राणी मी राजाची भाग ३०

गोष्ट राजा राणीची
राणी मी राजाची भाग ३०

मागील भागाचा सारांश: जान्हवीची मनस्थिती ठीक नसल्याचे व तिची आत्या तिला फसवत असल्याचे श्रीला सुजय कडून समजले. श्री जान्हवीला समजून सांगण्यासाठी तिच्या घरी गेला. जान्हवीचे घर तिच्या आत्त्याच्या नावावर असल्याचे श्रीला समजल्यावर तिची आत्त्या घराचे भांडवल करु नये, म्हणून श्रीने ते घर विकत घेण्याचे ठरवले.

आता बघूया पुढे….

जान्हवीचे घर आपण विकत घेत आहोत, ही बातमी श्रीला आईआजीच्या कानावर टाकावी असे वाटले. श्री घरी गेल्याबरोबर आईआजीची भेट घेण्यासाठी तिच्या रुममध्ये गेला. तर त्याची आई व आईआजी दोघीजणी गप्पा मारत होत्या.

"दोघी सासू-सूनांचं गुप्तगू सुरु आहे का?" श्रीने विचारले.

"नाही रे श्री. मी आईंकडे भगवद्गीता घ्यायला आले होते. आज तुला यायला उशीर का झाला? आणि डायरेक्ट इकडेच आला आहे वाटतं." आईने विचारले.

श्री म्हणाला,
"कंपनीतून जान्हवीच्या घरी गेलो होतो, मग तिकडेच उशीर झाला. आईआजीला काहीतरी सांगायचं होतं, म्हणून डायरेक्ट इकडेच आलो."

"जान्हवीच्या घरी कशाला गेला होतास?" आईआजीने विचारले.

"जान्हवीची मनस्थिती अजूनही ठीक नाही, असे सुजयने सांगितले आणि तिची आत्या तिला फसवू पाहते आहे, हे कळालं होतं. जान्हवीच्या घरी जाऊन तिच्याशी एकदा बोलण्याची विनंती सुजयने केली होती, म्हणून मी तिला समजावून सांगायला तिच्याकडे गेलो होतो." श्रीने सांगितले.

"बरं आणि मला काय सांगायचे होते?" आईआजीने विचारले.

श्री म्हणाला,
" आईआजी जान्हवीच्या बाबांनी त्यांचे घर तिच्या आत्त्याच्या नावावर केले होते, त्यांच्यात काहीतरी पहिले डील झालेली होती. मला हे जान्हवी कडून समजले. आत्त्या आपल्याला घरातून काढून देईल, या विचाराने जान्हवी आत्त्याच्या विरोधात बोलायला घाबरत होती.

जान्हवीची आत्त्या तिला तिच्या घरी घेऊन जाणार होती आणि तिचे लग्न लावून देणार होती. आत्याचा प्लॅन मला सुजय कडून समजला होता. जान्हवीची आत्त्या जान्हवीचं आयुष्य उध्वस्त करायला निघाली आहे, हे मला समजल्याने यावर काहीतरी उपाय काढावा असा विचार केला. मग मला एक आयडिया सुचली. मी जान्हवीच्या आत्त्याकडून ते घर विकत घेण्याचे ठरवले आणि तिच्या आत्त्याला बजावून सांगितले की, जान्हवीच्या आयुष्यात इथून पुढे डोकवायचं नाही. तिची आत्त्या जास्त पैसे मिळणार म्हणून लगेच घर विकायला तयार झाली. जान्हवीची आत्या एक नंबरची लोभी बाई आहे.

मी जान्हवीचे घर विकत घेणार असल्याची बातमी तुला द्यावी म्हणून इकडे आलो. दर महिन्याला जान्हवीच्या पगारातून ठराविक रक्कम आपण वजा करुन घेत जाऊ. कशी वाटली माझी आयडिया?"

"श्री तू हे सगळं कोणत्या नात्याने करत आहेस?" आईआजीने विचारले.

"कोणत्या नात्याने म्हणजे? माणुसकीच्या नात्याने. आईआजी एक मुलगी बेघर होण्यापासून वाचणार आहे तसेच तिचं आयुष्य तिला कसं जगायचं आहे? हे ती ठरवू शकते. तिला कोणावर अवलंबून रहावे लागणार नाही." श्रीने उत्तर दिले.

आईआजी म्हणाली,
"श्री तू अचानक इतका मोठा झाला आहेस की, तुला हा निर्णय घेण्याआधी एकदा मला विचारावे सुद्धा वाटले नाही. श्री एकतर हा जो काही मॅटर होता, तो जान्हवी व तिच्या आत्त्यामधील घरगुती मॅटर होता, यात तुला पडण्याची काहीही गरज नव्हती. जान्हवी फक्त आपल्या कंपनीत काम करते, तिच्या व्यक्तिगत आयुष्यात तिने काय करावं? कसं वागावं? कोणाचं ऐकावं? हा तिचा प्रश्न आहे, यात आपला पडण्याचा काहीच संबंध नाहीये. समजा जान्हवीला हे घर विकत घ्यायचे असते, तर तिने तुझ्याकडे मदत मागितली असती, मग तू याबद्दल विचार केला असता, तर ठीक होतं. 

तिचं घर तुला स्वतःच्या नावावर करुन घेण्याची काय गरज आहे?"

"अग आईआजी समजा हे घर जान्हवीच्या नावावर करण्याचा विचार केला असता, तर तिची आत्त्या इतक्या सहजासहजी तयार झाली नसती, शिवाय घर जान्हवीच्या नावावर असल्यावर त्या लोकांनी सारखं सारखं येऊन तिला त्रास दिला असता." श्रीने सांगितले.

यावर आईआजी म्हणाली,
"श्री तू घेतलेला निर्णय मला अजिबात पटलेला नाहीये. तू पुन्हा यावर विचार करावा असं मला वाटतं."

"आईआजी मला पुन्हा विचार करावा असं वाटत नाही. मी पूर्णपणे विचार करुनच निर्णय घेतला आहे." श्रीने सांगितले.

"मग ठीक आहे तर. तुला जर असेच निर्णय घ्यायचे असतील, तर मला सांगतही जावू नकोस आणि मला सल्ला विचारायला येऊ नकोस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी कष्टाने कमावलेला पैसा असा कोणावरही उधळला जाऊ नये." आईआजी रागात म्हणाली.

आईआजीच्या बोलण्यावर श्रीला काहीच बोलण्याची इच्छा नसल्याने तो काही न बोलता आपल्या रुममध्ये निघून गेला. श्री रागात निघून गेल्याने त्याची आई त्याला समजावून सांगण्यासाठी त्याच्या पाठोपाठ गेली. 

"श्री असं रागावू नये बाळा. आईआजी तुझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने मोठ्या आहेत. त्यांचं ऐकून घ्यावं." आई त्याला समजावण्यासाठी म्हणाली.

यावर श्री म्हणाला,
"आई मला तुझं म्हणणं पटतंय, पण आईआजी तिचा हेका सोडतंच नाही. तिने माझा हेतू समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मला मान्य आहे की, आज आपली कंपनी तिच्यामुळे इथवर येऊन ठेपली आहे, तिने खूप कष्टाने पैसा कमावलेला आहे. पण आई तिने माझ्या हातात माझ्यावर विश्वास ठेवून कंपनी सोपवली आहे,तर लगेच माझ्या निर्णय क्षमतेवर ती शंका कशी घेऊ शकते? 

आई जान्हवी मुळे कंपनीतील घोळ लक्षात आला, तिने त्या काळात आमची खूप मदत केली होती. आई जे लोकं आपल्यासाठी प्रामाणिकपणे काम करतात, त्यांच्यासाठी थोडी झळ खाल्ली तर काय बिघडणार आहे?

आईआजी इतरवेळी महिला सबलीकरणासाठी निधी देत असते, मग आज एका अनाथ मुलीला जर आपल्या कडून थोडी मदत केली, तर काय हरकत आहे?

आईआजीने माझ्यावर विश्वास ठेवून एकदा तरी माझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता."

"हे बघ श्री तुझा आणि आईंचा स्वभाव जवळपास सारखाच आहे. तुमच्या दोघांच्या बोलण्यापुढे घरातील इतर कोणी काहीच बोलू शकत नाही. आई माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असल्याने मी त्यांना काही सांगू शकत नाही, पण तू माझा मुलगा असल्याने तुला समजावून सांगायला आले होते. तुला आईंच्या बोलण्याचा राग आला असेल, पण त्यामागील त्यांचा हेतू माझ्यापेक्षा तुलाच जास्त समजू शकतो. आत्ता कुठे जाऊन आपल्या घरातील परिस्थिती सुधारली आहे. आईंबद्दल मनात कुठल्याही प्रकारची अढी मनात ठेवू नकोस. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सोबत अबोला धरु नकोस. 

तू घेतलेला निर्णय तुला योग्य वाटत असेल, तर तसंच कर. पण पुन्हा एकदा आईंशी बोलून त्यांच्या मनात काय चालू आहे? याचा अंदाज घे. आपलं घर एकत्र सुखाने नांदावं असं वाटत असेल, तर प्लिज एकदा आईंशी जाऊन बोल. अहंकारापेक्षा नात्यांना महत्व दे." एवढे बोलून श्रीची आई निघून गेली. 

आई निघून गेल्यावर श्री मनातल्या मनात विचार करत बसला की, "आईआजीच्या ह्याच स्वभावामुळे तिची मुलं तिच्या पासून दुरावली असतील का? आईआजी समोरच्याचं म्हणणं समजून का घेत नसेल? डॅड आईआजीच्या ह्याच स्वभावाला कंटाळून घर सोडून गेले असतील का? 

आईआजी सोबत मतभेद होण्याची माझी पहिली वेळ नाही. इतरवेळी मी तिच्या म्हणण्याचा अर्थ समजून घेऊन तिच्या हो ला हो म्हणायचो, पण यावेळी मला तिचं बोलणं पटलंच नाही, त्यामागील अर्थ समजून घेण्याचा सुद्धा मी प्रयत्न केला नाही. मी आईआजी सोबत चुकीचं बोललो का? मी तिचं म्हणणं समजून घेतलं नाही, यात मी चूक केली आहे का? 

मी पहिल्यांदा एवढा गोंधळून का गेलो आहे? आई म्हणते तसं अहंकारापेक्षा नाती श्रेष्ठ असतात. मी माणुसकीचे नाते तर जपतो आहे, त्याचं नात्याने मी जान्हवीला मदत करत आहे. माणुसकीचे नातेही तेवढेच महत्त्वाचे आहे ना. 

आईआजी एकीकडे सांगते की, तिची मदत कर आणि जेव्हा मी तिची मदत करायला गेलो, तर चिडून बसली आहे."

क्रमशः

©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all