राणी मी राजाची भाग ३१

गोष्ट राजा राणीची

राणी मी राजाची भाग ३१


मागील भागाचा सारांश: श्री जान्हवीचं घर विकत घेणार आहे, हे समजल्यावर आईआजी चिडली. तिला श्रीचा निर्णय आवडलेला नव्हता. श्रीला आईआजीच्या बोलण्याचा राग आला. श्रीच्या आईने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.


आता बघूया पुढे….


आईआजीच्या बोलण्याचा विचार करुन करुन श्रीचं डोकं फुटायला आलं होतं. श्रीला डोकं शांत करण्याची गरज असल्याने तो लॉनमध्ये जाऊन फेऱ्या मारत बसला.


"श्री काय झालं रे? तू गेल्या अर्ध्या तासापासून लॉनमध्ये येरझाऱ्या मारत आहेस. तू हॉलमधून बाहेर आला, तेव्हा मी तिथेच बसलेलो होतो, पण तू माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. सगळं काही ठीक आहे ना?" भरत काकाने येऊन विचारले.


"भरत काका मी तुमच्या सोबत आईआजी बद्दल बोलू शकतो का?" श्री म्हणाला.


"अरे अर्थात तू माझ्या सोबत कोणत्याही विषयावर बोलू शकतोस. उभं राहून बोलण्यापेक्षा आपण बेंचवर बसून बोलूयात." भरत काकाने सांगितले.


श्रीने घडलेली इतमभूत कथा भरत काकाला सांगितली.


"बरं मग यावर तुझे काय म्हणणे आहे? म्हणजे यात एवढं डिस्टर्ब होण्यासारखं काय आहे?" भरत काकाने विचारले.


श्री म्हणाला,

"काका तुम्हाला आईआजीचं वागणं, बोलणं नॉर्मल वाटत आहे का? त्यात तुम्हाला वेगळं काहीच वाटलं नाही का?"


"अरे बाबा, माझ्या अनेक गोष्टींवर आई अशीच रिऍक्ट झालेली आहे. आज तुला तिचा जो अनुभव आला आहे, तो मला अनेकदा येऊन गेला आहे. म्हणून मला त्याचं काही विशेष वाटलं नाही. एकदम टोकाचं बोलण्याची आईची सवयच आहे." भरत काकाने सांगितले.


श्री थोडा चिडून म्हणाला,

"अरे काका, पण समोरच्या व्यक्तीचा हेतू न समजून घेता तुम्ही त्याला पूर्णपणे चुकीचं ठरवू शकत नाही ना. मी कदाचित भावनिक होऊन हा निर्णय घेतलाही असेल, पण ह्यात जर काही चुकीचं असेल, तर ते ती शांतपणे सांगू शकत होती ना?"


"श्री तुझी होणारी चिडचिड, राग मी समजू शकतो. कारण माझीही अशीच चिडचिड बऱ्याचदा झालेली आहे. श्री तुला मन मोकळं करायला मी आहे, पण मला मन मोकळं करायला जागा सुद्धा नव्हती. रंजना सोबत सुद्धा मी ह्या विषयावर बोलू शकत नव्हतो, कारण तिच्या मनात आईबद्दल गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून. 


माझ्या बायको समोर माझ्या आईची प्रतिमा मलिन होऊ न देण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न केले होते. रंजना ज्यावेळी आईचं बोलणं सहन व्हायचं नाही, त्यावेळी ती वेगळं राहण्याचा हट्ट करायची. मी तिला कसं समजावलं होतं? हे फक्त माझं मलाच माहीत. 


तुझ्या मते समोरच्याचं बोलणं ऐकून न घेता आपण त्याला चुकीचं ठरवू शकत नाही, तर आता तूही तेच करत आहेस, हे लक्षात ठेव. तू उदय सकाळी जाऊन आईची भेट घेऊन एकदा तिचा हेतू लक्षात घे आणि मग आई बद्दल मत तयार कर.


आपण प्रत्येक गोष्टीचा सरळमार्गाने विचार करतो, पण आई त्याच गोष्टीकडे थोड्या वाकड्या नजरेने बघते. आईला जसे अनुभव आलेत, त्याप्रमाणे ती रिऍक्ट होते. आईच्या मनाविरुद्ध आपण काही केले तर ती चिडून बोलते. तिचा बोलण्याचा सूर वाढला की, तिचं म्हणणं कितीही खरं असलं तरी ते आपल्याला पटत नाही आणि तिच्या बद्दल आपल्या मनात अढी तयार होते.


तुला जान्हवीची कीव आली किंवा तुला तिची मदत करावी वाटली, म्हणून तू जे उचललेले पाऊल आहे, ते अगदी बरोबर आहे, पण या सगळ्याकडे आई थोड्या वेगळ्या नजरेने बघत असेल." भरत काकाने सांगितले.


श्री पुढे म्हणाला,

"आई म्हणते की, अहंकारापेक्षा नात्याला महत्त्व दे, ते हे आईआजीला समजत नसेल का?"


यावर भरत काका म्हणाला,

"श्री प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. आईचाही स्वभाव आपल्या सर्वांपेक्षा खूप वेगळा आहे. कोणाचाही मूळ स्वभाव बदलत नाही. आईची रिऍक्ट होण्याची पद्धतचं तशी आहे. आईला नात्यांचं महत्व आहे, पण ती ते बोलण्यातून आणि वागण्यातून दाखवत नाही. आईला कोणापुढे माघार घेणे आवडत नाही. तिची चूक झाली आहे, असं तिला वाटलं तरी ती कधीच ते मान्य करणार नाही.


आईपासून तिची पाचही मुले याचमुळे दुरावली. आईने आम्हा सर्वांना प्रोटेक्ट केलं, पण तिच्या मनात आमच्या बद्दल जे प्रेम होतं, ते कधीही तिला दाखवता आलं नाही. ज्या दिवशी राम दादा या घरातून निघून गेला, त्या दिवशी सुद्धा असंच काहीतरी झालं असेल आणि राम दादाला आईच्या बोलण्याचा खूप राग आला असेल, म्हणून तो घर सोडून गेला असेल.


श्री आईला हे कधीचं कळलं नाही की, आपल्या सर्वांमध्ये तिचंचं रक्त असल्याने आपण तरी माघार का म्हणून घेऊ?"


"आता मी काय करु?" श्रीने विचारले.


"उद्या सकाळी कंपनीत जाण्याआधी आईची भेट घे. तिला बोलण्याची इच्छा असेल, तर तिच्या मनात काय चालू आहे? हे तुला समजेल. समजा ती या विषयावर बोललीचं नाही, तर विषय तिथल्या तिथे सोडून दे. तू प्रयत्न तरी केला होता, याचं समाधान तुला कायम राहील. तुला तुझा निर्णय योग्य वाटत असेल, तर तो आमलात आण. आईला काय वाटेल? याचा विचार करत बसू नको." भरत काकाने सांगितले.


"भरत काका आईआजीने विरोध केल्यावर तुम्ही तिची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला होता का?" श्रीने विचारले.


यावर भरत काका म्हणाले,

"कधीच नाही, मी तिचाच मुलगा असल्याने इगो, सेल्फ रिस्पेक्ट मलाही तितकाच प्रिय होता. मी जी चूक केली, ती तू करु नये असं मला मनापासून वाटतं, म्हणून एकदा तिची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न कर. जसं जानकी वहिनी म्हणाली की, आपल्या घरातील सर्वजण आता एकत्र आलेले आहेत आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी तू अतोनात प्रयत्न केले, तर आता एका छोटयाशा इगोसाठी आई व तुझ्यात अंतर वाढू देऊ नकोस."


श्रीला भरत काकाचे म्हणणे पटले होते, त्याने आईआजी सोबत एकदा जाऊन बोलण्याचा विचार केला होता. दुसरी दिवशी सकाळी वॉक, अंघोळ झाल्यावर, नाश्ता करण्याआधी श्री आईआजीची भेट घेण्यासाठी तिच्या रुममध्ये गेला. आईआजी त्यावेळी मोबाईलवर अथर्वशीर्ष ऐकत होती. श्रीला रुममध्ये आलेलं बघून आईआजीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. आईआजी स्वतःहून काहीच बोलत नाहीये, हे बघून श्री म्हणाला,


"आईआजी काल जर माझ्या तोंडून काही चुकीचे शब्द निघून गेले असतील आणि त्यामुळे तू दुखावली गेली असेल, तर सॉरी. आईआजी मला फक्त तुझ्या नकारामागील कारण जाणून घ्यायचे आहे. तुला माझ्या सोबत बोलायचे नसेल, तर नको बोलू, पण तेवढं कारण सांग म्हणजे तुझ्या बद्दल माझ्या मनात गैरसमज निर्माण होणार नाही. मला माझ्या अहंकारापेक्षा आपल्यातील नाते जास्त महत्त्वाचे वाटते आणि तेच नाते टिकवण्यासाठी मी इथे तुझ्या सोबत बोलायला आलो आहे. तुलाही असंच वाटत असेल, तर थोडं स्पष्टपणे बोल."


आईआजी श्री कडे न बघता म्हणाली,

" श्री जान्हवी आपल्या कंपनीसाठी प्रामाणिकपणे काम करत आली आहे, शिवाय तिला आपल्या कंपनी बद्दल कळकळ वाटते. या सगळ्यामुळे तू तिची मदत करत आहेस, हे मला समजत आहे. पण श्री जान्हवी सोबतच आपल्या कंपनीत इतर कामगार सुद्धा आहेत, त्यांना याबद्दल समजल्यावर तेही तुझ्याकडे त्यांची दुखणी घेऊन येतील. आपण प्रत्येकालाचं इतक्या सढळ हाताने मदत करु शकणार नाही. मी नकार देण्यामागे माझा एवढाच हेतू होता. आता तू जो निर्णय घेतला आहेस, त्यापासून मागे हटू नकोस. फक्त कंपनीतील सुजय सोडून कोणालाच याबाबत कळू देऊ नकोस. सुजयलाही तसं सांगून ठेव. पुढे जाऊन लोकं याचा अर्थ वेगळाच काढतील.


श्री मला राग आला की, एवढी साधी सरळ गोष्ट सुद्धा नीट सांगता आली नाही. माझ्या ह्याच स्वभावामुळे माझी मुलं माझ्यापासून दूर गेली आहेत. आज तू स्वतःहून मनाचा मोठेपणा करुन माझ्यासोबत बोलायला आलास, त्याबद्दल मी तुझी मनःपूर्वक आभारी आहे. तुही माझ्यापासून दुरावशील की काय, ह्या भीतीने मला रात्रभर झोप लागली नाही. 


बरं तू आता कंपनीत जा. मी प्रवचन देत बसले की, थांबत नाही. तुला कंपनीत जायला उशीर होईल."


श्री स्माईल देऊन निघून गेला.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all