कथेचे शीर्षक :- रंग..अनोख्या नात्याचा.
विषय :- आणि ती हसली.
फेरी :-राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा.
रंग.. अनोख्या नात्याचा.
"या खेळणाऱ्या मुली बघताय? आपल्या आश्रमात पाच ते दहा वयोगटातील इतक्याच मुली आहेत. उरलेल्या काही मग लहान तर काही मोठया."
अनाथाश्रमातील व्यवस्थापिकाबाई समोर बसलेल्या जोडप्याशी बोलत होत्या.
"तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला कोणती मुलगी हवीय ते सांगा. हवे तर परिसर फिरण्याच्या निमित्ताने तुम्ही सर्वांना नजरेखालून घालू शकता."
व्यवस्थापिकांचे बोलणे ऐकून समोर बसलेल्या संतोषच्या डोळ्यासमोर उभा राहिला तो आठवडी बाजार.
आठवड्याभराची भाजी घेताना सुधा, त्याची बायको कशी निगुतीने एकेक भाजी हातात घेऊन, पारखून, घासाघीस करून घ्यायची.
त्याने सांगितलेल्या किंमतीपेक्षा दोन रुपये कमी करून हवी ती भाजी घेतली की तिचा चेहरा अगदी प्रफुल्लित होऊन जायचा.
"अहो, आम्हाला मुल हवंय. एखादी भाजी नाही. हे काय नजरेखालून घाला वगैरे." संतोष थोडया जरबेनेच म्हणाला.
"तसे नाही हो. इतक्या वर्षांचा अनुभव आहे म्हणून बोलले. काही पालक एक लेकरू सिलेक्ट करतात आणि मग दुसरे बाळ चांगले वाटले तर मग हुरहूर व्यक्त करतात म्हणून म्हटले." व्यवस्थापिका.
"तरीही मला हे नाही पटलंय. काय गं सुधा? तुझ्या मनात काय आहे?" संतोष बायकोकडे बघून म्हणाला.
"ती बघ ना. ती किती गोड आहे." दोघांच्या चर्चेचे वारेही न शिवलेली सुधा खेळत असलेल्या मुलींच्या घोळक्यातील एका मुलीकडे बोट दाखवून म्हणाली.
"संतोष, आपण तिला आपल्या घरी घेऊन जायचं?" तिने आता संतोषकडे बघितले. नजरेत एक चमक जाणवत होती. तीन वर्षांपासून आज पहिल्यांदा तिचे लकाकणारे डोळे तो न्याहाळत होता.
तिने केलेल्या ईशाऱ्याकडे त्याने पाहिले. एक गोबऱ्या गालाची गोरी मुलगी त्याला दिसली.
"ती होय? तिचे नाव श्रुती आहे. गोड आहे मुलगी." श्रुतीला आवाज देत बाई म्हणाल्या.
बाईंचा आवाज ऐकून श्रुतीचे पाऊल तिकडे वळले तोच सुधा संतोषला म्हणाली, "ही खूप गोड आहे रे. पण आपण तिला सोबत घेऊन जाऊया का? असे विचारलेय मी."
आता मात्र तिचे बोट जिच्याकडे होते ती संतोष आणि व्यवस्थापिका बाईंच्या नजरेस पडली. ती श्रुतीसारखी गोंडस नव्हती. उलटपक्षी वयाच्या मानाने जरा जास्तच बारीक होती. काळीसावळी, चेहऱ्यावर एक कोरडा भाव असलेली.
"ती होय?" बाईंच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरले. कारण आजवर त्या मुलीसाठी एकही पालक मिळाले नव्हते, मिळतील अशी आशाही नव्हती.
"बाई मला बोलवलंत?" एव्हाना श्रुती तिथे येऊन पोहचली.
"हो अगं. ती सावी आहे ना, तिला ऑफिसमध्ये बोलावले आहे, म्हणून सांग हं." बाईंनी तिला परत पाठवले.
पुढच्या दोन मिनिटात सावी तिथे उभी होती. आताही चेहरा तसाच, कोरडा. हसणे म्हणजे काय? हे जणू तिच्या ओठांना माहीतच नसावे.
"यांना नमस्कार कर. तुला भेटायला आलेत बघ." बाईंचे बोलणे तिच्या कानावरून गेले. तिची नजर सुधावर पडली. गोऱ्यापान सुधाला बघून तिच्या कपाळावर एक आठी उमटली.
"तुझे नाव काय गं बाळा?" दोघींची नजरानजर झाली तसे सुधाने तिला विचारले.
"सावळी." ती शांतपणे उत्तरली.
संतोष आणि सुधा दोघांनीही गोंधळून तिच्याकडे पाहिले.
"मी अशी काळ्यासावळ्या रंगाची आहे म्हणून माझी आई मला इथे सोडून गेली ना?" तिच्या टपोऱ्या डोळ्यात खंत आणि राग दोन्ही उफाळून येत होते.
"नाही गं राणी. आई कधी रंगामुळे आपले बाळ सोडून देते होय? प्रत्येक आईला आपले बाळ प्रियच असते गं." सुधाच्या डोळ्यात पाणी आले होते.
"आम्ही तुला आमची मुलगी म्हणून न्यायला आलोय. आमच्यासोबत येशील का?" सुधाच्या डोळ्यात अर्जव होते.
"मला इथून कुठेच जायचे नाहीये." सावीने जोराने नकारार्थी मान हलवली.
काही क्षण स्तब्धतेत गेले.
"तुला माहितीये? आमचं ना एक छोटूसं बाळ होतं. त्याला देवबाप्पा आपल्याकडे घेऊन गेला. आता आमच्याकडे दुसरं बाळंच नाहीये. तू येशील आमच्या घरी? मी तुला छान छान गोष्टी सांगेन. न्हाऊ माखू घालेन. आपण खूप मस्त्या करू, मज्जा करू."
सुधाच्या डोळ्यातील पाण्याने चिमणी सावी न्हाऊन निघाली. ती आत्तापर्यंत खाली मान घालुन उभी होती, इतक्या वेळानंतर तिने मान वर केली.
"मला सावळी म्हणून चिडवणार तर नाही ना?"
"छे गं. उलट सावी किती गोड नाव आहे तुझं. मला तर फार आवडलं. मी तुला सावीच म्हणेन."
सावी काही न बोलता तिथून निघून गेली. तिच्या बंद ओठावरची रेष किंचित हलल्याचे सुधाला जाणवले होते.
"ही सावी अशीच आहे का?" संतोषने त्यांना विचारले.
"नाही हो. एकदा एका जोडप्याने सावळी म्हणून तिला नकार दिला तेव्हापासून ती स्वतःच इथून जायला नकार देते. बाकी पोर गोड आहे हं. जरा आपल्याच कोषात असते, एवढंच." व्यवस्थापिकाबाई म्हणाल्या.
*******
"सुधा, एक विचारू?" रात्री झोपताना तिच्या रेशमी केसातून हात फिरवत संतोषने मनातला प्रश्न विचारला.
"एवढ्या सर्व मुलींतून मी सावीला का निवडले हा प्रश्न पडलाय ना तुला?" त्याच्या डोळ्यात बघत सुधा म्हणाली.
"हो म्हणजे हा प्रश्न पडलाय खरा. तिथल्या सगळ्या मुलीत ही किडमिडीत बारकी अशी. तीच तुला का भावली? म्हणजे तुझ्या चॉईसच्या बाहेर नाहीये मी. तरी जाणून घ्यावेसे वाटतेय." तो.
"तुला खरं सांगू संतोष, मलाही काही कळले नाही. तिच्यावर नजर स्थिरावली आणि वाटलं कोणीतरी अगदी जवळची अशी ही आहे. कोण? ते मात्र उमजत नव्हते. आणि मग अचानक मला गिरीजा आठवली. आमच्या शेजारच्या बंगल्यात रहायची. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी असेल कदाचित. आम्ही एकदोनदाच बोललो एकमेकींशी. ती गर्भश्रीमंत, एकुलती एक. कॉलेजमध्ये असताना चुकीची संगत लागली आणि तिचा पाय घसरला. एका व्यसनी मुलाच्या जाळ्यात ती अडकली. दारूच्या नादात तो ट्रॅकखाली आला आणि तिच्या आयुष्याचे बारा वाजले. ती प्रेग्नंट होती. घरी कळले तेव्हा तिला पाचवा महिना लागलेला. तिच्या वडिलांनी तिला दुसऱ्या गावाला नेऊन ठेवले डिलिव्हरीनंतर मृत अर्भक जन्माला आले, असे सांगून तिच्या बाळाला अनाथाश्रमात आणून सोडले. बाळाच्या विरहात गिरीजाने आत्महत्या केली आणि तिचे आईबाबा सुद्धा शहर सोडून दुसरीकडे निघून गेले."
"पण तुला हे सगळे कसे ठाऊक?" त्याच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्न होता.
"तुला आठवते? मागच्या महिन्यात मी ऑफिसच्या कामासाठी बंगलोरला गेले होते? तेव्हा फ्लाईटमध्ये मला गिरीजाचे बाबा भेटले. ते स्वतःहून माझ्याशी बोलले म्हणून मग मीदेखील त्यांना तिच्याबद्दल विचारले तर त्यांनीच सारेकाही सांगितले. डोळ्यात पश्चाताप होता. गिरीजाशी ते खोटे बोलले नसते तर त्यांची मुलगी जिवंत असती हे सांगताना डोळ्यात पाणी होते."
"इतकं वाईट वाटत असताना मग ते आपल्या नातीला घेऊन जाऊ शकले असते ना?" तो.
"संतोष, एवढं सगळं घडून गेल्यावरही समाजाच्या भीतीने ग्रासलेय रे त्यांना. स्वतःच्या मुलीलाच ते स्वीकारू शकले नाहीत, तर तिच्या मुलीला कसे स्वीकारतील? त्यांच्या आयुष्यात एक सल घेऊन जगताहेत ते. पण तिला सोबत नाही रे घेऊन जाणार."
सुधाच्या डोळ्यात पाणी होते. त्याने ते थेंब अलगद टिपले अन तिला आपल्या मिठीत बंदिस्त केले.
"हॅट्स ऑफ यू बायको. खरंच तू ग्रेट आहेस." तिच्या मस्तकावर ओठांची मोहर उमटवून तो म्हणाला.
"लग्नाच्या पाच वर्षानंतरही मला तुझ्या स्वभावाचे नवनवे कंगोरे अनुभवायला मिळत आहेत. आय एम सो लकी."
"लकी?" ती खिन्न हसली. "जी तुला स्वतःचे बाळ देऊ शकत नाही आणि तुला कसलं लकी वाटतेय रे?"
"सुधा, यापुढे असे बोललेलं मला चालणार नाही हं. आपल्या पिल्ल्याचे आयुष्य तेवढेच होते यात तुझी काय चूक गं? प्रेग्नसीतील कॉम्प्लिकेशन्स, स्वतःला विसरून पिल्ल्यासाठी केलेली खटपट कधी मी विसरेन का गं? उण्यापुऱ्या दोन वर्षात देवबाप्पा पिल्लूला स्वतःकडे घेऊन गेला पण ती दोन वर्ष भरभरून जगलो ना गं आपण? आणि बायको, पुन्हा स्वतःचे बाळ असण्याचा चान्स आपल्याकडे असता तर ह्या गोजिऱ्या सावीला आपण मुकलो असतो ना, सो चिअरअप! आणि तू माझ्यासाठी लकीच आहेस. डोन्ट फॉर्गेट."
तिला हलके थोपटत तो बोलत होता.
बाळ गमावल्याचे दुःख त्यालाही होतेच. त्यांचे पिल्लू जन्माला आले नी गर्भाशयात गुंतागुंत झाल्याने ती पुढे कधीच आई बनणार नाही, हे डॉक्टरांनी दोघांनाही सांगितले. एवढे गोड गुटगुटीत एक बाळ असताना दुसरा चान्स त्यांनाही नको होता. पण देवाचा फेरा कुणाला चुकला होता? पिल्लू दोन वर्षाचा असताना त्याला मेंदूज्वर झाला नी त्यात तो आईबाबांना सोडून गेला. आठ दिवसात होत्याचे नव्हते झाले. नेहमी उत्साहाने भरलेली सुधा आता अंतर्मुख झाली होती. एकलकोंडी, नवऱ्याशीही जास्त बोलत नव्हती. तो तिला समजून घ्यायचा प्रयत्न करत होता, पण ती आपल्याच दुःखात असायची. तीन वर्ष लोटली आणि मग एक दिवस त्याने एखादे मुल दत्तक घ्यायचा प्रस्ताव तिच्यासमोर मांडला. तिला ते पटले. फक्त तिला लहान मुल नको होते. थोडे मोठेच, म्हणजे पुढे जाऊन काही प्रॉब्लेम यायला नको. आज त्यासाठीच ते अनाथाश्रमात गेले होते आणि तिथे गेल्यावर सुधाने सावीला घरी आणण्याचा बेत रचला. सगळे कसे अनपेक्षितपणे घडले होते.
दत्तक घेण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रिया पार पडायला तीन महिन्यांचा कालावधी लागला. त्या काळात आठवडयातून तर कधी दोन आठवड्यातून दोघेही सावीला भेटून येत होते. अजूनही ती खुलली नव्हती.
आणि एकदाचा तिला घेऊन जाण्याचा दिवस उगवला. आपले सामान घेऊन ती गुमान कारमध्ये बसली. आज तिचा चेहरा जरा जास्तच खट्टू झाला होता.
"आश्रमातील मैत्रिणींची आठवण येतेय का?" सुधाच्या प्रश्नावर तिने नाही म्हणून मान हलवली. घरी पोहचेपर्यंत अंधारले होते. तिच्याही मनावर मळभ पसरले होते.
कारमधून उतरून ती सुधा आणि संतोषसह आत आली.
सुधाने अंधाऱ्या खोलीतील दिवा लावला आणि आत्तापर्यंत उदास असलेला सावीचा चेहरा एकदम फुलून आला. हॉल खूप छान सजवला होता. लाल काळ्या फुग्यांनी घरभर गर्दी केली होती. मध्यभागी टेबलवर एक मोठा बार्बी केक तिचीच वाट बघत होता.
"हॅपी बर्थडे सावी." संतोष आणि सुधा दोघे मोठ्याने म्हणाले.
"वॉव! आई, हे माझ्यासाठी?" सावीचे डोळे आनंदाने लकाकत होते.
"ऑफ कोर्स. आमच्या प्रिन्सेसचा आज बर्थडे आहे ना."सुधा हसून म्हणाली. सावीच्या तोंडून आई शब्द ऐकून ती सुखावली होती.
तेवढ्यात बाहेर मोठयाने हॉर्न वाजला.
"हॅपी बर्थडे सावीऽऽ."
अनाथाश्रमातील सर्व मुली आणि व्यवस्थापिका बाई आत येत म्हणाल्या.
आज सावीचा वाढदिवस होता पण सकाळपासून आश्रमात तिला कोणीही शुभेच्छा दिल्या नव्हत्या आणि आता नव्या घरी सर्व मिळून एक मोठा उत्सव साजरा करीत होते.
"थँक यू आई."
सावीने सुधाला आनंदून एक घट्ट मिठी मारली.दोघींच्या चेहऱ्यावर आंनदाची कारंजी फुलली होती. इतक्या दिवसात सावी पहिल्यांदा हसली होती.
"वेडाबाई आता ओठावरचे हसू असेच कायम राहू दे." दोघींना आलिंगन देत संतोष म्हणाला.
प्रेमाच्या रंगात रंगलेले त्यांचे त्रिकोणी कुटुंब खऱ्या अर्थाने पूर्ण झाले होते.
****समाप्त ****
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
संघ :-अहमदनगर.
फोटो गुगल साभार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा