रंग माळियेला...( भाग ३ रा)

Love story of Pradnya and Suyash... Exploring new horizon of love beyond colour

रंग माळियेला....( भाग ३ रा)

@ आर्या पाटील

( सदर कथा ही पूर्णत: काल्पनिक आहे)

******************************************

तांबडं फुटलं.. रात्रीच्या गर्भातून पुन्हा एकदा नवा दिवस उगवला.. पूर्वेकडून उगवलेल्या सूर्याची सोनेरी किरणे त्यांच्या घरावर पडली.. घर कसलं पिढीजात वाडाच होता तो.. त्या छोटेखानी शहरात आजही तो टुमदार वाडा तसाच उभा होता आपलं पारंपारिक सौंदर्य जपत..

नेहमीप्रमाणे घरात सकाळची लगबग सुरू झाली.. शालिनीताई केव्हाच उठल्या होत्या... प्रज्ञा आणि हेमलला डब्बा, आजींचे चहापानी, विलासरावांचा नाश्ता अश्या एक ना अनेक कामांची मांदियाळी सुरु होती किचनमध्ये..

आजींनीही आंघोळ करून देवपूजेची तयारी सुरु केली.. एव्हाना विलासरावही मॉर्निंग वॉकसाठी निघून गेले.. एका नामवंत कॉलेजमधील निवृत्त प्राध्यापक असलेल्या विलासरावांचा तो रोजचाच दिनक्रम..

हेमलही उठून तयार झाली होती पण रोज या सर्वांच्या आधी उठणारी प्रज्ञा अजूनही रुमच्या बाहेर पडली नव्हती..

" अजून कशी उठते ही पोरगी..? एवढा वेळ झोपून राहत नाही कधी.. तिची तब्येत बरी असेल ना ? विचारांचे इमले बांधत शालिनीताई चपात्या भाजत होत्या..

आजींनी देवपूजेला सुरवात केली.. पण फुलांची रिकामी परडी पाहून त्या स्वगत झाल्या ..

" माझी प्रज्ञा अजून उठली कशी नाही... देवा गजानना अजून किती परिक्षा पाहशील तिची..?"

शालिनीताईंनी हेमलला आवाज देत आजीला देवपूजेसाठी फुले आणायला सांगितली. हेमलने रुक्षपणे बागेतीत जास्वंदीची फुले खुडत परडी भरली आणि आजीच्या पुढ्यात धरली.

त्या परडीतील विखुरलेली फुले पाहून आजींनी भुवया उंचावल्या.. देवपूजा करता करता त्या रागातच पुटपुटल्या..

" काय गं हे हेमा.. एवढंस काम पण तेही तुला जमेना.. फुले कशी नाजूक हाताने खुडायची.. माझ्या प्रज्ञासारखी.. आणि दुर्वा कुठे आहे ?" 

आपल्या दातांनी जीभ दाबत तिने डोक्याला हात लावला..

" अरे देवा विसरलेच.. थांब आणते लगेच.." म्हणत ती मागे वळली.. मागे प्रज्ञा उभी होती.. ओंजळीत दुर्वा घेऊन.. तिने ओंजळ हेमलच्या हातात रिती केली.. देवाला हात जोडून नमस्कार केला आणि किचन गाठले.. तिला किचनमध्ये पाहून शालिनीताईंचा जीव भांड्यात पडला..

" प्रज्ञा बरी आहेस ना बेटा ?.. एवढा वेळ झोपून राहत नाहीस कधी ?" तिच्या डोक्याला हात लावत शालिनीताई म्हणाल्या. 

" हो गं आई.. मी एकदम बरी आहे. रात्री खूप उशीरापर्यंत झोपच लागली नाही. पहाटे पहाटे डोळा लागला त्यामुळेच उशीर झाला उठायला.." ती म्हणाली

" प्रज्ञा, बेटा कालचं सोडून दे सगळं.. आजच मी दुसऱ्या वधुवर मंडळात तुझं नाव नोंदवून येते. फार अति बोलल्या निलमताई" त्या म्हणाल्या.

" आई माझा कालचा दिवस कधीच भूतकाळात जमा झाला.. काल जे काही घडलं ते मी कालच विसरले.. आता तुही विसर सगळं.. दुसऱ्या वधुवर मंडळात नाव नोंदवून माझा रंग थोडाच बदलणार आहे.. असेल नशिबात तेव्हा होईल माझे लग्न उगाच त्रास करून घेऊ नकोस." आईला समजावत प्रज्ञा म्हणाली.

" बरं... नाही काढणार तो विषय पुन्हा.. चल थोडं खाऊन घे. रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नये." तिच्या हातात डब्बा देत त्या म्हणाल्या.

" अग, ट्रेनमध्ये भेटणाऱ्या साधनाकाकू आज सगळ्यांना पुरणपोळ्या आणणार आहे.. मग तिकडेच करेन नाश्ता." डब्बा बॅगेत भरत ती म्हणाली.

बागेतल्या फुलझाडांवरून प्रेमाने हात फिरवित गुलाबाची लालगर्द चार फुले तिने बॅगेत वरचेवर ठेवली आणि ती निघाली..

रोजच्याच गर्दीतून वाट काढत तिने प्लॅटफॉर्म गाठले..

" ही कमला अजून कशी आली नाही.. आज भेटायला सांगितले होते. विसरली की काय पोरगी.." हातातल्या घड्याळ्याकडे बघत प्रज्ञा पुटपुटली..

तोच त्याच गर्दीतून 'ताई' म्हणत ती तिच्याजवळ येऊन पोहचली..

 शाळेचे कपडे, त्यावर रेंगाळणाऱ्या दोन वेण्या, पाठीवर दफ्तर आणि हातात मोगरा अन् अबोलीचे गजरे अश्या वेशातील जेमतेम दहा बारा वर्षांची कमला..

मागच्या वर्षी वडिल वारले.. घरी आई आणि दोन लहान भावंड.. आई नेहमीच आजारी.. अशात घरची सर्व जबाबदारी कमलावर येऊन पडली.. खेळायच्या, शिकायच्या वयात ती मोठी झाली.. आई रोज गजरे गुंफून द्यायची आणि शाळेच्या वेळेआधी ती ते विकायची..

या साऱ्यांत शाळेची वेळ सांभाळता येईना.. रोजच शाळेला उशिर झाल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागले.. वेळेवर शाळेत न पोहचल्याने सरांचा ओरडाही ठरलेला..

तिची ही कहाणी प्रज्ञाला कळली.. आणि आज कमलाची तिचं समस्या सोडविण्यासाठी प्रज्ञाने तिला बोलावले होते..

" काय गं कमला.. किती उशीर.. आई बरी आहे ना ?" तिच्या हातातले गजरे न्हाहाळत प्रज्ञा म्हणाली.

"हो ताई.. आई बरी आहे.. त्या काकूंनी गजरा विकत घ्यायला खूप हुज्जत घातली म्हणून उशीर झाला.." ती म्हणाली..

" बरं.. आता मी काय सांगते ते ऐक.. हे पैसे घे.. महिनाभर यातूनच घरखर्च चालवायचा.. आजपासून गजरे विकणे बंद फक्त शाळा आणि अभ्यास करायचा.. आई आणि तुझ्या भावंडांना सांभाळायचे. मी आणि माझे काही सहकारी दर महिन्याला एक रक्कम एकत्र करणार आहोत त्याने तुझे घर चालेल.. एका एनजीओशी बोलणे चालू आहे बघू त्याच्यांकडूनही काही मदत होते का ?." तिच्या हातात पैशांचे पॉकेट देत प्रज्ञा म्हणाली..

" ताई.. पण आईला न विचारता मी हे पैसे कसे घेऊ ? ती नेहमी सांगते पैसे कष्ट करूनच मिळवायचे." मान खाली घालत कमला म्हणाली.

" ताई म्हणतेस आणि लगेच परकं करतेस.. घे हे पैसे. उद्या येते तुझ्या आईला भेटायला.. अजिबात संकोच बाळगू नकोस. आणि मी थोडेच फुकट देतेय पैसे... याबदल्यात एक खूप मोठे काम करायचे आहे तुला.. करणार ना ?" प्रज्ञा म्हणाली..

कमलाची कळी खुलली. मान वर करत ती म्हणाली,

" हो हो.. मी करेन काम.. कितीही मोठे असू दे. तु फक्त सांग ताई." आश्वासक शब्दांत ती म्हणाली.

" या पैशांच्या बदल्यात तु फक्त अभ्यास करायचा.. खूप मोठे व्हायचे. चांगली नोकरी मिळवायची आणि आईला सांभाळायचे." तिच्या डोक्यावर हात ठेवत प्रज्ञा म्हणाली.

कमला काही बोलायच्या मनस्थितीत नव्हतीच.. डोळ्यांतील अश्रू तिच्या भावना सांगून जात होते.. तोच ट्रेन आली..

 शिक्षण आणि उज्ज्वल भविष्याचे रुपेरी रंग कमलाच्या जीवनात भरत ती कृष्णवर्णीय प्रज्ञा ट्रेन मध्ये चढली..

ट्रेन निघून गेल्यावरही बऱ्याच वेळ कमला तिथेच उभी होती प्रज्ञाच्या मनाचं सौंदर्य डोळ्यांत साठवत.. 

आत चढल्या चढल्या प्रज्ञाने आपला ग्रूप गाठला.. बॅगेतील गुलाबाची फुले अलगद काढत आपल्या रोजच्या प्रवासी मैत्रिणींना दिली.. गप्पागोष्टी करत साधनाकाकूंनी बनवून आणलेल्या पुरणपोळीवर सगळ्यांनी यथैच्छ ताव मारला.

एक दिड तासाचा रोजचा प्रवास... हवाहवासा वाटणारा. गप्पांच्या नादात तिचं स्टेशन आलं.. घाईतच सगळ्यांचा निरोप घेत ती उतरली.

नेहमीप्रमाणे वेळेच्या आधीच ऑफिस गाठले.. डेस्कवरील गणरायाच्या मूर्तीला जास्वंदाचं फूल अर्पित कामाचा श्रीगणेशा केला..

" प्रज्ञा मॅडम, देशपांडे सरांनी तुम्हांला केबिनमध्ये बोलावले आहे.." शिपायाने निरोप दिला..

प्रोजेक्टचे काम बाजूला ठेवत ती उठली आणि केबिनकडे निघाली..

"मे आय कम इन सर.." प्रज्ञा म्हणाली.

"येस येस प्लिज कम मिस प्रज्ञा.. हॅव अ सिट.." देशपांडे सर म्हणाले.

" थँक यू सो मच सर.." बसत ती म्हणाली.

" वेल, प्रज्ञा एक खूप मोठं डिल आहे.. त्यासाठी तुला प्रेझेंटेशन तयार करायचे आहे.." देशपांडे सर म्हणाले

" येस सर आय विल मेक इट.. सर्व डिटेल्स कलेक्ट करते आणि लगेच सुरवात करते." ती आश्वासक शब्दांत म्हणाली.

" डिटेल्स तुला गोव्याला मिळतील.. अॅक्चुअली त्या कंपनीचे हेड ऑफिस गोव्याला आहे..तेथेच जाऊन प्रेझेंटेशन बनवायचे आहे आणि रिप्रेझेंटही करायचा आहे.. आपल्यासारखीच अजून एक कंपनीही प्रेझेंटेशन देणार आहे.. बट तु प्रेझेंट करणार म्हणजे डिल आपल्यालाच मिळणार.. अॅम आय राइट मिस प्रज्ञा..?" ते म्हणाले

" शुअर सर.. मी नक्कीच प्रयत्न करेन जेणेकरून डिल आपल्यालाच मिळेल.. सोबत तुमचे मार्गदर्शन आहेच." ती आत्मविश्वासाने म्हणाली.

"येस येस.. काहीही गरज लागल्यास कॉल कर.. बट प्रोजेक्ट अर्जन्ट आहे सो तुला उद्याच गोव्याला निघावे लागेल. आठ दिवसाची बिझनेस टुर आहे.. सो बी प्रिपेअर्ड.. आय विल सेन्ड ऑल डिटेल्स.. उद्या दुपारी १२ ची फ्लाइट आहे.. बेस्ट ऑफ लक.." ते म्हणाले..

"येस सर" म्हणत ति बाहेर पडली..

उद्या जायचं असल्याने ऑफिसमधून लवकरच निघाली.. घरी आल्यावर लागलिच उद्याची तयारी सुरु केली..

रात्रीची जेवणं झाल्यावर आईकडून केसांना तेल लावून घेत ती निवांत झाली.

" नेहमी तुच का? दुसर्‍या कोणाकडे जबाबदारी सोपवायला सांगायची ना.. तुझ्या लग्नाचं पाहतोय... तु घरी असलेली बरी.." दबक्या आवाजात शालिनीताई म्हणाल्या..

" पुन्हा तेच सुरु झालं तुझ आई... मुलांकडून पुन्हा नकार मिळविण्यासाठी मी एवढी मोठी संधी का घालवू ?" डोळे मिटत ती म्हणाली..

" अगदी बरोबर बोललीस प्रज्ञा. जा गं तु.. तेवढंच तुलाही बरं वाटेल.. नाहीतर रोज तेच तुझ्या लग्नाचं घेऊन बसतात." नातीची बाजू घेत आजी म्हणाल्या..

" दॅट्स माय गुड गर्ल...

आय लव्ह यु आजी.. तु येतेस का माझ्याबरोबर.. चल मस्त फिरून येऊ.. फक्त तु आणि मी.." आजीच्या पुढ्यात बसत प्रज्ञा म्हणाली..

" खरचं आले असते.. तु नसल्यावर करमत ही नाही मला.. पण हे गुडघे साथ देत नाहीत ना.. गोव्याचं परदेशी सौंदर्य बघायला मलाही आवडले असते." तिच्या केसांना मालिश करत आजी म्हणाल्या..

आजीच्या बोलण्याने मस्तच हशा पिकला.. बोलक्या दिवसाची सांगता तेवढीच हसरी झाली..

दुसऱ्या दिवशी दुपारी १२ ची फ्लाइट असल्याने प्रज्ञा सकाळी लवकरच घरून निघाली.. विलासराव आणि हेमलने घरच्या गाडीने तिला एअरपोर्ट वर सोडले.. बिझनेस टूर तिला नविन नव्हती.. चेक इन करून बोर्डिंग साठी गेली.. सारचं कसं पटापट झालं..

आपल्या सीटवर बसत तिने मोकळा श्‍वास घेतला..

आभाळात उडण्याची भारी हौस तिला.. त्यामुळे फ्लाइट मध्ये बसण्याची संधी सहसा ती दवडत नसायची..

विंडो सीट मिळाल्याने प्रवासाचा आनंद द्विगुणीत झाला होता.. आपल्याच आनंदात मश्गूल असतांना बाजूच्या सीटवर जवळजवळ तिशीतील एक तरुण येऊन बसला..

हो... आपल्या कथेचा नायक सुयश माने.. तोच होता तो.. अगदी बरोबर ओळखले.

त्याच प्रोजेक्टसाठी तो ही गोव्याला जात होता.. थोडक्याच एकाच डिलसाठी प्रतिस्पर्धी मधून भिडणार होते ते.. 

काल परवा तुटलेल्या त्या अनोळखी नात्याला परत एकदा पालवी फुटणार होती का?

क्रमश:

****************************************** लिखाणात काही चुका असल्यास क्षमस्व..

🎭 Series Post

View all