राणी मी राजाची भाग ३६

गोष्ट राजा राणीची

राणी मी राजाची भाग ३६


मागील भागाचा सारांश: श्री व जान्हवी पुण्याला जाण्यासाठी निघाले होते. रस्त्यात नितीनचा फोन श्रीला आला होता. नितीनचे ज्या मुलीवर प्रेम होते, तिच्या घरचे त्या मुलीचं लग्न दुसऱ्या मुलाबरोबर लावून द्यायला निघाले होते. श्रीने त्या मुलीच्या वडिलांना नितीन त्यांच्या मुलीसाठी कसा योग्य आहे? हे समजावून सांगितले.


आता बघूया पुढे……


काही अंतरावर गेल्यावर श्रीने ब्रेकफास्ट करण्यासाठी गाडी एका हॉटेल जवळ थांबवली. श्री व जान्हवी गाडीतून उतरले. हॉटेलमध्ये गेल्यावर श्री व जान्हवीने नाश्त्याची ऑर्डर दिली. तेवढ्यात श्रीला पुन्हा नितीनचा फोन आला. श्रीचं फोनवर बोलून झाल्यावर जान्हवी म्हणाली,

"नितीन काय म्हणत होता? स्वातीचे वडील लग्नाला तयार झाले का?"


"हो. नितीनने तेच सांगण्यासाठी फोन केला होता. नितीन माझे खूप आभार मानत होता." श्रीने सांगितले.


जान्हवी म्हणाली,

"मानणारचं ना. तुमच्यामुळे त्याचं प्रेम त्याला मिळालं."


"तुम्ही कधी कोणावर प्रेम केलं होतं का? किंवा तुमच्या आयुष्यात कोणी आहे का?" श्रीने चाचरतचं विचारले.


"नाही. सुजय हा माझा एकमेव मित्र आहे. माझ्या आयुष्यात आजवर असं कोणी आलंच नाहीये आणि शिवाय मी कुठल्याही मुलासोबत बोललेलं बाबांना आवडायचं नाही. सुजय शेजारी असल्याने त्याच्या सोबत बोललं तर बाबांना काही प्रॉब्लेम होत नव्हता. मला माझ्या बाबांना कधीच दुखवायला आवडलं नव्हतं. त्यांना त्रास देऊन मला सुखात रहायचं नव्हतं. माझे बाबा म्हणजे माझं सर्वस्व होतं. मी ठरवलं होतं की, बाबा सांगतील त्या मुलाशी मी लग्न करेल. पण आता बाबाचं राहिले नाहीत, तर पुढे काय करेल माहीत नाही. माझं राहुदेत, पण तुम्हाला गर्लफ्रेंड नक्कीच असेल." जान्हवी म्हणाली.


श्री म्हणाला,

"तुम्ही एवढ्या खात्रीने हे कसं बोलू शकता?"


"सर तुम्ही शिक्षणाच्या निमित्ताने इतकी वर्षे घरापासून बाहेर राहिले आहात. शिवाय लंडन मध्ये होतात, तिकडे गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड नॉर्मल गोष्ट आहे. श्रीमंत मुलांकडे मुली लगेच आकर्षित होतात." जान्हवीने सांगितले.


यावर श्री म्हणाला,

"बाकीच्या मुलीचं सोडा, तुम्ही माझ्याकडे आकर्षित झाल्यात का?"


"सर आता आपण तुमच्या गर्लफ्रेंड बद्दल बोलत आहोत. माझ्यावर लगेच घसरु नका." जान्हवी म्हणाली.


"उत्तर टाळण्याची आयडिया मस्त आहे. मला मैत्रिणी होत्या, पण गर्लफ्रेंड नाही. तुम्ही म्हणाला ते एका बाजूने खरं आहे. श्रीमंत मुलाला अनेक मुली जाळ्यात ओढू पाहत असतात. माझ्याही बाबत ते व्हायचं, पण मी कधीच कोणाच्या जाळ्यात अडकलो नाही. टाईमपास करणाऱ्यातला मुलगा मी नाहीये. जी मुलगी माझ्यातल्या श्रीवर प्रेम करेल अश्याच मुलीवर मला प्रेम करायचं आहे.


माझ्यामते पैसा ही गोष्ट क्षणिक आहे, आज आहे तर उद्या नाही. पण प्रेम हे चिरंतर असतं. मी कधीच कोणत्याही मुलीकडे त्या नजरेने बघितले नाही. मला सूट होईल अशी मुलगी मला भेटलीच नाही. लंडनमध्ये राहत असलो, तरी मला भारतीय संस्कृती जपायला आवडते. मी कुठेही असलो तरी असाच होतो." श्रीने सांगितले.


"मग आता तुमच्या साठी यशोमती मॅडम मुलगी शोधत असतील ना?" जान्हवीने विचारले.


"माहीत नाही म्हणजे तिच्या डोक्यात चालू असेलच पण मीच सध्या लग्न नको असं सांगितलंय. चला आपल्याला पुढच्या प्रवासाला सुरुवात करावी लागेल, नाहीतर पोहोचायला उशीर होईल. आधीच नितीनच्या फोनमुळे उशीर झाला आहे." श्री बोलल्यावर जान्हवी आपल्या जागेवरुन उठली, श्रीने नाश्त्याचे बिल दिले आणि दोघेजण गाडीत बसले आणि पुढील प्रवासाला सुरुवात झाली.


श्रीने आत्मसन्मान संस्थेचं लोकेशन गुगल मॅप वर टाकून ठेवलं होतं. पुण्यात गेल्यावर ट्रॅफिक लागल्याने श्रीला संस्थेत पोहोचायला उशीर होणार होता. ट्रॅफिक मध्ये श्रीला गाडी चालवायला कंटाळा आला होता. 


काही वेळातच श्री व जान्हवी आत्मसन्मान संस्थेपर्यंत पोहोचले. गाडी पार्क केल्यावर श्री म्हणाला,

"सगळं किती छान मेंटेन केलेलं दिसत आहे. बिल्डिंगच्या आजूबाजूला झाडं आहेत. झाडाच्या सावलीत बसण्यासाठी सिमेंटची बाकं तयार केलेली आहेत. बिल्डिंग कडे बघून प्रसन्न वाटत आहे. वातावरणात नकारात्मकता अजिबात नाहीये. चला नंदा मॅडमची भेट घेऊयात."


जान्हवी यावर काहीच बोलली नाही. ती श्रीच्या पाठोपाठ निघाली. नंदा मॅडमचं ऑफिस कुठे आहे? हे श्रीने एका गार्डला विचारले. ऑफिसच्या बाहेर गेल्यावर तेथील शिपायाला श्रीने आपले नाव सांगितले व नंदा मॅडमला भेटायचे आहे असे सांगितले. शिपायाने श्री व जान्हवीला वेटींग एरियात बसायला सांगितले. 


काही वेळानंतर एक मॅडम तिथे येऊन म्हणाल्या,

"सर, मॅडम तुम्ही बऱ्याच लांबून आला आहात. तुम्ही गेस्टरुम मध्ये जाऊन फ्रेश होऊन येतात का?"


श्री म्हणाला,

"आमची त्या आधी नंदा मॅडम सोबत भेट झाली असती तर बरं झालं असतं."


"ते काय झालं ना, आमच्या संस्थेतील एका महिलेची तब्येत अचानक बिघडल्याने ताई तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेल्या आहेत. मी मॅडमला तुम्ही आल्याचे कळवले आहे. त्यांनी सांगितलं की, त्या येईपर्यंत तुम्ही फ्रेश होऊन घ्या म्हणून." त्या मॅडमने सांगितले.


श्रीने मान हलवून होकार दर्शवला. श्री व जान्हवी गेस्टरुम मध्ये जाऊन फ्रेश होऊन आले आणि वेटींग एरियात नंदा मॅडमची वाट बघत बसले. जान्हवी आल्यापासून काहीच न बोलल्याने तिला बोलतं करण्यासाठी श्री म्हणाला,

"तुम्ही शांत का बसल्या आहात? ज्या दिवसाची गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही वाट बघत होतात, तो क्षण आता जवळ आला आहे."


"त्याचीच आता जास्त भीती वाटायला लागली आहे." जान्हवीने सांगितले.


"भीती! ती कसली? आपल्या आईला भेटण्यात घाबरण्यासारखं काय आहे?" श्रीने विचारले.


जान्हवी म्हणाली,

"सर गेल्या कित्येक वर्षांपासून मी तिला भेटलेली नाहीये. ती आता कशी दिसत असेल? ती कशी बोलत असेल? तिचा स्वभाव कसा असेल? तिला माझं बोलणं आवडेल का? बाबांनी माझ्यावर जे संस्कार केले आहेत, ते तिला आवडतील का? माझी आणि तिची विचारसरणी जुळेल का? बाबांनी आत्महत्या केली आहे, हे कळल्यावर त्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल? असे अनेक प्रश्न माझ्या मनात घोळत आहेत. आईने मला जन्म दिला. माझ्या आयुष्याची दहा वर्ष ती माझ्या सोबत होती.


मला आई ही खूप कमी आठवते. तिचा चेहरा आजही माझ्या डोळ्यासमोर आहे, पण आठवणी धूसर झाल्या आहेत. आपण जेव्हा आई सोबत नेहमी राहतो, तेव्हाच ती खरंच कशी आहे? तिने आपल्यासाठी काय त्याग केले आहेत? हे कळतात. माझ्या मनात आत्ता हे आई बद्दल प्रेम आहे, तेच प्रेम तिची भेट झाल्यावर राहील का? हाही विचार मनात येतो आहे. माझ्या आईची माझ्या मनात एक प्रतिमा तयार झालेली आहे. माझी आई जर वेगळी असेल, तर त्या प्रतिमेला तडा जाईल."


यावर श्री म्हणाला,

"मला तुमची मनस्थिती समजते आहे. कदाचित डॅड व माझी भेट झाल्यावर माझ्या मनात सुद्धा हेच प्रश्न उभे राहतील. आपल्या सोबत जे लोकं नाहीयेत आणि आपल्याला त्यांना भेटण्याची इच्छा असेल, तर त्यांची आपल्या विचारा नुसार एक प्रतिमा तयार होतेच, पण ती प्रतिमा काल्पनिक असते. रिऍलिटी मध्ये वेगळे असू शकतात आणि हे स्विकारायला आपल्याला वेळ लागतो. मला असं वाटतंय की, या सगळ्याचा आत्ता विचार करु नका. जे होईल त्याला तोंड द्यायचे. 


आपलं आयुष्यचं असं असतं, केव्हा आपल्या समोर काय येऊन ठेपेल, याचा काही नेम नसतो. कल्पना विश्वात रमायला भारी वाटतं, पण वास्तविक आयुष्य काहीतरी वेगळचं असतं. या मॅडमही कधी येतील काय माहीत? एकदाची भेट झाली, म्हणजे अवास्तव विचार मनात येणार नाहीत."


जान्हवीची आई तिच्या कल्पनेतील प्रतिमेसारखीच असेल का? आईला भेटल्यावर जान्हवीची प्रतिक्रिया काय असेल? आपली मुलगी आपल्याला भेटण्यासाठी आली आहे, हे कळल्यावर नंदाताईंची प्रतिक्रिया काय असेल? हे बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all