राणी मी राजाची भाग ४

गोष्ट राजा राणीची

राणी मी राजाची भाग ४


मागील भागाचा सारांश: श्रीने भारतात आपल्या घरी परतून घरच्यांना सरप्राईज देण्याचे ठरवले होते. आपल्या कथेची नायिका जान्हवी हिची आपण ओळख करुन घेतली. 


आता बघूया पुढे….


जान्हवीला कंपनीत वेळेवर पोहोचण्याची सवय होती, त्यासाठी दररोज तिची बरीच धावपळ होत होती. जान्हवी नेहमीप्रमाणे वेळेवरचं कंपनीत पोहोचली होती. कंपनीत गेल्यावर जान्हवी सिक्युरिटी गार्डपासून प्रत्येकाला स्माईल देऊन गुडमॉर्निंग विश करण्याची सवय होती.


जान्हवी आपल्या जागेवर जाऊन बसली. तिच्या शेजारी बसणारी साक्षी आधीच कंपनीत आलेली होती.


"गुड मॉर्निंग साक्षी, आज इतक्या लवकर कशी काय आलीस?" जान्हवीने विचारले.


"घरी मावशी आलेली आहे. घरी असलं की, उगाच डोकं खात बसते, त्यापेक्षा कंपनीत येऊन बसलेलं बरं." साक्षी वैतागून म्हणाली.


जान्हवी म्हणाली,

"अग आपल्यापेक्षा मोठी माणसं जर आपल्याला चार समजुतीच्या गोष्टी सांगत असतील, तर ऐकून घ्यायचं. मला तर घरी पाहुणे आलेले खूप आवडतात. माझी आत्या आलेली आहे, तर बाबा आणि आत्यासाठी साग्रसंगीत स्वयंपाक करुन आले आहे. आत्त्याला वरण-भात, भाजी, पोळी असं दोन्ही वेळेला लागतं. बिचाऱ्यांना घरी खूप काम असतं, आराम अजिबात मिळत नाही, मग आमच्याकडे चार दिवस आरामासाठी येतात."


साक्षी हात जोडून म्हणाली,

"जान्हवी मॅडम आपल्या सारख्या महान फक्त आपणचं असाल. तुझ्या आत्त्याला मी भेटले आहे, त्यामुळे त्या खऱ्या कश्या आहेत, हे मला ठाऊक आहे. तुझ्यासारखं वागणं फक्त तुलाच जमतं. मी इतकी ग्रेट नाहीये. माझी मावशी घरातील कामांवरुन बोलायला जे सुरुवात करते, ते माझ्या लग्नापर्यंत, सासू सासऱ्यांपर्यंत आणि कधी कधी माझ्या मुलांपर्यंत पोहोचते. मला तिचं बोलणं काही झेपत नाही."


साक्षी व जान्हवीचं बोलणं चालू असताना गोपाळ येऊन म्हणाला,

"जान्हवी मॅडम तुम्हाला यशोमती मॅडमने बोलावलं आहे. मॅडम जरा चिडलेल्या आहेत."


"मॅडम इतक्या लवकर आल्या पण आहेत!" जान्हवीने आश्चर्याने गोपाळकडे बघून विचारले.


यावर साक्षी म्हणाली,

"हो मॅडमला येऊन बराच वेळ झाला आहे. मॅडम काही वेळापूर्वी कोणाशी तरी खूप जोरजोरात बोलत होत्या."


"बरं मी पटकन जाऊन येते, नाहीतर माझ्यावर सगळा राग निघेल." जान्हवी बोलून यशोमती मॅडमच्या केबिनकडे गेली.


"मे आय कम इन मॅडम." जान्हवीने मॅडमची परवानगी मागितली.


"हो ये ना." मॅडमने सांगितले.


जान्हवी केबिनमध्ये जाऊन मॅडम समोर उभी राहिली. 


"अग उभी का? बस ना. मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे." मॅडमने सांगितल्यावर जान्हवी त्यांच्या समोरील खुर्चीत बसली. जान्हवीच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसून येत होते.


मॅडमने हातातील फाईल बाजूला ठेवली आणि त्या जान्हवी कडे बघून म्हणाल्या,

"तू फार टेन्शन घेऊ नकोस. मला इन जनरल तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. आपल्या कंपनीत इतरही स्टाफ आहे, पण ते पगाराइतकचं काम करतात. तू एकमेव अशी व्यक्ती आहेस की, तू तुझं काम अगदी मन लावून करतेस आणि इतरांना त्यांच्या कामात मदतही करतेस. उदाहरणार्थ, तुझ्या शेजारी असलेल्या साक्षीचं निम्मं काम तुचं करत असशील. 


असो, मला तुझ्यासोबत थोड्या वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. गेल्या काही वर्षांपासून मी ह्या बिजनेस मध्ये आहे. आज आपल्या प्रॉडक्ट्चे जे काही मार्केट तयार झालं आहे, ते एका दिवसात झालं नाहीये, त्यासाठी हळूहळू एकेक पावलं उचलावी लागली होती.


आता सध्या आधुनिक जग सुरु झालं आहे. जुन्या पद्धती मागे पडत चालल्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून आपला मालाचा होणारा सेल घटत चालला आहे. मार्केटमध्ये आपल्या मालाची विक्री घटली आहे. वर्षातून एखादा दुसरा महिना असा उगवत होता, पण यावेळी घट जरा जास्तचं आहे. आपल्या मालाची टेस्ट तीच आहे, तरीही मागणी का घटली असेल? तुला याबद्दल काय वाटतं?"


जान्हवी पुढे म्हणाली,

"मॅडम तुम्ही मला या विषयावर बोलण्याची संधी देत आहात, हेच माझ्यासाठी खूप आहे. मॅडम टेस्ट जरी तिचं असली, तरी काळानुसार आपल्याला काही बदल करावे लागतील. आपल्या वेफर्सची जी काही टेस्ट आहे, ती अप्रतिमचं आहे, त्याला तोड नाही, पण आपली मार्केटींग स्ट्रँटर्जी चुकत असेल. आपल्या कडून हवं तसं मार्केटींग होत नसेल, म्हणून हा परिणाम झाला असेल. मॅडम तुम्ही ज्यावेळी मार्केटमध्ये उतरला होता, त्यावेळी मोजकेच प्रॉडक्ट बाजारात होते, आता कॉम्पिटिशन खूप वाढली आहे, या सगळ्याचा विचार आपल्याला करावा लागेल."


"जान्हवी मला तुझं सगळं म्हणणं पटतंय, पण यावर उपाय काय?" यशोमती मॅडमने विचारले.


"पहिल्या काळात जाहिरातीचं माध्यम हे एकतर वर्तमानपत्र होतं किंवा टेलिव्हिजन. पण आता सोशल मीडियावर जास्त मार्केटींग होत आहे. आपण आपल्या कंपनीच्या प्रॉडक्टची जाहिरात सोशल मीडियावर करायला पाहिजे. अजून दुसरं म्हणजे आपण पॅकिंगची डिझाईन बदलली तर अजून फायदा होऊ शकेल, त्यासोबत आपण आपली एखादी टॅगलाईनही टाकू शकतो. जसं स्टारप्लस या चॅनलने त्यांची टॅगलाईन "रिश्ता वही सोच नयी" अशी टाकली होती. तसं काहीतरी आपणही करायला पाहिजे." जान्हवीने सांगितले.


यशोमती मॅडम म्हणाल्या,

"बरं पुढच्या आठवड्यात माझा नातू येणार आहे, तसंही ही कंपनी आता त्यालाच चालवायची आहे. मी ह्या मुद्द्यांवर त्याच्या सोबत बोलेल आणि काही मदत लागली तर तुला सांगते."


"हो चालेल. मॅडम मी येऊ का?" जान्हवीने खुर्चीतून उठता उठता विचारले.


मॅडमने मान हलवून होकार दिला. जान्हवी आपल्या जागेवर जाऊन आपल्या कामाला लागली.


–----------------------------------------------------


श्रीचे विमान मुंबई इंटरनॅशनल विमानतळावर लॅन्ड झाले. श्री आपलं सामान घेऊन एअरपोर्टच्या बाहेर येऊन उभा राहिला. श्री टॅक्सीची वाट बघत होता. घरी कोणाला कळवू द्यायचं नसल्याने गाडी श्रीला बोलावता आली नव्हती. टॅक्सी आल्यावर ड्रायव्हरने श्रीचं सामान गाडीत ठेवलं आणि श्री टॅक्सी मध्ये बसला.


"जवळपास पंधरा मिनिटे मी तुमची वाट बघत होतो. वेळेवर का आला नाहीत?" श्रीने दरडावून विचारले.


"साहेब आपल्या कडचे रस्ते आणि ट्रॅफिक मुळे कुठेही वेळेवर पोहोचता येत नाही. जरा समजून घ्या." ड्रायव्हर म्हणाला.


श्री म्हणाला,

"अहो, मग थोडं लवकर निघायचं. ट्रॅफिक आणि रस्त्याचे कारण दिले की झालं. लंडनमध्ये टॅक्सी उशीरा आलीतर भाडं कमी घेतात. आपल्याकडील लोकांना दुसऱ्याच्या वेळेची किंमतचं नसते."


"साहेब नाशिक पर्यंत तुम्ही आता हेच ऐकवणार आहात का?" ड्रायव्हरने विचारले.


यावर श्री म्हणाला,

"नाही रे बाबा. प्रवासाने डोकं जरा जड पडलंय."


ड्रायव्हर चुटकी वाजवून म्हणाला,

"अहो साहेब एवढंच ना, मग तुम्हाला टपरीवरचा कडक चहा पाजतो, एका घोटात डोकं हलकं होईल."


ड्रायव्हरने पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका टपरी जवळ गाडी थांबवली. श्रीसाठी कडक चहा घेऊन आला. चहा पिल्यावर श्रीला जरा बरं वाटलं. ड्रायव्हरने गाडी पुन्हा सुरु केली.


"साहेब लंडनमध्ये आपल्या सारखा चहा मिळतो का?" ड्रायव्हरने विचारले.


"नाही. तिकडे आपल्या सारखं काहीच मिळत नाही." श्रीने उत्तर दिले.


"साहेब तुम्ही सुट्टीला आला आहात का? की कायमचे इथेच राहणार?" ड्रायव्हरने पुढील प्रश्न विचारला.


श्री थोडा चिडून म्हणाला,

"मी शिक्षणासाठी म्हणून तिकडे गेलो होतो. आता कायमस्वरूपी इकडेच राहणार आहे. आता प्लिज मला काहीच विचारु नका. एकतर माझं डोकं पुन्हा दुखायला सुरुवात होईल. मी खूप महिन्यांनी परत आलो आहे, तर मला जरा बाहेरचा निसर्ग बघू द्या. तुम्ही आपलं गाडी चालवायचं काम करा."


श्री आजूबाजूच्या परिसराकडे कुतूहलाने बघत होता. रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडी, गाड्या, लोकांची गर्दी. सर्वत्र आपल्या सारखे दिसणारे लोकं. काही महिन्यांपूर्वी हे सगळं असंच होत का? याचा विचार श्री करत होता. खिडकीतून इकडे तिकडे बघताना श्रीचा डोळा लागला. 


नाशिक आल्यावर ड्रायव्हरने श्रीला झोपेतून उठवले. श्रीने ड्रायव्हरला त्याचा पत्ता सांगितला.


श्रीचं सरप्राईज घरातील सगळ्यांना कसं वाटेल? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all