रंग माळियेला...( भाग ८ वा)

Love story of Pradnya and Suyash.... Exploring new horizon of love beyond the colour...

रंग माळियेला...( भाग ८ वा)

@ आर्या पाटील

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.

******************************************

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे दोघेही तयार झाले.. गोवा पर्यटनासाठी.. गोव्याचे दोन रंग मनाला वेध लावून जातात.. 

निळा रंग... समुद्राच्या भव्यतेचा.. जो शहरी भागाचा प्रतिक आहे.. 

आणि दुसरा हिरवा.. शेतकऱ्यांच्या कष्टाचा जो ग्रामीण भागाची महती सांगतो. 

पाश्चात्य संस्कृतीसोबतच पारंपारिक संस्कृती जोपासणारं भारताचं सर्वात सुंदर रत्न म्हणजे ' गोवा'... आणि आज त्याच निसर्गसौंदर्याच्या साक्षीने एकमेकांत गुंतायला ते तयार झाले होते..

प्रज्ञा बरोबर वेळ घालवणे आवडायला लागले होते सुयशला.. आणि या पाच दिवसांत सुयशनेही तिच्या मनाचा कोपरा सहवासाने गंधाळून टाकला होता..

रिसेप्शन एरियामध्ये कधीचा सुयश प्रज्ञाची वाट पाहत येरझाऱ्या घालत होता.. आज मात्र प्रज्ञाला तयार व्हायला एरवीपेक्षा जरा जास्तच वेळ लागत होता... मुलगा बघायला येणार म्हणून आईच्या हट्टापायी ती कितीतरी वेळा सजली होती.. पण आज ती फक्त स्वत:च्या मनाच्या हट्टापायी सजत होती.. मनापासून सजण्याचा आनंद आज पहिल्यांदाच ती अनुभवत होती..

ऑफ व्हाइट रंगाचा फ्लोरल वनपिस, कानांत लोंबकळणारे ऑक्सिडाईज्ड कानातले, डोळ्यांत भरलेले काजळ, ओठांवर फिकट गुलाबी लिपस्टिक अन् पाठीवर केसांची आरास लेवून ती सजली होती.. तिने आपले रुप एकवार त्या आरश्यात न्हाहाळले.. एरवी तिच्या रंगावर हसणारा आरसा आज भलताच खुश वाटला..

" छान दिसतेस गं.. तु ही सुंदर आहेस..." तिच्या रुपाला नजरेत साठवत जणू तो म्हणाला..

मनाचा सारखा सारखा स्वत:लाच पाहत राहण्याचा मोह आवरत तिने रुममधून काढता पाय घेतला आणि खाली रिसेप्शन एरियामध्ये आली.. आतुरतेने तिची वाट पाहणारा सुयश तिच्या या वेगळ्या रुपाला पाहून जाग्यावरच खिळला.. कृष्णवर्णीय ती तरी खूपच मनमोहक होती.. तिच्या काजळ लावलेल्या डोळ्यांत तो हरवला.. आपल्याकडे टक लावून पाहण्याऱ्या सुयशला बघून ती ही ओशाळली.. पाठीवरील मोकळ्या केसांना क्लिपने एकवटत वर बांधले आणि ती त्याच्यापाशी पोहचली..

तिचं हे वागणं काही पटलं नाही त्याला...

" अगं राहू दे ना... मोकळ्या केसांत किती सुंदर दिसतेस.." तो मनातच म्हणाला..

" गुड मॉर्निंग सुयश..." स्मितहास्य देत ती म्हणाली..

" व्हेरी गुड मॉर्निंग ब्युटिफुल लेडी..." उत्साहाने तो म्हणाला..

" मग निघायचं का ? ड्रायव्हर दादा बाहेर वाट पाहत असतील..?" ती म्हणाली.

" आज ड्रायव्हर दादांना सुट्टी.. तुला गोवा दाखविण्याची जबाबदारी मीच पेलायची ठरवली आहे.." तो म्हणाला.

" ओके म्हणजे आज हॅण्डसम ड्रायव्हर सोबत लाँग ड्राईव्हला जायचे आहे तर..?" मिश्किल हसत ती म्हणाली..

" काय म्हणालीस ? चक्क हॅण्डसम... कान समाधानी झाले गं माझे.." नौटंकी स्वरात तो म्हणाला.

" मी ही बोलते कधी कधी खोटं तुझ्यासारखं.. तु नाहीस का नेहमीच ब्युटिफूल... ब्युटिफुल म्हणत चिडवित असतोस..?" त्याची मस्करी करित ती म्हणाली.

" कोण म्हणालं मी चिडवतो.. अगं.. खरचं तु खूप सुंदर आहेस पण एक कमतरता तेवढी वाटते.." तिच्या नजरेत नजर रोखत तो म्हणाला आणि दुसऱ्याच क्षणी तिच्या केसांना क्लिपच्या अडगळतीतून मोकळे केले..

तिचे रूप न्हाहाळत तो म्हणाला,

" मोकळ्या केसांत खूप सुंदर दिसतेस.."

आज पहिल्यांदाच कुणी परका व्यक्ती तिच्या रुपाला सन्मान देत होता... त्या सन्मानात ती ही विसावली

पण पुढच्याच क्षणी भानावर येत त्याच्या नजरेला भिडलेली आपली नजर बाजूला वळवत ती हळूच म्हणाली,

" चल निघूया... उशीर होईल.."

आणि पुढे निघाली.

तिच्या बोलण्याने तो ही भानावर आला.. आपल्या केसांवरून फ्लिमी स्टाईलमध्ये हात फिरवित तो खळीदार गालात हलकेच हसला आणि तिच्या मागे निघाला..

एका सुंदर नात्याची नांदी होती ती... हवीहवीशी पण तेवढीच वास्तवतावादी..

सुयश गाडी आणायला पार्किंग एरियामध्ये निघून गेला.. आणि प्रज्ञा गाडीची वाट पाहत हॉटेलबाहेर थांबली.. तोच एका जोडप्याची कुजबुज तिच्या कानांनी अचुक टिपली.

" लोकं प्रेमात आंधळी होतात ऐकलय पण एवढी... तो कसा आणि ती कशी.. जराही मेळ नाही.."

ते शब्द निखार्‍यागत तिच्या हृदयाला चटका लावून गेले.. मघापासून उत्साहाने सळसळती प्रज्ञा आता मात्र थंडावली.

घरी सोडलेले तेच काळ्या रंगाचे विषारी विचार तिच्या मनाच्या शुभ्र आकाशावर गस्त घालू लागले.. मघापासून आनंदात असलेली प्रज्ञा आता स्वत: वरच चिडली..

" कश्याला भलत्या मोहात पडतेस ? सत्यात न उतरणारी जगावेगळी स्वप्ने नको पाहूस.. सुयश फक्त तुझा चांगला मित्र आहे.. फक्त चांगला मित्र.." ती स्वगत झाली..

त्याने मोकळे केलेले आपले केस तिने पुन्हा वर बांधले.. तोच सुयशही गाडी घेऊन आला.. गाडीतून बाहेर पडत दुसऱ्या बाजूने गाडीचा दरवाजा उघडत तो म्हणाला,

" या मॅडम... हा ड्रायव्हर आपल्या सेवेत हजर आहे.."

प्रज्ञाने मात्र त्याला आपणहून टाळले.. गाडीचा मागचा दरवाजा उघडत ती म्हणाली,

"इट्स ओके सुयश, मी मागेच बसते.."

"अगदी थोडयावेळात असं काय झालं असेल की हिचा मुड एवढा बदलला..." मनाशी तर्क वितर्क बांधत तो गाडीत बसला..

थोडा वेळ शांततेच गेला.. आपल्याच विचारात मश्गूल प्रज्ञा गाडीच्या काचेतून बाहेर ध्यान लावून बसली होती.. पण ही शांतता सुयशला रास्त येईना..

" मघापासून गालावर आलेली लाली नाकावर कशी काय गेली काय माहित. बिच्चारे केस ते पण अडगळीत विसावले.. एवढ्या सुंदर चेहर्‍यावर नाराजी शोभत नाही.." तिच्या चेहर्‍यावर हसू आणण्याच्या उद्देशाने तो म्हणाला.

" माझ्यासारखी काळी मुलगी सुंदर दिसूच शकत नाही.. कितीही दिखावा केला तरी मी काळी आहे आणि काळीच राहणार.. हा रंग एवढ्या सहजासहजी नाही सुटायचा.." बोलता बोलता तिला गहिवरून आले.. आज पुन्हा एकदा रंगाच्या भयाण वास्तवाने तिच्या मनावरचा ताबा सुटला होता... एवढा जवळचा झाला होता का सुयश कि तिचं मन आपलं गाऱ्हाणं मांडत होतं त्याच्याजवळ..

तिचे बोलणे, तिची ती अगतिकता सुयशला छळून गेली.. गाडी रस्त्याच्या बाजूला लावत तो खाली उतरला.. गाडीचा मागचा दरवाजा उघडत तिलाही बाहेर येण्याची विनंती केली...

" कोण म्हणालं गं फक्त गोरी माणसेच सुंदर असतात ?.. आणि लोकांच्या सांगण्यावरून का स्वत: ला कुरुप समजायचे ?.. नाकीडोळी तर तु सुंदर आहेसच पण खरं सौंदर्य तुझ्या निरागस मनाकडे आहे.. त्या रूपवान मनामुळे जगातली सर्वात सुंदर तरुणी आहेस तु.. तुला कोणत्याच दिखाव्याची गरज नाही.. दिखाव्याची गरज त्यांना असते जे आपल्या सौंदर्याबाबत साशंक असतात.. तु तर मानस सुंदरी आहेस.. मनावर राज्य करणारी.. आणि हो त्या चंद्राच्या तेजालाही काळ्यागर्द आभाळामुळेच शोभा आहे.. दिवसाच्या पांढऱ्या उजेडात तो ही अस्तित्व शून्य बनतो.. अगं माझ्या डोळ्यांतून तुझे सौंदर्य बघ.. तु तुझ्याच प्रेमात पडशील.." पुन्हा एकदा तिचे केस मोकळे करुन तो गाडीजवळ परतला..

फ्रण्टसीटचा दरवाजा उघडत तो म्हणाला,

" मी होप कधीच सोडत नाही.."

त्याचे शब्द जणू ओलावा होते मायेचा, आधार होते मनाचा आणि शाश्वती होते तिच्या निस्सीम सौंदर्याची.. तिला पुन्हा एकदा मनाला रंगांच्या गावी पाठवायचे नव्हते कारण जातांना ते खुश असायचे पण येतांना त्याची पावले वास्तवाने जड व्हायची.. मनाची घालमेळ बाजूला सोडत तिने सहवासाला प्राधान्य दिले.. या क्षणी एका चांगल्या मित्राचा सहवास तिला जास्त महत्त्वाचा वाटला.. पाय गाडीकडे वळले.. त्याने उघडलेला गाडीचा आणि तिच्या मनाचाही दरवाजा त्याच्याबाजूने कौल देऊन गेला.. ती फ्रण्टसीटवर बसली आणि मघापासून मनाच्या आभाळावर गस्त घालणाऱ्या नकारात्मक विचांरावर सुयशच्या सकारात्मक विचारांचा प्रकाश पडला...

स्वभावगुणानुसार बोलक्या सुयशने अबोल प्रज्ञालाही बोलके केले.. चर्चेअंती त्यांनी दिवसभराचा प्लॅन आखला.. पहिलं प्राधान्य दिलं ते शिवशंकराच्या मंगेशी मंदिराला.. निसर्गाच्या कलाकुसरीने नटलेल्या मंगेशी गावातील ते नयनरम्य मंदिर उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना होते.. गाडी पार्क करून काही अंतर पायी चालत त्यांनी मंदिरात प्रवेश केला.. दर्शनी भागातील सातमजली दीपमाळ नजरेला व्यापून गेली.. मंदिरातील शांतता मनाला सोज्वळता प्रदान करती झाली.. दर्शनानंतर काळी वेळासाठी दोघेही मंदिर परिसरातच विसावले.. मंदिरांच मनमोहक रुप न्हाहाळण्यात गुंग असलेल्या प्रज्ञाला आपल्य कॅमेरात अन् मनाच्या कप्प्यातही कैद करून घेण्याचा मोह नाही आवरता आला त्याला.. तिच्या नकळत त्याने तिचा फोटो टिपला..

तिची नजर त्याच्याकडे वळताच हळूच कॅमेरा बाजूला वळवला..

थोड्याच वेळात मंदिरातील प्रसन्नता आणि पावित्र्य आपल्या नात्यात उतरवत मंदिरातून काढता पाय घेतला..

त्यानंतर मोर्चा वळला अगोड़ा फोर्टकडे.. एव्हाना दुपार झाली होती.. जेवण आटोपून त्यांनी फोर्ट गाठला.. लाल रंगाची छटा ल्यालेला किल्ला दिमाखात समुद्र तटावर उभा होता.. किल्ल्यावरून अथांग पसरलेल्या समुद्राला न्हाहाळतांना प्रज्ञा भान हरपून गेली.. आणि सुयशचं भान तिला पाहण्यात हरपलं..

"मोकळी हवा उरात भरून, साऱ्या दु:खांचा अंगरखा बाजूला सारून उंच उडावे अगदी स्वछंदी पक्ष्यासारखं... कधी उंच भरारी घेत गगनाला गवसणी घालावी तर कधी निळ्या समुद्राचा वेध घेत पाण्यावर परतावे.." प्रज्ञा आपल्याच विचारांत मग्न होती.. इतकी मग्न की आपल्यासोबत सुयशही आहे हे ही ती विसरली..

सुयशनेही संधी साधत तिची फिरकी घेण्याचे ठरवले..

तिला दिसणार नाही अश्या जागी अदृश्य होतं तिला त्रास देण्याचे ठरवले..

विचारांच्या मैफिलीतून ती जेव्हा बाहेर आली तेव्हा नजर सुयशला शोधू लागली.. जवळ जवळ दहा मिनिटे धुंडाळूनही तो काही सापडला नाही..

आता तिचा कासाविस चेहरा रडण्यागत झाला होता.. शेवटी सुयशलाच तिची कीव आली.. तिच्या कावऱ्या बावऱ्या नजरेला शांत करत तो तिच्यापुढ्यात हजर झाला.. त्याला पाहताच तिच्या जीवात जीव आला.. त्याच्या खांद्याला जोरदार हिसका देत ती जाब विचारती झाली..

" कुठे गेला होतास ? किती घाबरले मी ? असा मधेच सोडून जाणार असशील तर भलत्या मोहात का पाडतोस ? किती छळतोस रे?..

एकादमात ती म्हणाली.

" हात घट्ट पकड...बघ तुला कधीच एकटी सोडणार नाही.." तिच्या डोक्यावर हात ठेवत तो म्हणाला.

" ही कसली मस्करी सुयश ? असा जीवघेणा खेळ नको खेळूस ?" आपल्या डोक्यावरचा त्याचा हात झटकत ती म्हणाली..

" सॉरी बाबा.. खरच सॉरी.. परत नाही करणार असं... तुझा पिच्छा एवढ्या लवकर नाही सोडणार मी..." तिला समज देत तो म्हणाला..

किल्ल्यातून निघत ते गाडीपाशी पोहचले..

" मग आता कुठे जायचं मॅडम ?" गाडीचा दरवाजा उघडत तो म्हणाला.

" आता थेट कोको बिच.." गाडीत बसत ती म्हणाली..

" ये नाही हा.. बीच बिच काही नको.. आपण मस्त चर्चमध्ये जाऊयात.." आपल्या सर्वात मोठ्या समस्येचा तोडगा काढत तो म्हणाला.

" अजिबात नाही.. गाडी बीचवर घे नाहीतर मी उतरते.. तु तुझ्या वाट्याला मी माझ्या वाट्याला.." प्रज्ञाही ठामपणे म्हणाली.

" कसली आतल्या गाठीची आहेस गं... चल एकदाची.. मला शांत, सुखाने जगू देणार नाहीस तु.." नामुश्की ओढावल्यागत तो म्हणाला.. आणि कोको बीचचा रस्ता धरला..

" तु थोडावेळ इथेच थांब मी आलेच." म्हणत तिने सरळ किनारा गाठला..

कोको बीच डॉल्फिन सफारीसाठी विशेष प्रिय.. आणि त्याचसाठी प्रज्ञा इथे आली होती.. बोटीची दोन तिकिटे घेत ती सुयशकडे परतली..

गाडीबाहेर उभा असलेला सुयश तिला पाहून आशेने म्हणाला,

" मग आता निघायचं का इथून ? बीच न्हाहाळून झालं ना ?

" हो निघायचं तर आहे पण थेट समुद्रात.. मला डॉल्फिन बघायचे आहेत.." त्याचा हात पकडून त्याला खेचत ती म्हणाली.

" प्रज्ञा हे आता अति होतय. अगं किनार्‍यालगत चालायलाही धड़की भरते मला आणि तु तर समुद्रात घेऊन निघालीस.. नाही हा.. मी अजिबात येणार नाही.. आणि तु पण जाऊ नकोस.. जीवघेणा खेळ नुसता.." तिचा हात झटकत तो म्हणाला.

" हिच का तुझी मैत्री... शब्दांचा पक्का आहेस असं म्हणाला होतास.." त्याला डिवचत ती म्हणाली..

" पण मला खूप भीती वाटते गं.. नको ना प्लिज.. जाऊयाना आपण परत.." रडवेल्या स्वरात तो म्हणाला.

" घाबरू नकोस...मी आहे तुझ्यासोबत. पुन्हा कधी असे एकत्र भेटू याबाबत पण शंकाच आहे.. निदान हा वेळ तरी मला दे.. आणि सेफ्टीसाठी लाइफ जॅकेट आहे.. काळजी नको करूस खंबीर हो.. आणि तसं काही वाटल्यास आपण मागे परतु.." म्हणत तिने बळजबरीने त्याच्या हाताला पकडले आणि किनारा गाठला..

एव्हाना बोट तयारच होती.. इतर प्रवासीही बोटीत बसत होते. मुश्कीलीने सुयशला बोटीवर चढवत तिने सुटकेचा नि:श्वास सोडला..

बोटीने हळूहळू किनारा सोडला.. हेलकावे खाणाऱ्या बोटीत सुयशला फक्त प्रज्ञाचा आधार होता.. त्याने तिचा हात घट्ट धरला आणि डोळे गच्च मिटले...

"किती सौंदर्य होतं चहुबाजूंना... निसर्गरूपी चित्रकाराने नानाविध रंगांच्या छटा वापरून रंगवलेल्या अभिजात चित्रकलेचा डोळ्यांचं पारणं फेडणारा नमुना.. कसली भीती आणि कसली चिंता.. जीवन मरण या दोहोंमधले अंतर मिटून आपण निसर्गात एकरूप होण्याचा सोहळा जणू तो... आपण कितीही कृत्रिम, मशिनवर चालणारं लोभसवाणं जग तयार केलं तरी त्याला या निसर्ग देणगीला सर नाही.. डोळे उघड एकदा बघ तरी.. मी आहे तुझ्यासोबत.." मनाला भूरळ घालणाऱ्या शब्दांत ती म्हणाली..

डोळे बंद होते पण तो तिच्या नजरेतून सारं पाहत होता जणू.. तिच्या शब्दांचा आधार घेत त्याने हलकेच डोळे उघडले..

हिरवी टेकडी... त्यावर सजलेली ताडामाडाची झाडे, वास्तुशिल्पाचा सुंदर नमुना असलेली चर्च आणि दिमाखात उभा असलेला अगोड़ा किल्ला.. त्याच्याही नजरेला मोहवून गेला..

तो निसर्ग सौंदर्यात रमला आणि तोच नाविकाने बोटीचे इंजिन बंद केले.. डॉल्फिन पाहण्यासाठी काही वेळ त्या खोल समुद्रातच थांबावे लागणार होते.. मघापासून शांत असलेली बोट इंजिन बंद होताच समुद्राच्या लाटांवर जोरात हेलकावे खावू लागली..

तशी सुयशच्या काळजात धड़की भरली.. बोट उलटून हा समुद्र आपल्याला गिळंकृत करतो की काय या विचाराने तो भलताच घाबरला.. त्याच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला.. पुन्हा डोळे गच्च मिटत त्याने लहान बाळागत तिच्या खांद्यावर डोके ठेवले.. आणि म्हणाला

" प्रज्ञा मला खूप भीती वाटते.. नको ना डॉल्फिन आपण परत जाऊया प्लिज.."

" अरे काही होणार नाही तु शांत हो पाहू.." त्याच्या चेहर्‍यावरचा घाम टिपत ती म्हणाली..

त्याच्या अश्या तिच्या खांद्यावर डोके ठेवण्याने ती गडबडून गेली .. पण त्याला आधाराची सर्वात जास्त असलेली गरज लक्षात घेता तिने त्याच्या वागण्यावर शंका उपस्थित केली नाही.. आणि तसेही एवढ्या पाच दिवसात त्याने नेहमीच सहवासाचं पावित्र्य जपलं होतं..

तिच्या खांद्यावर विसावलेलं ते एक भित्र मन होतं.. मैत्रीण म्हणून तिनेही त्याला आधार द्यायचा निर्धार केला..

तोच डॉल्फिनचा एक घोळका त्या निळ्या समुद्रात दर्शन देऊन गेला.. अगदी चित्रपटात पाहिलेले, कथांमध्ये वाचलेले उंच उडी मारणारे डॉल्फिन नाहीत पण डोकी वर काढून पुन्हा पाण्यात गुडूप होणारे डॉल्फिन पाहताच प्रज्ञा लहान मुलीसारखी आनंदली..

"सुयश.. डोळे उघड... बघ तरी.." त्याच्या डोक्यावर हात फिरवित ती म्हणाली.

पण तो काही ऐकण्याच्या आणि पाहण्याच्या मनस्थितीत मुळीच नव्हता.. शेवटी यशस्वी डॉल्फिन सफर पूर्ण करत बोट किनार्‍याकडे निघाली.. आणि त्याचा जीव भांड्यात पडला..

प्रज्ञाच्या खांद्यावरून डोकं उचलत त्याने रागातच मान दुसऱ्या बाजूने वळवली.. पण तिचा हात काही सोडला नाही.

बोट किनाऱ्याला लागताच लाइफ जॅकेट उतरवत तो सरळ बाहेर पडला आणि थेट गाडीकडे निघाला..

" सुयश, अरे थांब मी आले.." ही प्रज्ञाची सादही त्याने कानावर घेतली नाही.

गाडीजवळ पोहचताच त्याने पाण्याची बॉटल काढली आणि घामाने दरदरलेला आपला चेहरा धुतला..

तोच ती ही गाडीजवळ येऊन पोहचली.

" या पाण्यालाही घाबरशील..." त्याला डिवचत ती म्हणाली..

तसा त्याने रागाचा एक तीक्ष्ण कटाक्ष तिच्यावर टाकला..

सुयशचा हा चेहरा मात्र तिने पहिल्यांदाच अनुभवला.. त्याला राग आला आहे याचं तारतम्य बाळगून ती शांत झाली आणि गाडीत बसली अगदीच शहाण्यासारखी.. त्याने गाडीचा दरवाजा उघडावा अशी अपेक्षा न करता..

गाडीत बसताच त्याने म्युजिक सिस्टम सुरु केली.. त्या गाण्याच्या मधुर संगितातही गाडीतील भीषण शांतता प्रज्ञा अनुभवत होती..

त्या क्षणी शांत राहणेच योग्य आहे हे जाणून तिने डोळे मिटले..

दिवसभराचा शीण असल्याने पटकन डुलकी लागली तिला.. अगदी तासाभरातच ते हॉटेलवर पोहचले.. गाडीला ब्रेक लावताच ती जागी झाली. गाडी पार्क करून

तिच्याशी एक शब्दही न बोलता सुयश निघून गेला.. त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत प्रज्ञा बराच वेळ तिथेच स्थिरावली..

क्रमश:

*******************************************

लिखाणात काही चुका आढळल्यास क्षमस्व..

    

🎭 Series Post

View all