राणी मी राजाची भाग १५

राजा, राणी आणि त्यांचा प्रवास

राणी मी राजाची भाग १५


मागील भागाचा सारांश: ग्राहक आईआजी बद्दल चुकीची चर्चा करत असताना श्रीला आढळून आले होते, त्यामुळे तो डिस्टर्ब झाला होता. जान्हवीने त्याला समजावून सांगितले. घरी गेल्यावर श्रीला भरुन आले होते. हे जग इतकं वाईट कसं असू शकतं? हा प्रश्न श्रीला पडला होता. श्रीला त्याच्या डॅडची आठवण आली होती.


आता बघूया पुढे…..


नितीनने बारमध्ये जाऊन गोपाळची भेट घेतली. गोपाळ दारुच्या नशेत सगळं काही बोलून मोकळा झाला, तो पवार व देसाई सोबत मिळून यशोमती मॅडमला कसं फसवतो? हे मोठ्या गर्वाने तो सांगत होता. नितीनने व्हिडिओ मध्ये त्याचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलं होतं.


दुसऱ्या दिवशी नितीन सोबत श्री राहिलेल्या ग्राहकांकडे फिरुन त्यांच्या कडून पुरावे गोळा केले. श्रीला काही करुन सोमवारी पवार व देसाईची भांडफोड करायची होती.


श्रीने आईआजी सोबत बसून एक प्लॅन आखला होता, त्याप्रमाणे सोमवारी पवार व देसाईचं खरं रुप पूर्ण स्टाफ समोर उघड करायचं, असं श्रीने ठरवलं होतं.


सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे श्री जान्हवी सोबत बसने कंपनीत पोहोचला. सगळं काही नेहमी प्रमाणेच सुरु होतं. हळूहळू सगळा स्टाफ कंपनीत येऊन आपापल्या कामाला लागला होते. काही वेळानंतर यशोमती मॅडम सर्वांसमोर येऊन उभ्या राहिल्या. यशोमती मॅडमला बघून सर्वजण आपापल्या जागेवर उभे राहिले.


यशोमती मॅडमने बोलायला सुरुवात केली,

"मी सहसा सगळ्या स्टाफसोबत अशी इथे येऊन कधीच बोलत नाही. आजवर ज्याच्याशी बोलले ते केबिनमध्येच. पण आपल्या कंपनीत गेल्या काही दिवसांपासून असं काहीतरी घडत आहे की, त्याचा खुलासा करण्यासाठी मी इथे येऊन तुमच्या सोबत संवाद साधायचे ठरवले. 


मी तुमच्या सर्वांवर आंधळा विश्वास ठेवला. तुमच्यापैकी कोणाच्याही प्रामाणिकपणावर संशय घेतला नाही. तुम्ही जे काम करतात, त्याचा पुरेपूर मोबदला मी देत आले आहे. तुमच्यापैकी कोणाला काही अडचण आली, तर मदत करत आली आहे. उदाहरणार्थ, देसाई कंपनीत जॉईन झाल्यावर सहा महिन्यातचं त्याच्या बायकोची डिलिव्हरी झाली, तिला मुलगी झाल्याने पूर्ण खर्च कंपनीने केला. पवारची मुलगी दहावीत पहिली आली होती, म्हणून कंपनीने तिचा सत्कार केला. गोपाळचे मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून दरवर्षी कंपनी त्यांच्या शिक्षणाचा खर्च करत आहे.


मी तुम्हा सर्वांना मी एक कुटुंब मानत होते. एका कुटुंबात राहून असं कोणी कंपनीचा विश्वासघात करेल, असं मला वाटलं नव्हतं. तुम्हाला जर काही कमी पडत होतं, तर माझ्याकडे येऊन हक्काने मागायचं होतं. मी फुल नाहीतर फुलाची पाकळी नक्कीच दिली असती. चार पैसे जास्त मिळावेत, म्हणून तुम्ही माझा विश्वासघात केला. तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही.

( सगळेजण एकमेकांकडे भिरभिरत्या नजरेने एकमेकांकडे बघत होते. मॅडम नेमक्या कोणाला बोलत आहेत, हेच त्यांना कळत नव्हते.)


देसाई, पवार व गोपाळ मी तुम्हाला बोलत आहे. मांजर डोळे झाकून दूध पीत असल्यावर तिला वाटतं की, आपल्याला कोणीच बघत नाहीये, पण असं नसतं सगळेजण बघत असतात. तुम्ही लोकांनी माझ्या कंपनीचं नाव खराब केलं आहे. माझ्या नावाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला लाज कशी वाटली नाही?" 


यशोमती मॅडमचे डोळे रागाने लाल झालेले होते.


"मॅडम आम्ही काहीच केलं नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तुम्हाला आमच्या विरोधात कोणीतरी भडकवलं आहे." पवार म्हणाला.

त्याच्या बोलण्याला देसाई व गोपाळने दुजोरा दिला. 


यशोमती मॅडमने पवारच्या बोलण्याचे रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवले, तसेच गोपाळचा व्हिडिओ सर्वांना दाखवण्यात आला. गोपाळ खाली मान घालून उभा राहिला. 


देसाई मोठ्या आवाजात म्हणाला,

"मॅडम हा जो नवीन पोरगा जॉईन झालाय ना, त्यानेच काहीतरी केलं आहे. पवारच्या आवाजाची नक्कल केली गेली आहे. यापूर्वी हेच रेकॉर्डिंग श्रीने आम्हाला ऐकवलं होतं आणि आमच्या कडून पैश्यांची मागणी करत होता. आम्ही त्यावेळी थोडेफार पैसे त्याला देऊन टाकले होते. पैसे घेताना मी त्याचा फोटो काढला आहे. गोपाळला दारु पाजून काहीतरी बोलण्यास भाग पाडले आहे. दारुच्या नशेतील माणूस काही बोलू शकतो."


देसाईने फोटो दाखवल्यावर सगळा स्टाफ बडबड करायला लागला होता. 


"पवार, देसाई, गोपाळ तुमच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. तुम्ही तुमच्या वरील आरोप दुसऱ्या कोणावर ढकलू नका. गोपाळ तुझ्या मुलांचे शिक्षण थांबू नये असं वाटत असेल, तर खरं काय आहे ते सगळ्यांसमोर सांग." यशोमती मॅडमने सांगितले.


गोपाळ काहीच बोलला नाही, खाली केलेली मान त्याने वर काढलीचं नाही.


यशोमती मॅडम म्हणाल्या,

"ठीक आहे तर, मी पोलिसांना फोन करुन बोलावते आणि त्यांच्या हातात हे पुरावे देते. हे खरं की खोटं याची शहानिशा पोलिसचं करतील."


गोपाळ यशोमती मॅडमच्या पाया पडून दोन्ही हात जोडून रडत म्हणाला,

"मॅडम मला माफ करा. मला पवार व देसाईने पैश्यांचं आमिष दाखवलं, म्हणून मी भुललो. मॅडम मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगतो की, इथून पुढं असं काहीच करणार नाही."


गोपळच्या अश्या बोलण्यावर पवार व देसाई मॅडम समोर हात जोडून उभे राहिले, मग पवार म्हणाला,

"मॅडम तुम्ही आपल्या कंपनीला कुटुंब मानतात ना, मग कुटुंबातील एखादा सदस्य चुकला, तर त्याला लगेच पोलिसांच्या हवाली तर करत नाही ना. मॅडम आमचं चुकलं, आम्ही तुमची नुकसानभरपाई व्याजासकट देऊ, पण कृपया आम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका."


यावर यशोमती मॅडम म्हणाल्या,

"आता ह्या कंपनीचा कुटुंब प्रमुख बदलला आहे. माझ्या हातात काहीच नाहीये. कुटुंब प्रमुख बदलल्याने नियम सुद्धा बदलले आहेत. नवीन कुटुंब प्रमुखाचं म्हणणं आहे की, त्याला जर तीन खून माफ असते, तर त्याने तुम्हाला तिघांना मारुन टाकलं असतं."


हे ऐकून सर्वांना शॉक बसला होता. आता नवीन कुटुंब प्रमुख कोण? हा प्रश्न सर्वांना पडला होता. जान्हवीच्या चेहऱ्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह होते. 


"आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की, हा कुटुंब प्रमुख कोण? तर तो असेल तुमचा नवीन बॉस. आता ही कंपनी मी त्याच्या हातात सुपूर्द करणार आहे. कदाचित मी तुम्हाला तिघांना माफ केलंही असतं, पण तो तुम्हाला माफ करेल, याची शक्यता नगण्य आहे. हवंतर तुम्ही त्याच्या सोबत बोलू शकता." यशोमती मॅडमने सांगितले.


पवार म्हणाला,

"मॅडम साहेबांना बोलवा ना. मी त्यांच्यावर पायावर डोकं ठेवून त्यांची माफी मागतो."


इतक्या वेळ बघ्याची भूमिका घेतलेला श्री म्हणाला,

"तुम्ही त्याच्या समोर जीव दिला, तरी तो तुम्हाला माफ करणार नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा कालचा आलेला मुलगा आपल्याला हे सर्व का सांगत आहे? तुम्हाला या कंपनीच्या नवीन बॉससोबत बोलायचं आहे ना.


माझं संपूर्ण नाव श्री राजाराम देशमुख. मी यशोमती देशमुख यांचा नातू आहे आणि देशमुख फुड्सचा नवीन मालक. पहिल्याच दिवशी कंपनीत आलो, तेव्हा कंपनीत काहीतरी घोळ चालू असल्याचे समजले. मला तसंही या कंपनीत कोणी ओळखत नव्हतं, म्हणून मी ठरवलं की, तुमच्यात काम करुन खरे गुन्हेगार शोधून काढायचे, तसेच तुम्ही लोक काम कसे करतात, हेही मला कळेल.


ह्या गद्दार लोकांनी मलाच त्यांच्या सोबत काम करण्यासाठी विचारलं. तुम्ही कंपनीत घोळ केला, फसवणूक केली, याचं मला फार काही वाटत नाही. पण तुमच्यामुळे माझ्या आईआजीचं नाव खराब झालं आहे. तिने अतिशय कष्टांतून ही कंपनी उभारली आहे. तिच्या चांगुलपणाची सुद्धा तुम्ही लोकांनी किंमत केली नाही. मी पोलिसांकडे तुमच्या विरोधात तक्रार केली आहे, थोड्याच वेळात ते येऊन तुम्हाला घेऊन जातील. गोपाळ तुझ्या कर्माची शिक्षा तुझ्या मुलांना देणार नाही, त्यांचं शिक्षण सुरु राहील."


बोलताना श्रीचे डोळे लाल झाले होते. जान्हवी श्रीकडे आश्चर्याने बघत होती. पोलिस येऊन देसाई, पवार व गोपाळला अटक करुन घेऊन गेले.


श्रीची खरी ओळख समजल्यावर जान्हवीची प्रतिक्रिया काय असेल? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe







🎭 Series Post

View all