राणी मी राजाची भाग ७

गोष्ट राजा राणीची

राणी मी राजाची भाग ७


मागील भागाचा सारांश: श्रीने प्रत्येकाच्या रुममध्ये जाऊन त्याने आणलेले गिफ्ट्स दिले आणि सर्वांना एकत्र जेवण करण्यासाठी विनंती केली. आईआजीने श्रीला बिजनेसचा भार सांभाळायला सांगितले. सगळेजण इच्छेविरुद्ध एकत्र जेवण करत आहे, हे श्रीच्या लक्षात आले होते.


आता बघूया पुढे….


घरी असल्यावर श्रीला सकाळी उठून वॉकला जाण्याची सवय होती. आजही तो नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून घराजवळील जॉगिंग ट्रॅकवर वॉक करण्यासाठी निघाला होता. सृष्टी जॉगिंग सूट मध्ये घराबाहेर उभी होती.


"तू माझ्या सोबत वॉक करायला येणार आहेस का?" श्रीने विचारले.


"नाही, मी वॉक करुन आले आहे. आईला योगा क्लासला सोडवायला जायचे आहे, तिचीच वाट बघत उभी आहे." सृष्टीने सांगितले.


श्री आश्चर्याने म्हणाला,

"गायत्री काकू योगा क्लासला जाते. आश्चर्यचं आहे. तू इतक्या लवकर कधीपासून उठायला लागलीस."


"सहा महिन्यांपासून मी वॉकला जात आहे. सकाळी उठून वॉक केल्याने दिवसाची सुरुवात चांगली होते. सुरुवातीला दृष्टी माझ्या सोबत यायची, पण आमचं भांडण झाल्यापासून ती येत नाही." सृष्टीने सांगितले.


तेवढ्यात गायत्री काकू योगा सूट मध्ये आली. तिला बघून श्री म्हणाला,

"काकू तू बराच बदल करुन घेतलास. योगा क्लासला जाते आहेस, हे खरंच खूप चांगलं आहे. मी सांगायचो तेव्हा तू काही ऐकलं नाहीस."


यावर गायत्री काकू फक्त हसली. 


सृष्टी पुढे म्हणाली,

"दादू हा सगळा दिखावा आहे. असो जॉगिंग ट्रॅक बराच बदलला आहे. आमच्या आई साहेबांना क्लासला उशीर झालेला आवडत नाही."


श्री जॉगिंग ट्रॅकच्या दिशेने मार्गस्थ झाला. जॉगिंग ट्रॅकवर बरीच गर्दी दिसत होती. श्री ते बघून मनातल्या मनात म्हणाला,

"काही वर्षांपूर्वी इकडे जास्त कोणी येत नव्हतं. आता लोक बरेच फिटनेस फ्रिक झालेले दिसत आहेत."


श्री कानात हेडफोन टाकून आपली आवडती गाणी लावून वॉक करत होता. श्री आपल्याच धुंदीत होता. जॉगिंग ट्रॅकचं निरीक्षण करता करता श्री वॉक करत होता. गेल्या काही महिन्यात जॉगिंग ट्रॅकमध्ये काय काय बदल झाले? याचे तो निरीक्षण करत होता. पुढे जाऊन श्रीचा धक्का नकळतपणे एका मुलीला लागला, त्या मुलीने वळून बडबड करायला सुरुवात केली. श्रीच्या कानात हेडफोन असल्याने त्याला तिचं काहीच बोलणं कळत नव्हतं, म्हणून श्रीने हाताने तिला थांबायला सांगितले. आपल्या कानातील हेडफोन काढून तो म्हणाला,


"तुम्ही काय म्हणत होता?"


त्या मुलीने बोलायला सुरुवात केली,

"ओ मिस्टर मुलींना धक्के मारायचे असतील, तर दुसरीकडे जा. इथे जॉगिंग ट्रॅकवर त्यासाठी येत जाऊ नका. तुमच्या सारखी मुले एखादी एकटी मुलगी दिसली की धक्का मारायचा चान्स बघत असतात. मी तुमच्या सारख्या मुलांना चांगल्या रीतीने ओळखते. सभ्य पणाचा आव आणून असले उद्योग करत फिरतात."


श्री तिला थांबवत म्हणाला,

"ओ मिस, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझ्याकडून चुकून धक्का लागला असेल, तर त्यासाठी सॉरी, पण उगीच तुमचे भलते सलते आरोप मी ऐकून घेणार नाही. सगळ्या मुलांना एका तराजूत तोलून तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. कानात हेडफोन असल्याने माझ्या लक्षात आले नसेल."


यावर ती मुलगी म्हणाली,

"बरं ठीक आहे. अहो सकाळच्या वेळी कानात हेडफोन घालून वॉक करण्यापेक्षा पक्षांचा किलबिलाट ऐकत निसर्गाचा आनंद घेत वॉक करायचा. असं केल्याने मन प्रसन्न होतं."


श्री काही बोलणार इतक्यात त्या मुलीचे वडील येऊन म्हणाले,

"जान्हवी बाळा मी तुलाच शोधत होतो. घरी जाऊन तुला सगळं आवरुन कंपनीत जायचं आहे ना. चल पटकन आता घरी जाऊयात."


जान्हवी बाबांच्या पाठोपाठ निघून गेली. जाताना श्रीकडे बघून तोंड वाकडं करुन गेली. ती मुलगी निघून गेल्यावर श्री डोक्यावर हात मारत मनातल्या मनात म्हणाला,

"कसल्या मुली असतात राव."


श्री कानात हेडफोन टाकणार तेवढ्यात त्या मुलीचं बोलणं त्याला आठवलं आणि तो कानात हेडफोन न टाकता वॉक करु लागला. वेगवेगळ्या पक्षांचा आवाज ऐकून त्याचं मन प्रसन्न झालं होतं.


वॉक करुन श्री घरी परतला, तेव्हा त्याची आई तुळशीची पूजा करत होती. श्री तुळशी जवळ जायला लागल्यावर त्याची आई लगेच म्हणाली,

"श्री आधी अंघोळ करुन ये. बिना अंघोळीचं तुळशी जवळ यायचं नाही."


श्री तसाच आपल्या रुममध्ये निघून गेला. श्री अंघोळ करुन आपलं आवरुन खाली आला. तेव्हा त्याची आई डायनिंग एरियात चहा पित बसलेली होती. 


"श्री एवढं आवरुन निवरुन कुठं निघाला आहेस?" त्याच्या आईने विचारले.


"आईआजीने मला कंपनीत बोलावले आहे. कंपनीचा भार मी सांभाळावा अशी तिची इच्छा आहे." श्रीने सांगितले.


रमाकाकूंनी श्रीला चहा व पोहे आणून दिले. त्यावेळी सृष्टी आणि दृष्टी दोघीजणी ब्रेकफास्ट करण्यासाठी येऊन बसल्या. दोघींना बघून श्रीला बरे वाटले.


"दादू कंपनीत जाण्याचा तुझा आज पहिला दिवस आहे ना?" सृष्टीने विचारले.


" हो. याआधी जायचो, पण काम करायला म्हणून पहिल्यांदाच जात आहे. वेगळीच फिलिंग आहे. आईआजी खूप मोठी जबाबदारी माझ्या अंगावर टाकत आहे. टेन्शनही आलं आहे. एवढा बिजनेस सांभाळायचा म्हणजे जोक नाहीये." श्रीने सांगितले.


यावर दृष्टी म्हणाली,

"दादू बिजनेस सांभाळण्याची पात्रता तुझ्यात आहे. तुला सगळं काही जमेल."


सृष्टी दृष्टीच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली,

"हो दादू. तू सगळं काही करु शकतो. बिचारी आईआजी तरी किती दिवस काम करेल."


"हो ना. आईआजीला आता आराम करु द्यावा लागणार आहे. चला मी निघतो. पहिल्याच दिवशी उशीर व्हायला नको." श्री म्हणाला.


"आई केव्हाच कंपनीत गेल्या आहेत. त्यांच्या मानाने तुला जायला उशीरचं झाला आहे." श्रीची आई म्हणाली.


श्री आपल्या जागेवरुन घाईघाईने उठला. आईच्या पाया पडून आशिर्वाद घेतला आणि घराबाहेर पडला. ड्रायव्हर गाडी घेऊन त्याची वाट बघत होता.


"श्री साहेब मोठया मॅडमने तुम्हाला कंपनीत घेऊन जायची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे." ड्रायव्हरने सांगितले.


श्री मान हलवून गाडीत बसला. 


"तुझं नाव काय रे? तू नवीन जॉईन झाला आहेस का?" श्रीने विचारले.


"साहेब माझे नाव नितीन आहे. मॅडमच्या गाडीवर जे ड्रायव्हर आहेत ना, ते माझे काका आहेत. त्यांच्यामुळेचं मोठया मॅडमने एका महिन्यापासून मला कामावर ठेवले आहे. तुम्हाला कुठेही घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे." ड्रायव्हरने उत्तर दिले.


यावर श्री म्हणाला,

"तू प्रकाश काकांचा पुतण्या आहे तर, म्हणजे तू दररोज माझ्या सोबत असशील का?" 


"हो साहेब." ड्रायव्हरने मान हलवून उत्तर दिले.


रस्त्याने जाताना श्री आजूबाजूचा परिसर न्याहाळत होता. तो म्हणाला,

"गेल्या सात महिन्यात बराच बदल झाला आहे रे."


"हो साहेब. एका महिन्यात रस्त्यावर एकतरी नवीन दुकान तयार होते. आजकाल लवकर बदल होत चालले आहेत. आमच्या गावाकडेही असंच होतं." नितीनने सांगितले.


"गावाकडे कोणकोण राहतं?" श्रीने विचारले.


"माझे आई वडील, एक मोठा भाऊ आहे, तो शेती करतो. सहा महिन्यांपूर्वी त्याचं लग्न झालंय. शेतीवर आमच्या दोघांचं पोट भागलं नसतं, म्हणून काका मला इकडे शहरात घेऊन आलेय." नितीनने सांगितले.


श्री म्हणाला,

"म्हणजे तुझं लग्न झालं नाहीये तर.."


"हो साहेब. अजून झालं नाहीये, पण काही महिन्यांनी करण्याचा विचार आहे." नितीनने सांगितले.


"लग्न जमलंय का?" श्रीने विचारले.


नितीन म्हणाला,

"नाही साहेब. एका मुलीवर माझं खूप प्रेम आहे. तिच्या वडिलांना जावई शहरात नोकरी करणारा पाहिजे. थोडे पैसे जमले की, तिच्या घरी जाऊन तिचा हात मागेल. साहेब तिचंही माझ्यावर प्रेम आहे, पण तिच्या वडिलांनी अट घातल्याने आमचं लग्न पुढे ढकललं."


"बरं सगळं असं आहे तर.." श्री म्हणाला.


दोघांच्या गप्पा सुरु असताना गाडी कंपनी जवळ येऊन थांबली. श्री गाडीतून खाली उतरला.


श्री चा कंपनीतील पहिला दिवस कसा जाईल? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe






🎭 Series Post

View all