रंग मेंदीचे....

Short Storied Describing Emotions Related To Mehandi


सुमारे साठ वर्षांपूर्वीची गोष्ट... 12 वर्षांच्या गोदावरीची मंगळागौर होती... बरोबरीच्या मुलींसोबत तिनं मेंदीची पानं खुडली... पाट्यावर बारीक वाटली अन् दोन्ही हातांवर छान थापली. आपले दोन्ही हात नाकाजवळ नेऊन मेंदीचा सुगंध मनसोक्त हुंगत असताना नेमकं सासऱ्यांनी पाहिलं अन् तसंच फरफटत नेऊन घराबाहेर उभं केलं...

श्रावणातल्या झडी-पावसात ती अंगणात तशीच मुसमुसत उभी...

सासरे छत्री घेऊन बाहेर गेल्याचं सासूबाईंनी पाहिलं अन् गोदूला घरात घेतलं...

आज नातीच्या लग्नात तिच्या हातावर मेंदी काढतांना बघून गोदूमाई शहारली... अगदी "त्या" पावसात भिजत कुडकुडली होती तशीच...

************************************************

"दिवसभर घरीच तर असतेस.जरा घराबाहेर जाऊन दोन पैसे कमावून बघ, म्हणजे कळेल तुला पैश्यांची किंमत !" ह्या नवऱ्याच्या टोमण्यांना मधुरा कंटाळली होती.

मधुराला अभ्यासात फार गती नव्हतीच त्यामुळे बारावी होताच घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं. आपण बाहेर जाऊन पैसे कमवावेत असं तिला फार वाटे.आता मुलं मोठी झाल्याने रिकामा वेळही भरपूर होता पण नोकरी करायची म्हटलं तर तिचं शिक्षण आड येई.

एक दिवस शेजारच्या प्रियांकानं तिला हातावर मेंदी काढून देण्याबद्दल विचारलं... तिनंही पटकन होकार दिला अन् दुपारी सगळी कामं आटोपल्यावर दोघी मायलेकीच्या हातावर मेंदी काढून दिली... प्रियांकानं ती नको-नको म्हणत असताना तिच्या हातात पाचशेची नोट कोंबली.

अश्याच मैत्रिणींच्या प्रोत्साहनामुळे मधुराने मेंदी अन् रांगोळीच्या ऑर्डर्स घेणं सुरु केलं. ह्यातून ती आता "कमावती" झालीये.आता तिला कुणीही पैश्याची "किंमत" सांगत नाही!

ह्या मेंदीने तिच्या आयुष्यात स्वाभिमानाचा रंग भरलाय.

************************************************
पाच वर्षांची आर्या आपल्या खोलीतून लपूनछपून बैठकीत बसलेल्या "ती" ला बघत होती...

"अगं, लाजू नकोस, ये बाहेर" आजीनं तिला हाक मारली... ""ही" तुझी नवीन आई बरं का! आजीनं प्रतिभाशी तिची ओळख करून दिली तशी ती अजूनच आजीच्या पदराआड लपली.

आर्याची आई दोन वर्षांपूर्वीच कॅन्सरने वारली... तिच्या बाबांचं हे दुसरं लग्न होणारे दोन दिवसांनी ... आज मेंदी काढण्याचा घरगुती कार्यक्रम आहे अन् त्यासाठीच आजीनं बोलावलंय प्रतिभाला...

प्रतिभानं आर्याचा हात धरून आजीच्या पदराआडून तिला हळूच बाहेर काढलं.. अन् तिच्या हातात मेंदीचा कोन देत आपला हात पुढे केला.

आर्यानं तिच्या हातावर काढलेल्या मेंदीच्या वेड्यावाकडया ठिपक्यातच तिला मातृत्वाचा रंग गवसला अन् आर्याला तिची आई!

************************************************