रंग माळियेला......(भाग १ ला)

Love story of Pradnya and Suyash.. exploring new horizon of pure love beyond colour

# रंग माळियेला... भाग १ ला

@ आर्या पाटील

****************************************

(नात्याला प्रीतीचा रंग देणारी 'प्रज्ञा'आणि 'सुयशची' एक काल्पनिक सावळी प्रेमकथा जी समाजाची काळी वास्तवता नक्कीच दाखवेल)

###########################

         "वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ !

          निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा !"

गणरायाला स्मरत सरु आजीची देवपूजा सुरु झाली.. त्या आवाजाने ती लागलीच बागेकडे धावली. प्रेमाने जोपासलेल्या आपल्या बागेतील लाल जास्वंदीची फुले भराभर परडीत वेचत तिने मोर्चा वळवला दुर्व्याकडे.. काळ्या मातीच्या कॅनव्हासवर हिरव्यागर्द रंगाची छटा रंगवणाऱ्या बाप्पाच्या प्रिय दुर्व्याला तिने परडीत वेचले.. आपल्या पांढर्‍या ड्रेसवरील ओढणी सांभाळत लगबगीने देवघर गाठले...

आजीला हलक्या हाताने स्पर्श करत फुलांची परडी पुढ्यात धरली.. ती परडी हातात घेत सरु आजी म्हणाल्या,

" गुणाची गं माझी लेक.. बाप्पा जरा लक्ष दे माझ्या नातीवर.."

आजी अजून काही म्हणायच्या आत तिने हात जोडले अन् डोळे मिटून देव्हार्‍यातल्या गणरायाला नमस्कार केला..

देवाच्या पुढ्यात प्रज्वलित दिव्याच्या मंद प्रकाशात तिचा कृष्णवर्ण चमकून उठला...

ती प्रज्ञा... प्रज्ञा देशमुख.. विलासराव आणि शालिनीताईंच पहिलं कन्यारत्न.. नाव्याप्रमाणेच प्रज्ञावान, गुणवान आणि दयावान.. 

सडपातळ बांधा, लांबसडक केस, दाट भूवया, रेखीव चेहरा साऱ्याच जमेच्या बाजू.. पण कृष्ण आणि विठ्ठलासारखा लाभलेला 'कृष्णवर्ण' तिच्या सौंदर्याच्या नेहमीच आड येत होता..

जगाची पण कमाल आहे नाही...

सावळ्या विठ्ठलाला हृदयात सामावले जाते पण कृष्णवर्णीय त्याच्या लेकरांना डोळ्यांतही स्थान नसते..

" गोरी असती तर सिनेमातल्या नट्यांनाही मागे टाकले असते माझ्या लेकीने.." प्रज्ञाची आई नेहमी म्हणायची..

त्यावर सरु आजींचे उत्तर ठरलेले असायचे,

" नट्यांना काय सोनं लागलयं?.. माझी प्रज्ञा नक्षत्रासारखी आहे.. काळ्या आभाळावरही चमकून दिसणारी.."

लहानपणी शाळेत असतांना तिच्या वर्णावरून अनेकदा मुलं मुली चेष्टा करायचे.. किंबहुना तिच्याशी मैत्री करायलाही मुली तयार नसायच्या.. हळवी प्रज्ञा हिरमुसायची..

" प्रज्ञा.. एवढी मोठी हो की या मुली स्वत:हून तुझ्याशी मैत्री करतील..." आजी समजवायची..

आजी म्हणजे तिच्या आयुष्यातील तिची आवडीची सखी.. तिच्या हृदयाचा प्रेमळ कप्पा जणू..ज्यात तिने स्वत: ला, स्वत: मधील सौंदर्याला नेहमीच जपून ठेवले..

आजीचे म्हणणे तिला पटले..'विद्या देवतेशी' मैत्री करत तिने अभ्यासात स्वत: ला झोकून दिले.. प्रत्येक परिक्षा प्रथम क्रमाकाने उत्तीर्ण होऊ लागली.. खेळातही ती आघाडीवर होती.. प्रत्येक स्पर्धा ती गाजवून सोडू लागली.. आणि पाहता पाहता आजीच्या म्हणण्याप्रमाणे मैत्रीणींच्या मनात तिने ती उंची गाठली.. त्या स्वत:हून मैत्रीचा हात पुढे करू लागल्या.. प्रज्ञाला तेच हवे होते.. हक्काच्या मैत्रिणी तिचं जगण्याचं आभाळ विस्तारून गेल्या.. मैत्री निभावण्यात तिने कोणतीच गय केली नाही..

तिच्या मनाचा मोठेपणा तिला सार्‍या शाळेत आणि मग कॉलेजातही चांगली मैत्रीण म्हणून लोकप्रिय करून गेला. मेहनतीच्या जोरावर तिने इंजिनियरिंग पूर्ण केले..

आणि आज एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये प्रोजेक्ट हेड म्हणून ती कार्यरत होती.. यशाच्या उंच शिखरावर पोहचूनही पाय मात्र जमिनीवरच होते...

शिक्षण, नोकरी असा प्रवास करत करत तिची जीवनगाडी लग्नाच्या थांब्यावर येऊन पोहचली होती... घरच्यांना वेध लागले होते ते लाडक्या लेकीच्या लग्नाचे.. संसाराचं ते सोनेरी आभाळ तिलाही हवेहवेसे वाटत होते.. या आभाळी तिलाही मनसोक्त उडायचे होते...

पण... पण तिच्या स्वप्नांनाही शाप होता तिच्या 'कृष्णवर्णाचा'...

तब्बल दहा मुलांनी तिच्या वर्णावरून तिला नापसंद केले..

आणि आज अकरावा मुलगा तिला पाहण्यासाठी येत होता..

शालिनीताई सकाळपासून किचन सांभाळत होत्या..

विलासराव घरातील छोटीमोठी कामे आवरत होते..

प्रज्ञा ची लहान बहिण हेमल इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती.. श्वेतवर्णाची हेमल प्रज्ञापेक्षा रुपाने उजवी होती.. येणाऱ्या पाहुण्यांच्या दृष्टीस आपण पडू नये म्हणून ती लवकरच कॉलेजला निघून गेली..

" अकरावा मुलगा म्हणजे नक्कीच लग्न जुळेल.." म्हणत आजीने देवघरातून बाहेर पडत तुलशी वृंदावन गाठले ...

प्रज्ञा साऱ्यांची धावपळ शांतपणे पाहत होती.. यावेळी ही नकारच येणार याची तिला पूर्ण शाश्वती होती.

स्वयंपाकघरात काम करणाऱ्या आईचा कानोसा घेत ती आत गेली...

" आई या वेळेस तरी माझा बिना इफेक्ट वाला.. काळाच फोटो दिलास ना.." स्वयंपाकघरात आईला मदत करता करता प्रज्ञा म्हणाली..

" असं काय बोलतेस वेडाबाई? तु काय काळी आहेस का? हा थोडी सावळी आहेस पण सुंदर आहेस.." वेड्या आशेत शालिनीताई म्हणाल्या..

" सावळी नाही गं काळीच आहे मी.. जे आहे ते आहे.. बरं ते जाऊ दे.. तु माझा तोच फोटो दिलास ना ?" तिने पुन्हा तोच प्रश्न केला..

" तु हट्ट्च धरलास मग काय करणार? दिला तोच तुझ्या आवडीचा फोटो.." काहीश्या गंभीर होत शालिनीताई म्हणाल्या..

" आई जे खरं आहे तेच दिसु दे.. उगा त्यांना आणि आपल्यालाही आशा नको.. मी काय म्हणते... मी लग्नच नाही करत.. आयुष्यभर तुम्हांलाच सांभाळेन.." आईला मिठी मारत ती म्हणाली..

" आणि आम्ही मेल्यावर काय करणार ? कोणासाठी जगणार ? अस एकट्याने आयुष्य नाही गं निघत... उगाच का नवऱ्याला आयुष्यभराचा जोडीदार म्हटंल आहे..." तिला समजावत त्या म्हणाल्या....

" बरं बाई तु जिंकलीस मी हरले... आता सांग कोणती साडी घालू ते... प्रत्येक वेळेस नविन साड्या कुठून गं

आणतेस ?" पोह्यांसाठी भाजलेले शेंगदाणे तोंडात टाकत ती म्हणाली..

" ती अबोली रंगाची, हलक्या नक्षीची साडी घाल.. चांगली दिसेल तुझ्यावर.. तशीही तु प्रत्येक साडीत सुंदरच दिसतेस.." तिच्या डोक्यावरून हात फिरवित शालिनीताई म्हणाल्या..

" जगाची नजर पण माझ्या आईसारखीच असती तर ?" उत्तरवजा प्रश्न विचारत तिने किचनमधून काढता पाय घेतला..

शालिनीताई कितीतरी वेळ तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे तशाच पाहत होत्या..

" किती गुणाची लेक आहे माझी.. पण एका रंगापायी...

ज्या घरात जाईल त्या घराचे नंदनवन करेल.. किती माया ती तिच्यात.. सगळ्यांनाच जीव लावते.. माणसं तर माणसं पण प्राणी, बागेतील झाडे किती प्रिय तिला.. घरात गोडाधोडाचं बनवलं तर आधी बाजूच्या सानेकाकूंना नेऊन देणार.. भाजी विकायल्या आलेल्या मावशींना आधी पाणी देणार.. आळीतील गरजू मुलांचे मोफत क्लासेस घेणार.. रेल्वेतील रोजच्या मैत्रीणींसाठी बागेतील गुलाबाची फुले घेवून जाणार.. घरातील प्रत्येक कामात सरस.. हातात तर जणू अन्नपूर्णाच वसली आहे तिच्या.. किती रुचकर स्वयंपाक करते.. पोटच काय पण मन ही भरते.. आजीची सेवा करणे तिला सर्वात जास्त प्रिय.. दुसऱ्याच्या दु:खात दु:खी होणारी तर दुसऱ्याच्या सुखात आपला आनंद शोधणारी माझी लेक मनाने सौंदर्यवतीच आहे.. गजानना तिचं मन जपणारा राजकुमार तिला लवकरच मिळो.. स्वगत होत शालिनीताईंनी हात जोडले....

कथेतील दुसरं कुटुंब.. रामराव माने, त्यांच्या पत्नी सरला माने आणि दोघांचा एकुलता एक मुलगा सुयश माने.

सुयश ही कम्प्युटर इंजिनियर होता. एका नावाजलेल्या कंपनीत सिनियर इंजिनियर म्हणून कार्यरत असलेला तो उंचपुरा, गोर्‍या वर्णाचा आणि नाकीडोळी रुबाबदार होता.. अगदीच राजबिंडा..

त्याच्यासाठीही वधू शोधमोहिम सुरु होती.. एकुलता एक असल्याने त्याच्या आईवडिलांना होणाऱ्या सुनेकडून खूप अपेक्षा होत्या.. आणि योगायोगाने आज तेच प्रज्ञाला पाहण्यासाठी जात होते.. 

छोटेखानी वधुवर मंडळ चालवणाऱ्या निलमताईंनी प्रज्ञाचा इफेक्टवाला फोटो त्यांना दाखवला.. त्या फोटोत श्वेतवर्णाची दिसणारी प्रज्ञा त्यांना आवडली होती." त्यांच्या संज्ञेत बसणारी गोरीपान सुंदर तरुणी होती ती..

इकडे कालच प्रज्ञाच्या आईने बिनाइफेक्टवाला फोटो नेऊन दिला निलमताईंना...आणि तोच वरपक्षाला दाखविण्याची विनंती केली.. निलमताईंनी शालिनीताईंना समजवायचा प्रयत्न केला..

पण त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या.. शेवटी आज सकाळीच निलमताईंनी प्रज्ञाचा नवा फोटो घेऊन सुयशचे घर गाठले..

क्रमश:

******************************************

कथामालिका लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न.. लिखाणात चुका आढळल्यास, कोणाचे मन दुखावल्यास क्षमस्व..

    

🎭 Series Post

View all