राणी मी राजाची भाग १९

प्रवास राजा राणीचा

राणी मी राजाची भाग १९


मागील भागाचा सारांश: दृष्टीने तिची बाजू श्रीला सांगितली. श्रीने दृष्टीला सृष्टी सोबत पॅचअप करण्याचा सल्ला दिला. श्रीने आईला त्याच्या डॅडने घर का सोडलं? हा प्रश्न विचारला. आई श्रीच्या प्रश्नाचे उत्तर देईल का?


आता बघूया पुढे….


श्रीच्या प्रश्नाचे उत्तर तर द्यावे लागणार होते, म्हणून त्याची आई म्हणाली,


"श्री यापूर्वी सुद्धा तू हा प्रश्न अनेकदा विचारलास, पण दरवेळी मी त्या प्रश्नाचं उत्तर देणे टाळले. कारण तू लहान आहेस, असं मला वाटायचं. आता तुला हे सगळं सांगितलं तरी चालेल. सगळं खरं जाणून घेण्याचा तुला हक्क आहे.


आमचं लग्न झालं आणि वर्षभरातचं तुझा जन्म झाला. घरातील पहिलं बाळ म्हणून तुझं सगळेच जण कोडकौतुक करत होते. तुला सांभाळण्यात, घरातील कामं करण्यात माझा दिवस असाच निघून जायचा. तुझे डॅड दिवसभर कंपनीत रहायचे. रात्री घरी आल्यावर त्यांना माझ्या सोबत बोलायचं असायचं, माझ्या सोबत वेळ घालवावा असं वाटायचं, पण मला कामांपुढे काही सुचायचं नाही. आमच्यातील संवाद हळूहळू संपुष्टात आला होता. आमच्यात जे काही बोलणं व्हायचं, ते फक्त कामापुरतचं. 


जेव्हा ते घरी लवकर यायचे, तेव्हा आई त्यांना कामाबद्दल बोलण्यासाठी रुममध्ये बोलावून घ्यायच्या. मी तुझ्यात मन रमवून घ्यायचे. लक्ष्मण भाऊजी, गायत्री, भरत भाऊजी व रंजना हे चौघेजण कुठेतरी फिरायला जायचे. लक्ष्मण भाऊजी व भरत भाऊजी कंपनीकडे लक्ष देत नसल्याने आई त्या दोघांसोबत फारश्या बोलायच्या नाहीत. मलाही त्यांच्याकडे बघून वाटायचं की, आपण तिघांनी कुठेतरी फिरायला जावं, एकत्र वेळ घालवावा. पण ते कधीच शक्य झालं नाही.


तू एक वर्षांचा झाल्यावर हे कंपनीच्या कामासाठी पुण्याला दोन दिवसांसाठी जाणार होते, तेव्हा ह्यांनी आपल्या दोघांना सोबत घेऊन जाण्याबद्दल आईंकडे बोलून दाखवलं, तर त्यावेळी आईंनी खूप बडबड केली होती. त्या दिवसानंतर ह्यांनी कधीही आपल्यला सोबत घेऊन जाण्याचा विचार केला नाही. 


साहजिकच तुझ्या डॅडमध्ये आणि माझ्यामध्ये अंतर वाढत चालले होते. आम्ही फक्त नावाला एका रुममध्ये रहायचो. आमच्या नवरा बायकोमध्ये असणारे काहीच संबंध उरले नव्हते. तुझ्यासाठी तुझे डॅड मात्र आवर्जून वेळ काढायचे. दररोज रात्री घरी आल्यावर तुझ्यासोबत खेळायचे, गप्पा मारायचे. तुला सायकल चालवायला पण त्यांनीच शिकवलं होतं.


हळूहळू कंपनीतील कामाचा व्याप वाढत चालला होता आणि ह्यांच बाहेरगावी फिरणं वाढू लागलं होतं. घरात असेल तरी ते सतत फोनवर असायचे, नाहीतर आईंसोबत बिजनेसच्या गप्पा मारत बसायचे. आपली एक बायको आहे आणि तिच्याप्रती आपली काही कर्तव्ये आहेत, हेच ते विसरुन गेले होते. 


आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी ते रात्री बारा नंतर घरी आले होते. मी सगळी केलेली तयारी वाया गेली होती. मी छानपैकी तयार होऊन बसले होते. गायत्रीने केक बनवला होता. घरात थोडंफार डेकोरेशन केलेलं होतं. ते घरी आल्यावर मी खूप चिडले, ओरडले, रडले, रागावले. जे काही मनात दडवून ठेवलं होतं, ते सगळं अश्रूंसोबत बाहेर पडलं होतं. ह्यांनी सगळं गुपचूप ऐकून घेतलं. मला मोकळं होऊ दिलं होतं. ते काहीच बोलले नव्हते.


दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टच्या वेळी आईंनी मला चांगलंच फैलावर घेऊन सांगितलं की, "तो बाहेर मजा मारण्यासाठी जात नाही. आपला बिजनेस व्यवस्थित चालावा, आपली प्रगती व्हावी, म्हणून तो सर्व काही करत असतो. हे घर जे चाललं आहे, ते केवळ त्याच्यामुळे. तुला काही कमी पडतं आहे का? सगळं काही तर जागेवर मिळत आहे. काल जे झालं ते झालं, इथून पुढे या घरात असला प्रकार होता कामा नये."


लक्ष्मण व भरत भाऊजींनी ह्यांना माझ्या मनस्थिती बद्दल सांगितलं, तसेच थोड्या दिवस कुठेतरी बाहेर फिरुन येण्याचा सल्ला दिला होता. आईंसमोर कधी कुणाचं काहीच चाललं नाही. आई वडिलांनी मोठ्यांना उलटून बोलायचं नाही, हे संस्कार केल्याने मी आईंसमोर माझी बाजू कधी मांडूचं शकले नाही. 


हे रात्री घरी किती वाजता यायचे? कुठून यायचे? याकडे मी लक्ष देणे सोडले होते. तुझ्या सातव्या वाढदिवसाच्या दिवशी हे वेळेवर आलेच नाहीत. कुठल्या तरी फॉरनर्स सोबत मिटिंग होती, असं त्यावेळी आईंकडून कळलं होतं. रात्री घरी उशिरा आलेच, पण तेही दारुच्या नशेत. आईंना ते सहन झालं नाही व त्यांच्या दोघांमध्ये भांडण झालं. ते भांडणही त्यांच्या रुममध्ये झाल्याने आम्हाला काही कळलंच नाही. चेहऱ्यावरुन हे प्रचंड चिडलेले होते, त्यांच्या डोळ्यात रक्त उतरलेलं होतं. हे काही न बोलता घरातून निघून गेले. जाताना त्यांनी माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. त्यावेळी तुझ्या दोन्ही आत्या आलेल्या होत्या. 


मला वाटलं होतं की, डोकं शांत झाल्यावर हे परत येतील, पण ते कधी आलेच नाही. आईंसमोर बोलण्याची किंवा त्यांना काही विचारण्याची कोणातही हिंमत नव्हती. मीही कधी त्यांना त्या दिवशी रुममध्ये काय घडलं? हे विचारलं नाही आणि त्यांनीही कधी सांगितलं नाही. तू अनेकदा तुझ्या डॅड बद्दल प्रश्न विचारायचा, पण आईंनी तुला काहीही सांगायला नकार दिलेला होता."


"बापरे हे सगळं वेगळंच घडलं होतं. आई तुला काय वाटतंय की, ह्या सगळ्याला आईआजी कुठेतरी जबाबदार आहे का?" श्रीने विचारले.


यावर श्रीची आई म्हणाली,

"श्री असंही म्हणता येणार नाही. खूप खोलवर विचार केला, तर आईंनी त्या काळात फक्त बिजनेसचा विचार केला. तुझ्या डॅडला घर आणि बिजनेस ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित रित्या हाताळत्या आल्या नाही, असं मी म्हणेल. त्यांना तो समन्वय गाठता आला नाही. मला काही काळापुरता आईंचा रागही आला होता, पण आज इतकी वर्षे होऊन गेलीत, तुझे डॅड घरातून निघून गेले. आजवर आईंनी मला कशाचीही कमी पडू दिली नाही. माझा नवरा निघून गेला, याबद्दल त्यांनी मला कधीही दूषणे लावली नाही. 


तुझ्या डॅडला आपण दोघे महत्त्वाचे सुद्धा वाटलो नसेल का? त्यांनी घर का सोडलं? हे मला माहित नाही, पण आपल्याप्रती त्यांची काहीतरी ड्युटी होती, हे त्यांना कळलंच नसेल का? एक फोन करुन सुद्धा त्यांना आपली चौकशी करावी वाटली नसेल का?"


श्री म्हणाला,

"आई कदाचित काही वर्षांनी डॅडला तसं वाटलंही असेल, पण परत येण्याची त्यांच्यात हिंमत नसेल. जोपर्यंत आपली व त्यांची भेट होत नाही, तोपर्यंत आपण त्यांच्या बद्दल मत बनवणे चुकीचे आहे. आई एवढं सगळं होऊनही आईआजी बद्दल तुझ्या मनातील आदर बघून छान वाटलं. आता त्या दिवशी रुममध्ये काय झालं होतं? ह्याचं उत्तर फक्त आईआजी व डॅडलाचं माहीत असेल. आईआजी तर सहजासहजी सगळं काही सांगेल, असं वाटत नाही. डॅडचा शोध लावावा तरी कसा?" 


"तुझ्या डॅडचे एक मित्र होते. अविनाश कदम म्हणून, त्यांचा पत्ता माझ्याकडे आहे. डॅड गेल्यावर आमचा कधी संबंध आला नाही, पण त्यांना जर काही माहीत असेल, तर तुला कळेल." श्रीच्या आईने सांगितले.


"आई तुला कधी डॅडचा शोध घ्यावा असे वाटले नाही का? म्हणजे त्यासाठी आपल्या घरातील कोणी काहीच प्रयत्न केले नाही का?" श्रीने विचारले.


"श्री तुझ्या डॅडचा शोध घ्यायचा असेल, तर त्यासाठी मला घराबाहेर पडावे लागणार होते. आईंनी घराबाहेर पडण्याची परवानगी दिली नसती, म्हणून तो विचार कधी डोक्यात आणलाचं नाही. बाकीच्यांचं म्हणशील तर सुरुवातीला सगळ्यांना वाटलं होतं की, ते कंपनीच्या कामासाठी बाहेर गेले असतील. जवळपास महिना उलटून गेल्यानंतर एके दिवशी भरत भाऊजींनी आईंना विचारले होते की, "दादा परत कधी येणार आहे?"

यावर आईंनी सांगितले की, "त्याचं डोकं ठिकाणावर जेव्हा येईल, तेव्हा तो परत येईल. तो कुठे गेला आहे? हे मला माहित नाही. तो परत येईपर्यंत त्याचं नाव ह्या घरात घेतलेलं मला चालणार नाही. त्याच्या बद्दल कुठलाही प्रश्न मला विचारण्यात येऊ नये." 


आता तुचं सांग श्री कोण काय करेल? हे कुठे जातात? ह्यांचा कोणाशी कॉन्टॅक्ट आहे? हे आईसोडून कोणालाही माहीत नव्हतं. आईचं बोलायला तयार नाही म्हटल्यावर कोण काय करु शकलं असतं. एक मात्र मला तुला सांगायचे आहे, हे गेल्यानंतर लक्ष्मण व भरत भाऊजींनी तुला कधीही त्यांची कमी भासू दिली नाही. तुला गाडी कोणी शिकवली? तुला स्विमिंग कोणी शिकवली? तुला यात्रेत फिरायला कोण घेऊन जायचं? हे सगळं आठवून बघ. काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद नक्कीच निर्माण झाले आहेत, पण ते का झाले? याचा शोध घे आणि मग त्यांना ब्लेम कर. काल तू जे काही भरत भाऊजींना बोलला ते मला बिलकुल आवडलं नाहीये, त्यांची जाऊन माफी माग. त्यावेळी आई समोर असल्याने मला फार बोलता आलं नाही."


"हो आई. माझं चुकलंच होतं. मी दोघा काकांची जाऊन माफी मागणार आहे." श्रीला आपली चूक कळली होती.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all