रंग माळियेला...( भाग ७ वा)

Love story of Pradnya and Suyash... Exploring new horizon of love beyond the colour.....

रंग माळियेला...(भाग ७ वा)

@ आर्या पाटील

सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक आहे.

******************************************

मन शांत असेल तर सुखाची झोप लागते.. मग सकाळही प्रसन्न, टवटवीत आणि आल्हाददायक होते.. काल रात्री सुयशने हिच मन:शांती अनुभवली.. सकाळी लवकरच तो उठला.. प्रज्ञा अजूनही त्याच्या मनात पिंगा घालत होती.. आवरून तो सरळ खाली उतरला.. आजची टवटवीत सकाळ त्याला जास्तच भूरळ घालित होती.. सुयश पूर्वेच्या आभाळावर चढलेली तांबूस लाली पाहण्यात गुंग होता तोच मागून प्रज्ञाही खाली आली..

प्रज्ञाला पाहताच त्याच्या चेहर्‍यावरही प्रसन्नतेची लाली चढली. काहिश्या निश्चयी स्वरात तो म्हणाला,

" गुड मॉर्निंग प्रज्ञा, आता बोल कुठे जायचे आहे ?"

" व्हेरी गुड मॉर्निंग, मैत्री जास्तच मनावर घेतलेली दिसते. आज चक्क बोल.." प्रश्नार्थक भावात ती म्हणाली.

"येस, अगदी बरोबर.. आजपासून मी असच बोलणार अफ्टर ऑल यु आर माय फ्रेन्ड, अ गुड फ्रेन्ड..." ठामपणे तो म्हणाला..

" ओके... चालेल नक्कीच. पण तुर्तास निघूया.. पुन्हा ऑफिसला पोहचावे लागेल." काढता पाय घेत ती म्हणाली.

त्याने ही होकारार्थी मान हलवली आणि तिच्या सोबत निघाला.. हॉटेलच्या गार्डनमधून बाहेर पडत तिने लगतच्या समुद्राचा रस्ता धरला तसा तो बिचकला.. उभ्या जाग्यावर स्तब्ध होत त्याने प्रज्ञाचा हात पकडला..

" प्रज्ञा, मला नाही आवडत हा समुद्र.." तो अगतिकतेने म्हणाला.

" आवडेल.. त्याला नव्याने अनुभवा तरी. जुनी आवड एवढ्या सहजासहजी नाही संपत." त्याला आधार देत ती म्हणाली.

तिचा हात घट्ट पकडत त्याने होकारार्थी मान हलवली..

आज क्रित्येक वर्षांनी वाळूचा तो मखमाली स्पर्श तो पुन्हा अनुभवत होता..' निलय' बरोबर घालवलेले ते सोनेरी क्षण भराभर नजरेसमोरून जाऊ लागले.. आठवणींच्या दाट ढगांनी डोळे पुन्हा भरले.. डोळ्यांतले पाणी डोळ्यातच टिपत त्याने वास्तवता स्विकारली..

तो रमलेला पाहून प्रज्ञा त्याला घेऊन पाण्याच्या जवळ गेली. फेसाळलेली पाण्याची लाट त्याच्या दोन्ही पायांना भिजवून गेली.. त्या स्पर्शाने त्याच्या अंगावर रोमांच उभा राहिला. त्याने प्रज्ञाचा हात आणखी घट्ट पकडला..

 त्याच्या थरथरत्या हाताला आधार देत ती म्हणाली,

" सुयश, घाबरू नका... मी आहे. गतआठवणी सोडून द्या या खाऱ्या पाण्यात.. समुद्राचं हृदय खूप मोठं आहे तो सामावून घेईल त्या.. स्वत: ला मोकळं करा.." ती म्हणाली.

त्या पाण्यात उभा राहत त्याने लांब श्वास घेतला. कसलासा निश्चय करित डोळे बंद केले.. तोच प्रज्ञाने त्याच्या हातून आपला हात सोडवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला..

पण त्याने तो हात सोडला नाही.. त्याला,त्याच्या हळव्या मनाला आधार होता त्या हाताचा..

आज बऱ्याच दिवसांनी तो समुद्रावर आला होता.. भीत भीतचं तो समुद्राला नजरेत साठवत होता.. प्रज्ञाचा हात अजूनही हातात तसाच होता..

वेळेचं गांभीर्य राखत त्यांनी किनार्‍यावरून काढता पाय घेतला..

किनाऱ्यावरून बाहेर पडताच त्याने मघापासून घट्ट धरून ठेवलेला तिचा हात सोडला..

आज पहिल्यांदा काहीतरी सुटल्यासारखं वाटलं तिला.. त्याने सोडलेला हात दुसऱ्या हातात घेत ती चालू लागली.. कसली नांदी होती ती... की फक्त आकर्षण ?

पण या साऱ्यांत सुयश तिच्या विचारांचा एक महत्त्वाचा भाग बनत होता..

सुयशच्या मनातही मैत्रीचे अंकुर फुटले होते. प्रज्ञाच्या रुपात मिळालेली अनोखी मैत्रीण त्याला हवीहवीशी वाटत होती..

तिचा हात फक्त त्याने सोडला होता पण मन मात्र तिच्यात गुंतत चालले होते..

हॉटेलवर पोहचताच प्रज्ञा रुममध्ये गेली.. आज आरसा तिच्याकडे टक लावून पाहत होता.. वर बांधलेले केस मोकळे करत अलगद तिने बट कानामागून काढून चेहर्‍यावर घेतली.. हाताकडे लक्ष जाताच पुन्हा एकदा सुयशच्या आठवणींची भरती आली.. नखशिखांत स्वत:चं रुप न्हाहाळतांना ती तिलाच सुंदर भासत होती..

काळाकुट्ट अंधार पांघरुण निजलेल्या धरेवर सूर्याची कोवळी किरणे पडावी आणि तिची कोमेजलेली काया नव्याने बहरून यावी.. असेच काहीसे झाले होते प्रज्ञाच्या बाबतीत...

सुयशचा सहवास तिला तेजोमज सूर्याच्या कोवळ्या किरणांसारखाच भासत होता.. मिटलेल्या कळीवर सूर्यकिरणांचा शिडकावा व्हावा आणि फुल उमलावं तशीच गत तिच्या मनाची झाली होती.. आज पहिल्यांदाच कोणी तरी तिच्या मनाच्या भावना फुलवून गेला होता.. पण...

मनाची एक बाजू तिला सुखावून गेली पण दुसऱ्या बाजूने तिला वास्तवता दाखवली..

"सुयश आणि तुझी कधीच बरोबरी होणार नाही.. तो पौर्णिमेच्या चंद्रासारखा सुंदर आहे. आणि तु त्या चंद्रामागचं काळं गर्द आभाळ.. कशी बरोबरी होणार तुमची? वेळीच सावर.. भलत्याच मोहात नको पडूस.." मघापासून तिच्या सौंदर्याची स्तुती करण्यात मश्गूल असलेलं तिचं मन त्याच आरश्यातून तिच्याकडे पाहत तिच्या रुपाला हसत म्हणालं..

मघापासून आनंदाची भरती आलेला चेहरा पुरता पडला.. तो आरसा नकोसा वाटला तिला.. बाथरूममध्ये शिरत तिने शॉवर सुरु केला.. 

'आपला काळा रंगही या पाण्याबरोबर वाहून गेला असता तर.. पण का ? मी आहे वेगळी.. आहे माझा रंग वेगळा...सुयश चांगला माणूस आहे.. आणि आमच्या नात्यात फक्त माणुसकी आहे.. दुसरं काहीच नाही' स्वगत होत तिने मनाला धीर दिला..

आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचा दिवस होता.. ऑफिस टिमसमोर प्रेझेंटेशन सादर करायचे होते. मनाला खंबीर करत ती तयार झाली.. घरी कॉल करून आई बाबांचा आणि आजीचा आर्शिवाद घेतला.. बाळगणपतीची मूर्ती जी ती नेहमीच बरोबर बाळगी त्याचाही आशिर्वाद घेत ती रुमबाहेर पडली..

नाश्त्यासाठी सुयश आधीच खाली उतरला होता..

 "सुयश आणि आपला संबंध फक्त पुढचे दोन दिवस.. स्वत: ला सावर" मनाला समज देत ती त्याच्याजवळ पोहोचली..

" प्रज्ञा.. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय गं.. आज प्रेझेंटेशन आहे.. पण माझं प्रेझेंटेशन अजून तयार ही नाही.. कालचा पूर्ण दिवस असाच वाया गेला" धीरगंभीर शब्दांत तो म्हणाला.

" वाया गेला नाही.. वाया घालवला.. वा! मी एकहाती जिंकते वाटते.." त्याला चिडवत ती म्हणाली..

त्याच्या चेहर्‍यावरचे रंग मात्र पार उडून गेले.. ऑफिसमध्ये गेल्याबरोबर तो प्रेझेंटेशनच्या कामाला लागला.. तोच त्याला बॉसने बोलावल्याची वर्दी घेऊन शिपाई आला.. त्याचा रडवेला चेहरा पाहत प्रज्ञाच्या गाली हसू उमटलं..

केबिनमध्ये शिरल्या शिरल्या बॉसने हसत त्याचे स्वागत केले आणि म्हणाले..

" गुड मॉर्निंग मिस्टर सुयश.. युवर प्रेझेंटेशन इज टु गुड.. आणि काल आला नाहीत पण आपलं प्रेझंटेशन मिस प्रज्ञाकडे पाठवायला विसरला नाहीत.. कामाप्रती तुमची निष्ठा आवडली.. प्रेझेंटशनही उत्तम तयार केले आहे.. दोन तासांनी कॉन्फरन्स् रुममध्ये भेटूयात.. आय अॅम इगरली वेंटीग फॉर युवर रिप्रेझेंटेशन.. बेस्ट ऑफ लक.. यु मे लिव्ह नाऊ.."

सुयशला क्षणभर आपल्या कानांवर विश्वासच बसला नाही..

"थँक्यु सर..." एवढंच काहीसा प्रतिसाद देत तो केबिन बाहेर पडला.. आणि प्रज्ञाला गाठलं.

लॅपटॉपवर काम करणाऱ्या प्रज्ञाचा हात उत्साहाच्या भरात आपल्या हातात घेत तो म्हणाला,

" थँक यू सो मच प्रज्ञा.. यु आर बेस्ट.. वाचवलस मला नाहीतर माझी नोकरी पक्की गेली असती..

त्याचा स्पर्श तिला सुखावून गेला.. पण त्याच्या श्वेतवर्णीय हातात आपले हात पाहून तिने पुन्हा एकदा वास्तवता स्विकारली.. आपले हात त्याच्या हातातून सोडवत ती म्हणाली,

" इट्स ओके सुयश.. थँक यू नका म्हणू.. तुम्ही मैत्रीणीचा शिक्का लावला म्हंटल्यावर एवढ तर करावच लागणार ना... ते जाऊ द्या तुमचा ईमेल आयडी द्या मी प्रेझेंटेशन मेल करते." लॅपटॉपमध्ये नजर वळवत ती म्हणाली..

तिच्या लॅपटॉमध्ये आपला ईमेल आयडी टाइप करण्यासाठी तो जवळ आला.. एवढ्या दिवसात त्याला एवढ्या जवळून पहिल्यांदाच ती पाहत होती.. अगदीच राजबिंडा, रुबाबदार, गोरापान होता सुयश.. आणि गालावर पडणारी खळी जणू त्याच्या रुपाला लाभलेली निसर्गदत्त देणगीच.. ती त्याला बघण्यात मश्गूल होती.. त्याचं रुप आपल्या डोळ्यांत साठवतांना ती सुखावत होती..

" ओके प्रज्ञा, धिस इज माय ईमेल आयडी..नाऊ सेन्ड प्रेझेंटेशन.." तिच्याकडे पाहत तो म्हणाला..

त्याची नजर नजरेला भिडताच ती भानावर आली..

पटकन नजर चोरत ती लॅपटॉपकडे वळली..

तिची ती नजर त्याच्या हृदयाला घायाळ करून गेली.. कमालीचा सुंदर असलेल्या सुयशला मात्र त्या क्षणी ती जगातली सर्वात सुंदर तरुणी भासली..

" ओके... डन. आता लागा कामाला.. रिप्रेझेंट करतांना मी बनवलेल्या प्रेझेंटेशनची लाज राखा.." त्याला चिडवीत ती म्हणाली.

" कसली जिनियस आहेस गं.. खूप छान बनवल आहे प्रेझेंटेशन ते ही एवढ्या कमी वेळात.. थँक यू सो मच.." प्रेझेंटेशन न्हाहाळत तो म्हणाला.

" थँक यू नको.. आता युद्धाला तयार व्हा.. शत्रुपक्षाचा एवढाही उदो उदो चांगला नाही.. चारीमुंड्या चीत व्हाल.." धमकीवजा शब्दांत ती म्हणाली..

" ओहो धमकी... मग आता भेट सरळ कॉन्फरन्स रूममध्ये.. बेस्ट ऑफ लक.." त्यानेही आव्हान स्विकारले..

पुढचे दोन तास प्रेझेंटेशनचे बारकावे समजून घेत तो तयार झाला..

मिटिंगला सुरवात होताच रिप्रेझेंटशनचा पहिला मान प्रज्ञाला मिळाला.. प्रज्ञामधला कॉन्फिडन्स सुयशला कमालीचा आवडला.. ऑफिस स्टाफनेही तिला भरभरून दाद दिली.. मग नंबर आला सुयशचा.. प्रेझेंटेशन भलेही प्रज्ञाने तयार केले होते पण सुयशने त्याला जिवंत रुप दिले.. अगदीच कमी वेळात प्रज्ञासारख्या कट्टर प्रतिस्पर्धाला टक्कर देत त्याने तिच्याही पेक्षा उजवं सादरीकरण केलं..

दोघांच्या प्रेझेंटेशनमधील बारकावे लक्षात घेत स्टाफने निर्णय जाहिर केला.. कौल सुयशच्या बाजूने लागला.. आणि त्याच्या कंपनीला डिल मिळाले.. ऑफिस स्टाफकडून कौतुकाचा वर्षाव होत असतांना सुयश मात्र समाधानी नव्हता.. त्याच्यामते या डिलवर पूर्णपणे प्रज्ञाचा अधिकार होता.. ऑफिस स्टाफला खरं सांगण्याचा त्याचा प्रयत्न नजरेनेच प्रज्ञाने हाणून पाडला.. त्याचं अभिनंदन करत ती बाहेर पडली..

काही वेळातच डील चे सारे सोपस्कर आवरून सुयशही

बाहेर पडला. कॅफेट एरियामध्ये कॉफी पित बसलेल्या प्रज्ञाला हेरत तो तिच्याजवळ पोहोचला..

" आय अॅम रियली सॉरी प्रज्ञा.. तु का नाहीस खरं सांगू दिलं मला ? या डिलवर फक्त तुझा अधिकार आहे.." नाराजीच्या स्वरात तो म्हणाला.

" सुयश.. ही डिल तुमच्या कर्तबगारीवर मिळाली आहे तुम्हांला.. प्रेझेंटेशन कितीही चांगलं तयार करा तुम्ही ते कसं रिप्रेझेंट करता ते महत्त्वाचं.. आज खूप शिकायला मिळालं तुमच्याकडून.. तुम्ही नक्कीच वरचढ होता.." मोठ्या मनाने त्याच्या गुणांना दाद देत ती म्हणाली..

" पण... तरीही.." तो बोलातच होता की प्रज्ञाने त्याला अडवले..

" आता पण नाही की बिन नाही.. बोला मग पार्टी कधी देणार ?" विषय बदलत ती म्हणाली..

" तु सांगशील तेव्हा.. आणि तु सांगशील तिथे.." तो ही आश्वासक शब्दांत म्हणाला..

तोच पुन्हा एकदा शिपाई प्रज्ञाला कॉन्फरन्स् रुममध्ये बोलावल्याचा निरोप घेऊन आला.. सुयशच्या गालावर खळी पडली.. कॉफीचा मग बाजूला ठेवत प्रज्ञा उठली आणि आत गेली.

" मिस प्रज्ञा.. युवर प्रेझेंटेशन इज टु गुड सो वी डिसायडेड वन डिल फॉर युवर कंपनी अल्सो..." म्हणत एका स्टाफ मेंबरने सगळ्यांचे प्रतिनिधित्व करत एक सुखद धक्का तिला दिला.. त्यांच्या कंपनीशी संलग्न असलेल्या दुसऱ्या एका कंपनीचे डिल प्रज्ञाच्या कंपनीला मिळवून दिले..

" थँक यू सो मच सर... इट्स रियली मॅजिकल.." आभार मानत ती म्हणाली.

" वेल हा मॅजिक करणारा मॅजिशियन बाहेर आहे.. हो मिस्टर सुयश आहेत या मागचे सूत्रधार.. तुम्ही बाहेर गेल्यानंतर त्या अवलियाने तुमच्या प्रेझेंटेशन मधील बारकावे जे आम्हांला उमगले नव्हते ते सहजतेने उलगडले.. सो क्रेडिट गोज टू हिम.." सुयशचा कारनामा प्रज्ञापुढे मांडत ते म्हणाले..

डिलचे सगळे सोपस्कर पार पाडत ती बाहेर आली आणि सुयशकडे वळली.. तिच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.. तिच्या डोळ्यांतली चमक त्याला सारं काही सांगून गेली.

" कॉन्ग्रॅज्युलेशन्स... प्रज्ञा.. डिल मिळाली ना ?" उठून उभा राहत तो म्हणाला.

" तुम्हांला कसं कळलं ? आणि काय हो एवढं करायची काय गरज होती ?" ती म्हणाली.

" तुमचा चेहरा सांगतो ना.. त्याच्यावरचा आनंद लपून राहत नाही.. आणि गरज नाही हे माझं कर्तव्य होतं... आपल्या मैत्रिणीसाठी हा मित्र एवढं तरी हक्काने करूच शकतो.." तो म्हणाला.

" पण खरचं थँक यू.. मनावरचं दडपण कमी झालं.. देशमुखसर काहिच बोलले नसते पण त्यांनी दाखवलेला विश्वास मात्र तुटला असता.." ती म्हणाली.

" दोस्ती में नो सॉरी नो थँक यू... अरे देवा विसरलोच.. तुम्ही कुठे मित्र मानता मला.." नाटकी स्वरात तो म्हणाला.

" हो हो कळली नौटंकी तुमची.. सॉरी सॉरी तुझी... तुझ्याबरोबर मैत्री करायला आवडेल मलाही.." सकारात्मक मनाचा कौल स्विकारत ती म्हणाली.

" इस बात पे पार्टी तो बनती है.." आनंदात तो म्हणाला.. आज त्यांच अनोख नातं मैत्रीची पायरी यशस्वीपणे चढलं होतं..

" ठिक आहे मग उद्याचा पूर्ण दिवस आणि परवाचा अर्धा दिवस हातात आहे आपल्या.. परवा रात्रीची फ्लाइट आहे.. एवढ्या वेळा गोव्यात आले पण गोवा पाहिला नाही.. जेवढा शक्य असेल तेवढ्या गोव्याला डोळ्यांत साठवूया या दिड दिवसांत.." तिने आपला मुद्दा मांडला.

" गोव्यात बघणार काय फक्त निळा समुद्र ?" प्रश्नचिन्ह उपस्थित करित तो म्हणाला.

" पारंपारिक आणि पाश्चात संस्कृतीचा सुवर्णमध्य असलेल्या गोव्यात खूप काही बघण्यासारखं आहे.. फक्त माझ्या नजरेने बघा..." ती ही आश्वासक शब्दांत म्हणाली.

" अजून आहेच का बघा... हे जर असेच राहिलं तर मजा नाही मैत्रीची.." रुसत तो म्हणाला..

" ओके सॉरी.. पुढच्या वेळेस नक्की काळजी घेईन.. आता निघुयात.." तिनेही आश्वासन दिले..

आजचा दिवस भलताच आनंदात सरला.. डिल फायनल झाल्यामूळे दोघांच्याही कष्टाचे चिज झाले.. यावर त्यांच्या मैत्रीने कळस चढवला.. दिवसभरातील घटनांचे आढावे घेत त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.. जेवणानंतर बराच वेळ एकमेकांना जाणून घेत ते विसावले..

मग वेळेचं भान राखत दोघेही आपआपल्या रुममध्ये जाऊन शांतपणे झोपले उद्याच्या दिवसाची स्वप्ने रंगवत...

क्रमश:

पुढच्या भागात गोव्याचं निसर्गसौंदर्य आणि सुयश आणि प्रज्ञाची बहरत असलेली मैत्री आपल्या भेटीला आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन... भाग प्रकाशनास विलंब झाल्याबद्दल क्षमस्व.

*****************************************

लिखाणात चुका आढळल्यास क्षमस्व...

🎭 Series Post

View all