रणसंग्राम - एक झुंजार भाग २१ #मराठी_कादंबरी

The story revolves around a political family. Vijaysinha's daughter abhishree who is fond of politics. But his son aadinat way long from politics. Abhishree create her gang of friends to work for people and start new era of politics in society.

रणसंग्राम - एक झुंजार भाग : २१

मागील सर्व भाग खालील लिंक वर मिळतील

रणसंग्राम सिरीज

मागील भागात -

आदिनाथ शांभवीच्या विरहातुन काही केल्या सावरत नव्हता. परीतोष अभिश्रीला त्याच्या प्रेमाची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न करत होता पण तिला त्याची प्रत्यक्ष कबुलीच हवी होती. अभिश्रीची चौकडी जेव्हा एका अज्ञात इसमा कडे गेली तेव्हा त्याला त्यांच्या बद्दल इथंभुत माहिती असल्याने सर्वच चकित झाले.

--------------------------

"तुला माझ्या वडिलांचं नाव आधीपासुन माहिती होतं..?" शांभवी

"हो…" आदिनाथ

"म्हणुन तु तुझी ओळख लपवली. यानंतर मला कधीच काँटॅक्ट करु नको. मी हे शहर सोडुन जात आहे. तुम्ही राजकारणी लोक खोटी असता आणि खोटीच राहणार. स्वतःच्या फायद्यासाठी फक्त वापर करायचा असतो तुम्हाला." शांभवी

"शांभवी नो.. प्लीज". आदिनाथ

शांभवीने फोन ठेऊन स्विच ऑफ करुन दिला. आदिनाथ परत स्वतःच्या कोशात चालला गेला. 

----------------------------

तिकडे अभिश्रीची चौकडी त्या अज्ञात व्यक्तीकडे आ वासुन बघत उभी होती. 

विसरले का तुम्ही सगळे..?  कुठे बघितलंय यांना.. गेस करा बरं.." अभिश्री

ती व्यक्ती खुर्ची मागची स्टिक घेऊन तिच्या आधाराने उभी राहिली.

"अरे… हा तर तो सिग्नलवरचा भिकारी माणूस." नित्या

"नाही नाही.. ते कॉलेजमध्ये आलेले आजोबा. अभीवर येणारा ढोल एका हातानी थांबवला होता त्यांनी." जोसेफ

"ओ.. शेख चिल्लीचे बंधू भगिनी ते तिन्ही एकच आहेत. स्टिक नाही दिसत का..?" दक्ष

"ओ.. तेरी.." नित्या.

"नमस्कार मी कदिरन. तुम्हा सगळ्यांना पहिल्यांदाच भेटुन छान वाटलं." कदिरन

"पहिली भेट असुन आमच्याबद्दल एवढी माहिती कशी..?" हिमानीका

"जर तुम्ही तुमचे पाचही इंद्रियांचा १००% नीट वापर करुन डोकं चालवलं तर तुम्ही सुध्दा जगात कोणाचीही माहिती मिळवु शकता. आजूबाजूला कायम लक्ष हवं घडत.

दक्ष तू चहा पित असताना तुला ऑफिस मधून ३ फोन आले. फक्त एवढंच वेरिफाय करण्यासाठी की किती वेळात पोहचणार. तुझ्या टीममध्ये टीम लीडर 

 पेक्षा तुला जास्त फोकस मिळतो. त्यामुळे ते त्याला आणि इतर जुन्या लोकांना सहन होत नाही. त्यामुळे तू सावध राहणं गरजेचं आहे.

नित्या तुझी सारखी चुळबुळ सुरु आहे. हात सतत बॅग कडे जातो म्हणजे तिथे काही तरी आहे. जे तुला लपवायच आहे. पर्सला विनाकारण २ गुंड्या लावल्यात. त्यामुळे त्यात कॅमेरा आहे हे कळतं. बी काज्युअल, बी कॉन्फिडनट. एक रिपोर्टर म्हणजे कुठल्या एजंट पेक्षा कमी नसतो. तू नर्व्हस दिसली तर कोणीही तुला चेक करेलच.

हीमनिका तुला बघायला येणाऱ्या मुलाबद्दल चहा पितांना तुझ्या बहिणीशी होणारं चॅटिंग कोणीतरी बघत होतं. तिकडे तुझं लक्षही नव्हतं. तुझं रोख ठोक बोलणं, साधी पण इम्प्रेसिव्ह पर्सनॅलीटी झेपू शकणाराच मुलगाच तुला हो म्हणेल काळजी नको करु. कट्टा गँग जितक्या सराईत पने मॅनेज करते तस त्यासोबत घरही करशील.

जोसेफ तुझ्या बनियानवर जो चटणीचा डाग पडलाय त्याच्या स्मेलचा तुला सारखा त्रास होत आहे. त्यावरुन ती चार दिवस तरी जुनी आहे हे कळतय. त्यासाठी ती असिडिटीची गोळी.

अभी तुझे डोळे रडल्यासारखे दिसत आहेत. तू आयुष्यात फक्त तुझे बाबा आणि आदिनाथ या दोनच व्यक्तींसाठी रडू शकतेस. १२ महिन्यात १२ सुध्दा सुट्ट्या न घेणारा आदिनाथ ४ दिवस झाले ऑफिसला गेला नाहीये म्हणजे त्याचाच काहीतरी प्रोब्लेम आहे. असो करशील तु तो साॅल्व्ह. 

"अभी हे काय पत्रिका वगैरे बघतात का…? की चेहरा बघुन भविष्य सांगतात..? आणि तुझा नी यांचा काय संबंध..?" दक्ष

"कदिरन म्हणजे माझी सावली जो पर्यंत तो आहे संकट माझ्या जवळही फिरकु शकत नाही." अभिश्री

" तुम्ही आमच्या पाळतीवर माणसं ठेवलीत..? म्हणजे आम्हाला आलेले फोन, मेसेजवर आमच्या आजुबाजुच्या लोकांना माहिती होते त्यावरुन तुम्ही हे बोलले. नक्की कोण आहा तुम्ही?" नित्या

"हा.. त्यासाठी भविष्यकार किंवा माणसं कशाला हवे. या सर्व गोष्टी मी एका मिनटात मोबाईलवरुन ट्रॅक करु शकतो. प्रत्येकाकडे स्मार्ट फोन असतो ज्यामध्ये त्यांचं आयुष्य दडलेल असते., जिकडे तिकडे सी.सी. टी. व्ही. असतात. बोटांवर सगळं हॅक करुन देतो मी." जोसेफ

"जसं तू इतरांच्या आयुष्यात डोकावूं शकता तसं इतरही लोक तुमच्यामध्ये डोकावूं शकतात हे कसं विसरता तुम्ही लोक. त्या टेक्नॉलॉजीच्या एवढं आहारी गेले की माझ्या पायासारखी मेंदूची कुबडी झाली ती तुमच्या. तुम्ही इथवर पोहचले ते फक्त मी ठरवलं म्हणुन. आमच्या या इंद्रायणीनगर मध्ये कुठलीही टेक्नॉलॉजी माझ्या परवानगी शिवाय शिरकाव करु शकत नाही. येथील लोकांना त्याचं व्यासनही नाही. तरीसुध्दा त्यांच्या मदतीने मला आपल्या शहरातील मोठमोठ्या बिझनेसमन, राजकारणी, बलाढ्य, लोकांची इथंभूत माहिती मिळते." 

"कसं शक्य आहे..?" जोसेफ

"कारण या परिसरातील लोकं संपूर्ण शहरात विखुरलेली आहे. कोणी सिग्नल वरील फेरीवाले, भिकारी, मोठ्या हॉटेल मधील वेटर, राजकारण्यांचे ड्रायव्हर, टपरी वाले, चपराशी, घरकाम करणारे, मजुर, ऑटो, टॅक्सी, कार  ड्रायव्हर, कचरा उचलणारे अशे अनेक छोटे मोठे काम करतात. ते काम करताना आपले डोळे, कान उघडे ठेऊन असतात. जसं आज तुमच्या गोष्टी यांच्या कडून कळल्या तसं संपुर्ण शहरातील कळतात." कदिरन

सर्वांना या हे ऐकुन काय बोलावं हे सुचलच नाही. खरंच ही लोक आपल्या आजूबाजूला वावरतात हे आपण कधी लक्ष देऊन बघितलेच नाही. 

"आज तुम्हाला इथे बोलवून हे सर्व सांगण्याचा उद्देश एवढाच की तुम्हाला माणसांमध्ये काम करायचं आहे तर त्यांच्यात जगुन काम करा. डोक्याची दार सदैव उघडी ठेवा. या सर्व लोकांची आणि नेटवर्कची मदत तुम्हाला लवकरच पडणार आहे."कदिरन

"म्हणजे टेक्नॉलॉजी वापरायचीच नाही का..?" नित्या

"वापरायची न.. पण आपलं सहावं इंद्रिय म्हणुन." कदिरन

"भावा.. तू एकदा माझ्या कडे ये.. हे इंद्रिय बिंद्रिय न सगळं विसरशील. मग बघ मोबाईल शिवाय अंघोळीला पण जाणार नाही." जोसेफ

"तुझ्या मेंदू वरचे डाग निघणं तर कठीण आहे. आत जाऊन बनियान वरचा डाग तरी धुवून घे. " कदिरन

जोसेफ आतल्या रुममध्ये गेला बनियान काढून बेसिनवर डाग धुतला आणि समोर जे दिसलं ते बघुन जवळपास उडालाच. तसाच बाहेर पळाला आणि कदिरनच्या पायाशी लोटांगण घातलं. 

"गुरुदेव… क्षमा करा मला. तुम्ही खुप ग्रेट आहात. मी आता इथेच राहणार. तुमच्या अंडर शिकणार." जोसेफ

सर्वांना आश्चर्य वाटलं. जोसेफ म्हणजे २४ तास फक्त फोन, लॅपटॉप, इंटरनेट याच जगात बुडून असायचा.  तो एक विलक्षण हॅकर होता ज्याचा त्याला आणि सर्वांना अभिमान होता. त्यानी आतल्या रुममध्ये असं काय बघितलं असेल की तो एव्हढा नतमस्तक झाला…? प्रश्न सर्वानाच पडला.

"जो.. बावळट.. उठ आणि कपडे घाल ते. नाहीतर वस्तीतील लोक हकलवुन देतील." अभिश्री

"मला वाटते आता तुम्ही निघायला हवं. इथे जास्त वेळ नको थांबायला" कदिरन

"एक मिनिट.. पण आम्हाला तुमच्या बद्दल आणखी जाणुन घ्यायला आवडेल. आतमध्ये नक्की काय आहे..? तुम्ही इथे अश्या ठिकाणी एवढं साधं का राहता..?" नित्या

"हो..हो.. रिपोर्टर मॅडम सगळं याच भेटीत जाणुन घ्याल तर पुढे काय बोलणार." कदिरन

"ठीक आहे. पण लवकरच भेटू." नित्या 

तिचं मन तिथेच घुटमळत होतं. इतरांनाही तिचं उत्सुकता होती. एक वेगळाच अनुभव आणि एनर्जी घेऊन ते सर्व आले त्याच पद्धतीने परत गेले. अभिश्री कदिरनला चांगली ओळखत असली तरी भेट मात्र कमीच होत. त्याचं काम, ओळख सगळ्यांसाठी कोडंच होतं. 

-------------------------------

रात्री जेवताना अभी छान उत्साहात वाटत होती. 

"हममं.. खुश दिसतेय स्वारी. काम जोरात चाललेलं दिसतंय." विजयसिंह

"हो तर… अभीचाच बोलबाला असतो आपल्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये." पी. ए. दळवी

"कसलं काय काका… त्यांची आणि आमची वेवलेंथ जुळेल तर न.." अभिश्री

"वेवलेंथ जुळवण्यात ताकद घालण्यापेक्षा दोघंही समांतर चालले तरी कामं होतील की." पी. ए. दळवी

"म्हणजे…?" अभिश्री

"म्हणजे.. त्यांना सध्या त्यांच्या पद्धतीने काम करू द्या. तुम्ही तुमच्या परीने करा. दोघांच्या पद्धतीमध्ये जे फायदे आहेत ते आपण उचलायचे." पी. ए. दळवी

"काका.. तुमच्या गोष्टी कधी कधी खुप बाऊंसर जातात. अजिबात कळत नाही." अभिश्री

"अगं… त्याच्या गोष्टी मलाच अजुन कळत नाही बघ तू तरी प्रयत्न करुन." विजयसिंह

"आता तिच्या समोर लाजवू नको विजय मला." पी. ए. दळवी

"भाऊजी बरोबरच आहे त्यांचं. तुमचं बोलणं हे फार पुढच्या गोष्टींचा विचार करुन असतं. आता अभीलाही त्याचा खुप सपोर्ट मिळेल." ईश्वरी

दळवी म्हणजे विजयसिंह आणि ईश्वरीचे कॉलेजपासुनचे मित्र. राजकारण आणि विजयसिंहांना त्यांनी पूर्णपणे वाहुन घेतलं होतं. विजयसिंहांच्या राजकारणी प्रवासात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ते कुठलीही गोष्ट, व्यक्ती, प्रसंग अगदी तटस्थ पणे बघत आणि भावना विरहित. त्यामुळे कठीण प्रसंगात सुध्दा ते कधीच डगमगत नसत.

गणू काकांनी वरुन आदिनाथचं भरलेलं ताट आणलं आणि दुधाचा ग्लास घेऊन गेले. ईश्वरी आणि विजयसिंहांची काळजी आता वाढत चालली होती. 

"आई, बाबा डोन्ट वरी. आज याचा सोक्ष मोक्ष लाऊनच राहणार. बस झालं आता.." अभिश्री

तिने परीतोषची बहिण भार्गवीला फोन लावला.

"भागे.. घरी ये तुझ्या मित्राला आता फक्त तूच बाहेर काढू शकते." 

भार्गवी दहाव्या मिनिटाला परीतोषला घेऊन अभिश्रीच्या रुममध्ये पोहचली.

"ह्याला कशाला आणलं..?" अभिश्री

"अगं एवढ्या रात्री ड्रायव्हर काकांना कुठे त्रास देऊ  आणि नसतं आणलं तर पुन्हा हा उद्या रडला असता." भार्गवी

दोघी जणी दात दाखवुन परीतोषकडे हसत होत्या.

"आधी त्याचं दार उघडुन दाखवा मग फुशारक्या मारा." परीतोष

"दारातून नाही खिडकीतून जायचं." अभिश्री

"सगळे उलटे धंदे." परीतोष

तिघंही आदिनाथच्या टेरेसमध्ये जमले. भार्गवी खिडकीतुन आत शिरली. तिच्या अपेक्षेप्रमाणे आदिनाथ ची अवस्था खुप वाईट होती. ४ दिवसात त्याचा चेहरा संपुर्णपणे निस्तेज झाला होता. डोळे जागरण करुन सुजले होते. भार्गवीला बघताच त्याने तिला मिठी मारली. डोळे आणि मन मोकळं केलं. रुमच्या कोंदट वातावरणातुन त्यांनी आदिनाथला बाहेर आणलं. त्यांच्या नाईट अड्ड्यावर. खडकवासला धरणाजवळ रात्री सुरु असणाऱ्या त्यांच्या फेवरेट टपरीजवळ ते पोहचले. समोर धरणाचं बॅकवॉटर, थंड वारा रात्रीची शांतता. या वातावरणात आदिनाथला थोडं बरं वाटलं. एका दगडावर बसून भार्गवी सोबत तो पाण्याकडे बघत होता. भार्गवी एम. बी. बी. एस. करत असुन तिला ह्युमन सायकॉलॉजी मध्ये खास अवड होती. तिच्या बोलण्याने समोरचा माणूस मोटिव्हेट होत. थेट शांभवी बद्दल न बोलता ती त्याच्याशी इतर गप्पा मारत होती. अभिश्री परीतोषकडे दुर्लक्ष करत इकडे तिकडे फिरत होती. पण दोघांचही लक्ष एकमेकांकडे होतं.

परीतोष त्यांच्याकडे धावत आला. 

"अभिश्रीच्या पायाला लागलंय भागू चल लवकर खुप रक्त निघतय."

तिघाही लगेच तिकडे पळाले. अभिश्री छानपैकी गाडीच्या बोनेटवर बसुन कुल्फी खात होती. आदिनाथ आणि भार्गवी त्याच्याकडे रागाने बघत होते.

"बघताय काय तिच्या अंगठ्याला किती लागलंय दिसत नाहीये का रक्त..?" परीतोष

अभिश्रीच्या अंगठ्याचा छोटीशी ठेच लागली होती ज्याच्याकडे तिचं लक्षही नव्हतं.

"मंद आहेस का तु..? किती घाबरलो आम्ही. एवढं तर तिला दिवसातून १० वेळ लागतं" भार्गवी

"तू फर्स्ट एड आण आधी." परीतोष

अभिश्री वैतागून त्याच्याकडे बघत होती. भार्गवीने गाडीतुन फर्स्ट एड आणलं. 

"हळु.. आधी क्लीन कर नीट. मग मलम लाव आणि मग पट्टी." परीतोष

भार्गवीने त्याच्याच हातात फर्स्ट एड दिलं आणि आदिनाथ बरोबर चहा पिण्यासाठी बाजुला गेली. अभिश्री गाडीवरच बसुन होती. तो खाली गुडघ्यावर बसला. थरथरत्या हाताने तिचा पाय मांडीवर घेतला. हळूच फुंकर घातली. आता मात्र तिला काही सुचणं बंद झालं. त्याच्या हातांचा तो प्रेमळ स्पर्श, थंडगार फुंकर बघुन मन त्याच्याभोवती भिरभिरत होतं. त्याने अलगद तिच्या बोटाला मलम लावला. कापूस लाऊन पट्टी बांधली आणि तेवढ्याच अलगदपने दोन्ही हातांनी पाय उचलून खाली ठेवला. तोच अभिश्री भानावर आली. आपण परत अडकत असल्याची तिला जाणीव झाली. ती तशीच तणतणत समोर टपरी जवळ गेली आणि त्याच्या कडे रागाने बघत पट्टी काढून फेकली व पायावर पाणी ओतलं. दुकानदाराकडुन थोडी हळद घेऊन बोटाला लावली.

"झाले तुमचे माकडचाळे..? आता ज्या कामासाठी आलोय ते करुयात का..?" भार्गवी

आता मोर्चा आदिनाथकडे वळला. 

"ह्ममम…आता थेट मुद्द्यावरच येऊ मला वाटते.  तर तू तुझं खरं नाव शांभवीला का नाही सांगितलं…? आणि ते तिला कळलं तर त्यात एवढं काय..? आपण काय चोर, दरोडेखोर, स्मगलर थोडी आहोत." भार्गवी

"एक वेळ ते पुरलं असतं. पण सरपोतदार फॅमिली नको." आदिनाथ

"अरे पण का…?" परीतोष

"तुम्हाला तिचं पुर्ण नाव माहिती आहे का..?." आदिनाथ

"हो.. fb वर बघितलं मी. शांभवी सरिता जाधव." अभिश्री

"आणि वडिलांचं नाव..?" आदिनाथ 

"ओह.. पण ती तर तिच्या मामाकडे राहते न. वडिलांना कधीच सोडून दिलं.. असो काय नाव आहे..?" अभिश्री

"संपतराव शेलार..!!!" आदिनाथ

नाव ऐकुन अभिश्रीच्या हातातील कुल्फी खाली गळून पडली. भार्गवी तर तिथेच मटकन खाली बसली. 

"म्हणजे अमर काका काकींचा मृत्यू त्यांच्याच मुलाने… म्हणजे शांभवी ही..." परीतोष

"हो शांभवी चिरागचीच बहिण ज्याने आई बाबांना जीवे मारलं. त्या घटने नंतर तिच्या आईने शेलारांच घर सोडलं. तेव्हापासून शांभवीच्या मनात तिच्या वडिलांचा आणि राजकारणाचा प्रचंड राग बसला. तिने त्यांचं नाव कधीच लावलं नाही. तिला त्या आठवणी विसरुन एक साधं आयुष्य जगायच होतं. पण मी तेच सर्व तिच्या आयुष्यात परत घेऊन आलो." आदिनाथ

--------------------------------------

संपतराव शेलारांना एक फोन आला आणि त्यांच्या चेहऱ्यावर बऱ्याच वर्षांनी आनंद झळकला.

"वाह पोरी शाब्बास.. मानलं तुला. जे मला १० वर्षात जमलं नाही ते तू १० महिन्यात करुन दाखवलं. माझ्या चिरागचं अधुरं स्वप्न तू नक्की पुर्ण करशील." 

क्रमशः

आदिनाथ आणि शांभवीचं पुढे काय होईल..?

त्यांचं प्रेम पुढे बहरेल की त्यातुन एक राजकारणी कट शिजेल..?

अभिश्रीच्या नुकत्याच सुरु झालेल्या राजकारणी  करिअरवर त्याचा काय परिणाम होईल..?

जाणुन घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

कथा शेअर करताना नावासह शेअर करावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरुर कळवा.

(सदर कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. कथेतील पात्रांचा व घटनांचा वास्तविकतेशी काहीही संबंध आल्यास तो योगायोग असेल. राजकारणा विषयी संपुर्ण ज्ञान मिळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असल्याने त्यातील चुकांसाठी क्षमस्व.)

{ कथा २००४ पासुन सुरु झाली आहे असे ग्राह्य धरण्यात यावे. काळ पुढे सरकल्याने साल २०१५ सुरु झाले आहे.}

रणसंग्राम - एक झुंजार

लेखन : रेवपुर्वा

🎭 Series Post

View all