राणी मी राजाची भाग ६

गोष्ट राजा राणीची
राणी मी राजाची भाग ६

मागील भागाचा सारांश: श्री घरी आला तेव्हा घरातील चित्र बघून तो स्वतःच सरप्राईज झाला होता. घरातील वातावरण पहिल्यासारखे राहिलेले नव्हते, हे बघून श्रीला वाईट वाटले होते.

आता बघूया पुढे….

"आईआजी आत येऊ का?" श्रीने दरवाजावर नॉक करुन विचारले.

"श्री ये ना." आजीने सांगितले.

रुममध्ये गेल्यावर आपल्या हातातील शाल आजीच्या हातात देत श्री म्हणाला,
"मार्केटमध्ये फिरत असताना या शालीवर नजर गेली आणि तुझी आठवण आली, म्हणून ही शाल तुझ्यासाठी आणली आहे."

शाल हातात घेऊन आजीने निरखून बघितली व ती म्हणाली,
"श्री शाल मस्त आहे. मला आवडली."

"आजी आपल्या घराचं काय करुन ठेवलं आहेस? सगळे असे विखुरले का गेलेत? सगळंच बदललं आहे ग. तू असताना असं का झालं?" श्रीने आजीकडे बघून विचारले.

आजी म्हणाली,
"श्री संस्कारांची जागा आधुनिक विचारांनी घेतली. मी लादलेल्या नियमांनी सगळेजण घुसमटायला लागले होते. पळवाटा शोधू लागले होते. मग मीच सगळे नियम बंद करायला सांगितले. प्रत्येकाला पटेल तसं वागण्याची मुभा दिली. सगळ्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं. सगळ्याचं गोष्टी बघवल्या जात नाहीत, म्हणून मी घरात असले की, रुमच्या बाहेर जात नाही. मी सगळ्यांना जोडून ठेवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना कोणतीच बंधने नको होती. एकाच घरात राहून प्रत्येकजण वेगळं राहिल्यासारखा जगतो आहे. तुझी आई आणि सृष्टी सोडता माझ्या रुममध्ये येऊन कोणीच माझी विचारपूस करत नाही. लक्ष्मण आणि भरतला बघून कित्येक दिवस लोटले असतील, त्यांना त्यांच्या ह्या म्हाताऱ्या आईची आठवण सुद्धा येत नाही. असो तुझा प्रवास कसा झाला?"

आजी तिच्या डोळ्यातील पाणी लपवत आहे, हे श्रीच्या लक्षात आले होते.

"आईआजी माझा प्रवास छान झाला. आपल्या घरातील चित्र बघून खूप वाईट वाटलं. सगळयांना एकत्र आणावे लागेल आणि त्यासाठी मलाचं काहीतरी करावे लागेल." श्रीने सांगितले.

यावर आईआजी म्हणाली,
"श्री आता कंपनीची जबाबदारी तू घे. मला वयोमानानुसार हे सगळं पेलवत नाही. या घराला एकत्र आण किंवा नको आणूस, याबद्दल मी काही बोलणार नाही. पण कंपनीकडे आता तू लक्ष दे. कंपनीला नवीन मालकाची व नवीन कल्पनांची आवश्यकता आहे. आता ह्या यशोमती देशमुखला हे सगळं पेलवत नाही. देशमुख फूड्सला तुझी गरज आहे."

"आईआजी तू लगेच रिटायर होण्याची भाषा करु नकोस. मला तुझ्याकडून अजून बरंच काही शिकायचं आहे. मी लगेच देशमुख फूड्सचा पदभार स्विकारणार नाही." श्रीने सांगितले.

आजी पुढे म्हणाली,
"श्री हे आजही तुलाच सांभाळायचे आहे आणि उद्याही तुलाचं. तुझे आजोबा गेल्यावर एका रात्रीत माझ्यावर ही जबाबदारी येऊन पडली होती. मी तुझ्या मार्गदर्शन करायला असेलच, पण आता मला ही दररोजची धावपळ करायला सांगू नकोस."

"बरं यशोमती देशमुख मॅडम, उद्या सकाळी मी तुमच्या सोबत कंपनीत येईल. मग पुढच्या गोष्टी ठरवू. आता बाकीच्यांसाठी आणलेले गिफ्ट्स त्यांच्या रुममध्ये नेऊन देतो. सगळेजण एकत्र भेटणार नाहीतचं." श्री एवढं बोलून आजीच्या रुममधून निघून गेला.

"आई आता येऊ का?" श्रीने आईच्या दरवाजावर नॉक करुन विचारले.

"श्री परवानगी काय मागतोस? ये ना." आई म्हणाली.

"आपल्याकडे सगळ्यांना आपापली प्रायव्हसी लागते असं मला कळलंय, म्हणून परवानगी घेतल्या शिवाय कोणाच्या रुममध्ये जायचं नाही, हे ठरवले आहे." श्रीने सांगितले.

"तुला काही हवं आहे का?" आईने विचारले.

"नाही ग. मी घरातील महिला वर्गासाठी शाल आणल्या आहेत, तिचं दयायला आलो होतो. आईआजी पासून सुरुवात केली. तुझं भगवद्गीता पठन झालं का?" श्रीने विचारले.

"हो झालं ना. अरे श्री आता सगळा स्वयंपाक रमा करुन घेते. घरातील सगळ्या कामांसाठी बाई आहे, मग मला काहीच काम करावं लागतं नाही. मोकळा वेळ कुठेतरी सत्कारणी लावावा, म्हणून संध्याकाळी हरिपाठ करायला जाते. त्यानिमित्ताने चार बायका भेटतात, गप्पागोष्टींमध्ये वेळ निघून जातो." आईने सांगितले.

श्री म्हणाला,
"आई तू गायत्री काकू व छोट्या काकू सोबत बोलत नाही का?" 

"त्या दोघींना मी काही विचारलेलं आवडत नाही. माझं देवदेव करणं त्यांना आवडत नाही. माझी उडवत बसतात, त्यापेक्षा मी त्यांच्यासोबत बोलणंच बंद केलं. बोलून भांडण करण्यापेक्षा अबोला बरा." आईने उत्तर दिले.

"आई आपलं घर पहिल्यासारखं व्हावं, असं तुला वाटत नाही का?" श्रीने विचारले.

"वाटत ना, पण ते शक्य नाहीये. एकदा मन कलुषित झालं की, पुन्हा शुद्ध होणे कठीण असते." आईने उत्तर दिले.

"बरं आई मी बाकीच्यांना गिफ्ट्स देऊन येतो. थोड्या वेळात खाली जेवायला ये." श्री एवढं बोलून बाहेर निघून गेला.

"काका- काकू आता येऊ का?" श्रीने विचारले.

"अरे श्री ये ना. तुझी काकू तू आल्याचे मला आत्ताच सांगत होती." लक्ष्मण काका म्हणाले

श्रीने काकांना नमस्कार केला. आपल्या हातातील पिशवी काकांच्या हातात देत श्री म्हणाला,
"काका या पिशवीत थर्मल जॅकेट आहे आणि काकूसाठी शाल आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा करतो. काका जेवण करताना गप्पा मारु."

एवढंच बोलून श्री पटकन रुममधून बाहेर पडला. श्रीने भरत काकाच्या रुममध्ये जाऊन सेम संभाषण केले. आता श्री सृष्टीच्या रुममध्ये गेला.

"चिऊ तुझ्यासाठी आणि माऊसाठी स्वेटर आणले आहे. रंग आणि डिझाईन दोन्ही एकसारखेच आहे, जेणेकरुन तुमच्या दोघींची भांडणं होणार नाही. आता वाटतंय की, वेगळे आणले असते तरी चालले असते, तुम्हाला दोघींना जास्त काही फरक पडला नसता. तुमची भांडणं व्हायला तुम्ही बोलायला तर पाहिजे."

"दादू असं का बोलतो आहेस? आमच्या दोघींमध्ये भांडणं होतात,म्हणून आई आणि काकूने आम्हाला बोलण्यास मनाई केली आहे." सृष्टीने सांगितले.

श्री म्हणाला,
"या घरातील मोठ्या लोकांना काही कळत नाहीच, पण तुम्हाला दोघींनाही काहीच कळत नाही, हे बघून जास्त वाईट वाटलं. हे दुसरं स्वेटर तू दृष्टीला तिच्या रुममध्ये नेऊन दे आणि मी तिला जेवणासाठी खाली बोलावले आहे, असं सांग."

श्रीच्या सांगण्यावरुन सृष्टीने दृष्टीला श्रीचा निरोप दिला. श्रीने सगळ्यांना जेवणासाठी खाली जेवायला बोलावले होते, म्हणून एकेकजण खाली येऊन डायनिंग टेबलच्या इथे बसले. आईआजी सोडून सगळेजण आलेले होते. सगळेजण एकत्र बसले होते, पण कोणीच कोणाशीच काहीच बोलत नव्हते. श्रीने रमाकाकूंना आईआजीला जेवणासाठी खाली बोलवायला सांगितले. 

सगळ्यांना डायनिंग टेबलच्या इथे एकत्र बघितल्यावर आईआजीला आश्चर्य वाटले. आईआजी बसल्यावर रमाकाकूंनी जेवायला वाढले. सगळेजण खाली मान घालून जेवत होते. श्री सर्वांची जेवणं होण्याची वाट बघत होता. सगळ्यांची जेवणं झाल्यावर श्री उठून उभा राहिला व म्हणाला,

"माझ्या शब्दाला मान देऊन आपण सगळे इथे जेवायला एकत्र आलात, त्याबद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे. तुम्ही सगळेजण बळजबरी आल्यासारखेच जेवण करत होतात. उद्यापासून मी कोणालाही इथे येऊन एकत्र जेवण करण्याचा आग्रह करणार नाही. जेव्हा तुमची मनापासून इच्छा होईल, तेव्हा याल. आपल्या घरातील आपली माणसं एकमेकांपासून एवढी दूर गेलेली बघून माझ्या मनाला खूप यातना झाल्या. आता तुमच्यात काय झालं होतं? तुम्ही सगळे असे का वागत आहात? याबद्दल मी कोणाशीही बोलणार नाही, कारण प्रत्येकाला आपापली बाजू योग्य वाटत असेल. असो मी दररोज नेहमीच्या वेळेला सकाळचा ब्रेकफास्ट आणि रात्री जेवण करायला डायनिंग टेबलवर येणार आहे. आपल्यापैकी कोणाला जॉईन व्हायचं असेल, तर होऊ शकता. या घरातील माणसं एकत्र जोडलेली रहावी असं मला वाटतं. मला हे घर पहिल्यासारखं बघायचं आहे. मी कोणावरही जबरदस्ती करणार नाही. तुमचं स्वातंत्र्य तुमच्या पासून कोणीही हिरावून घेणार नाही. मला घर असं पाहिजे की, बाहेरच्या जगातून घरी येण्याची ओढ लागावी.

'घर असावे घरासारखे,
नकोत नुसत्या भिंती,
त्या नात्यांना अर्थ असावा,
नकोत नुसती नाती.'

श्री त्याच्या घरातील सगळ्यांना पुन्हा एकत्र आणू शकेल का? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe






🎭 Series Post

View all