राणी मी राजाची भाग २६

प्रवास एका कुटुंबाचा

राणी मी राजाची भाग २६


मागील भागाचा सारांश: श्री अविनाश कदमला शोधायला गेल्यावर त्याची व जान्हवीची भेट झाली. जान्हवीने अविनाश काका वृद्धाश्रमात असल्याची माहिती श्रीला दिली. जान्हवी व श्री दोघेजण वृद्धाश्रमात गेले. अविनाशने श्रीला त्याच्या डॅड बद्दल थोडीच माहिती दिली, तसेच त्याचे डॅड कुठे आहेत? हे अविनाश काकांना सुद्धा माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.


आता बघूया पुढे…..


अविनाश काका निघून गेल्यावर श्री तिथेच एका बेंचवर विचार करत बसला होता. अविनाश काकांनी सांगितलेल्या प्रत्येक शब्दाचा, वाक्याचा अर्थ लावून त्याचे डॅड कसे होते? याचा विचार करत होता. श्री आपल्याच विचारात दंग झालेला होता. जान्हवी श्रीला शोधत शोधत तिथे येऊन म्हणाली,


"सर तुम्ही एकटे इथे काय करत आहात? अविनाश काका व तुमची भेट झाली ना?"


जान्हवीच्या बोलण्यामुळे श्री आपल्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला.


"हो आमची भेट झाली." श्रीने उत्तर दिले.


जान्हवी श्रीच्या चेहऱ्याकडे बघून म्हणाली,

"सर तुम्ही ठीक आहात ना? तुमचा चेहरा असा चिंताग्रस्त का दिसत आहे?"


"काही नाही. एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आलो होतो, ते मिळालं नाहीच, पण त्यासोबत नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत." श्रीने सांगितले.


"सर तुम्हाला सांगायला काही प्रॉब्लेम नसेल, तर तुम्ही अविनाश काकांना का शोधत होता? हे सांगू शकाल का?" जान्हवीने विचारले.


श्रीच्या डोळयात पाणी आले होते. जान्हवीने आपल्या कडील पाण्याची बॉटल श्रीला दिली. श्रीने पाणी प्यायल्यानंतर जान्हवी म्हणाली,

"सर किती दिवस असं मनात सगळं दाबून ठेवाल. तुमच्या मनात कसली भीती आहे, ते मी समजू शकते. सर मी माझ्या बाबांची शप्पथ घेऊन सांगते की, तुम्ही सांगितलेली एकही गोष्ट मी कोणाला सांगणार नाही."


श्री म्हणाला,

"तुम्हाला माझ्या मनात काय चालू आहे? ते किती पटकन कळलं. जान्हवी मला माझ्या डॅडचा चेहरा आठवत सुद्धा नाहीये. ते घर सोडून गेले तेव्हा मी फक्त सात वर्षांचा होतो. मला फक्त त्यांची पाठमोरी आकृती आठवते. 


आपली डिग्री पूर्ण झाली की, डॅडला शोधायचं हे मी ठरवलं होतं. पण मला माझे डॅड सापडतचं नाहीये. माझे डॅड कुठे गेलेत? हे कोणालाच माहिती नाही. अविनाश काका हे माझ्या डॅडचे मित्र होते, पण त्यांनाही काही ठाऊक नाही. मला वाटलं होतं की, आजतरी मला माझ्या डॅड बद्दल काहीतरी कळेल. आता मी डॅडला कुठे शोधू? हेच कळत नाहीये."


"सर सोशल मीडियावर तुम्ही त्यांना शोधलं का?" जान्हवीने विचारले.


"हो केव्हाच शोधून झालंय, पण माझ्या डॅड सारखी एकही व्यक्ती मला सापडली नाही. आमच्या घरात त्यांचा एकही फोटो नाहीये. फोटोच्या मदतीने तरी त्यांना शोधता आलं असतं." श्रीने सांगितले.


जान्हवी म्हणाली,

"तुमच्या आई वडिलांच्या लग्नातील फोटो असतीलच ना?" 


यावर श्री म्हणाला,

"माहीत नाही. आईआजीच्या आदेशानुसार डॅडचा एकही फोटो घरात ठेवलेला नाहीये. आईआजीचं म्हणणं आहे की, जो माणूस स्वतःहून घर सोडून गेला, त्याच्या फोटोला सुद्धा आपल्या घरात थारा नाही."


"मग तर अवघडचं आहे. सर मी दिलेला सल्ला ऐकाल का?" जान्हवी म्हणाली.


"हो सांगा ना." श्री म्हणाला.


यावर जान्हवी म्हणाली,

"सर तुम्ही तुमच्या डॅडला शोधण्यासाठी प्रयत्न केले, पण तुम्हाला त्यांच्या बद्दल काहीच क्लू मिळाला नाही. आता नशिबात असेल तरचं तुमची आणि त्यांची भेट होईल. ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत नाहीत, वेळ आली की ती उत्तरे तुम्हाला मिळतील. सर सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडल्या तर त्याला आयुष्य म्हणता येणार नाही. काही प्रश्न वेळेवर सोडून द्यावे लागतात.


तुमची मनस्थिती माझ्या व्यतिरिक्त कोणीच समजू शकत नाही. जसं तुम्हाला डॅडचं प्रेम मिळालं नाही, तसं मला आईचं प्रेम कधीच मिळालं नाही. मी दहा वर्षांची असताना माझी आई घर सोडून गेली. जाताना तिच्या मनात एकदाही माझा विचार आला नाही. तिने वळून सुद्धा बघितले नाही. शाळेत आई या विषयावर निबंध लिहायचा असल्यावर त्यात काय लिहायचे? हा प्रश्न मला पडायचा.


बाबांच्या हातच्या जळक्या पोळ्या खाऊन मी लहानाची मोठी झाले. माझ्या बाबांनी मला आईचे प्रेम देण्याचा प्रयत्न केला, पण ते कधी शक्य होत नाही. मी स्वयंपाक शेजारच्या काकूंकडून शिकले. आठवी-नववीत असल्यापासून मी स्वयंपाक करत आहे. घरातील कामांचा कितीही कंटाळा आला, तरी ती करावीच लागतात.


आईची कमी अनेकदा जाणवली. आपण सगळंच काही बाबांसोबत शेअर करु शकत नाही ना? त्यासाठी आईचं लागते. मैत्रिणी जेव्हा त्यांच्या आईबद्दल बोलायच्या, तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. बाबा दुःखी होतील, म्हणून त्यांना मनातील बऱ्याच गोष्टी सांगू शकले नाही.


आज घरी बाबांचे एक मित्र आले होते, ते चारधाम यात्रेला जाणार आहेत, बाबांना सोबत येण्याचा ते आग्रह करत होते. बाबांनी माझं कारण पुढे करुन नकार दिला. तेव्हा ते अगदी सहजपणे बोलून गेले की, "जान्हवी मुळे तू दुसरं लग्न केलं नाहीस आणि आता तिच्यामुळे उरलेलं आयुष्य सुद्धा सुखाने जगू शकत नाही. एकदाचं तिचं लग्न करुन टाक, म्हणजे तू कायमचा मोकळा होशील."


तेव्हा मनात विचार आला की, माझ्यामुळे बाबा खरंच किती अडकून गेले आहेत. माझ्यामुळे त्यांना त्यांचं आयुष्य जगता आलं नाही. आता बाबांसोबत या विषयावर बोलून त्यांना त्रास होऊ द्यायचा नव्हता, म्हणून इकडे येण्याचं ठरवलं. इकडे येऊन तेवढंच माईंड डायव्हर्ट व्हायला मदत होते."


श्री पुढे म्हणाला,

"तुमचं दुःख माझ्यापेक्षा कितीतरी पटीने मोठं आहे. तुमच्या चेहऱ्यावरील स्माईलकडे बघून कोणीच म्हणणार नाही की, तुमच्या मनात इतकं काही साचलं असेल म्हणून. तुम्ही इतकं नॉर्मल आयुष्य कसं जगू शकतात?"


"यशोमती मॅडमच्या चेहऱ्यावरुन त्यांचा मुलगा घर सोडून गेल्याचे दुःख जसं दिसत नाही, अगदी तसंच. सर देव जेव्हा दुःख देतो, तेव्हा ते सहन करण्याची ताकदही देतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचे भोग आहेत, ते भोगल्याशिवाय आपली त्यातून सुटका होणार नाही. तुम्ही डिस्टर्ब होतात आणि मीच माझे रडगाणे सांगत बसले." जान्हवी म्हणाली.


यावर श्री म्हणाला,

"अजिबात नाही, उलट तुमचं दुःख ऐकून माझ्या दुःखाची तीव्रता कमी झाल्यासारखी वाटली. तुम्ही हे सगळं सुजय किंवा साक्षी सोबत शेअर करत नाहीत का?"


"सर त्या दोघांना सगळं माहीतच आहे आणि वारंवार तेच सांगून मला त्यांना बोअर करण्याची इच्छा होत नाही. साक्षी व सुजयकडे त्यांची आई आहे, म्हणून त्यांना आईची किंमत नाहीये, ते आईला गृहीत धरतात आणि यावरुन माझं त्या दोघांसोबत भांडण होतं. मग मीच ठरवलं की, त्या विषयावर त्यांच्या सोबत बोलायचंच नाही. तुमच्या डॅडची कमी तुम्हाला जाणवते, म्हणून तुम्ही माझं ते दुःख समजू शकतात. बाकीचे काही वेळेसाठी वरवर सांत्वन करतात आणि नंतर विसरुन जातात." जान्हवीने सांगितले.


"तुमची आई घर का सोडून गेली होती?" श्रीने विचारले.


जान्हवी म्हणाली,

"बाबांनी कधी काही सांगितले नाही, पण आत्या म्हणत होती की, तिचे परक्या पुरुषासोबत विवाहबाह्य संबंध होते. बाबांना हे समजल्यावर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि आई घर सोडून गेली. आता त्यात किती सत्यता होती, हे मला माहित नाही. आत्त्याला कोणतीही छोटीशी गोष्ट मोठी करुन सांगण्याची सवय आहे.


मलाही असं अनेकदा वाटतं की, आईची भेट घेऊन एकदा तिच्याकडून खरं कारण जाणून घ्यावं. बाबा या विषयावर बोलतच नाहीत. शेवटी मी असं ठरवलं आहे की, कधीतरी तिची व आपली भेट होईल आणि सत्य एक ना एक दिवस आपल्या समोर येईल. बरं आता आपण निघुयात. घरी जाईपर्यंत अंधार पडेल. बाबा काळजी करत बसतील."


जान्हवी व श्री परतीच्या दिशेला निघाले. श्रीच्या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले नव्हते, पण आपल्या पेक्षाही मोठे दुःख बाकीच्यांच्या आयुष्यात असते, हे त्याला समजले. कोणीच सर्वसुखी नसतो, हे त्याला कळले होते.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all