राणी मी राजाची भाग २

गोष्ट राजा राणीची
राणी मी राजाची भाग २

मागील भागाचा सारांश: श्रीला त्याच्या डॅडचे स्वप्न पडल्याने तो झोपेत ओरडत होता, त्याच्या ओरडण्याने प्रणव झोपेतून जागा झाला. श्रीला पडलेले स्वप्न हे त्याच्या लहानपणी घडून गेलेला एक प्रसंग होता. श्री व प्रणवमध्ये यावरुन बऱ्याच गप्पा झाल्या. श्रीच्या आजीबद्दल ऐकल्यावर प्रणवला त्याच्या आजीची एकदा तरी भेट घ्यावी अशी इच्छा झाली.

आता बघूया पुढे….

प्रणव ऑफिसमध्ये निघून गेल्यावर श्री आपलं आवरुन घराबाहेर पडला. श्रीला एकट्याला फिरायला खूप आवडत होते. तो स्वतःची कंपनी एन्जॉय करायचा. श्री जवळपास सगळीकडे एकटाच फिरायचा. श्री एकलकोंडा बिलकुल नव्हता, त्याला त्याच्या आसपास माणसं लागायची, तो माणसांमध्ये रमणारा व्यक्ती होता. 

श्री हा लहानपणापासून एकत्र कुटुंबात वाढलेला होता. श्रीच्या कुटुंबात त्याची आजी, आई, दोन काका व काकू आणि दोन चुलत बहिणी असे दहाजण होते. श्री हा त्याच्या पिढीतील पहिलं बाळ असल्याने सर्वांचाच तो लाडका होता. श्रीच्या दोन्ही चुलत बहिणी त्याच्या पेक्षा लहान होत्या. श्रीला दोन आत्त्याही होत्या, त्या आपापल्या घरी सुखाने नांदत होत्या.

श्रीच्या आजोबांनी वेफर्स पॅकिंग करुन विकण्याचा बिजनेस सुरु केला होता. पुढील काही वर्षांतचं त्याच्या आजोबा एक्सपायर झाले. आजोबांनंतर त्याच्या आजीने बिजनेसची सारी सूत्रे हातात घेतली. आजीने बिजनेस हळूहळू वाढवला. श्रीचे वडील हे घरात मोठे होते. आजीला वाटायचं की, आपल्या मोठ्या मुलाने बिजनेस मध्ये लक्ष घालायला हवे. आईच्या इच्छेखातर त्यांनी बिजनेस मध्ये लक्ष घालायला सुरुवात केली, पण सतत आईच्या सुचनांचा त्यांना कंटाळा येऊ लागला होता. 

श्रीचे लहान दोन काका आपापल्या जगात व्यस्त होते, त्यांना फॅमिली बिजनेसशी काही देणे घेणे नव्हते. श्रीचे वडील घर सोडून गेल्यावर आजी एकटीच बिजनेस मध्ये लक्ष घालत होती. श्रीच्या आजीची इच्छा होती की, श्रीचं एम बी इ पूर्ण झाल्यावर बिजनेसची धुरा त्याने सांभाळावी. श्रीला त्याच्या फॅमिली बिजनेस मध्ये इंटरेस्ट होता, त्यामुळे श्री बिजनेस चांगल्या रीतीने सांभाळू शकणार होता.

श्री घराबाहेर पडल्यावर फिरत फिरत एका पार्कच्या कडेने चालला होता, तेव्हा त्याच्या कानावर एक गाणं पडलं,

'हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी
जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी
अपनी छत्री तुमको दे दे कभी जो बरसे पानी
कभी नये पॅकेट मे बेचे तुमको चीज पुरानी
फिर भी दिल हैं हिंदुस्थानी
फिर भी दिल हैं हिंदुस्थानी."

गाणं ऐकून श्री जागेवर थबकला आणि गाण्याचा आवाज येणाऱ्या दिशेकडे त्याने बघितले, तर एक भारतीय व्यक्ती बेंचवर गाणं ऐकत होता. श्रीची पावलं आपसूकचं त्या व्यक्तीच्या दिशेने वळली. श्री त्या व्यक्तीजवळ जाऊन उभा राहिला, पण तो व्यक्ती डोळे मिटून गाणं ऐकण्यात इतका व्यस्त होता की, श्री त्याच्याजवळ जाऊन उभा आहे हेही त्याच्या लक्षात आले नव्हते. श्रीने गाणं ऐकत त्या व्यक्तीच्या शेजारी बसला. गाणं संपल्यावर त्या व्यक्तीने डोळे उघडले, त्याच्या डोळ्याच्या कडा ओलावलेल्या होत्या. 

श्रीला आपल्या शेजारी बघून तो दचकला. श्री त्यांच्याकडे बघून म्हणाला,
"गाना सुनके अपना देश याद आ रहा होगा. वैसे आप किस राज्यमे रहते हैं?"

"मैं महाराष्ट्र का रहनेवाला हूँ." त्या व्यक्तीने उत्तर दिले.

श्री हसून म्हणाला,
"मला वाटलं होतं की, तुम्ही इतर राज्यातील असाल म्हणून मी हिंदीतून बोललो. मीही महाराष्ट्रीयनचं आहे."

"तू इकडे कधीपासून आहेस?" त्या व्यक्तीने विचारले.

"तीन वर्षांपासून मी इकडे आहे. एम बी ए करण्यासाठी आलो होतो. पंधरा दिवसांनी परत जाणार आहे. गाणं ऐकून इकडे तुमच्याकडे आलो. आपल्या देशाचे गाणे परक्या देशात ऐकूल्यावर एक आपलेपणा वाटतो आणि आपल्या कुटुंबियांची आठवण येते. मनाला एक वेगळ्याच प्रकारची हुरहूर लागते." श्रीने सांगितले.

यावर ती व्यक्ती म्हणाली,
"मी जी चूक केली, ती तू करणार नाहीस, हे ऐकून बरं वाटलं."

"कोणती चूक?" श्रीने आश्चर्याने विचारले.

"आपला देश, आपली माणसं सोडून दुसऱ्या देशात येऊन सेटल होण्याचा निर्णय. जोपर्यंत मनात हिंमत होती, तोवर काही वाटलं नाही. पण आता मी मनाने थकलो आहे. आपली माणसं आपल्या जवळ असावी असं सारखं वाटत असतं." त्या व्यक्तीने सांगितले.

श्री पुढे म्हणाला,
"तुम्हाला मनापासून जर आपल्या लोकांमध्ये परतावे वाटत असेल, तर तुम्ही भारतात का जात नाहीत?" 

"मी स्वतःच परतीचे मार्ग बंद करुन टाकले आहेत. एका छोट्याशा गोष्टीवरुन मी भांडण करुन घराबाहेर पडलो. माझा अहंकार जपण्यासाठी मी सर्व नाती लाथाडली." त्या व्यक्तीने उत्तर दिले.

"मग तुमचं इकडे कोणीच राहत नाही का?" श्रीने पुढील प्रश्न विचारला.

"म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही." ती व्यक्ती उत्तरली.

"म्हणजे?" श्री.

ती व्यक्ती म्हणाली,
"आपली ही पहिलीच भेट आहे. आपण एकमेकांना ओळखत पण नाही, मग मी तुला सगळं कसं सांगू शकेल?"

श्री म्हणाला,
"सॉरी, मी ओघात जरा जास्तच प्रश्न विचारले. एनिवेज माझं नाव श्री."

"अरे इट्स ओके. माझं नाव राम. फक्त नावाला राम आहे, रामाचे गुण काही मला घेता आले नाही. वडील दशरथ राजाच्या वचनासाठी प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवासात गेले होते. माझ्या आई वडिलांनी तर मला सर्व काही दिलं होतं, पण ते सुख मला उपभोगता आलं नाही. असो मी तुला माझं आडनाव सांगू शकणार नाही. कदाचित आडनावावरुन तू मला ओळखशील. माझ्यामागे आडनाव लावण्याची सुद्धा मला लाज वाटते." बोलता बोलता रामच्या डोळयात पाणी आले होते.

श्री रामकडे बघून म्हणाला,
"मी तुमच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने खूप लहान आहे. मी एवढंच सांगेल की, तुमच्या आयुष्यात काय घडलं होतं? हे मला ठाऊक नाही, पण आपली माणसे कितीही आपल्यावर रागावली असतील तरी त्यांचा राग निवळतो, त्यांचा आपल्यावर राग टिकत नाही. माझी आईआजी नेहमी म्हणते की, "माफी मागितल्याने कोणी लहान किंवा मोठा होत नाही. चूक कितीही छोटीशी असली तरी माफी जरुर मागावी, म्हणजे आपल्या मनावर ओझं राहत नाही."
एकदा घरी जाऊन सगळ्यांची माफी मागून बघा. ते तुम्हाला माफ करतील, असा मला विश्वास आहे. समजा त्यांनी तुम्हाला माफ जरी केलं नाही, तरी त्यांची माफी मागितल्याने तुमच्या मनावरील ओझं कमी होईल.

तुमच्याकडे एक संधी आहे, ती आजमावून बघा. कदाचित हरवलेली नाती तुमच्या आयुष्यात पुन्हा येतील."

श्रीचं बोलणं झाल्यावर राम त्याच्याकडे कौतुकाने बघून म्हणाला,
"इतक्या लहान वयात तू किती समजदार आहेस. तू किती छान बोलतोस. तुझ्यातील दहा टक्के समजदारी जरी माझ्यात असती, तर आज मी माझ्या माणसांना मुकलेलो नसतो. तुझ्या बोलण्याचा मी नक्कीच विचार करेल."

श्री हसून म्हणाला,
"मी काही कोणी फिलॉसॉफर नाहीये. मलाही राग येतो, मीही चिडतो, पण ते सगळं काही क्षणिक असतं. मला जे माझ्या आईने, आजीने, काका- काकूंनी शिकवले. माझ्यावर जे संस्कार केले, त्या सगळ्यामुळे मी असा आहे."

"तुझी जडणघडण एकत्र कुटुंबात झालेली दिसतेय." रामने विचारले.

"हो. आमचं दहा जणांचं कुटुंब आहे. शिक्षणामुळे कुटुंबापासून लांब रहावं लागतंय, नाहीतर मला एकट्याला रहायला बिलकुल आवडत नाही. मी एकटा भटकू शकतो, नवनवीन जागा एक्सप्लोर करु शकतो, पण एकटा राहू शकत नाही."
श्रीने सांगितले.

यावर राम म्हणाला,
"थोडक्यात काय तर तुला तुझ्या लोकांमध्ये रमायला आवडतं. काहीही झालं तरी तू कधीच तुझ्या कुटुंबाला सोडू नकोस. कितीही मतभेद झाले तरी शांततेत बसून त्यांच्याशी बोल. डोक्यात राग घालून घर सोडू नकोस."

"हो नक्कीच." श्रीने सांगितले.

राम बेंचवरुन उठत म्हणाला,
"आज तुझ्यासारख्या यंग भारतीय व्यक्तीला भेटून आनंद झाला. नशिबात असेल तर आपली पुन्हा भेट होईलचं. चल मी निघतो."

श्री चेहऱ्यावर स्मितहास्य आणून म्हणाला,
"हो पण ती भेट महाराष्ट्रात व्हावी, अशी मी अपेक्षा करतो."

राम एक स्माईल देऊन निघून गेला. श्री त्याच्याकडे बघतच होता. राम पार्कच्या बाहेर पडल्यावर एक मर्सडीज कार त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. राम त्यात बसून गाडी निघून गेली. 
श्री मनातल्या मनात म्हणाला,
"माणसाकडे कितीही पैसा आला, तरी तो आपल्या माणसांशिवाय सुखी राहू शकत नाही, हे तितकेच खरे आहे."

क्रमशः

©®Dr Supriya Dighe





🎭 Series Post

View all