित्राला सोबत घेऊन लांबच्या रस्त्याने कॉलेजला जायला निघे. आणि मग कधी नवद ती सडा टाकतांना दिसें तर कधी रांगोळी काढतांना दिसें. मग  तो दिवस अजरामर होऊन जाई. म्हणजे कसं धन्य धन्य वाटे. आता ती डेरी दिसली आणि त्या मुलीची आठवण आली. त्या काळात आम्हाला भुरळ घालणारी ती मुलगी आता कशी बरं दिसतं असेल. काय करत असेल. कुठं असेल. तिचा नवरा काय करत असेल. ती आपल्याला ओळखेल काय. या कोणत्याही प्रश्नाला उत्तरं नव्हते. पण उगाचच वाटून गेलं की आजही आता आठ वाजले की ती बाहेर येईल आणि अंगणात सडा घालायला लागेल आणि नंतर रेखीव रांगोळी घालेल. पावलं उगाचच त्या डेरीच्या आसपास रेंगाळली.

डेरीच्या डाव्या बाजूने सरळ गेलो असतो तर बऱ्याच लांब पर्यंत एक बंद पडलेल्या कापडगिरणीची     महाकाय उंच भिंत होती. त्या उंच भिंतीच्या वर पुन्हा गरज नसतांना काटेरी कुंपण लावलेलं होतं. भिंतीला समांतर बरंच अंतर चालून आल्या नंतर त्या बंद पडलेल्या कापडं गिरणीचं प्रचंड किल्ल्यासारखं गेट लागतं असे. तिथं एक शिपाई हातात बंदूक घेऊन पहारा देत उभा असे. एका वेळी दोन ट्रका जातील एव्हढं मोठं ते गेट होतं. पण त्या गेटाला किल्ल्याच्या गेटाला असतो तसा एक दिंडी दरवाजा होता. माणसं सायकल घेऊन त्या दरवाजातुन ये जा करत असतं.

एक दिवस शाळेतल्या एका मित्राने मला सहज विचारलं.,

" माझ्या घरी अभ्यासाला चलतोस का?."

काय होतं ना की मी अभ्यासात जरा बरा होतो. त्या मुळे बहुतेक मुलं माझ्याशी मैत्री करत. मी त्याला विचारलं तू कुठं राहतोस तर तो म्हणाला, " मी रतनलाल मिलच्या आत राहतो "

मला तर एकदम आनंदच झाला होता. कारणं त्या प्रचंड महाकाय भिंती मागे काय आहे. याचं कुतूहल मनात खूप होतं. या मुलाचं त्या भिंतीच्या पलीकडे घरचं आहे म्हटल्यावर मला एकदम परग्रहावरचा माणूस भेटल्या सारखा आनंद झाला. त्या दिवशी मी घरी उशीरा घरी येईल असं सांगून त्याच्या घरी गेलो. त्या छोट्याश्या दिंडी दरवाजाला ओलांडून आत गेलो. आतलं दृश्य पाहून माझे तर डोळेच फिरून गेले. आत मध्ये मी कधीही न पाहिलेले, दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं असलेले नितांत सुंदर झाडं होती. सुंदर सुंदर फुलं असलेली बाग होती. मध्येच अनेक त्रिकोणी छप्पर असणारी एक दगडी बिल्डिंग होती. एक मोठ्ठी आकाशात उंचावलेली चिमणी होती. आणि सगळ्यात शेवटी त्या मित्रांच क्वार्टर होतं. घर इतकं सुंदर असू शकतं याची मला कल्पनाच नव्हती. घरात तो, त्याचे आईवडील आणि त्याची एक कॉलेजला जाणारी सुंदर बहीण होती. त्या मुळे त्याचं घर जास्तच सुंदर भासत होतं.

मी क्षणभर त्या गेटजवळ उभा राहिलो. आता ते लहान गेट कुलूप लावून कायमचं बंद केलेलं दिसतं होतं.तिथं पहारा देणारा शिपाई नव्हता. आकाशात झेपावलेली चिमणी अजूनही तशीच होती.फक्त तिच्यातून धूर निघत नव्हता.

मी विचार करायला लागलो आज माझा तो मित्र कुठं असेल बरं. आणि त्याची ती कॉलेजला जाणारी सुंदर बहीण. कुठं असेल बरं हे कुटुंब. आणि आता मी पाहिलेले ते सुंदर रस्ते कसे असतील आतली झाडं आणि बाग यांचं काय बरं झालं असेल. सगळेच निरुत्तर करणारे प्रश्न होते.