रस्ता ( भाग एक )

नियती माणसाला फिरवते, कधी नीट मार्गाला लावते तर कधी रस्त्यावर आणते. योग्य रस्ता दाखवणारा मिळाला तर प्रवास योग्य होतो अन्यथा भटकंती सुरूच राहते.
रस्ता....( भाग एक )

रसिक वाचकहो,

रस्ता हा काही लिहिण्याचा विषय होवू शकतो का. माहित नाही. पण मला जाणवलं की मी जो रस्ता तुडवला होता तो रस्ताच मुळी चुकीचा होता. नंतर ज्याला ज्याला भेटलो त्यानं त्यानं हेच सांगितलं की तोही रस्ता चुकलेला होता. म्हणजेच इथे जो तो पथ चुकलेला होता. मग माझा रस्ता तरी कोणता होता.

काय माझ्या मनात आलं होतं कुणास ठाऊक.एकदा अचानक मुलं म्हणाली,

" बाबा, आजकाल आमच्या बॅचच्या मुलांची संमेलन होतात. तसं तुमच्या काळात नव्हतं का.बघा ना प्रयत्न करून तुमच्या काळातलं कोणी भेटत का "

आणि डोक्यात विचार आला. किती वर्ष झाली आपण गावाला गेलोच नाही. कशी बरं ही गावाची ओढ मुळापासून निघून गेली होती. तूझ्या साठी मी गाव सोडून पळालो. ते पळणं खरं तर गावातलं स्वतःच अस्तित्व मिटवण्या साठी होतं का स्वतःचा जीव वाचवण्यासाठी होतं. याचं उत्तरं मला अजूनही मिळालेलं नव्हतं. तू झिडकारल्या नंतर मिळेल त्या फांदीला लटकत जगत राहायचं एव्हढाच वर्तमानकाळ माझ्या सामोरं होता. पण न बदलणाऱ्या भूतकाळाच काय. कधी कधी डोहाच्या तळाशी असलेल्या अजगरा सारखा तो भूतकाळ जसाच्या तसा जिवंत होता. जेंव्हा मुलांनी असं विचारलं तेंव्हा मी ठरवलं जाऊन बघूया एकदा गावाला. बघूया चाळीस वर्षात काय काय बदल झाले ते.

ज्या रस्त्यावर तू मला भेटली होतीस .फक्त सात पावलं सोबत चालण्याची वचन देऊन सात जन्म वाट बघूनही पुन्हा कधीच भेट होणार नाही अशा रस्त्याने निघून गेलीस . तुझी वाट पाहात ज्या रस्त्यावर , मी ज्या झाडाखाली तासनं तास उभा होतो तो रस्ता ते झाडं अजूनही तसंच आहे. आता बघितलं तर त्या झाडाजवळ मी पण नाही आणि तू देखील नाही. तरी ते झाडं त्याचं रस्त्यावर त्याचं जागी तशीच वाट बघत उभं आहे. कदाचित ते झाडं अडवळणावरच्या वाटेवर असल्याने शिल्लक राहिलेलं असावं . नाहीतर काळाच्या ओघात ते कधीच नष्ट झालं असतं.

आता सहज गावी गेलो होतो. तर सगळं गाव मुळापासून बदलेलं होतं. पण माझ्या डोळ्यसमोर उभं होतं तेच गाव, तेच रस्ते.

एकच ठिकाणचा रस्ता अजिबात बदलेला नव्हता. तो होता स्मशानाचा....कदाचित तो परतीचा रस्ता नसावा म्हणूनही जसा होता तसाच आहे.

नियती माणसाला फिरवते, कधी नीट मार्गाला लावते तर कधी रस्त्यावर आणते. योग्य रस्ता दाखवणारा मिळाला तर प्रवास योग्य होतो अन्यथा भटकंती सुरूच राहते.

समजतं नाही, असंख्य वाटा. काही बोलावणाऱ्या काही भुलावणाऱ्या. त्यात काही वाटा एकमेकींना भेटणाऱ्या. काही समांतर जाणाऱ्या तर काही विरुद्ध दिशेने जाणाऱ्या. बरं या वाटांवर कुठं पिवळ्या फुलांचा सडा टाकणारे गुलमोहर उभे असतात तर कुठं पुन्हा पुन्हा जमिनीमध्ये पाळ मूळ रोवून कमानी सारखे वट वृक्ष उभे असतात . कुठं काटेरी बाभळ असतो तर कुठे डेरेदार आम्रवृक्ष उभा असतो . कुठं सुगंधाची पखरण करणारा पारिजात असतो , तर कुठं बकुळ आणि लांब दांड्याची बुचाची फुलं असलेला चाफा असतो .

हे सगळं तर आहेच. पण या रस्त्यांना तू आणि मी आठवतं असेल का. मी तर तोच आहे. हा गंधही तोच आहे. ही आर्तता पण तिचं आहे. पण सगळं सगळं बदललं आहे. तू कुठ आहेस माहिती नाही. एडका मदन धडक देत असतांनाची त्या बदलेल्या रस्त्यांची तुझी आणि माझी एक आगळी वेगळी कहाणी. बहुतेक प्रत्येकाची हिचं कहाणी असू शकते. कदाचित थोडाफार रस्ता वेगळ्या वळणाचा असू शकतो.

अशाच चुकलेल्या रस्त्यावर, चुकीच्या मार्गाने चुकलेल्या, व्यक्तीचा शोध घेण्याची ही चुकीची कथा.

( पुढे सुरु... क्रमश: )

🎭 Series Post

View all