राणी मी राजाची भाग २४

प्रवास एका कुटुंबाचा

राणी मी राजाची भाग २४


मागील भागाचा सारांश: दृष्टीने सृष्टीला पत्र लिहून तिची माफी मागितली व ती सृष्टीच्या रुममध्ये शिफ्ट झाली. श्रीने घरातील सर्वांना एकत्र बोलावून भरत व लक्ष्मण काका त्याला कंपनीतील कामात मदत करणार असल्याचे सांगितले. 


आता बघूया पुढे….


दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने श्री उशिरा पर्यंत झोपला होता. श्री वॉकला पण गेला नव्हता. श्रीचा मोबाईल वाजल्यावर त्याला जाग आली.


"हॅलो, कोण बोलतंय?" मोबाईल वरील नंबर न बघता झोपेतच श्रीने फोन उचलला होता.


"काय भावा, थोड्या दिवसातचं या मित्राला विसरला सुद्धा." समोरुन आवाज आला.


"प्रणव तू आहेस होय. अरे झोपेत होतो, कोणाचा फोन आहे, तेही बघितले नाही. आज कंपनीला सुट्टी असल्याने झोप घेण्याचे ठरवले होते. बोल काय म्हणतोस?" श्रीने सांगितले.


प्रणव म्हणाला,

"आज रविवार असल्याने तुला फोन केला होता. तू आता कंपनीचा मालक झाला आहेस म्हटल्यावर विक डेज मध्ये तुला अजिबात वेळ नसेल."


"हो सध्या काम खूप जास्त होतं. कंपनीत थोडा मॅटर झाला होता, तो सॉल्व्ह करण्यात बिजी होतो. गेल्या सात महिन्यात बरंच काही बदलल होतं. बरेच प्रश्न उभे राहिले होते, त्या प्रश्नांची उत्तरे शोधत होतो. काही प्रश्नांची उत्तरे मिळाली आणि काही अनुत्तरित आहेत. माझं राहुदेत, तुझं काय चाललंय?" श्रीने विचारले.


"श्री आयुष्य यालाच म्हणतात. एक प्रश्न सुटला की दुसरा उभा राहतो. बरं ते जाऊदेत. मी दोन महिन्यांनी भारतात येणार आहे. माझं लग्न जमलंय. मावस मामाची मुलगी आहे. नात्यातील असल्याने आम्ही एक दोनदा भेटलो होतो. ती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, तर तिलाही इकडे नोकरी मिळून जाईल. दोन तीन वेळेस व्हिडिओ कॉल वर बोलून निर्णय घेऊन टाकला. किती दिवस असं एकटं आयुष्य जगायचं. तू गेल्यापासून घर खायला उठत होतं. म्हटलं चला आपल्या हक्काचं माणूस घेऊन येऊयात." प्रणवने सांगितले.


श्री म्हणाला,

"अरे भाई इस बातपे पार्टी तो बनती हैं. खूप खूप अभिनंदन."


"भारतात आलो की पार्टी देईल. लग्नाची तारीख फिक्स झाली की, तुला मॅसेज करेल. कितीही बिजी असला तरी तुला लग्नाला यायचं आहे, हे लक्षात ठेव." प्रणव म्हणाला.


" मी तुझ्या लग्नासाठी सुट्टी काढणार नाही, असं होईल का? मला तारीख आधी सांगून ठेव, म्हणजे मी त्याप्रमाणे माझं शेड्युल ऍडजस्ट करुन ठेवेल." श्रीने सांगितले.


"श्री आता तुही कोणीतरी शोध. बिजनेस, कामं होतच राहतील, पण लग्नही तितकंच महत्त्वाचं असेल. घरच्यांना सांगून शोध मोहीम सुरु कर." प्रणव म्हणाला.


यावर श्री म्हणाला,

"इतक्यात नको रे. घरी सांगितलं, तर लगेच शोधायला लागतील. लग्न केलं की, कंपनीत मला पूर्ण लक्ष देता येणार नाही. थोड्या दिवसांनी बघू." 


प्रणव पुढे म्हणाला,

"जशी तुझी मर्जी. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, लग्न करताना मुलीचं बाह्यरुप बघू नकोस, तिचा स्वभाव कसा आहे? ती तुला प्रत्येक परिस्थितीत सपोर्ट करु शकेल का? ते बघ. ती गरीबा घरची असेल तरी चालेल, पण मनाने ती श्रीमंत असली पाहिजे, हे लक्षात ठेव."


श्री म्हणाला,

"हो रे बाबा. आलं माझ्या लक्षात. चल मी नंतर बोलतो, आता उठून फ्रेश होतो. नाहीतर आमच्या घरातील महिला वर्ग मला फैलावर घेतील."


एवढं बोलून श्रीने फोन कट केला आणि अंघोळ करुन नाश्ता करण्यासाठी खाली गेला. श्रीचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. किचनमध्ये त्याची आई व दोन्ही काकू थालीपीठ करत होत्या. लक्ष्मण काका, भरत काका, सृष्टी व दृष्टी डायनिंग टेबलवर बसून एकमेकांसोबत गप्पा मारत थालीपीठ खात होते.


श्रीला बघून गायत्री काकू म्हणाली,

"श्री पहिले गरमागरम थालीपीठ खाऊन घे, मग मी तुला चहा देते. फक्त मला एक सांग की, थालीपीठासोबत दही देऊ की लोणचं?"


श्री खुर्चीत बसत म्हणाला,

"दही दे."


गायत्री काकूने थालीपीठ व दही श्रीच्या पुढ्यात आणून ठेवले.


"दादू लवकर खाऊन घे. आईआजीने आपल्या तिघांना तिच्या रुममध्ये बोलावलं आहे." सृष्टीने सांगितले.


"हे काय श्री आज वॉकला गेला नाहीस." लक्ष्मण काकांनी विचारले.


"आज झोपेतून उठवत नव्हतं, म्हणून गेलो नाही. काका एका रात्रीत आपल्या घरात इतका मोठा बदल कसा झाला?" श्रीच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसून येत होते.


भरत काका म्हणाले,

"थांब मी सांगतो. काल रात्री तू रुममध्ये निघून गेल्यावर आपल्या घरातील महिला वर्गाची मिटिंग भरली होती. आपापसात बोलून त्यांच्या हातून काय चुकलं? हे एकमेकींनी समजून घेतलं. बऱ्याच चर्चेनंतर त्यांच्यातील गैरसमज मिटले, म्हणून हे चित्र दिसत आहे.


श्री तुझ्यात सगळ्यांचा जीव अडकलेला आहे. तुझ्या चेहऱ्यावरील नाराजी बघून त्यांना गिल्टी फिल झालं."


श्री हसून म्हणाला,

"माझ्या बोलण्याचा काहीतरी फरक पडला, हे महत्त्वाचं."


चहा, नाश्ता झाल्यावर श्री सृष्टी व दृष्टी आईआजीच्या रुममध्ये गेले. आईआजी पुस्तक वाचत बसलेली होती. तिघांना बघून आईआजीने हातातील पुस्तक बाजूला ठेवले.


"आईआजी आम्हा तिघांना का बोलावलं?" श्रीने विचारले.


आईआजी म्हणाली,

"मला तुम्हा तिघांना काहीतरी सांगायचं आहे. श्री तुझ्या मनात माझ्याबद्दल जास्त शंका असतील, तू स्वतःहून मला काहीच विचारणार नाहीस, हे मला माहिती आहे.


भरत, लक्ष्मण, जानकी यांच्याकडून तुला मी कशी त्या वेळेला वागली होती? त्याचे सगळ्यांच्या आयुष्यावर झालेले परिणाम तुला कळले असतील. सृष्टी कधीतरी माझ्यासोबत बोलायला येते, पण दृष्टी कधीच येत नाही. कारण तिला माझी भीती वाटत असेल, असं मी समजते किंवा मी रागावलेले तिला आवडत नसेल.


आता काल परवाचीचं गोष्ट घे, सृष्टीच्या तोंडून फॅशन डिझायनिंगचे नाव ऐकले, तरी मी भडकले होते. तिच्या मनाचा विचार न करता मला जे योग्य वाटले ते सांगितले. स्वाभाविकचं तिच्या मनात माझी निगेटिव्ह इमेज तयार झाली असेल. 


माझा हाच स्वभाव सगळ्यांसाठी व माझ्यासाठीही हानिकारक ठरला. ज्यावेळी माझ्या मुलांना माझी गरज होती, तेव्हा मी फक्त बिजनेसचा विचार करत होते. मी स्वतःला कंपनीच्या कामात इतकं बुडवून घेतलं की, एक आई म्हणून माझ्या मुलांना माझी गरज होती, हेच माझ्या लक्षात आले नाही.


राजाराम व जानकीमध्ये माझ्यामुळेच दुरावा निर्माण झाला होता. राजाराम जर हे घर सोडून गेला, तर त्याला मी कुठेतरी कारणीभूत असल्याचे मला वाटते. वेळ निघून गेल्यावर माझ्या लक्षात सर्व काही आले होते, पण त्याचा काहीच उपयोग नव्हता.


लक्ष्मण व भरतने कंपनी जॉईन न करण्याचे ठरवले, पण जसं श्रीने त्यांना एकत्र येऊन काम करण्यास भाग पाडले, तसं मी करुचं शकले नाही. मला बिजनेस व घर याचा समतोल राखता आला नाही. मला माझी नाती सांभाळता आली नाही. माझ्या मुली माझ्यासोबत कधीच मनमोकळ्या बोलल्या नाहीत. अजूनही त्या माझ्याशी बोलायला घाबरतात. तुम्ही तिघांनी मला चुकीचं ठरवू नये,म्हणून मी तुम्हाला बोलावून घेतले."


आईआजीचं बोलणं संपल्यावर श्री म्हणाला,

"आईआजी कोणीच परफेक्ट नसतं. तू कुठेच कमी पडली नाहीस. तू जे संस्कार सगळ्यांवर केले आहेत ना, ते खूप चांगले केले आहेत. आज हे सगळेजण एका छताखाली राहत आहेत,ते केवळ तुझ्यामुळेच. तू सगळ्यांना एका धाग्यात बांधून ठेवले आहेस. तुझं काही ठिकाणी चुकलं आहे, हे सगळेच सांगतात, पण सर्वांनी त्या त्या वेळी तुला समजून घेतलं आहे. सगळ्यांच्या मनात तुझ्याबद्दल आदर आहे. तुला कोणीही चुकीचं समजत नाही.


आता डॅड घर सोडून का गेले? किंवा आई व त्यांच्यामध्ये दुरावा का आला? ह्याचा विचार आत्ता न केलेला बरा. डॅड सोबत बोलल्याशिवाय याबाबत मी काहीच बोलणार नाही. तू स्वतःला अजिबात गिल्टी मानू नकोस. तू आमच्या सर्वांसाठी बेस्ट आजी आहेस आणि कायम राहशील."


सृष्टी, दृष्टी व श्रीने आजीला मिठी मारली. आईआजीच्या डोळयात पाणी आले होते. तिघांच्या तोंडून आणि त्यांचे डोळे आईआजीचे संस्कारचं बोलत होते.


क्रमशः


©® Dr Supriya Dighe






🎭 Series Post

View all