राणी मी राजाची भाग १०

गोष्ट राजा राणीची

राणी मी राजाची भाग १०


मागील भागाचा सारांश: श्री कंपनीत एक स्टाफ म्हणून काम करायला सुरुवात करतो. जान्हवी त्याला प्रत्येक काम समजावून सांगत होती. जान्हवीने श्री सोबत आपला डबा सुद्धा शेअर केला होता.


आता बघूया पुढे….


श्री नेहमीप्रमाणे सकाळी उठून वॉक करण्यासाठी जॉगिंग ट्रॅकवर गेला होता. जान्हवीची जॉगिंग ट्रॅकवर भेट होईल, हे त्याच्या लक्षात नव्हते. जॉगिंग ट्रॅकवर गेल्या गेल्या लगेच जान्हवीने त्याला आवाज देऊन थांबवले.


"मला वाटलंच होतं की, तुम्ही इथे भेटाल म्हणून." जान्हवी म्हणाली.


"आज मी तुम्हाला धक्का मारला नाहीये बरं का." श्री हसून म्हणाला.


यावर जान्हवी म्हणाली,

"काय तुम्ही पण एकच गोष्ट घेऊन बसला आहात."


जान्हवी व श्री वॉक करत करत बोलत होते.


"आज एकट्याच आला आहात की बाबा सोबत आहेत." श्रीने विचारले.


"मी बाबांमुळेचं वॉक करायला येत आहे. बाबा एकटे येत नाहीत, त्यांना डॉक्टरने दररोज वॉक करायला सांगितले आहे. मला दररोज सकाळी झोपेतून उठण्याचा कंटाळा येतो, पण बाबांसाठी उठावे लागते." जान्हवीने सांगितले.


"अच्छा. मग बाबा एकटेच वॉक करतात का? तुमच्या दोघांचं स्पीड मॅच होत नसेल ना?" श्रीने विचारले.


जान्हवी म्हणाली,

"हो ना. तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे. बरं ऐका. आपण कंपनीतील सिक्रेट कामाबद्दल इथेच बोलत जाऊयात म्हणजे कोणाला काही शंका येणार नाही."


श्री जान्हवीच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला,

"यस, ही चांगली आयडिया आहे."


"कंपनीत गेल्यावर दोन लोकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा. एक म्हणजे देसाई आणि दुसरे म्हणजे पवार. हे दोघेजण कंपनीतील सगळ्यात जुन्या स्टाफपैकी एक आहेत. त्या दोघांना कंपनीतील सर्व व्यवहार ठाऊक आहेत. माझा त्या दोघांवर दाट संशय आहे." जान्हवीने सांगितले.


"जान्हवी मॅडम मला काय वाटतंय की, ज्या ग्राहकांकडून आपण ऑर्डर घेतली आणि त्यांना वेळेत माल पोहोचवला नाही, अश्या ग्राहकांकडे जाऊन चौकशी केली तर, म्हणजे आपल्याकडे ठोस पुरावा असेल आणि आपल्याला काहीतरी क्लू मिळेल." श्री म्हणाला.


यावर जान्हवी म्हणाली,

"तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आपण वर्कींग हवर्स मध्ये कुठे जाऊ शकत नाहीत. कंपनी सुटल्यावर जायचं म्हटल्यावर खूप उशीर होईल. शनिवार- रविवार सुट्टी असल्यावर आपल्याला तिकडे जाऊन चौकशी करावी लागेल. तुम्ही घरुन परवानगी घेऊन ठेवा, मी पण बाबांशी बोलून ठेवते. आपण ह्या विकेंडला सगळ्या ग्राहकांकडे जाण्याचा प्रयत्न करु. निदान जास्तीत जास्त ग्राहकांकडे जाऊयात."


"हो चालेल. मी एक सुचवू का? आपण एकमेकांसोबत कमीत कमी बोलत जाऊयात. मला काही अडचण आली, तर मी तुम्हाला विचारेल. कारण उगाच ह्या लोकांना आपल्या दोघांवर संशय यायला नको. आपल्या कंपनीत जो शिपाई आहे गोपाळ, तो आपल्याला काही माहिती देऊ शकतो का?" श्रीने विचारले.


जान्हवी म्हणाली,

"तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे. आपण कंपनीत कमीत कमी बोलत जाऊयात. हवंतर संध्याकाळी बस स्टॉपवर भेटून बोलत जाऊयात. बसमध्ये पण नको. राहिला प्रश्न गोपाळचा तर तो तसा प्रामाणिक वाटतो, पण बाकी सवयींबद्दल मला फारशी माहिती नाही. साक्षी म्हणत होती की, तिने त्याला मागे एका बारमधून पूर्ण नशेत बाहेर पडताना बघितले होते. त्याला जर दारुचे व्यसन असेल, तर मग तो आपल्याला सहजासहजी खरं सांगेल हे सांगता येणार नाही. देसाई आणि पवार काय करु शकतील? याचा आपल्याला अजून अंदाज आलेला नाहीये."


श्री म्हणाला,

"बरं मी गोपाळचं बघून घेईल, फक्त मला साक्षी कडून तो कोणत्या बारमध्ये होता, याची माहिती काढून द्या. मी त्याला बरोबर हाताळतो. गोपाळला सगळ्या स्टाफच्या खानेसुमाऱ्या माहीत असतील."


"चालेल. मी बोलता बोलता साक्षी कडून ही माहिती काढून घेऊन तुम्हाला देते. चला आता मी निघते, नाहीतर कंपनीत यायला उशीर होईल." एवढं बोलून जान्हवी तेथून निघून गेली. थोड्यावेळ वॉक करुन श्रीही घरी गेला. 


"रमाकाकू कंपनीत जाताना मला जेवणाचा डबा घेऊन जायचा आहे, तुम्ही डबा तयार करुन ठेवा." श्रीने रुममध्ये जाता जाता रमाकाकूंना सांगितले.


श्री पटकन तयार होऊन खाली आला. चहा पिऊन, ब्रेकफास्ट करुन हातात डबा घेऊन श्री घराबाहेर पडला. श्रीला असं हातात डब्याची पिशवी घेऊन कंपनीत बसने जायला ऑकवर्ड वाटत होतं, पण काही दिवसांसाठी श्रीला हे सगळं करावं लागणार होतं. जान्हवी बसस्टॉपवर पोहोचण्याआधी श्री तिथे पोहोचलेला होता.


आपल्या आधी श्रीला बघून जान्हवी म्हणाली,

"अरे वा तुम्ही तर वेळ पाळणारे आहात. लवकरच आलात. यशोमती मॅडमला तुमचा हा गुण नक्की आवडेल. मॅडम या वयात सुद्धा सर्वांत आधी कंपनीत हजर असतात."


"मला वेळ पाळायला आवडते. तुम्हाला यशोमती मॅडम आवडतात का?" श्रीने विचारले.


जान्हवी म्हणाली,

"यशोमती मॅडम माझ्या आदर्श आहेत, त्यांचा परिवार खूप मोठा आहे, त्यांनी सर्व फॅमिलीला एकत्र बांधून ठेवलं आहे. शिवाय इतका मोठा बिजनेस स्वतःच्या हिमतीवर उभारला आहे. आजही त्यांच्यात काम करण्याची कमालीची जिद्द आहे. हॅट्स ऑफ टू हर." 


"यशोमती मॅडमच्या फॅमिली बद्दल तुम्हाला कसं ठाऊक?" श्रीने विचारले.


"मागे मॅडमचा एक इंटरव्ह्यू झाला होता, त्यात ऐकलं होतं. मला फक्त एकच प्रश्न आहे की, मॅडमचा एकही मुलगा त्यांचा बिजनेस का सांभाळत नसेल? म्हणजे घरात इतकी माणसं असताना त्या एकट्याच बिजनेस कडे लक्ष का देत असतील?" जान्हवी म्हणाली.


"जाऊदेत आपल्याला काय करायचं? घरोघरी मातीच्या चुली असतात." श्रीने असं बोलून विषय टाळला.


तेवढ्यात बस आली आणि दोघे बसमध्ये चढले. जान्हवी दररोज प्रमाणे बसमधील सर्वांशी गप्पा मारत होती. श्री आपला शांतचं होता. कंपनीचा स्टॉप आल्यावर दोघे बसमधून खाली उतरले. 


"तुम्हाला एवढं बोलून कंटाळा येत नाही का?" श्रीने विचारले.


जान्हवी म्हणाली,

"मला गप्पा मारायला खूप आवडतात. बोलल्याने मनात काही राहत नाही. शांत राहिल्यावर मात्र मनात नको ते विचार येत राहतात."


कंपनीत गेल्यावर श्री व जान्हवी एकमेकांसोबत फारसं काही बोलले नाही. श्रीने देसाई व पवारांची भेट घेऊन त्यांच्या कामाच्या पद्धतीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. मागील दोन तीन महिन्यांचे सेल्स आणि प्रोडक्शनचे रिपोर्ट चेक केल्यावर काहीतरी मोठा घोळ असल्याचा त्याला अंदाज आला. 


जेवण करण्यासाठी श्री जान्हवी व साक्षी सोबत जाऊन बसला. श्रीच्या डोक्यात असंख्य हिशोब चालू असल्याने त्याने काही न बोलता मान खाली घालून जेवण केले. जेवण झाल्यावर तो आपल्या जागेवर जाऊन बसला. 


"श्री साहेब तुम्हाला देसाई साहेबांनी बोलावलं आहे." गोपाळने निरोप दिला.


श्री देसाई कडे जाऊन म्हणाला,

"सर मला बोलावलंत." 


पवार, देसाई आणि गोपाळ तिघेजण तिथे उपस्थित होते.


देसाईने बोलायला सुरुवात केली,

"तू कंपनीत नवीन जॉईन झाल्याने तुझी आणि आमची जवळून ओळख झाली नाही. जान्हवी व साक्षी सोबत फिरुन मॅडमचा चमचा होण्याची गरज नाहीये. यशोमती मॅडमचं आता वय झालं आहे, त्यांना बिजनेस करता येत नाही. आम्ही दोघेही बऱ्याच वर्षांपासून त्यांच्या कामाचा अभ्यास करत आहे. मॅडम आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. तू आमच्या टीममध्ये येऊन काम करायला सुरुवात कर. मॅडम सोबत पवार बोलून घेईल. 


हे बघ श्री आजकाल सरळ मार्गाने वागलं, तर हवे तेवढे पैसे मिळत नाहीत. आम्ही ज्या मार्गाने जात आहोत, त्या मार्गाने गेल्यावर पगाराव्यतिरिक्त भरपूर पैसे मिळतील."


"सर आपण मॅडमच्या विरोधात काम करायचे का? म्हणजे त्यांना फसवायचे का?" श्रीने विचारले.


"नाही रे. हे बघ आपले काही ग्राहक खूप जुने आहेत, त्यांच्या कडून ऑर्डर घेऊन यायची आणि त्यांना मालाची डिलिव्हरी वेळेवर द्यायची नाहीये, त्यांच्याकडे मालाची कमी झाल्यावर दुसऱ्या कंपनीला कळवायचं, ते लोकं तिथे जाऊन त्यांचा माल देतील आणि आपल्याला त्या बदल्यात कमिशन मिळेल. मॅडमला याबद्दल काहीच कळत नाहीत, कारण त्यांचा आमच्यावर विश्वास असल्याने त्या डायरेक्ट तारीख, वेळ कधीच चेक करत नाहीत." पवारने सांगितले.


श्री म्हणाला,

"साहेब ते सगळं ठीक आहे, पण मी कालचं कंपनीत जॉईन झालो आहे, तर तुम्ही माझ्यावर विश्वास कसा ठेऊ शकता? म्हणजे तुम्हाला ही भीती वाटत कशी नाही की, मी मॅडमला सगळं काही जाऊन सांगू शकतो."


देसाई हसून म्हणाला,

"अरे वा, तू तर लईचं हुशार आहेस. काल तुला बसमध्ये चढताना पाहिलं, तेव्हाच तुला पैश्यांची किती गरज असेल, हे जाणवलं. तू गरीब आहेस, हे यशोमती मॅडम कडून कळालं होतं. तू नवीन आहेस, म्हणून तुझ्या डोक्यावर यशोमती मॅडमचं भूत नसेल. नाहीतर इकडे जुना सगळा स्टाफ यशोमती मॅडमचा भक्त आहे. गोपाळला आम्ही आमच्या बाजूने कसं वळवलं हे आमचं आम्हाला माहीत. तू आम्हाला धोका देणार नाहीस, हे आम्हाला वाटतंय. कामाचा लोड वाढल्याने आमच्या तिघांच्याने हे सगळं होत नाही. आम्हाला माणसाची गरज असतानाच तू जॉईन झालास. बरं यावर कोणासोबतचं चर्चा करायची नाही. हा गोपाळ जो आहे ना, तो ह्या कंपनीतील चालता फिरता सीसीटीव्ही आहे, त्यामुळे ह्याला सगळं काही कळतं. तुला जे काम करायचं आहे, त्याबद्दलचा मोबदला व माहिती गोपाळ देईल. आता तू येऊ शकतोस."


श्रीला त्या तिघांचा खूप राग आला होता, पण त्याला स्वतःवर संयम ठेवणे भाग होते. आपल्या आईआजीच्या विश्वासाचा हे लोकं गैरफायदा घेत आहेत, याचा जास्त राग त्याला आला होता.


श्री पवार व देसाईचं भांड कसं फोडेल? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all