Oct 26, 2020
Love

रंग त्याचा सावळा

Read Later
रंग त्याचा सावळा

    समीर आज लवकरच घरी आला होता.आज त्याने ऑफिस मधून हाफ डे घेतला होता कारण उद्या समिधाच्या चुलत बहिणीचा म्हणजे त्याच्या मेहुनीचा साखरपुडा होता.समीर तसा जरा गंभीर दिसत होता त्याच्या मनात बरीचशी घालमेल चालली होती. सविधाशी त्याला आज बोलयाचेच होते. म्हणून तो समिधाला म्हणाला.

 

समीर,“ आवरली का तुझी पॅकिंग वगैरे?” 

 

           समिधा बेडरूममध्ये छोटीशी बॅग भरत विचार करत होती. माझ्या माहेरी जायचं आहे पण माझ्या पेक्षा यालाच घाई झाली आहे. मी ठरवलं होतं की मी एकटी जाईन. याला सुट्टी नाही ही सबब होतीच द्यायला पण बाबांनी याला फोन करून आग्रह केला आणि मग काय झाला हा ही तयार आता त्या अंकिताच कुचके बोलणे ऐका कालच तर तिच्या होणाऱ्या गोऱ्या गोमट्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो मला पाठवला होता तिने! बघ म्हणे फीअर अँड हँडसम! मला हिनवायला दुसरं काय? वरून माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणीना बोलावलं आहे म्हणे आता या समीरला पाहून सगळ्यांच्या विचित्र नजरा मला झेलायला लागतील.  याने मला प्रॉमिस तर केलं आहे पण मला विश्वास नाही. ती हा सगळा विचार करत होती तो पर्यंत  समीर बेडरूममध्ये आला आणि तिला बोलू लागला.

 

समीर,“ हे बघ समिधा मोठी बॅग घे! तू आता माहेरी गेलीस की तुला परत येण्याची गरज नाही इथे! कारण आठ दिवस म्हणून तू तिथे राहा आणि आपलं ठरल्या प्रमाणे मी तुला डिव्होर्स नोटीस पाठवून देईन! मग मनसोक्त मला शिव्या-श्राप दे! रड! त्रागा कर! मी दोन्ही कडे सगळ्यांना सांगेन की मला तुझ्या बरोबर राहायचं नाही! काय दोष द्यायचा तो मला देतील! तुला सगळ्यांची सहानुभूती मिळेल मग वर्ष भरात डिव्होर्स आणि त्या नंतर तू  मोकळी!” तो एका दमात सगळं बोलून गेला.

 

समिधा,“ तुम्ही  खरं बोलता  आहात हे?” तिने आश्चर्याने  विचारले.

 

समीर,“ हो!” तो तिच्याकडे पाठ फिरवून डोळे पुसत म्हणाला.

 

       समिधा आणि समीर आत्ता तर लग्नाला सहा महिने झालेले नवीन जोडपे पण त्यांच्यात असं काय घडलं होत की ते घटस्फोटाची भाषा बोलत होते?


 

       समिधा पुण्यातील सुखवस्तू एकत्र कुटुंबातील मुलगी! दिसायला गोरीपान,शिडशिडीत बांधा, टपोरे घारे डोळे चाफेकळी नाक आणि स्टेप कट असलेले सुंदर भुरे केस त्यात ही आय.आय.टी. इंजिनिअर पण कुटुंब आणि खास करून तिचे बाबा शिस्त प्रिय आणि लग्ना सारखे महत्त्वाचे निर्णय घरातले मोठे लोकच घेत.त्यामुळे समीर आणि तिचे अरेंज मॅरेज!

            समीर जाधव इंजिअर!मुंबईत p. w. d मध्ये क्लास वन ऑफिसर होता.सुस्वभावी आणि उत्तम कुटुंबातील! अंगापिंडाने मजबूत पण सावळ्या रंगाचा! समिधा त्याच्या बाबांचे मित्र म्हणजेच आनंद सामंत यांची कन्या! सामंतानी स्वतःच समीरला समिधासाठी मागणी घातली आणि पाहण्याचा कार्यक्रम  झाला आणि पाहता क्षणी समिधा त्याला पसंत पडली. मग काय उडला लग्नाचा बार!

        पण या सगळ्यात समिधाला मात्र तिची पसंती कोणीच विचारली नाही आणि तिच्या बाबां पुढे तोंड उघडायची तिला हिम्मत झाली नाही. पण गेल्या सहा महिन्यात तिच्या वागण्यातून समीरला कळून चुकले होते की समिधाला तो नवरा म्हणून पसंत नाही. समिधा लग्न झाल्या पासून त्याला हिडीसपीडिस करायची. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिने समीरला सांगून टाकले की ती या नात्यासाठी तयार नाही! त्याला वाटले की तिला तिचा वेळ द्यावा! स्पेस द्यावी म्हणून तो तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे आई-वडील गावाकडे आणि लग्न होऊन पंधरा दिवसातच त्यांनी समिधाला त्याच्या बरोबर मुबंईला पाठवून दिले. तिथे आल्यावर ही समिधाची वागणूक बदलत नव्हती. ती समीरशी ना नीट बोले ना नीट वागे!   समीर तिला पसंत नव्हता कारण त्याचा सावळा रंग! तिने कायम गोऱ्यागोमट्या राजकुमारची स्वप्ने पाहिली होती आणि समीर तिच्या कोणत्याच कल्पनेत बसत नव्हता. शेवटी समीरनेच एक दिवस तिला विचारले.

 

समीर,“ तुझे कोणा दुसऱ्यावर प्रेम आहे का समिधा? तुझं लग्न जबरदस्तीने झाले आहे का?” 

 

समिधा,“ तसेच काही नाही पण!” ती  घाबरत म्हणाली.

 

समीर,“ पण मग काय समिधा? मी तुला पसंत नाही का? तसं असेल तर मला सांग आपण काही तरी मार्ग काढू यातून!” तो म्हणाला.

 

समिधा,“ हो तुम्ही मला पसंत नाहीत आणि नव्हता!पण माझ्या बाबां पुढे माझे काही चालले नाही! आणि तुम्ही काय मार्ग काढणार आहात यातून?”ती चिडून म्हणाली.

 

समीर,“ मार्ग तर निघूच शकतो आपण घटस्फोट घेऊ! तुझी या लादलेल्या आणि पसंत नसलेल्या नात्या पासून सुटका होईल!” तो शांतपणे म्हणाला.

 

समिधा,“ जर माझ्या बाबांना कळले की मी तुमच्याशी घटस्फोट घेतला तर ते मला दारात ही  उभे करणार नाहीत समीर! तुम्हाला हे इतके सोपे वाटते का?” ती रडत म्हणाली.

 

समीर,“ समजा मीच तुला घटस्फोट दिला तर! तर त्यांना घरात घ्यावेच लागेल तुला समिधा! बरोबर का?” 

   तो जणू आज सोक्षमोक्ष लावूनच टाकणार होता असं त्याने ठरवले होते.समिधा त्याच्याकडे पाहून म्हणाली. 

 

समिधा,“ खरंच तुम्ही असं करू शकता का? पण तुम्ही हे सगळं का करणार?” तिने विचारले.

 

समीर, मी का करणार हे सोडून दे! पण मी हे नक्की करेन! आणि ते ही लवकरच!” तो म्हणाला. 

 

      आणि आज समीरने  त्याचा शब्द खरा केला होता.त्याने समिधाला घटस्फोटाची नोटीस दाखवली व तो पुढे  म्हणाला.

 

समीर,“ हे बघ ही नोटीस  मी तुला तू माहेरी राहिल्यावर चार-पाच दिवसाने पाठवेन आणि मग तुझा काही दोष नसताना मी तुला घटस्फोट देत आहे म्हणाल्यावर तुझे बाबा मला समजवायला येतील तेव्हा मी त्यांचा अपमान करेन म्हणजे मी त्यांच्या मनातून उतरलो की तुझा पुढचा  मार्ग सुखकर होईल!” तो म्हणाला.

 

समिधा,“ पण तुम्ही हे सगळं का करत आहात माझ्यासाठी?” तिने आश्चर्याने विचारले.

 

समीर,“ कारण समिधा चूक कुठे तरी माझी ही आहे मी तुला पसंती दर्शवली पण मी तुला पसंत आहे की नाही याचा विचार मी तरी कुठे केला?मी एकदा तरी तुला ‛मी तुला पसंत आहे का?’ हे विचारायला हवे होते आता चूक मी केली म्हणजे मला ती निस्तरावी लागणार ना!” तो शक्यतो स्वतःच्या डोळ्यातील पाणी लपवत म्हणाला.

 

समिधा,“ समीर तुमच्या सारखी चांगली माणसं खूप कमी आहेत या जगात!” ती कृतज्ञपणे म्हणाली.

 

समीर,“ बरं बरं आवर लवकर आपल्याला कमीत कमी रात्री  नऊ वाजे पर्यंत तरी पुण्यात पोहचावे लागेल कारण उद्या कार्यक्रम करून मला निघावं लागेल!” तो म्हणाला.

 

समिधा,“बरं!” असं म्हणून तिने मोठी बॅग काढली आणि कपडे भरण्यात मग्न झाली. समीर तिथेच उभा राहून बराच वेळ तिला पाहत होता. तिचे मात्र लक्ष नव्हत त्याच्याकडे.

 

          त्याने स्वतःचे ही दोन जोड घेतले आणि बॅगेत भरले.दोघे ही पाच वाजता पुण्याला जायला निघाले. समीर ड्राइव्ह करत होता व मधे-मधे समिधाशी बोलत होता.समिधा मात्र शांत होती. तिला एक तर समीर इतकं चांगलं वागू शकतो याचे आश्चर्य वाटत होते. ती विचार करत होती.

           गेल्या सहा महिन्यात आपण फक्त याला हिडीसपीडिस केले. या लग्नातुन याला फक्त मनःस्थाप झाला आणि तरी हा आपली इतकी मदत करत आहे. सगळा वाईट पणा स्वतः कडे घेऊन हा आपल्याला या नको असलेल्या नात्यातून मुक्त करत आहे. खरंच हा किती चांगला आहे.या विचारातच तिला झोप लागली.

             समीर देखील समिधाचा विचार करत होता. आपण पाहता क्षणीच हिच्या प्रेमात पडलो. हिचा आत्मविश्वास आणि अदब पाहून आपण भाळलो! पण हिची साथ माझ्या आयुष्यात इतकीच लिहली असेल कदाचित! मीच कुठे तरी कमी पडलो असेन! म्हणूनच सहा महिन्याच्या काळात आपण तिच्या मनात स्थान निर्माण नाही करू शकलो! असं ही लग्न करताना ही आपण तिला एकदा ही तिची पसंती विचारली नाही! पण आता या लादलेल्या लग्नातून तिची सुटका करून आपण आपली चूक सुधारली पाहिजे नाही ती मी सुधारणारच!”पण मी तिच्यावर इतकं प्रेम करतो.तिची सवय झाली आहे या सहा महिन्यात मला आता ती दूर गेल्यावर मी तिच्या शिवाय जगू शकेन का?

      या विचारांच्या तंद्रीतच समिधाचे घर आले.समिधा अजून ही झोपलीच होती.तिला समीरने उठवले ती आणि समीर घरात गेले.सगळे तिला आणि समीरला पाहून खुश होते.समिधा तिच्या चुलत बहिणी,आई आणि चलत्यां बरोबर आत निघून गेली. समीर बाहेर हॉलमध्ये पुरुषांच्या बरोबर बसला! उद्या साखरपुडा असल्याने आज बरीच पाहुणे मंडळी मुक्कामी आली होती.

               अंकिता समिधाला खोचकपणे म्हणाली 

 

अंकिता,“अग डार्क जीजू कुठे आहेत? अग म्हणजे टॉल, डार्क अँड हँडसम जीजू ग!”

 

 समिधा, “आहेत बाहेर बाबां बरोबर!” ती तिचा बोलण्याचा रोख समजून मनात चरफडत म्हणाली.

 

      अंकिता समिधाची सख्खी  चुलत बहीण तिच्या पेक्षा वर्ष भरणे लहान होती. पण  लहानपणापासून  तिचा समिधावर रोष होता कारण समिधा हुशार असल्याने कायम अंकीताची तुलना तिच्याशी केली जायची आणि अंकीताला  कायम समिधाचे उदाहरण देऊन हिनवले जायचे पण समिधाच लग्न समीरशी झाल्या पासून  अंकिता तिला सतत समीरच्या रंगा वरून टोचून बोलत असे आणि  समिधा स्वतःच्या नशिबाला दोष देण्याशिवाय काही करू शकत नसे आणि आता तर काय अंकीताला समीर पेक्षा देखणा नवरा मिळाला होता. गोरागोमटा आणि हँडसम आता तर आयतच माकडाच्या हातात कोलीत मिळालं होतं.आता उद्या ही अंकिता तिला चांगलंच हिनवणार होती. त्यामुळे समिधा आता पासूनच अपसेट होती.

 

         रात्री सगळ्यांची जेवणं झाली आणि सगळे झोपले. आज सगळे लवकरच उठले. नाष्टा झाला आणि एक-एक करून सगळे कार्यक्रमाच्या हॉलवर पोहोचले. दुपारच्या आणि संध्याकाळच्या  जेवनाची सोय तिथेच होती.साखरपुड्याचा कार्यक्रम संध्याकाळी होता. समीर आणि समिधा ही हॉलवर पोहोचले होते.समीर समिधाच्या माहेरच्या लोकांमध्ये अगदी मिसळून गेला होता. तो तिच्या भावांना  कार्यक्रमात मदत करत होता. समिधा ही महिला मंडळाला मदत करत होती. 

                 एका प्रशस्त आणि सुंदर हॉलमध्ये साखरपुडा ठेवण्यात आला होता. स्टेजवर मस्त ऑर्चिटच्या फुलांची सजावट करण्यात आली होती. हॉलच्या प्रवेश व्दारापासून  स्टेज पर्यंत जाण्यासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या आणि त्याच्या कडेने  दोन्ही बाजूने स्टॅंड असलेले मोठं मोठे  लोखंडी खांब समोरासमोर ठेवण्यात आले होते आणि त्या दोन दोन खांबावर फुलांच्या कमानी तयार करण्यात आल्या होत्या. हॉलच्या किचन मध्ये संध्याकाळच्या मेजवानीची तयारी सुरू होती. आता चार वाजून गेले म्हणून सगळे तयार व्हायला लागले होते.अंकिताने ही ब्युटीशीअन बोलावून घेतली होती आणि ती केंव्हा पासून तयार होत होती.समिधा ही मस्त तयार झाली होती तिने पर्पल कलरचा लेंहंगा-चोली घातली होती आणि केस मोकळे सोडले होते, लाईट मेकअप आधीच सुंदर असणारी ती अजूनच सुंदर दिसत होती. समीरने ही फ्लोरल प्रिंट असलेले ऑफ व्हाइट ब्लेझर, ऑफ व्हाईत कलरचा शर्ट आणि तशीच ट्राव्हजर घातले होते. त्याचे रुबाबदार असणारे व्यक्तिमत्त्व त्यात खुलून दिसत होते.तो तयार होऊन समिधाच्या दिशेने येत होता आणि ती त्याला अवाक होऊन पाहत होती.ती विचारात पडली एक रंग सोडला तर याच्या मध्ये कोणतीच कमी नाही.स्वभावने ही छान आहे.त्याने मनात आणले असते तर केव्हाच मला मिळवले असते स्वतःचा नवरा होण्याचा हक्क गाजवला असता पण त्याने तसं काहीच केलं नाही.हीच तर तो एक चांगला व्यक्ती असल्याची ग्वाही आहे ना! आज कसला कातील दिसतोय हा! हा हाच समीर आहे का मी ज्याला नाकारत आहे.तो जवळ आला आणि समिधा समोर चुटकी वाजवली तेंव्हा समिधा भावनांवर आली. समीर तिला म्हणाला.

 

समीर,“ कुठे लक्ष आहे मॅडम! ही माझी बॅग तुझ्या जवळ ठेव. मी रात्री जाताना घेऊन जाईन! By the way you are looking  gorgeous!”तो तिला पाहत म्हणाला.

 

समिधा,“ समीर तुमचं  आज रात्रीच निघण गरजेचं आहे का? उगीच रात्रीच ड्रायव्हिंग! एक तर आज दिवस भर तुम्ही एक मिनिट ही बसला नाहीत. तुम्ही आज राहा आणि उद्या सकाळी निघा ना!” ती काळजीने बोलत होती.

 

समीर,“ अग तू तर बायको सारखी काळजी करायला लागलीस की! नाही मी जाईन आजच मला महत्वाची कामे आहेत आणि आता या लग्नातुन बाहेर पड समिधा हळूहळू म्हणजे तुला ही जड जाणार नाही.” तो तिला समजावत होता.

 

      समिधा त्यावर काही बोलणार तर तिचा भाऊ तिथे आला आणि समीरला घेऊन गेला. समिधा मात्र त्याच्या या बोलण्याने अपसेट झाली पण ती अपसेट का होती हे तिलाच कळत नव्हते.समीरचे बोलणे खरं तर चुकीचे नव्हते. अंकीताच्या सासरचे लोक तिचा होणारा नवरा राहुल ही आले.आता साखरपुड्याचे विधी सुरू झाले. सगळे विधी झाले आणि प्रत्येक जण गिफ्ट सह भावी वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर जात होते.समिधाला खरं तर नव्हतं जायचं पण फॉर्मेलीत म्हणून जावं लागणार होत. समीरने तिला इशारा केला आणि ती समीर बरोबर स्टेजवर गिफ्ट घेऊन गेली. अंकिताने  मात्र तो ही चान्स सोडला नाही समिधाला हिनावण्याची ती तिला व समीरला तुच्छपणे पाहत म्हणाली.

 

अंकिता,“ समी बघ ना राहुल खरच फिअर अँड हॅन्डसम आहे ना! नाही तर काहींना न शोभनाऱ्या जोडीदारा बरोबर आयुष्य काढाव लागत ग!” 

 

          समिधाच्या डोळ्यात हे ऐकून टचकन पाणी आले. ती अंकीताला काहीच न बोलता तिथून निघून गेली. समीरच्या मात्र सगळा प्रकार लक्षात आला. खरं तर अंकिताने समीरचा अपमान केला होता आणि जावई म्हणून तो या गोष्टीवरून तमाशा करू शकला असता पण त्याने तसे केले नाही. त्याला समिधाची काळजी वाटत होती म्हणून तो तिला शोधू लागला. तर समिधा त्याला एका कोपऱ्यात मुसमुसताना दिसली. समीर तिला समजावत म्हणाला.

 

समीर,“ अग तू कशाला अंकिताचे बोलणे इतके मनाला लावून घेतेस आणि असं ही तुला अजून असे बोलणे खावे लागणार नाही  कारण ते कारणच तुझ्या आयुष्यात राहणार नाही”

 

समिधा,“ तुम्हाला हे सगळे इतके सोपे वाटते का?  काश मी तुम्हाला माझ्या आयुष्यातून डिलिट करू शकले असते!” ती चिडून असं म्हणाली आणि निघून गेली.

         खरं तर अंकिताच्या बोलण्यापेक्षा समिधाचे बोलणे समीरच्या मनाला लागले.त्याचे डोळे अक्षरशः पाण्याने भरले होते.पण त्याने स्वतःच्या भावनांना आवर घातला.  समीरची या सगळ्यामध्ये काहीच चूक नव्हती कारण समिधाला जर तो पसंतच नव्हता तर तिने तिच्या बाबांना ठामपणे नकार द्यायला हवा होता.पण तिने तसं न करता समीरशी लग्न करून उलट त्यालाच बोल लावला होता. समीर मात्र या सगळ्यात विनाकारण भरडला जात होता.तरी त्याने समंजसपणा दाखवला. सगळे आता जेवण करत होते.समीरला समिधाचा भाऊ आणि बाबा चार वेळा जेवायला बोलावून गेले होते.पण समीरची नजर समिधाला शोधत होती.त्याला समिधा एका कोपऱ्यात तोंड पाडून बसली होती. त्याला माहित होतं की ती जेवली नसणार म्हणून त्याने ज्यूस काउंटर वरून एक ज्यूसचा ग्लास घेतला आणि तो समिधा जवळ जाऊन म्हणाला.

 

समीर,“ समिधा हे घे कमीत कमी ज्यूस तर घे!”

 

समिधा,“ समीर प्लिज तुम्ही जा इथून मला एकटीला राहायचे आहे. उगीच माझ्या मागे मागे करू नका! बरं दिसत नाही ते!” ती चिडून म्हणाली आणि वॉशरुमकडे गेली.

 

        समीर तिथेच उभा राहिला. थोड्याच वेळात सगळ्या हॉलमध्ये गदारोळ आणि गोंगाट उठला. जो तो पळत होता. कारण हॉलच्या किचन मध्ये आग लागली होती आणि ती आग सगळीकडे पसरत होती हळूहळू ती आग सगळा हॉल व्यापत होती. जो तो आप-आपला जीव वाचवत होता. समीर हे सगळं पाहून वॉशरुमकडे पळाला कारण समिधा वॉशरुममध्ये होती. समिधाला बाहेर काय झालेले आहे ते काहीच माहीत नव्हतं.एव्हाना आग चांगलीच भडकली होती आणि सगळीकडे धुरच धूर दिसत होता. समीरने वॉशरुमचे दार वाजवले आणि त्याने समिधाला आवाज दिला.

 

समीर,“ समिधा दार उघड! लवकर बाहेर ये ग!”तो ओरडत होता.

 

समिधा,“ तुम्ही मला एकट सोडणार नाही का?” असं म्हणून तिने चिडून दार उघडलं तर समोरच दृश्य पाहून चक्रावली. सगळीकडे धुराचे लोळ आणि आग दिसत होती. समीरने तोंडाला रुमाल लावला होता तरी त्याला ठसका येत होता.तो खोकतच तिला म्हणाला.

 

समीर,“ लवकर चल समिधा! खूप आग भडकली आहे!”असं म्हणून त्याने तिचा हात धरला आणि तो त्या आगीतून वाट काढत तिला आणि स्वतःला वाचवत निघाला. त्याने काही तरी विचार केला आणि थांबला स्वतःचे ब्लेझर काढून तिला देत तो म्हणाला.

 

समीर,“हे घे घाल हे  ब्लेझर आणि चल!” तो म्हणाला.

 

समिधा,“ नको मला! तुम्हाला पण गरज आहेच की याची!”ती तोंडाला पदर धरून बोलत होती.

 

समीर,“ माझी कोणतीच गोष्ट ऐकायची नाही असेच ठरवलं आहे का ग तू?”तो चिडून म्हणाला.

      

       त्याला इतकं चिडलेला पाहून तिने निमूटपणे ब्लेझर घातले. समीरने एका हाताने समिधाला कवेत घेतले होते आणि दुसऱ्या हाताने तो वाट काढत होता.समिधाला त्याने एक सुरक्षित ठिकाण पाहून थांबवले आणि तो जरासा पुढे रस्ता कुठून आहे ते पाहण्यासाठी गेला कारण धुरामुळे पुढचे काही दिसत नव्हते. तो बाहेर निघण्यासाठी हॉल च्या मागच्या बाजूला उघडणारी  एक खिडकी शोधून आला जी खूप मोठी होती आणि उघडी ही त्यातून ते दोघे आरामात बाहेर जाऊ शकत होते. समीर माघारी आला तर समिधा तिथे नव्हती. त्याने इकडे तिकडे पाहिले तर समिधा ही काही तरी शोधत असलेली त्याला दिसली. तिच्या मागे फुलांच्या कमानी बनवण्यासाठी तात्पुरते उभे  केलेल्या  लोखंडी खांबातील एक खांब त्याच्यावर जवळच असलेल्या कुलर जळून कोसळल्याने तो खांब ही नेमका समिधाची अंगावर पडणार होता तेव्हढ्यात समीरचे लक्ष तिकडे गेले आणि त्याने समिधाला तिथून हटवले पण तो खांब त्याच्या अंगावर अर्धवट कोसळला.समिधा ते पाहून किंचाळली. पण समीर दोन मिनिटात सावरला कारण त्याच्या जवळ तितका वेळच नव्हता सगळी कडून आग डोंब उसळला होता. त्याने समिधाला धरले आणि तो आग चुकवत  खिडकी पाशी गेला.खिडकी उंच असल्याने त्याने पहिल्यांदा समिधाला उचलून बाहेर सोडले आणि मग स्वतः उडी मारून बाहेर पडला.

 

    तो पर्यंत बाहेर सगळे त्या दोघांना शोधत होते.  ते दोघे ही  हॉलच्या  मेन डोअर समोर गेले.तो पर्यंत फायर ब्रिगेड आणि अब्युलन्स ही आल्या होत्या. समिधाने तिच्या आईला पाहिले आणि त्यांना मिठी मारून ती रडू लागली. समिधाच्या बाबांनी समीरला तू ठीक आहेस का? हे विचारायच्या आधीच समीर खाली कोसळला. ते पाहून सगळे त्याच्याकडे धावले समिधाने त्याला  हात लावून उठवण्याचा प्रयत्न केला तर तिच्या हाताला डोक्यातून वाहणारे रक्त लागले. त्याचा शर्ट मागुन पूर्ण रक्ताने भरला होता. तातडीने त्याला अब्युलन्स मधून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. 

 

           एव्हाना रात्रीचे बारा वाजून गेले होते. समीरला इमर्जन्सी रूममध्ये नेण्यात आले.समिधा मात्र बाहेर सुन्न बसून होती. डॉक्टर अर्धा-पाऊण  तासाने  बाहेर आले व समीरला रूममध्ये शिफ्ट करण्यात आले. त्याच्या डोक्याला मार लागला होता. दोन्ही हाताला बरेचसे भाजले होते पण सगळ्यात चिंता जनक बाब म्हणजे त्याच्या फुफ्फुसांमध्ये खूप सारा धूर गेला होता कारण एका हाताने त्याने समिधाला धरले होते आणि दुसऱ्या हाताने तो आगीतून मार्ग काढत होता आणि या सगळ्या गडबडीत त्याचा रुमाल कुठे तरी पडला होता पण समिधाला मात्र त्याने घागरा-चोलीची ओढणी तोंडाला बांधायला लावली होती त्यामुळे तिला काहीच झाले नव्हते.समीरने मात्र नको तितका धूर श्वासा वाटे फुफ्फुसात घेतला होता आणि त्याचाच परिणाम म्हणून तो नीट श्वास घेऊ शकत नव्हता आणि सतत खोकत होता. त्याला श्वास घेता येत नसल्यामुळे ऑक्सिजन लावण्यात आले होते तरी तो सतत खोकत होता. शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने आणि डोक्याला लागल्याने तो बेशुद्ध होता. समिधाच्या बाबांना डॉक्टरांनी बोलवून घेतले.समिधा मात्र समीरच्या रूममध्ये गेली.त्याचा हात धरून  बोलू लागली.

 

समिधा,“ मुद्दाम केलं ना तुम्ही हे सगळं!बोला ना समीर मी काय विचारते आहे? तुम्हाला मला धडा शिकायचा होता म्हणून करताय ना तुम्ही हे सगळं? बोलाणा? आता का गप्प तुम्ही? नाही त्या वेळी खूप बडबड करता की आता का गप्प आहात?” ती रागाने आवाज चढवून बोलत होती पण डोळ्यातून मात्र अश्रू धारा वाहत होत्या.

 

      ते ऐकून तिचे बाबा तिथे आले आणि त्यांनी समिधाच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांना पाहून ती तिच्या बाबांना मिठी मारून रडू लागली आणि पुढे बोलू लागली.

 

समिधा,“ समीर तुमचं ऐकतात ना बाबा त्यांना सांगा ना उठायला!मी नाही त्रास देणार त्यांना मी चिडणार ही नाही आणि पुन्हा कधी भांडणार ही नाही. मीच मूर्ख आहे आज मीच बोलून गेले त्यांना की तुम्हाला माझ्या आयुष्यातुन मला डिलिट करता आलं असत तर बरं झालं असत पण बाबा मी ते रागात म्हणाले होते. मला समीर हवे आहेत. कायम साठी त्यांना सांगा ना उठायला!”  ती रडूत बोलत होती.

 

बाबा,“ समू बेटा सावर स्वतःला! आणि मी काय बोलतो ते नीट ऐक समीरला काही ही होणार नाही त्याला काही ही झालं नाही. त्याच्या लंग्जमध्ये खूप जास्त प्रमाणात धूर गेला होता म्हणून त्याला ऑक्सिजन लावले आहे बेटा तो श्वास घेऊ शकत नव्हता म्हणून आणि डोक्याला ही मार लागला आहे ना त्याच्या म्हणून तो बेशुद्ध आहे. But he is safe! तो सकाळ पर्यंत शुद्धीवर येईल! तू सावर स्वतःला! मी समजू शकतो तुला काय वाटत आहे ते पण तू असा धीर सोडलास तर समीरला  कशी सांभाळणार ग?”ते  तिला समजावत बोलत होते.

 

         हे सगळं ऐकून समिधाच्या जीवन जीव आला आणि शांत झाली.ती रात्र भर तिथेच समीरचा हात धरून  खुर्चीवर बसून राहिली.पहाटे पहाटे समीरने डोळे उघडले. समिधाने ते पाहिले आणि बेल वाजवून नर्सला बोलवून तिला डॉक्टरांना बोलवायला सांगितले. समीर सगळीकडे  पाहून  तो कुठे आहे याचा अंदाज घेत होता. समिधाने ते पाहिले आणि त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत ती म्हणाली

 

समिधा,“ आपण हॉस्पिटलमध्ये आहोत समीर! आता कसं वाटतंय तुम्हाला?” 

 

समीर,“  ठीक” तो इतकाच बोलू शकला कारण त्याला सतत खोकला येत होता.

 

             डॉक्टर आले त्यांनी समीरला चेक केले आणि ते म्हणाले.

 

डॉक्टर,“ how are you young man! बाहेर सगळी तुझी सासरवाडी खूप कौतुक करत आहे तुझं!आगीतून बायकोला सुखरूप घेऊन आलास म्हणे!” ते हसून बोलत होते.

 

समीर,“ इतकं मोठं काही नाही केलं मी!” तो तुटक तुटक म्हणाला.

 

डॉक्टर,“ बरं आता आराम कर! मिसेस जाधव तुम्ही माझ्या बरोबर चला प्लिज!” ते असं म्हणाले आणि समिधाने समीरला डोळ्यानेच मी आले असे खुणावले आणि डॉक्टरच्या पाठोपाठ गेली.

 

        समिधा डॉक्टरशी बोलून येऊ पर्यंत समीरला भेटायला तिचे आई-बाबा आणि समीरचे आई-बाबा ( जे आत्ताच आले होते) आले होते. ते गेले आणि समिधा त्याच्या जवळ बसली. समीर बेडला टेकून बसला होता. तिला पाहून तो म्हणाला.

 

समीर,“ डॉक्टर काय म्हणाले? कधी डिस्चार्ज देणार मला!” 

 

समिधा,“अजून चार दिवस नाही”

 

समीर,“ मी ठीक आहे की आता मला असं ही खूप कामे होती. ऑफिसमध्ये कळलं का माझ्या!” तो इतकं बोलू पर्यंत त्याला दोनदा ठसका लागून गेला.

 

समिधा,“ हो कळवले आहे मी तुमच्या ऑफिसमध्ये आणि पंधरा दिवसाची सिक लिव्ह ही मंजूर झाली तुमची आणि कसली घाई झाली हो तुम्हाला इतकी नीट बोलता ही येत नाही अजून किती खोकताय आणि मी ठीक आहे म्हणे!” ती चिडून बोलत होती.

 

समीर,“ तसं नाही सगळंच प्लॅनिंग फिसकटल की!” तो म्हणाला.

 

       समिधाला त्याच्या बोलण्याचा रोख कळला आणि तिने थोपवून ठेवलेला भावनांचा बांध आता फुटला तिने समीरला मिठी मारली आणि ती रडत बोलू लागली.

 

समिधा,“ I am sorry समीर! मी तुम्हाला काल नाही नाही ते बोलले. मी खरच मूर्ख आहे. मी नाही राहू शकत तुमच्या शिवाय! मी तुम्हाला नाही गमवू शकत!” ती रडत बोलत होती.

 

समीर,“ अग पण तूच म्हणाली होतीस ना की मी तुला पसंत नाही आणि एका रात्रीत एव्हढं काय बदललं ग?” त्याने  आश्चर्याने विचारले.

 

समिधा,“ मी sorry म्हणतेय ना त्यासाठी! खूप काही बदललं एका रात्रीत!” ती तशीच मिठी मारून त्याला बोलत होती आणि समीरला ते ऑड वाटत होतं 

 

समीर,“ समिधा सोड मला आपण हॉस्पिटलमध्ये आहोत बरं दिसत का अस! तू जास्त भावनिक होत आहेस. सावर स्वतःला!” तो स्वतःला तिच्या पासून  सोडवून घेत बोलत होता. समीरच्या अशा वागण्याने ती चिडली आणि बोलू लागली

 

समिधा,“ अच्छा! मी भावनिक होत आहे का आणि काल तुम्ही जे काही केले ते काय होते? आणि मी तुमची बायको आहे हॉस्पिटल असलं म्हणून काय झालं! अजून किती शिक्षा देणार मला तुम्ही? मला मान्य आहे की मी चुकले आहे but I am realizing that I….”ती पुढे बोलायची थांबली.

 

समीर,“ अग काय बोलते आहेस तू मला काहीच कळत नाही.  आणि  कालच म्हणशील तर मी इतकं काहीच विशेष नाही केलं आहे! काय realize झालं तुला?” तो बोलला पण त्याला पुन्हा ठसका लागला.समिधा उठली आणि तिने समीरला पाणी दिले आणि रूमचे दार लावून घेतले आणि त्याच्या जवळ बेडवर बसत ती बोलू लागली.

 

समिधा,“  एकदम शांत बसायचं तुम्हाला डॉक्टरने जास्त बोलू नका म्हणून सांगितले आहे.  मी काय बोलते ना ते नीट ऐका! मी realize केलं की माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि मी नाही राहू शकत तुमच्या शिवाय!” ती पुढे बोलणार तर समीर मध्येच बोलू लागला.

 

समीर,“ समिधा मी तुला काल रात्री वाचवलं आणि मी जखमी झालो त्यामुळे तू घाबरली असणार कदाचित तुला जे वाटते ते  प्रेम नसून सहानुभूती आणि कृज्ञाता असू शकते.तुझ्या भावनांची सरमिसळ होत आहे. हे बघ मी आजच निघतो वाटलं तर मी मुंबईला नाही जात तर आई-बाबां बरोबर गावाकडे जातो तू शांत डोक्याने विचार कर आणि मग काय तो निर्णय घे!” तो म्हणाला.

 

     समिधाच्या बोलण्यावर त्याचा विश्वास  बसत नव्हता कारण होते समिधाची समीरशी गेल्या सहा महिन्यांतील वागणूक.

 

समिधा,“ पुन्हा बोललात मध्ये! आणि कुठे निघालात आत्ताच डॉक्टरांनी बोलावून मला इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहेत पहिले तर तुम्हाला चार दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार आहे आणि त्या नंरत कमीत कमी पाच दिवस तुम्ही प्रवास करू शकत नाही. उगीच मनाचे मांडे नका खावू आणि तुमच्या बद्दल माझ्या  मनात ज्या भावना  आहेत  त्या  काय काल रात्री पासून नाहीत तर तुम्ही डिव्हिर्सचा विषय काढल्या पासून माझ्या मनाची घालमेल होत होती पण ती का हे मला कळत नव्हतं. काल ही अंकिता स्टेजवर जे काही बोलली ना!  तिने मला हिनावल म्हणून मला वाईट नाही वाटलं तर तिने तुमचा अपमान केला म्हणून मला वाईट वाटत होत आणि तुमचा राग येत होता!” ती चिडून बोलत होती.

 

समीर,“ माझा राग पण का?आणि अजून एक तू काल रात्री त्या खांबा जवळ काय करत होती ग? काही झालं असत म्हणजे तुला?” तो पुन्हा मध्येच बोलला आणि समिधाने त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला तसा तो गप्प बसला.

 

समिधा,“का विचारताय मला तुम्ही ना तिला चांगलं सूनवायला हवं होते! तिच्या गोऱ्या नवऱ्याच काय कौतुक सांगते वो ती; तुम्ही क्लास वन ऑफिसर आहात ते ही सरकारी! तिच्या नवऱ्याला तुमच्या पोस्ट पर्यंत  पोहचण्यासाठी अजून पाच वर्षे लागतील!तुम्ही ना काल तमाशा करायला हवा होता तुमचा अपमान झाला म्हणून तर तुम्ही मूग गिळून गप्प बसलात म्हणून तुमच्या राग आला मला! आणि  काल रात्री इथेच कुठे तरी माझे मंगळसूत्र पडले ते शोधत होते मी त्या खांबा जवळ हे काय सापडले तिथेच मला! ” ती बोलत होती आणि समीर तिच्याकडे आवक होऊन पाहत होता.ते पाहून समिधा पुढे बोलू लागली.

 

समिधा,“ इतकं आश्चर्याने पहायची गरज नाही! तुम्हा ना ता म्हणले की ताक भात नाही कळत! काल ही तुम्हाला रात्री जाऊ नका मी म्हणत होते कारण मला तुमच्या बरोबर यायचं होत. पण तुम्ही म्हणालात की मी खऱ्या बायको सारखी वागते म्हणून मग मी काय खोटी बायको आहे का तुमची? तेव्हाच तुमच्याशी बोलायचं होत मला पण वेळ नाही मिळाला मला! हो मला माहित आहे मी चुकले प्रत्येक मुलगी आपल्या होणाऱ्या  साथीदारांची एक छवी रंगवत असते मनात! ती मी ही रंगवली आणि तुम्ही त्या छवीत बसत नव्हता म्हणून मी नाराज होते पण तुमच्या समंजसपणा आणि  प्रेमळ स्वभावामुळे तुमच्या प्रेमात पडले मी ही सहानुभूती किंवा कृतज्ञता ही नाही समजलं! हा काल मी खूप घाबरले होते पण त्यात ही प्रेम होतं!आणि गेल्या सहा महिन्यात मी जे काय तुमच्याशी वागले त्यासाठी  I am sorry मला जे बोलायचे होते ते बोलून झाले माझे आता निर्णय सर्वस्वी तुमचा आहे.नऊ-दहा दिवसांनी तुम्ही जाऊ शकता तो पर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही.त्या नंरत जर तुम्हा घटस्फोटाची नोटीस पाठवायची तर पाठवा तुम्ही!” ती असं म्हणून दार उघडायला उठली तर समीरने तिचा हात धरला आणि तिला जवळ ओढली.

 

समीर,“ बाप रे! इतका विचार आणि राग! हे सगळं तर माझ्या कल्पना शक्ती पलीकडचे आहे! मी आज वेगळीच समिधा पाहतोय! मला खरच वाटलं नव्हतं की तू इतका विचार करत असशील माझा!  मी तुला पसंत केलं रादर तुझ्या प्रेमात पडलो ते तुझे रूप पाहून नाही तर तुझ्या वागण्या बोलण्यातल्या आत्मविश्वास आणि अदब पाहून पण आज एक नवीन समिधा पाहतोय मी जी हळवी आहे पण करारी पण आहे. तुझ्या प्रेमात मी नव्याने पडलो आज!बाकी सगळ्या अपेक्षा पूर्ण करेन मी तुझ्या पण ते तमाशा वगैरे करायला मला नाही जमणार!” तो हसून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

 

समिधा,“  अजून खूप ओळखच बाकी आहे मग मला! आणि हे ही माहिती की तुम्हाला नाही जमणार तमाशा वैगरे करायला! ते मी पाहून घेईन!” ती म्हणाली.

 

समीर,“ मग मघाशी म्हणालीस ते अजून एकदा म्हण ना!” तो तिचा हात धरून म्हणाला.

 

समिधा,“ का ऐकलं नाही का मघाशी! आता आराम करा!” ती लाजत  हात सोडवून घेत म्हणाली.

 

      समीर काही बोलणार तर रूमचे दार कोणी तरी वाजवले.  समिधाने जाऊन दार उघडले तर वोर्डबॉय नाष्टा घेऊन आला होता.समिधाने समीरला नाष्टा भरवला.  तर समोर अंकिता उभी होती. समिधा उठली तेंव्हा समीरने तिला काही बोलू नकोस असा इशारा केला.समिधाने डोळ्यानेच नाही बोलत असं आश्वासन दिले.  समिधाने अंकीताला बाहेर चल म्हणून खुणावले.

 

समिधा,“ हे बघ अंकिता मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आधीच तुझं झालंच आहे की मला आणि माझ्या समीरला बोलून! आता माझी काहीच ऐकून घेण्याची मन:स्थिती नाही एक तर समीरच्या तब्बेतीचे टेन्शन आहे मला!” ती चिडून बोलत होती.

 

अंकिता,“ समी मी तुला इथे हिनवायला आणि अजून काही बोलायला ही नाही आले. मी इथे तुझी माफी मागायला आले आहे. मी तुला आणि समीर जीजूंना परवा पासून खूप बोलले आहे. खरं तर मी चुकले ग माणसाच्या रंगा जवळ काही नाही समी गुण महत्वाचे असतात. तुला माहीत आहे का मी ज्या राहुलच्या रूपावर भाळले ना आग लागली की तो स्टेज वरून मला तिथेच सोडून पळून गेला आणि समीर जीजूंनी स्वतःचा जीव पणाला लावून तुला आगीतून बाहेर काढले. ते तुझ्यावर खूप प्रेम करतात. प्रेमात ही तूच बाजी मारलीस समी!  मी साखरपुडा मोडला कारण जो माणूस  संकटात माझी साथ देवू शकत नाही. तो आयुष्य भर   माझी साथ काय देणार! By the way जीजूची तब्बेत कशी आहे?”ती रडत बोलत होती.

 

समिधा,“ अंकीता तू मला हिनवले त्याच मला वाईट नाही वाटले पण तू जो समीरचा अपमान केला ना त्याचा मला राग आला. समीरचा स्वभाव समजूतदार आहे म्हणून नाही तर खूप तमाशा झाला असता काल!  त्यांची तब्बेत अजून ही तितकीशी बरी नाही पण सुधारेल हळूहळू! बरं मी जाते ते एकटेच आहेत” असं म्हणून ती निघून ही गेली. तिने अंकिताला मात्र माफ केले नाही.

 

    या घटनेला आता एक महिना होऊन गेला. समिधा आणि समीरच्या नात्याला आता नवीन बहर आला होता. समिधाने समीरला मनापासून स्वीकारले होते. तिला आता समीर शिवाय काहीच दिसत नव्हते.समीर ही समिधाच्या प्रेमाने सुखावला होता. शेवटी त्याचा रंग नाही तर त्याचे गुण जिंकले होते.

       माणूस रुपावरून नाही तर गुणावरून श्रेष्ठ ठरत असतो. 

   

     या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

 

©Swamini (asmita) chougule