रंग माळियेला...( भाग ४ रा)

Love story of Pradnya and Suyash... Exploring new horizon of the love beyond the colour...

रंग माळियेला... ( भाग ४ था)

@ आर्या पाटील

सदर कथा काल्पनिक आहे

******************************************

गोव्याचा प्रवास जणू नांदी त्यांच्या अनोख्या नात्याची.. एकमेकांच्या बाजूला बसलेले, एकमेकांना परके असलेले ते दोघे एकमेकांना आपलंस करून घेतील ?.....

सुयश.... गौरवर्णीय, उंचपुरा, नाकीडोळा देखणा, चंचळ आणि बोलका...

असं म्हणतात जी माणसं बोलकी असतात ती साफ हृदयाची असतात.. आपला सुयशही अगदी तसाच होता.. मनमुराद बोलणे हा तर त्याचा आवडीचा छंद मग या प्रवासात तो शांत कसा राहणार.. त्याने आपलं सावज हेरायला सुरवात केली.. बाजूला बसलेल्या प्रज्ञावर नजर जातात तो मनाशीच म्हणाला.." भेटला बाबा.. बकरा.. आता प्रवास बोलका होणार.."

हलक्या सफेद रंगाचा टॉप आणि राखाडी रंगाची पॅन्ट परिधान केलेली प्रज्ञा जरी कृष्णवर्णीय असली तरी नाकाडोळी रुबाबदार होती.. कृष्णवर्ण सोडला तर बाकी सर्वच बाबतीत ती उजवी होती.. कोणीही एका नजरेत प्रेमात पडावं अशी.. तिला न्हाहाळत सुयश स्वगत झाला..

" प्रत्येक रंगात देवाने अप्सरा बनवल्या आहेत.. किती सुंदर आहे ही.."

तिच्या हातातील मराठी कादंबरी त्याला अजून मोकळं करून गेली.. जगाच्या पाठीवर कुठेही जा पण आपला मराठी माणूस भेटल्याचा आनंद वेगळाच असतो.. मोठ्या आशेने तो म्हणाला,

" हेलो मॅडम, मी सुयश.. सुयश माने... एक रिक्वेस्ट होती.. थोड्या वेळासाठी विंडो सीट मिळेल का ?"

"सॉरी, पण ते शक्य नाही.. माझी सीट मी नाही सोडू शकत"

त्याला त्रयस्थ नजरेने न्हाहाळत ती म्हणाली आणि दुसऱ्याच क्षणी पुन्हा वाचनात गढून गेली..

" कसली आहे ही.. एकदा नीट बघ तरी समोर किती हॅन्डसम ड्युड बसलाय.." कॉलरवजा टी-शर्टला गळ्याशी पकडत तो स्वत:शीच म्हणाला..

पुन्हा एक प्रयत्न करुयात या विचारात तो पुन्हा बोलता झाला,

" बाय द वे... तुम्ही खूप सुंदर दिसत आहात" तिला न्हाहाळत तो म्हणाला..

" सॉरी...... चश्मा आहे का हो तुम्हांला ?.. की निट दिसत नाही ?.." पुस्तक बंद करत तिने नजर सुयशच्या दिशेने रोखली..

नजरेला नजर भिडताच तो पुन्हा एकदा तिची स्तुती करत म्हणाला,

" आहा! काय बोलके डोळे आहेत हो तुमचे..."

" तुम्ही कितीही स्तुतिसुमने उधळली.. तरी ही सीट मी सोडणार नाही" म्हणत ती पुन्हा पुस्तक वाचू लागली.

" शी.. कसली आतल्या गाठीची आहे ही.. स्तुती करतो तरी हिला प्रॉब्लेम." पुन्हा तो स्वत:शीच म्हणाला.

" कसलं ध्यान आहे हे... सीट मिळविण्यासाठी कोणाच्या भावना दुखावायला हे चॉकलेट बॉय मागे पुढे पाहत नाहीत.." ती जरा मोठ्यातच म्हणाली.

" सॉरी मॅडम... तुम्ही खरच सुंदर आहात.. रंग गोरा असेल तरच कोणी सुंदर नसते... माझ्या मते वर्णावरून सुंदरता ठरत नाही.. तुमच्या भावना दुखवण्याचा कोणताच हेतू माझा नाही आणि सीट मिळविण्यासाठी तर मी मुळीच बोलत नाही.." आपला मुद्दा पटवून देत तो म्हणाला..

तिचे बोलणे त्याच्या जीवाला चांगलेच लागले होते..

" इट्स ओके, पण तरीही ही सीट तुम्हांला मिळणार नाही.." थोडी शांत होत ती म्हणाली..

आता तो ही थोडा शांत झाला.. तोच टेक ऑफ साठी सिट बेल्ट लावण्याची अनाऊन्समेंट झाली...

प्लेन टेक ऑफ आणि लॅण्डिंग करतांना प्रज्ञाच्या पोटात भलामोठा गोळा यायचा.. एवढा वेळा प्रवास करूनही तिची समस्या कायम होती..

आता ही टेक ऑफच्या दरम्यान तिच्या पोटात गोळा येऊ लागला.. तिने डोळे मिटले आणि नकळतपणे बाजूला बसलेल्या सुयशचा हात घट्ट पकडला.. तिच्या अनाहुत स्पर्शाने तो बावरला..

मिटलेल्या डोळ्यांत ती त्याला आणखीनच भावली.

" वर्ण सोडला तर देवाने हिला नखशिखांत सुंदर बनवले आहे." तिला न्हाहाळत तो स्वगत झाला..

पोटातला गोळा निवळल्यावर तिने हळूहळू डोळे उघडले.

सुयशचा हात सोडत ती म्हणाली,

" सॉरी.. अॅण्ड थँक यु..."

" एवढेच दोन शब्द येतात का हो तुम्हांला.." तिला उत्तर देत तो म्हणाला.

अजूनही त्याची नजर तिच्यावरच खिळलेली होती.. जरा रागातच त्याच्यावर कटाक्ष टाकत ती म्हणाली,

" तुमच्या नजरेत नक्की काही दोष नाही ना ? एकदा चेक करून घ्या.."

" समोर अस्मानीचं सौंदर्य असतांना नजरेला तरी काय दोष द्यायचा.." आपल्याच अदाकारीत तो म्हणाला..

" पण तरीही.." ति वाक्य पूर्ण करणार तेवढ्याच तो पुन्हा म्हणाला

" तुमची सीट तुम्हीं मला देणार नाहीत.. इट्स ओके मॅडम.. आम्हांलाही मिळेल कधीतरी विंडो सीट.." 

त्याच्या स्वरातली नाराजी प्रज्ञापासून लपली नाही.. शेवटी तिला त्याच्या वागण्याची किव आली.

" या.. राव बसा या विंडो सीटवर.. निदान शांत तरी बसाल.. तेवढच निदान निवांत पुस्तक तरी वाचता येईल. आता भेटलात पुन्हा भेटू नका." सीटवरून उठत ती म्हणाली.

" थँक यु सो मच मॅडम.. वाटता तेवढ्या खडूस नाहीत तुम्ही.." सुयश जोरात म्हणाला.

तिने एक रागाचा कटाक्ष टाकला तसा तो शांत झाला. थोडा वेळ शांततेत गेला. पण शांतता त्याला रास्त येईना. वातावरण पुन्हा बोलकं करित तो म्हणाला,

" पण.... खरच मॅडम.. जागा दिली म्हणून नाही पण खरच तुम्ही सुंदर आहात."

" तुम्हांला सीट हवी आहे की नाही ? आता एकही शब्द बोललात तर याद राखा." धमकीवजा शब्दांत ती म्हणाली.

हाताची घडी घालत त्याने तोंडावर बोट ठेवून दाखवले.

" काय अवलिया आहे हा..... कधी एकदा गोवा येतो आणि याच्यापासून पिच्छा सुटतोय असं झालय.." ती मनातल्या मनात म्हणाली..

थोड्याच वेळात विमान लॅण्ड होणार होते... आपला सिट बेल्ट बांधत सुयशने आपला हात पुढे केला.

" पकडा मॅडम... पोटात गोळा येत असेल ना.. लॅण्डिंगला..." तो म्हणाला.

मागचा पुढचा विचार न करता तिनेही त्याचा हात घट्ट धरला आणि डोळे गच्च मिटून घेतले.

" भारीच आहे ही राव..." स्वगत होत तो हसला.

एकदाचे विमान लँड झाले आणि तिला हायसे वाटले.

" थँक यु सो मच.." एवढच म्हणत ती उठली आणि निघाली.

" ओ मॅडम, ऐका तरी तुमचं नाव तरी सांगा.." जागेवरूनच तो म्हणाला.

त्याच्यापासून पिच्छा सोडवत ती मात्र खूप पुढे निघून गेली. चेक आऊट करून विमानतळाबाहेर पडली.

बाहेर कंपनीच्या गाडीचा ड्रायव्हर नेम प्लेट घेऊन उभा होता.. तिने आपली ओळख करून देत सरळ गाडी गाठली.

" मॅडम तुम्ही बसा. अजून एक सर आहेत. त्यांना रिसिव्ह करून मी आलोच." म्हणत तो ड्रायव्हर दुसरी नेम प्लेट घेऊन पुन्हा उभा राहिला..

ती दुसरी व्यक्ती म्हणजे सुयश मानेच. सेम प्रोजेक्टसाठी त्याच्या कंपनीने त्याची निवड केली होती..

" सुटले बाई... परत ते ध्यान डोळ्यातही पडायला नको.." म्हणत तिने मोबाईल काढला आणि हॉटेलची डिटेल्स चेक केली.

तोच दुसऱ्या बाजूने गाडीचा दरवाजा उघडत सुयश आला. 

" ओ माय गॉड, मॅडम तुम्ही... किती शोधलं तुम्हांला.. आणि तुम्ही इथे सापडलात. ओके ओके म्हणजे त्या दुसऱ्या तुम्हींच तर.. आपण एकाच डिल साठी आलो आहोत गोव्यात.. पण सॉरी हा....ती डिल आम्हांलाच मिळणार.." गाडीत बसत तो जोशात म्हणाला.

काहीही न बोलता प्रज्ञाने डोक्याला हात लावला.. त्याशिवाय ती करू तरी काय शकत होती.

गाडी सुरु झाली आणि त्याच्या तोंडाचा पट्टाही..

" बाय द वे.. तुमचं नाव विचारायचं राहूनच गेलं. मी सुयश माने आणि तुम्ही.." तो विचारता झाला.

" मी प्रज्ञा.... प्रज्ञा देशमुख." उसने अवसान आणत ती म्हणाली..

गाडीच्या काचेतून गोव्याचं सौंदर्य न्हाहाळण्यात ती मंत्रमुग्ध झाली. कधी गिरक्या घेत वर चढणारे तर कधी सरसर खाली येणारे वळणदार रस्ते, शांतनिवांतपणा जपणारा निसर्ग, अगदीच मोजकी वर्दळ... सारं सारं नजरेत सामावत ती गोव्यात गुंतली होती..

तोच सुयशने ड्रायव्हरला जवळच असलेल्या चर्चजवळ थांबण्याची विनंती केली.. गाडी थांबली आणि तो उतरला.. प्रज्ञाचा नाइलाज होता ती ही त्याच्यामागून उतरली..

बाजूलाच एक दहा बारा वर्षांची मुलगी मेणबत्त्या विकत होती.. चर्चमध्ये जाऊन मेणबत्ती प्रज्वलित केल्यावर आपल्या इच्छा पूर्ण होतात अशी एक श्रद्धा होती..

सुयशने त्या मुलीला आवाज दिला..

प्रज्ञा सारं पाहत होती. दोन मिनिटे त्या दोघांत संभाषण झालं. त्यानंतर तिच्या हातात दोन हजार रुपयांची नोट देत त्याने तिच्याकडील साऱ्या मेणबत्त्या खरेदी केल्या. त्या मुलीने हात जोडले. तिच्या डोक्यावर हात ठेवत तो तिथून निघाला..

" हा तोच आहे का.. ज्याने आपल्याला हैराण करून ठेवले आहे ." ती स्वगत झाली.

" चला मॅडम.. फक्त दहा मिनिटे आहेत आपल्या हातात.." तिला भानावर आणत तो म्हणाला.

" गोव्यामधील सगळ्या चर्च फिरणार आहात वाटतं ?" त्याच्या हातातल्या मेणबत्त्या न्हाहाळत ती म्हणाली.

" नाही हो.. एकाच चर्चसाठी आहेत. तुम्ही निदान प्रेमाने चार शब्द बोलावे ही विनंती करणार आहे गॉडला.. तुम्हांला बोलतं करायचं म्हणजे एवढ्या मेणबत्त्या हव्याच.." गाल फुगवत तो म्हणाला.

मघापासून त्याच्यावर येणाऱ्या रागाची जागा आता स्मितहास्याने घेतली..

चर्चला भेट देऊन झाल्यानंतर पुन्हा गाडीत बसत त्यांनी हॉटेलचा रस्ता धरला.. मघापासून बडबड करणारा सुयश आता शांत झाला होता.

" काय मग राव.. मला बोलतं करण्याच्या नादात तुम्हीच शांत झालात. एवढा शांतपणा शोभत नाही तुम्हांला." आता तिने त्याची खेचली.

" गॉड पावला म्हणावा.. चक्क तुम्ही बोललात.." आपल्या नेहमीच्या अंदाजात येत तो म्हणाला.

" काही माणसं मनाला भावली की मी ही होते बोलकी.." ती हसत म्हणाली.

आता तो ही गोड हसला. त्याच्या गोर्‍या चेहर्‍यावर पडलेली खळी तिला आकर्षित करून गेली.

हॉटेलला पोहोचल्यावर आपआपल्या रुमची चावी घेऊन ते फ्रेश होण्यासाठी निघून गेले. एव्हाना संध्याकाळचे पाच वाजले असतील.. आजचा दिवस तेवढा निवांत मिळणार होता उद्यापासून प्रेझेंटेशनच्या कामाला सुरवात करायची होती..

जेवणाची वेळ निघून गेली होती त्यामुळे हलका नाश्ता करून ती हॉटेलबाहेर पडली.. हॉटेल समुद्राला लागूनच होते.. तो निळाशार सागर किनारा तिला साद घालू लागला.. समुद्राचं तिला भारी आकर्षण.

गोव्याचा समुद्र म्हणजे नेहमीच फेसाळलेला, उत्साहाने सळसळता.. त्याचा उत्साह डोळ्यांत साठवत ती किनार्‍यावर पोहोचली.. तो किनारा हॉटेलला लागून असल्याने जास्त वर्दळ नव्हती.. पायातली स्लिपर बाजूला काढत पांढऱ्या वाळूवर ती अनवाणी चालू लागली

थोडा वेळ फेरफटका मारल्यानंतर तिथेच किनार्‍यावर निवांत बसली..

हळूहळू खाली येत सूर्याने समुद्राच्या पाण्यात उडी घेतली.. सूर्यास्ताच्या त्या सोनेरी प्रकाशाने पाणी लख्ख चकाकत होतं.

" किती निस्वार्थी असतो ना दिवस... फक्त अन् फक्त दुसऱ्यांसाठी जगणारा..

प्रात:काळी साऱ्यांच्या आयुष्यात उत्साहाने सळसळती पहाट घेऊन येणारा हा दिवस उष:काळी क्षितिजावर विसावत नेत्रसुख देतो, कितीतरी कवी मनांची तहान भागवतो.. अश्या या निस्वार्थी आणि परोपकारी पाहुण्याचं स्वागत पहाटे सूर्यदेवता करते तर त्याची अंत्ययात्रा रात्री चंद्र अन् तारे आदराने सजवतात..

हे चंद्र,तारे त्या जाणाऱ्या पाहुण्याला मानवंदना तर देतातच पण पुन्हा नव्याने गर्भधारणा केलेल्या रात्ररूपी माऊलीला शुभेच्छा द्यायला विसरत नाहीत.." प्रज्ञा आपल्याच विचारात मग्न होती.. तोच रुमच्या बाल्कनीतून सुयशने तिला आवाज दिला.. त्या आवाजाने ती पटकन भानावर आली.. समुद्रकिनारी चांगलाच अंधार पसरला होता.. पायात स्लिपर चढवत घाईतच तिने हॉटेल गाठले.. ती पोहचेस्तोवर सुयश खाली उतरला होता..

" मॅडम, असं एकटीने उशीरापर्यंत समुद्रकिनारी बसणे योग्य नाही.." तो गंभीर होत म्हणाला..

" घाबरू नका.. मी कराटे चॅम्पियन आहे.." ती हसत म्हणाली.

" दिसायला जेवढा सुंदर दिसतो तेवढाच भयानक आहे हा समुद्र.." आपल्याच विचारात तो म्हणाला.

" बघणाऱ्याचा दृष्टिकोन.....

खवळलेला समुद्र बघून काहीजण घाबरतात तर काहीजण त्याच्याकडून सळसळता उत्साह घेतात." ती ही आत्मविश्वासाने म्हणाली..

" सळसळता उत्साह देणारा तुमचा हा समुद्र जीवघेण्या आठवणी ही देतो.." आणखी गंभीर होत तो म्हणाला.

" मिस्टर सुयश, तुम्ही ठिक आहात ना ?" काळजीयुक्त स्वरात ती म्हणाली..

" हो, मी ठिक आहे.. माझं एक काम होतं तुमच्याकडे.. आपण आपली रुम आपआपसांत बदलली तर चालेल का ?... तो खवळलेला समुद्र नको वाटतो बघायला." तो म्हणाला..

" ठिक आहे.. मला चालेल.. लगेच करायची का शिफ्टिंग ?" त्याच्याकडे अगतिकतेने पाहत ती म्हणाली..

तो ही लगेच तयार झाला. लागलीच त्यांनी रूम चेंज केली..

नविन रुममध्ये शिरताच तिने बाल्कनी गाठली.. फेसाळलेल्या समुद्राचा आवाज कानांवर पडताच ती सुखावली.

" हेच तर खरे स्वर्गसुख.. खिडकी उघडावी आणि अथांग सागराचे दर्शन व्हावे..

चला त्या महाशयाने एकतरी गोष्ट चांगली केली.. पण..

समुद्राचा एवढा तिटकारा का असेल त्या अवलियाला ?" त्याची धीरगंभीर मुद्रा आठवत ती स्वगत झाली..

क्रमश:

******************************************

लिखाणात चुका आढळल्यास क्षमस्व..

🎭 Series Post

View all