रंग माळियेला...( भाग २८ वा)

Love story of Pradnya and Suyash... Exploring new horizon of love beyond the colour..

# रंग माळियेला...( भाग २८ वा)

©® आर्या पाटील

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.

*******************************************

बघता बघता आठवडा सरत आला.. रामरावांनी सुयशची रूम आवरून ठेवली होती आणि त्याच्या मनातला पसारा आवरण्यासाठी फक्त त्याची परत येण्याची वाट पाहत होते.. प्रज्ञाला सांगण्याचे मुद्दामहून टाळले त्यांनी.. कधीकधी अनाहुतपणे झालेली आपल्या माणसाची भेट अधिकचा आनंद देऊन जाते.. कदाचित तोच आनंद प्रज्ञाच्या वाट्याला द्यायची इच्छा असेल त्यांची.. त्या दिवशीच्या फोनच्या किस्स्यावरून ती अजूनही सुयशवर प्रेम करते हा अंदाज बांधायला फार वेळ नाही लागला त्यांना.. आठवणींचा ओलावा होताच फक्त परिस्थितीच्या आघाताने उन्मळून पडलेल्या त्यांच्या प्रेमवृक्षाला पुन्हा जिव्हाळ्याची पालवी फुटावी एवढीच काय ती भाबडी इच्छा होती त्यांची..

सरता सरता दिवस, महिने आणि पाच वर्षे सरली.. तिथे जोडलेल्या माणसांचा, सुमेधाचा निरोप घेऊन सुयश भारतात यायला निघाला.वरून खंबीर असलेल्या सुमेधाची अवस्था कळत होती त्यालाही.. आपण नाही पण तिने मनापासून प्रेम केलं होतं आपल्यावर आणि प्रेम जेव्हा वाळूसारखं हातातून निसटतं तेव्हा होणाऱ्या वेदना अनुभवल्या होत्या त्याने.. निरोप घेतांना सुयशने आलिंगन दिले तिला.. ती ही सुखावली त्याच्या मिठीत.. आपल्याविषयी पुसटसही प्रेम नसतांना आपल्या प्रेमाचा केलेला आदर तिला सुखावून गेला.. सुटत काहिच नव्हतं उलट अधिकचं मिळत आहे या भावनेने ती सुखावली..

" जा लवकर.. नाहीतर मी जाऊ देणार नाही तुला.." त्याच्या मिठीतून बाहेर पडत ती म्हणाली आणि डोळ्यांतले अश्रू पुसले..

त्याने नेहमीसारखं तिच्या डोक्यावर हात ठेवत स्मितहास्य केले.. आणि तो निघाला..

तो दूरदूर जातांना भरून येत होतं पण हेच सत्य आहे ते स्विकारत ती ही निघून गेली..

आज पाच वर्षांनी आपल्या देशात, आपल्या घरात, आपल्या माणसांत परतत होता सुयश.. भूतकाळाची मांदियाळी मनाच्या गाभार्‍याला हळवं बनवत होती.

"आई... तु भेटशील का गं परत तिथेच दाराशी.. नेहमीप्रमाणे माझी वाट पाहत उभी असलेली..

आई.. तुझा तो प्रेमळ हात पुन्हा फिरेल का गं या थकलेल्या डोक्यावरून.. साऱ्या चिंता क्षणात संपवत.

आई.. तुझी ती मायेची विचारपूस पुन्हा शीळ घालेल का या कानात... मनाला शांत करत.

आई... थकलोय गं आता स्वत: पासून पळून पळून.. लेकराला कुशीत घेशील का... पुन्हा जिवंत होऊनी.."

मनच मनाला प्रश्न विचारीत होतं.. आणि डोळ्यातलं पाणी त्याचं उत्तर बनत होतं..

"आणि प्रज्ञा...? ती भेटली तर....? मी रोखू शकेन का स्वत: ला..?" त्याच्या मनाने प्रश्न केला.

" ती भेटली तर तिला फक्त तिरस्कारच मिळेल माझ्याकडून... तिच्यावर सर्वात जास्त प्रेम केल होतं मी पण आज सर्वात जास्त राग तिचाच येतो.. नको आहे ती मला आयुष्यात पुन्हा.. आता निभावलच ना तिच्याशिवाय.. मग पूर्ण आयुष्यभरही निभावेल.. तिच काय कुणीच नको दुसरं.. ती मला पुन्हा कधीच भेटू नये.." बुद्धीने उत्तर दिले.

" कशाच्या का रुपात असेना ती आहे तुझ्या मनात.. तिरस्काराच्या कवचाखाली प्रेम लपवत आहेस तु.. काहीच तर नाही निभावलं तुझं तिच्याशिवाय नाहीतर सुमेधाचं प्रेम नसतं नाकारलस तु.. अरे एवढच काय पण तुझ्या तिरस्काराचा तिला त्रास नको म्हणून भेटायचं नाही तुला तिला..." मनाने पुन्हा बाजू उचलून धरली..

बुद्धी आणि मनाच्या द्वंद्वात तो थकला.. कानात हेडफोन लावून शांत बसून राहिला.. अगदिच तासाभरात विमान लँडिंग करणार होतं..

इकडे रामरावही तासभर आधीच एयरपोर्टवर येऊन पोहचले होते.. कधी एकदा लेकाला डोळ्यांत साठवतो असे काहिसे झाले होते त्यांना.. एवढी वर्षे डोळ्यांत साठवलेले अश्रू आणि मनात साठवलेल्या दु:खाला त्याच्या खांद्यावर मोकळे करायचे होते..

आईचं प्रेम तिच्या प्रत्येक कृतीतून दिसतं अन् बापाचं प्रेम त्याच्या हृदयात साठलेलं असतं.. बापही आईएवढाच हळवा असतो.. फक्त परिस्थितीचं समायोजन त्याला खंबीर बनवते एवढच..

एव्हाना विमानाचं लँडिंग झालं.... ब्लॅक ब्लेजर, व्हाइट इनर आणि ब्लॅक पॅन्ट घातलेला सुयश रामरावांनी दुरुन हेरला.. त्याचं आपल्याकडे लक्ष जावं म्हणून ते पुढे आले.

सुयशनेही रामरावांना पाहिले.. त्यांच्याजवळ जात डोळ्यांवरचा काळा गॉगल बाजूला केला..

" बाबा.. कसे आहात..?" आर्त स्वरात म्हणत त्याने रामरावांना नमस्कार केला..

 अडवत त्यांनी त्याला मिठीत घेतले.. आज त्या मिठीत सुयशने आईपण अनुभवलं.. दोघांनी डोळ्यांना रुमाल लावला..

आज पाच वर्षांनी लेक भेटला होता त्याचं रुपडं डोळ्यांत मावत नव्हतं.. त्यामुळेच जणू भरती आली होती त्यांना. सुयश बाबात आई शोधत होता.. त्यामुळे त्याचाही ताबा सुटला मनावरचा..

थोडा वेळ शांततेत गेला..

एकमेकांची विचारपूस करत त्यांनी गाडी गाठली..

पाच वर्षांचा एकमेकांशिवाय सरलेला गतकाळ आठवणींच्या रुपात एकमेकांसोबत वाटून घेत त्यांनी घर गाठलं.. फाटकातून गाडी आत शिरली.. रामराव उतरून बाहेर आले.. सुयशला मात्र उतरण्याचा धीर होत नव्हता.. आईचा चेहरा सारखा डोळ्यासमोर तरळत होता.

" सुयश, बाळा बाहेर ये.." दरवाजा उघडत रामराव म्हणाले..

" बाबा.. नाही इच्छा होत घरात जाण्याची.. आईची खूप आठवण येतेय.." गाडीतून उतरत तो म्हणाला..

" तिच्यासाठीच घरात चल.. आजही मी अनुभवतो तिचं असणं.. किचनमध्ये दरवळणाऱ्या सुवासात ती आहे, घरातील प्रत्येक वस्तूच्या स्पर्शात ती आहे, बागेतल्या प्रत्येक फुलाच्या उमलण्यात ती, आठवणींनी भारलेल्या आपल्या घरात ती आहे.. तु चल आत.. तुला असं बाहेर रडतांना नाही पाहवणार तिला.." त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आत नेत रामराव म्हणाले..

आईने जपलेलं घर जणू स्वर्ग होतं त्याचं.. आणि आज याच स्वर्गात पाच वर्षांनी परतला होता तो.. आईच्या स्पर्शात परत आल्याचं समाधान जाणवत होतं.. त्याने सरलाताईच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.. आणि फ्रेश होण्यासाठी रुममध्ये गेला..

रामरावांनी लेकासाठी कॉफी बनवली.. संबंध दिवस त्याच्या सोबत घालवण्याचा घाट घातला होता त्यांनी.. एवढ्या दिवसांत प्रथमच ते वृद्धाश्रमातही नव्हते गेले.. प्रज्ञाला मात्र ते का आले नाहीत याची काळजी लागून राहिली. थोडावेळ वाट पाहून.. शेवटी तिने त्यांना कॉल केलाच..

कॉफी घेऊन रामराव बागेत बसले होते.. सुयशही फ्रेश होऊन तिथे पोहचला..

फोन वाजताच रामरावांनी पटकन उचलला...

" बाबा... तब्येत ठिक आहे ना..? आज आला नाहीत.." प्रज्ञाने समोरून विचारणा केली..

" मी ठिक आहे बेटा.. आज जरा गडबडीत आहे.. उद्या येईन.. पाटील रावांना सांग.. नाहीतर वाट पाहत राहतील...." रामराव म्हणाले..

" कॉफी घ्या.. थंड होईल.." मध्येच सुयश म्हणाला.

ओळखीचा तो आवाज प्रज्ञाला पलिकडे पुसटसा ऐकू गेला.. 

"नाही तो आला असता तर बाबा म्हणाले असते" अंदाज बांधत ती स्वगत झाली..

" ओके बेटा.. ठेवतो.. थोडं इर्मजन्सी आहे.." म्हणत रामरावांनी फोन ठेवला.

" अरे वृद्धाश्रमातून फोन होता.. तिकडे फेरी झाली नाही आज.. काळजीत होते मित्रवर्ग म्हणून कॉल केला.." कॉफीचा मग हातात घेत रामराव म्हणाले..

" पण छान आहे बाबा.. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीत रमलं की एकांतवासाचं दु: ख भोगावं लागत नाही." सुयश विचारात गढून जात म्हणाला.

" मग, तु ही रमव की स्वत: ला संसारात.. सरला गेली निदान तिची इच्छा तरी पूर्ण कर.. तुला कोणी पसंद आली असेल तर.." रामराव बोलणार तोच सुयशने त्यांना गप्प केलं..

" बाबा, लग्नाचं राहू द्या.. मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे.. त्यात हा विषय नको.. आणि सर्वात महत्त्वाचं माझ्या आयुष्यात असं कुणीच नाही आणि येणारही नाही.." ठामपणे सुयश म्हणाला.

" कुणी यायला प्रज्ञा मनातून जायला हवी ना.." स्वत:शीच पुटपुटत रामराव म्हणाले..

" काही बोललात का..?" रामरावांचे अस्पष्ट शब्द कानावर घेत सुयशने प्रश्न केला..

" हा तेच तुझ्या परदेश दौर्‍याबद्दल.. सगळं सविस्तर सांग.. निवांत." विषय बदलत रामराव म्हणाले.

एकमेकांना वेळ देत दोघांनी सहवास भरभरून अनुभवला.. रात्री स्वयंपाकाचं सुयशने मनावर घेतलं.. आणि रामरावांना विदेशी पद्धतीचं खाऊ घातलं.. रात्री शतपावली झाल्यावर दोघेही झोपायला निघून गेले..

" देवा गजानना, कौल दिलास बाबा.. आता या दोघांना एकत्र आणायची जबाबदारी माझ्यावर.. ती पेलण्याची ताकद दे.. माझ्या राणीला लेकाचा सुखी संसार पाहायचा होता.. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या.. आता ही इच्छा कशी अपूर्ण राहिल.. सरला लवकरच तुझ्या लेकाचा सुखी संसार सुरु होईल बघ.. माझा शब्द आहे तुला.." मनात जपलेल्या आपल्या पत्नीला वचन देत रामराव समाधानाने झोपी गेले..

वेळेचा फरक पडला होता. त्यामुळे सुयशला झोप येत नव्हती.... पहाटे पहाटे झोप लागली.. त्यामुळे सकाळही दुपारी बारा वाजता झाली.. उठल्यावर रामराव डोळ्यांना दिसले नाहीत.. आंघोळ, नाश्ता आवरत त्याने त्यांना कॉल केला..

" अरे सुयश.. उठलास का..? मी वृद्धाश्रमात आलो आहे.. तुझ्यापुरतं बनवून खा.. मी संध्याकाळी चार पर्यंत येईन.." रामराव म्हणाले.

" ओके.. पण लवकर या.. एकट्याला करमत नाही.." सुयशने प्रतिउत्तर दिले..

" मग इकडे येतोस का..?" रामरावांनी मोक्यावर चौका मारण्याचा प्रयत्न केला.

" नको.. तुम्ही एन्जॉय करा.. मी थांबतो घरी.." म्हणत त्याने फोन ठेवला..

" काय बाबा.. आज खूप खूश दिसता.." तोच मागून येत प्रज्ञा म्हणाली.

" हो गं बेटा.. एक रखडलेलं काम मार्गी लागतय.. देवाच्या आशिर्वादाने ते झालं म्हणजे स्वर्ग गाठला बघ.." रामराव आशावादी मनाने म्हणाले.

" मग मी ही प्रार्थना करेन देवाला की तुमचं काम लवकरच होवो.." प्रज्ञाने आपल्या गोड वाणीने त्यांच्या आशा प्रफुल्लित केल्या..

रामराव गोड हसले..

"आजपासून सुरवात करायला हरकत नाही.." मनातल्या मनात पुटपुटत त्यांनी त्यांच्या एकत्र येण्याचे इमले रचायला घेतले..

ते एवढं सहज शक्य नव्हते.. कुणाची तरी भक्कम मदत लागणार म्हणून त्यांनी आपल्या जिवलग मित्राला पाटील रावांना सगळं खरंखरं सांगून टाकलं..

पाटील रावही अगतिक झाले.. आपल्या मित्राला साथ देण्याचं वचन देत त्यांनी मैत्री निभावली..

सुयश आणि प्रज्ञा यांची भेट व्हावी या हेतूने त्यांनी पहिला डाव आखला.. चारच्या सुमारास सुयशला फोन करून गाडी बंद पडल्याचे सांगून आपल्याला घ्यायला वृद्धाश्रमात बोलावून घेतले..

सुयशही दुसरी गाडी घेऊन वृद्धाश्रमात पोहचला...

रामराव पाटीलरावांसोबत मागच्या बगिच्यात बसले होते.. गाडीतून बाहेर पडत सुयशने त्यांना पुन्हा कॉल लावला.. त्यांनीही फोन मुद्दामहून रिसिव्ह केला नाही.. ऑफिसमध्ये जाऊन विचारण्याशिवाय पर्याय नव्हता..

इकडे ऑफिसमधून एका महत्त्वाच्या कामासाठी फाईल घेऊन प्रज्ञा बाहेर पडायला आणि सुयश ऑफिसमध्ये पोहचायला एकच वेळ.. दोघांचेही लक्ष नसल्याने एकमेकांवर आदळत त्यांनी पुर्नभेटीची ग्वाही दिली.. प्रज्ञाच्या हातातली फाइल खाली पडली आणि कागद विखुरले गेले.. लक्ष कागदांवर असल्याने टक्कर लागलेली व्यक्ती दोघेही ओळखू शकले नाहीत..

" ओ मिस्टर, जरा बघून चाला.." विखुरलेल्या कागदांकडे पाहत ती म्हणाली..

सुयश एव्हाना खाली बसून कागद गोळा करू लागला होता पण तिच्या आवाजाने तो पटकन भानावर आला..

"प्रज्ञा...." नाव ओठ्यावर यायच्या आत तो उठून उभा राहिला.. डोळ्यांवरचा गॉगल काढताच नजरभेट झाली.. तीही हरवली त्याच्या डोळ्यांत.. ओळखीचा स्पर्श, ओळखीचा आवाज, ओळखीचे डोळे यापलिकडे दोन ओळखीची हृदये एकमेकांना भेटत होती...

" सुयश.... तु.." काळजातून आर्त स्वर बाहेर पडले.. त्या स्वरातील वेदना अश्रूंच्या रुपात डोळ्यांतून बरसली..

क्षणभर त्यालाही वाटले ते अश्रू टिपावे.. तिला रडतांना आताही पाहवत नव्हते का त्याला..?

पुढच्याच क्षणी सावरत त्याने स्वत: ला तिच्या ओळखीपासून अलिप्त केले..

" आय अॅम सॉरी.. माझं लक्ष नव्हतं.." अनोळखीपणे तो म्हणाला.

" सुयश... बरा आहेस ना..?" डोळ्यांना आलेली भरती टिपत ती अलवारपणे म्हणाली.

" सॉरी, मी नाही ओळखत तुम्हांला.. अनोळखी व्यक्तींशी नाही बोलत मी.." तेवढ्याच परखडपणे म्हणत त्याने गॉगल डोळ्यांवर चढवला आणि ऑफिसमध्ये आला..

आदित्य ऑफिसमधून निघतच होता की सुयश तिथे पोहचला..

" हॅलो, आय अॅम सुयश माने.. रामराव मानेंना भेटायचं होतं.." हस्तांदोलन करत सुयश म्हणाला..

सुयश या एका शब्दासरशी आदित्य हादरला.. आपला हात मागे घेत त्याने बाहेर धाव घेतली.. विखुरलेल्या कागदांत विखुरलेल्या आठवणी शोधत बसलेली प्रज्ञा पाहून तो अगतिक झाला..

" प्रज्ञा, तु ठिक आहेस ना..?" तिला भानावर आणत तो म्हणाला..

ती उठली.. त्याने कागद गोळा करून तिच्या हातात दिले..

" मला अनोळखी म्हणून निघून गेला तो.. प्रेम क्षणात संपतं का..?" डोळे पुसत ती म्हणाली.

" तु आधी शांत हो.. इथे बस पाहू.." म्हणत त्याने बाजूला बसवत तिला पाणी दिले..

तोच रामरावही तिथे पोहचले.. प्रज्ञाला रडवेल्या अवस्थेत पाहून रामरावही तिच्याजवळ गेले..

" प्रज्ञा, काय झालं बेटा..?" तिच्या डोक्यावर हात ठेवत रामराव म्हणाले.

" बाबा... सुयश..." आत बोट दाखवत ती म्हणाली..

" त्याने माझी ओळखही नाकारली.. मला अनोळखी म्हणत निघून गेला तो.." रामरावांच्या शब्दांनी हळवी होत रडत प्रज्ञा म्हणाली..

आदित्यच्या जिव्हारी लागत होतं सारं.. कालपर्यंत सुयश तिच्या आठवणीत होता आणि आज समोर येऊन ठाकला आहे या जाणिवेने त्यालाही भरून आलं..

बाजूला जात त्याने स्वत: ला अलिप्त केलं..

तोच सुयशही बाहेर आला..

" बाबा, कोणाशी बोलत आहात तुम्ही..? परक्या माणसांशी असं आपुलकीनं बोलू नये.. गैरफायदा घेतात ते त्याचा.." सुयश रागाने म्हणाला.

" सुयश, शांत हो.. अजून किती त्रास देशील तिलाही आणि तुलाही.." रामराव त्याला समजावत म्हणाले.

" जो त्रास तिने दिलाय त्यापेक्षा कमीच आहे हा त्रास.. माझी आई गमावली आहे मी हिच्यामुळे.. आणि तुम्ही तुमची पत्नी.. तुम्ही माफ केलं असेल पण मी नाही माफ करणार.. कधीच नाही.." तोंड फिरवित सुयश म्हणाला.

त्याच्या बोलण्याने होतं नव्हतं ते अवसानही गळून पडलं... त्याचा राग तिच्या डोळ्यांतून अश्रू बनून वाहू लागला....

" सुयश, आता अजिबात काहीच बोलायचे नाहीस.. आईची शपथ आहे तुला.. जाऊन बाहेर थांब..मी आलोच." रामराव म्हणाले..

त्यांचे शब्द न टाळता तो तसाच बाहेर निघून गेला.. प्रज्ञाकडे न पाहता..

" प्रज्ञा, सुयशच्या बोलण्याची मी माफी मागतो.. आईच्या बाबतीत खूप हळवा आहे तो म्हणून.." हात जोडत रामराव म्हणाले.

" बाबा, तुम्ही का हात जोडता..? त्याचं बरोबर आहे.. कसा माफ करेल तो मला त्याने आई गमावली आहे माझ्यामुळे.. माझ्यावर रागावणं हा त्याचा अधिकार आहे.. आणि या वेदना माझी शिक्षा.. तुम्ही त्याला बघा. खूप दु:खी आहे तो.. त्याला सावरा.. त्याला असं पाहवत नाही.. त्याला जपा." डोळ्यांतलं पाणी टिपत ती म्हणाली.

" पण तुझं काय बेटा..? तुही तेवढीच दु:खी आहेस.. तुझ्या वेदना त्याला कळायला हव्यात." रामराव म्हणाले.

" बाबा, मी ठिक आहे.. सवय झाली आहे या साऱ्याची आता.. घरी बाबांचा तिरस्कार स्विकारत सवय केली आहे मनाची.. आणि सुयशला माझा तिरस्कार करण्याचा अधिकार आहे.. तुम्ही खरच जा.. मी ठिक आहे.." म्हणत प्रज्ञा उठली आणि आपल्या रुममध्ये निघून गेली..

सुयश बाहेर निघून गेला होता.. गाडीजवळ थांबत त्याने डोळ्यांवरून गॉगल काढला.. शुन्यात नजर लावून तो प्रज्ञाला आठवत होता...

एवढं बोलून ही तिचा विचार क्षणभरही त्याच्या मनातून जात नव्हता..

तिरस्कार करत होता तो तिचा.. पण मनातलं प्रेम अजूनही जीवंत होतं.. म्हणूनच त्याला वाईट वाटत होतं आता..

" मी का बोललो तिला..? सरळ का नाही टाळलं..? ज्या मार्गाला जायचं नाही त्या मार्गाचा पत्ता का विचारा..? ती ठिक असेल ना..? पण मला काय त्याचं..? मला नाही काहीच वाटत तिच्याबद्दल.." मनाला तेच तेच समजावत तो गाडीत बसला..

एव्हाना रामरावही गाडीत येवून बसले.. घरापर्यंतचा प्रवास एकमेकांशी एक ही शब्द न बोलता पार केला त्यांनी.. घरात कमालीची शांतता पसरली होती.. सुयश फ्रेश होऊन खाली आला.. रामरावही फ्रेश होऊन बागेत जाऊन बसले होते.. सुयशने किचनमध्ये जाऊन कॉफी बनवली आणि ती घेऊन रामरावांजवळ येऊन बसला..

रामरावांनी काहीही न बोलता तो कॉफी मग उचलला...

थोडावेळ शांततेत गेला..

" आय अॅम सॉरी बाबा.. मी एवढ रियॅक्ट नव्हतं व्हायला पाहिजे.." सुयश म्हणाला.

" सुयश, सॉरी मला नको म्हणूस.. तिला म्हण.. तिने मुद्दाम केलं का सर्व..? का तिला शिक्षा देत आहेस..? तुझ्या आईच्या जाण्याचा दोष तिला देतांना तिला होणाऱ्या मानसिक त्रासाची कल्पना नाही का येत तुला..? खूप सहन केलय पाच वर्षात तिने.. तिच्या बाबांचा रोष पत्कारत लग्नाला विरोध केला, स्वत: ला सगळ्यांपासून अलिप्त करत वृद्धाश्रमासाठी वाहून घेतलं. तिच्यामुळे आपण सरलाला गमावलं आहे हा त्रास नाही सहन होत तिला.. नको रे अगतिक करू पोरीला.. अजूनही तेवढच प्रेम आहे तिचं तुझ्यावर.. तुझी काळजी आहे तिला.. सॉरी बोलायचं असेल तर तिला बोल.. आज खूप चुकीचा वागलास तु.." म्हणत रामराव उठून आत निघून गेले..

मनाची घुसमट त्याला तरी कुठे स्वस्थ बसू देत होती.. पण आपण खरच चुकलोय.. एवढं टोकाला नव्हतं जायला पाहिजे या विचारातच त्याने तिची माफी मागायचे ठरवले..

क्रमश:

******************************************

लिखाणात चुका आढळल्यास क्षमस्व...

    

🎭 Series Post

View all