राणी मी राजाची भाग ४४
मागील भागाचा सारांश: सृष्टी व दृष्टीने श्रीला सांगितले की, जान्हवी श्रीसाठी परफेक्ट मॅच आहे. त्या दोघींनी श्रीला जान्हवीकडे एक लाईफ पार्टनर म्हणून बघण्यास सुचवले. श्री जान्हवीकडे त्या नजरेने बघू लागला होता.
आता बघूया पुढे…..
घरी गेल्यावर श्रीला सृष्टी हॉलमध्ये बसलेली दिसली. श्रीने तिला रुममध्ये ये, म्हणून सांगितले.
"बोल काय म्हणतोस?" सृष्टीने रुममध्ये जाऊन श्रीला विचारले.
"तू एवढी तोऱ्यात का बोलत आहेस? काही कामात होतीस का?" श्री म्हणाला.
"दादू मी जरा थकले होते,म्हणून शांत हॉलमध्ये बसले होते." सृष्टीने सांगितले.
श्री म्हणाला,
"बरं ते जाऊदेत. तुम्ही त्या दिवशी मला जान्हवी बद्दल जे सुचवलं होतं, त्याप्रमाणे मी जान्हवीकडे त्या दृष्टीने बघायला सुरुवात केली होती. मला तसंही जान्हवी सोबत बोलताना कम्फर्टेबल वाटायचं.
माझ्या बायको कडून ज्या बेसिक अपेक्षा आहेत, त्या जान्हवी पूर्णपणे पार पाडू शकेल, म्हणजे हे बघ माझ्या बायकोने माझं काम समजून घेणं मला आवश्यक वाटत होतं. जान्हवी कंपनीत काम करत असल्याने तिला सगळंच माहीत आहे. माझ्या बायकोला स्वयंपाकाची थोडीफार आवड असावी असं मला वाटत होतं, तर जान्हवी सुगरण आहे. माझ्या बायकोमध्ये माणुसकी असावी असं वाटत होतं, जान्हवी मध्ये बऱ्यापैकी माणुसकी आहे. माझ्या बायकोने माझ्या घरातील माणसांना सांभाळून घ्यावं असं वाटत होतं, तर जान्हवीला माणसांची आवड आहे.
जान्हवी खरंच माझ्यासाठी परफेक्ट मॅच आहे. जान्हवी जर माझ्या आयुष्यात आली, तर मी खूप आनंदी होईल. आपल्या घरातील संस्कार तिच्यामुळे अबाधित राहतील."
यावर सृष्टी म्हणाली,
"दादू हे सगळं आम्ही तुला त्या दिवशी सांगत होतो. बरं मग तू तिला प्रपोज कधी करणार आहेस?"
"तेच तर टेन्शन आलं आहे. ती नाही म्हणाली तर काय करायचं?" श्री म्हणाला.
"जान्हवी एकतर तुला नकार देणारचं नाही, पण समजा ती मिडल क्लास आहे, म्हणून जर ती तुला नकार देत असेल, तर तू तिला व्यवस्थित रित्या सगळी परिस्थिती समजावून सांग." सृष्टीने सांगितले.
श्री म्हणाला,
"बरं आता तिला प्रपोज कसं करायचं? याचा विचार करतो."
"दादू एक सुचवते. जान्हवी खूप साधी सरळ मुलगी आहे. साधं एक गुलाबाचं फुल देऊन प्रपोज केलं तरी चालेल. जास्त काही करत बसू नकोस. हवंतर तुला बोलायला जड जात असेल, तर एका चिठ्ठीत तुझ्या मनातील भावना लिहून तिला दे." सृष्टी म्हणाली.
जान्हवीला प्रपोज कसं आणि कधी करायचं? हा एकच विचार श्रीच्या डोक्यात घोळत होता.
------------------------------------------------------
जान्हवीची आई तिच्या घरी आल्याने तिने काही दिवसांसाठी कंपनीतून सुट्टी घेतली होती. जान्हवी व तिच्या आईने भूतकाळातील क्षण जगायचे ठरवले होते. जान्हवीच्या आईने जान्हवीला घरातील एकाही कामाला हात लावू दिला नाही. खूप वर्षांनी जान्हवीला असा आराम मिळत होता. आईला जान्हवीने बदललेलं नाशिक दाखवलं. दोघी मायलेकी बऱ्याच ठिकाणी फिरल्या, खरेदी केली. जान्हवी व तिच्या आईने भरपूर मजा केली.
"जान्हवी श्री देशमुख हे तुझे बॉस असून सुद्धा तुझी इतकी मदत ते का करत आहेत? म्हणजे घर वाचवण्यापासून ते माझ्यापर्यंत तुला घेऊन येण्यापर्यंत." आईने विचारले.
"आई देशमुख फॅमिलीतील सर्वचजण माणुसकी जपतात. श्री सरांच्या वडिलांनी तुला अनोळखी असून सुद्धा मदत केली होती, तर त्यांचा गुण त्यांच्या उतरलेला असेल. सध्यातरी श्री सर व माझ्यात मैत्रीचे नाते आहे." जान्हवीने सांगितले.
यावर आई म्हणाली,
"फक्त मैत्री आहे की त्यापलीकडे काही आहे?"
जान्हवी हसून म्हणाली,
"आई आत्ता तू एकदम टिपिकल आई सारखी बोललीस बघ. आई खरंच आमच्यात तसं काहीच नाहीये. तू आल्यापासून तर आमच्यात काहीच बोलणे झाले नाहीये."
"तुझ्या बाजूने काही नसेलही, पण त्यांच्या बाजूने असेल तर…." आईने जान्हवी समोर प्रश्नचिन्ह उभे केले.
जान्हवी म्हणाली,
"आई जी गोष्ट कधी घडेल किंवा घडणारही नाही, त्याबद्दल आत्ता विचार करुन काहीच उपयोग होणार नाही. समजा असं काही घडलंच तर त्यावेळेस बघू."
"हे बघ जान्हवी. देशमुख चांगले आहेत किंवा ते माणुसकी जपतात याबद्दल माझं काहीच दुमत नाहीये, पण ती मोठी माणसं आहेत, त्यांचे छंद आपल्या कल्पनेच्या पलीकडील असतात. मी तुला जरा स्पष्टचं सांगते. राम दादा जेवढे चांगले मला वाटायचे तेवढे ते चांगले नव्हते. वाईट सवयी त्यांनाही होत्या. एकदा माणसाच्या आयुष्यात बाई आणि बाटली आली की काही खरं नसतं.
मी स्वतः राम दादांना कित्येक वेळेस परस्त्री सोबत बघितले होते. माझं आणि त्यांचं या विषयावर बऱ्याचदा बोलणंही झालं होतं, पण राम दादा एका वेगळ्याच दुःखात होते.
त्यांचा मुलगा त्यांच्या सारखाच असेल असं नाही, पण आपण अश्या लोकांपासून दोन हात दूर राहिलेलं बरं." आईने सांगितले.
यावर जान्हवी म्हणाली,
"आई तू श्री सरांच्या वडिलांचा विषय काढलाचं आहे, तर विचारते. ते आता सध्या कुठे आहेत? याबद्दल तुला काही कल्पना आहे का?"
"ते रागाच्या भरात घर सोडून गेले होते, एवढंच मला माहित होतं. राम दादा भारतात नाहीयेत हे मात्र तितकंच खरं. घर सोडून गेल्यावर काही दिवसांनी त्यांनी मला फोन करुन डोनेशनचा चेक कोणाकडून घ्यायचा याबद्दल सांगितले होते, तेव्हा ते भारतात नाही याची कल्पना आली होती. बाकी मला काहीच कल्पना नाहीये." आईने उत्तर दिले.
-----------------------------------------------------
जान्हवी सुट्टीवर असल्याने श्रीला कंपनीत बोअर व्हायचं. जान्हवी सकाळी वॉकला सुद्धा येत नव्हती, त्यामुळे तीन ते चार दिवस श्री व जान्हवीची भेटचं होऊ शकली नव्हती. जान्हवीची आई तिच्या सोबत असल्याने श्री तिला फोनही करु शकत नव्हता आणि तिच्या घरी जाऊन डायरेक्ट भेटही घेऊ शकत नव्हता. श्री जान्हवीच्या प्रेमात खरंच पडला होता, त्याला तिची खूप आठवण येत होती.
एके दिवशी श्री आपल्या केबिनमध्ये काम करत बसलेला होता.
"सर तुम्हाला भेटण्यासाठी कोणीतरी आलं आहे." संदीपने येऊन सांगितले.
"कोण आलंय? त्यांचं नाव काय?" श्रीने विचारले.
"माहीत नाही सर. मी त्यांना त्यांचं नाव विचारलं, पण त्याचं म्हणणं आहे की, त्यांना तुम्हालाच भेटायचं आहे. सुरुवातीला त्यांनी यशोमती मॅडम आहेत का? म्हणून विचारलं होतं. तुम्ही आता कंपनीचे बॉस आहे, हे कळल्यावर त्यांनी तुम्हाला भेटायचे आहे, असं सांगितलं. दिसण्यावरुन तरी ते एक जंटलमन वाटत आहेत." संदीप म्हणाला.
"बरं त्यांना आत पाठवून दे." श्रीने सांगितले.
"मे आय कम इन." आवाज आल्यावर श्रीने दरवाजाकडे बघितले.
श्री स्माईल देऊन म्हणाला,
"तुम्ही! इकडे कसे? प्लिज आत या ना."
समोरील व्यक्ती श्री समोरील खुर्चीत येऊन बसली व म्हणाली,
"ही कंपनी तुझी आहे का?"
"नाही. ही कंपनी माझ्या आजी आजोबांची आहे. मी फक्त आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम करत आहे. आपली भेट पुन्हा इतक्या लवकर भारतात होईल असं वाटलं नव्हतं. तुम्ही तुमच्या फॅमिलीला भेटला का? आणि तुम्ही इथे का आला आहात? कारण मी तुम्हाला माझे पूर्ण नावही सांगितले नव्हते आणि माझा पत्ताही सांगितला नव्हता." श्रीने विचारले.
"प्रश्नही तुचं विचारला आहेस आणि उत्तरही तुचं दिले आहेस. त्याआधी मला एक सांग की, तुझे पूर्ण नाव काय आहे?" ती व्यक्ती म्हणाली.
"माझं नाव श्री राजाराम देशमुख." श्रीने उत्तर दिले.
"राजारामला भेटला आहेस का?" त्या व्यक्तीने विचारले.
"मी सात वर्षांचा असताना त्यांची आणि माझी शेवटची भेट झाली होती. आता भेटण्याची इच्छा भरपूर आहे, पण आमची भेट होत नाहीये." श्रीने उत्तर दिले.
"हे जग गोल आहे, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी आपण एवढे तडफडत असतो, ती व्यक्ती आपल्या समोर येऊन उभी राहिली तरी आपल्याला कळत नाही. कारण आपण डोळे असून नीट बघत नाही आणि डोकं असून आपण विचार करत नाही." ती व्यक्ती म्हणाली.
श्री थोडा चिडून म्हणाला,
"मि. राम हे तुमचं काय सुरु आहे? तुम्ही माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि वरुन कोड्यात बोलत आहात."
"मि. राम या नावातचं सगळं काही आहे. आपल्या मुलाला आपला चेहराही आठवत नाही, यासारखं दुर्दैव कोणतंच नाही. माझं पूर्ण नाव राजाराम देशमुख म्हणजे तुझा डॅड."
हे ऐकल्यावर श्रीची प्रतिक्रिया काय असेल? बघूया पुढील भागात….
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा