राणी मी राजाची भाग २७

प्रवास एका कुटुंबाचा

राणी मी राजाची भाग २७


मागील भागाचा सारांश: जान्हवीने तिच्या आई बद्दल श्रीला सांगितले. आपल्या पेक्षा जान्हवीच्या आयुष्यात जास्त दुःख आहे, हे श्रीला कळले होते.


आता बघूया पुढे….


श्रीने जान्हवीला तिच्या घरी सोडले आणि तो स्वतः आपल्या घरी गेला. घरात गेल्यावर हॉलमध्ये श्रीला त्याची आई दिसली. श्रीने तिच्याजवळ जाऊन तिला कडकडून मिठी मारली. श्रीने आपल्याला अचानक मिठी कशी मारली? हा प्रश्न त्याच्या आईला पडला होता. श्रीच्या मिठीतून सुटत आई म्हणाली,

"श्री काय झालं?"


"आई आपल्याकडे जे असतं ना त्याची किंमत आपल्याला नसते. मी माझ्याकडे डॅड नाही, म्हणून तक्रार करत बसलो होतो. पण मी हा विचारच केला नाही की, माझ्याकडे आई आहे. जी माझ्यावर कायम प्रेम करत आली आहे. लक्ष्मण काका, भरत काका या दोघांनी मला डॅडचे प्रेम देण्याचा प्रयत्न केला. मला डॅड नव्हते, पण सगळ्यांनी आपापल्या परीने एक वडील जे आपल्या मुलासाठी करतात, त्यापेक्षा जास्त माझ्यासाठी केले आहे. या जगात वावरायचं कसं? ह्याचे धडे आईआजीकडून मिळाले.


आई काही लोकांच्या आयुष्यात यापेक्षा दुःख असतं. आपल्याला जोपर्यंत त्यांचं दुःख समजत नाही, तोपर्यंत आपण आपल्या दुःखाला कवटाळून बसलेलो असतो." श्रीने सांगितले.


यावर त्याची आई म्हणाली,

"श्री असंच असतं रे. आपल्याकडे काय नाहीये? याचा विचार करत आयुष्य घालवतो आणि मग जे आहे त्याचा आनंद घालवून बसतो. तुला आयुष्याचे हे सत्य जरा लवकर उमगले, म्हणून बरे झाले. मला हे सर्व समजल्यानेच मी कधीच आईंना दोष देत बसत नाही. श्री आयुष्यात सगळंच मिळालं असतं, तर आपण कशासाठी जगलो असतो. आपल्या ज्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठीचं आपण जगत असतो."


"आई तू अगदी जान्हवी सारखीच बोललीस." श्री म्हणाला.


"कोण जान्हवी?" आईने विचारले.


यावर श्री म्हणाला,

"जान्हवी आपल्या कंपनीत काम करते. आज तिच्याच मदतीने अविनाश काकांची भेट झाली. आई जान्हवी अतिशय कष्टाळू, प्रामाणिक आहे. परिस्थितीने तिला फारच समजदार बनवले आहे. मनात एवढं दुःख असून सुद्धा ती सगळ्यांसमोर नेहमी हसतमुखाने वावरत असते. सगळ्यांची मदत करायला तिला आवडते." 


"श्री तुझ्या तोंडून चक्क एका मुलीचे एवढे कौतुक ऐकते आहे. एकदा तिला भेटावंच लागेल. बरं अविनाश भाऊजींकडून काही कळलं का? आणि त्यांचा पत्ता बदलला आहे का?" आईने विचारले.


"अविनाश काकांना त्यांच्या मुलाने वृद्धाश्रमात ठेवले आहे. डॅड कुठे आणि का गेलेत? हे त्यांनाही ठाऊक नाही. पण अविनाश काकांच्या बोलण्यावरुन एकच कळले की, डॅड एकटे पडले होते, त्यांना कोणी समजूनचं घेतलं नाही." श्रीने सांगितले.


यावर आई म्हणाली,

"श्री डॅडचा शोध घेणे आता खूप झाले. आपल्या नशिबात असेल, तर डॅड आपल्याला शोधत येतील. आता या जगात त्यांना कुठे आणि कसं शोधशील? तुझे डॅड एक ना एक दिवस परत येतील, असा मला विश्वास आहे."


"हो आई, मीही हेच ठरवले आहे." श्री बोलून त्याच्या रुममध्ये निघून गेला.


------------------------------------------------------


"जान्हवी आज यायला उशीर केलास. वृद्धाश्रमात बऱ्याच वेळा रमली होतीस." जान्हवीने घरात पाऊल ठेवल्या बरोबर तिचे बाबा म्हणाले.


"हो बाबा. वृद्धाश्रमात मला आमचे बॉस श्री सर भेटले होते, ते अविनाश काकांना भेटायला आले होते. त्यांच्या सोबत बोलता बोलता उशीर झाला. त्यांनीच मला घरी सोडलं." जान्हवीने सांगितले.


"तुझ्या बॉसचं अविनाश कडे काय काम होतं?" बाबांनी विचारले.


जान्हवी म्हणाली,

"माहीत नाही बाबा. त्यावर आमचं फारसं बोलणं झालं नाही. बाबा आज सरांच्या बोलण्यावरुन एक समजलं की, फक्त तुमच्या जवळ पैसा असून उपयोग नाही. तुम्हाला तुमची माणसंही तेवढीच हवीशी असतात. आपल्या माणसांशिवाय आयुष्य जगायला काहीच अर्थ नसतो. यशोमती मॅडम कडे बघून मला नेहमी वाटायचं की, त्या त्यांच्या आयुष्यात खूप सुखी असतील, पण असं अजिबात नाहीये. त्यांच्या आयुष्यात तर आपल्यापेक्षा मोठे प्रॉब्लेम आहेत. आपण त्याची कल्पना सुद्धा करु शकत नाही."


यावर तिचे बाबा म्हणाले,

"बाळा पैशाने सगळं काही विकत घेता येत नाही. ही मोठी लोकं स्वतःला कामात इतकी गुंग करुन घेतात की, घरातील माणसांना वेळच देत नाही. ज्या कुटुंबामध्ये संवाद नसतो, ती माणसं एकत्र टिकूच शकत नाही."


"पण बाबा श्री सरांवर खूप छान संस्कार झालेले आहेत. त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या श्रीमंतीचा माज कधीच दिसून येत नाही." जान्हवीने सांगितले.


"त्याच संस्कारांमुळे आज त्यांचं कुटुंब एकत्र नांदत असेल. आता त्यांच्यावर चर्चा पुरे झाली. मी भाजीपाला आणून तो निवडून ठेवला आहे. तू स्वयंपाकाचं काय ते बघून घे. मी जरा दामलेंकडे जाऊन येतो." बाबा म्हणाले.

------------------------------------------------------


दुसऱ्या दिवशी सकाळी श्री नेहमीप्रमाणे वॉक करण्यासाठी घरातून निघाला होता, तर सृष्टी व दृष्टी त्याची वाट बघत गेटमध्ये उभ्या होत्या.


"तुम्ही दोघी इथे काय करत आहात?" श्रीने विचारले.


"तुझीच वाट बघत होतो. आम्ही आजपासून तुझ्या सोबत वॉक करायला येणार आहोत." सृष्टीने सांगितले.


श्री म्हणाला,

"तू तर यावेळेला काकूला घेऊन योगा क्लासला जात असते ना?"


"आजपासून आई घरी राहून दोन्ही काकूंना योगा शिकवणार आहे. त्या तिघींची गट्टी पुन्हा जमली आहे." सृष्टीने सांगितले.


श्री हसून म्हणाला,

"चांगल आहे, आपण वॉक करत करत गप्पा मारुयात. नाहीतर आपला गप्पांचा वॉक इथेच होईल."


जॉगिंग ट्रॅकवर जान्हवीने श्रीकडे बघून स्माईल दिली. श्री जान्हवी सोबत काही बोलणार इतक्यात दृष्टी म्हणाली,

"दादू थोड्याच दिवसात तुझी इकडे मैत्रीण पण झाली. तुला आमची अडचण होत असेल, तर सांग आम्ही दोघी सेपरेट वॉक करतो."


श्रीने रागाने दृष्टीकडे बघितले व तो म्हणाला,

"माऊ शांत बस. काही बोलू नको."


जान्हवी समोर येऊन म्हणाली,

"आज वॉक करायला पार्टनर घेऊन आलात का?"


"ह्या दोघी आमच्या घरातल्या चिवचिव करणाऱ्या चिमण्या आहेत. त्या दिवशी ते दोन टेडी बिअर ह्यांनाचं घेऊन गेलो होतो." श्रीने सांगितले.


लगेच सृष्टी म्हणाली,

"दादू चिमण्या काय, माझं नाव सृष्टी आहे व हिचं नाव दृष्टी आहे. आम्ही दादूच्या चुलत बहिणी आहोत."


"अच्छा. मी जान्हवी तुमच्या कंपनीत जॉब करते. यशोमती मॅडम कडून तुमच्या दोघींची नावे समजली. एकदा असंच त्या म्हणून गेल्या होत्या की, मी त्यांना त्यांची नातचं वाटते असं, तेव्हा तुमचा उल्लेख झाला होता." जान्हवीने सांगितले.


"दीदी चल आपण तिकडे जाऊन वॉक करुयात." दृष्टी असं बोलल्या बरोबर सृष्टी व दृष्टी दोघी निघून गेल्या.


"आजही तुमचे बाबा आले नाहीत का?" श्रीने विचारले.


"बाबा घराजवळ खालीचं वॉक करतात. आमच्या शेजारचे दामले काका त्यांच्या जोडीला असतात, मग मी एकटीच इकडे येते. कालची रात्र व्यवस्थित झोप लागली ना म्हणजे आपण जी चर्चा केली त्यावर फारसा विचार केला नाही ना." जान्हवी म्हणाली.


यावर श्री म्हणाला,

"हो व्यवस्थित झोप लागली. काल घरी गेल्यावर पहिले आईला मिठी मारली व तिच्या सोबत थोडं बोललो, मग मनातील सर्वचं विसरुन गेलो. आपण व्यक्त होत राहिलं पाहिजे. उगाच मनात सगळं साचून ठेवलं की, मग एखाद्या दिवशी त्याचा उद्रेक होऊ शकतो."


"हो म्हणूनच बोलण्याची गरज असते. तुम्हाला जर कधीही काहीही शेअर करावंसं वाटलं, तर तुम्ही माझ्या सोबत बोलू शकतात. सुजय व साक्षी माझ्याशी भरपूर बोलतात. त्यांच्या मते मी एक चांगली लिसनर आहे." जान्हवी म्हणाली.


"तुम्ही एक चांगल्या लिसनर असाल, पण मग तुम्ही तुमचं मन कोणाकडे मोकळं करतात?" श्रीने विचारले.


जान्हवी म्हणाली,

"माझ्या मनातील भावना समजून घेणार अजून कोणी भेटलं नाही. माझं दुःख समजून घेणे, हे सामान्य माणसाचे काम नाही. चला सकाळी सकाळी मी काहीतरी बोलून तुमचा मूड अजिबात खराब करणार नाही. मी निघते."


क्रमशः


©®Dr Supriya Dighe








🎭 Series Post

View all