रंग माळियेला...( भाग १९ वा)

Love story of Pradnya and Suyash... Exploring new horizon of love beyond the colour..

# रंग माळियेला...(भाग १९ वा)

©® आर्या पाटील

सदर कथा पूर्णत: काल्पनिक आहे.

*******************************************

सकाळ झाली ती समायोजनाचं सत्य स्विकारत आणि मनाची समजूत काढत..संकष्ट चतुर्थी असल्याने आजीला मंदिरात घेऊन जायचे कारण सांगून तिने ऑफिसला सुट्टी टाकली.. जवळजवळ नऊच्या सुमारास दोघीही जवळच्या मंदिरात पोहचल्या.. त्या पोहचायच्या आधीच वैदेही आणि सुयश मंदिरात हजर होते.. त्यांना पाहून तर प्रज्ञाची कळी पुन्हा रुसली.. तोच सुयश पुढ्यात येत आजीजवळ गेला.. आजींनी मोबाईलमध्ये फोटो पाहिला होता त्याचा. त्यांनी लगेच ओळखले..

" सुयश ना हा..." आजी म्हणाल्या.

" एकदम बरोबर ओळखलं तुम्ही आजी.." नमस्कार करत तो म्हणाला.

" औक्षवंत हो... प्रज्ञाकडून खूपच ऐकलय तुझ्याबद्दल.. खूप देखणा आहेस. सिनेमातल्या हिरोप्रमाणे.." त्याची द्रिष्ट काढत त्या म्हणाल्या..

" थँक यु आजी.. तुम्ही पण खूप गोड आहात. प्रज्ञा तुमच्यावरच गेली आहे.." सुयश म्हणाला..

प्रज्ञा हसली.. तेवढ्यात वैदेही आली.. 

" आजी.. ही वैदेही.. सुयशची होणारी बायको..." प्रज्ञा पडक्या स्वरात म्हणाली..

" काय...?" आजी विस्मयाने म्हणाल्या..

" नमस्कार करते आजी.." म्हणत वैदेहीनेही त्यांना नमस्कार केला.

" सुखी हो.." म्हणत त्या गाभार्‍याकडे निघून गेल्या..

" बाप्पा, काय रे..? पुन्हा एकदा माझ्या प्रज्ञाला नाराज गेलसं.. किती वेळ तिची परिक्षा पाहणार.. वाटलं हाच असेल माझ्या प्रज्ञाचा राजकुमार.. पण " बाप्पाच्या मूर्तीसमोर हात जोडत स्वगत होत आजी म्हणाल्या..

प्रज्ञानेही देवासमोर हात जोडले..

" देवा या भावनांच्या खेळातून मुक्त कर.. नाही सहन होत आता.. खूप प्रेम आहे माझं सुयशवर.. त्याला सुखी ठेव.." प्रज्ञा अंर्तमनात म्हणाली.

सुयश आणि वैदेहीनेही जोडीने दर्शन घेतलं.. त्यांना एकत्र पाहून दोघीही आतून तुटत होत्या..

मंदिरा समोरच्या पारावर आजीला बसवून प्रज्ञा वैदेहीला मंदिराचा परिसर दाखवायला घेऊन गेली..

त्या जवळ नाहीत याचा कानोसा घेत सुयश आजीजवळ येऊन बसला.. मघापासून प्रज्ञाच्या विचाराने आरक्त झालेल्या आजींची कळी त्याच्या बोलण्याने चांगलीच खुळली.. त्याचे गालगुच्चे घेत त्या खूप आनंदित झाल्या.. तोवर त्या दोघीही आल्या.. सुयशला आजीसोबत हसतांना पाहून, आजींना मनमोकळेपणाने त्याला दाद देतांना पाहून प्रज्ञाही सुखावली.

" बेटा वैदेही, ये इकडे.. खूप नशिबवान आहेस गं.. खूप चांगला जोडीदार निवडला आहेस.. अभिमान वाटला तुझा.." वैदेहीला जवळ घेत आजी म्हणाल्या.

आता मात्र प्रज्ञाचा चेहरा चांगलाच बघण्यासारखा झाला होता.. एक आजीच तर होती तिच्या हृदयाजवळची पण तिला ही नव्हतं कळत तिच्या हृदयातलं..

" चला निघायचं.. आजी तुम्हांला घरी सोडतो आणि प्रज्ञाला घेऊन जातो सोबतीला.." आजीला आधार देत उठवत सुयश म्हणाला.

" हो हो येईल ती.. तेवढीच वैदेहीला सोबत.. तशीही प्रज्ञाने सुट्टी घेतली आहे.. घरी सांगेन मी बरोबर.. जा प्रज्ञा यांच्यासोबत.." प्रज्ञाकडे पाहत आजी म्हणाल्या.

प्रज्ञाचा नकारार्थी कटाक्ष त्यांनी दुर्लक्ष करून परतवला..

सुयश आजीला घेवून गाडीकडे निघून गेला.. मंदिराच्या आवारात जागा नसल्याने त्याने गाडी रस्त्याच्या पलिकडे पार्क केली होती.. वैदेही आणि प्रज्ञा चप्पल घालण्यासाठी गेल्या..

विचारांच्या तंद्रीत रस्ता क्रॉस करत असतांना समोरून येणाऱ्या गाडीचा वेध काही प्रज्ञाला घेता आला नाही..

" प्रज्ञा बाजूला हो.. गाडी येतेय.." गाडीजवळून सुयश किंचाळला.. तशी ती भानावर आली.

 गाडी तिला धक्का देणार तोच वैदेहीने तिचा हात जोरात ओढला.. आणि तिला मागे खेचले..

प्रज्ञा पटकन भानावर आली..

" ये पोरी मरायला माझीच गाडी भेटली का..?" ओरडत गाडीवाला निघून गेला..

वायुवेगे सुयश तिच्याजवळ पोहचला.. गाडीत बसलेल्या आजींच्या काळजाचा ठोकाही चुकला होता..

प्रज्ञाला गाडीजवळ आणत त्याने अनाहूतपणे तिला मिठीत घेतले..

" यु स्टुपिट... कळत नाही का तुला..?तुला काही झालं असतं तर..?" तो अगतिकतेने म्हणाला..

त्याच्या हृदयाची तिच धडधड तिला पुन्हा सुखावून गेली.. त्याच्या मिठीत सुरक्षित करून गेली..

" वैदेही आर यु ओके..?" वैदेहीकडे पाहत सुयश म्हणाला..

थम्ब अप करून तिने आपण बरे आहोत हे खुणेनेच सांगितले आणि गाडीत जाऊन बसली..

वैदेही या एका नावाने प्रज्ञा भानावर आली.. त्याच्या मिठीतून स्वत: ला सोडवत ती बाजूला झाली..

" प्रज्ञा, ठीक आहेस ना. कसला विचार करत होतीस..? समोरून येणारी गाडीही दिसली नाही तुला.. नशीब वैदेही होती.." तिचा हात पकडत तो म्हणाला.

" हो वैदेही... तुझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती.. आभारी आहे तुझ्या होणाऱ्या बायकोने वाचवले मला.." त्याचा हात सोडवत ती रागातच म्हणाली.

" हाच विचार करत होतीस ना..? वैदेहीला माझ्यासोबत पाहून त्रास होतोय ना... मग तु का नकार दिलास..? तुझं खूप प्रेम आहे माझ्यावर.. कालही होतं आणि आजही आहे.." तिच्या दोन्ही हातांना धरत तो म्हणाला..

" सुयश, किती वेळा सांगितलं तुला माझं नाही प्रेम तुझ्यावर.. प्लिज माझा पिच्छा सोड..?" हात जोडत ती म्हणाली.

" ओके दॅट्स फाईन... मग बघ मला वैदेहीसोबत लग्नबंधनात अडकतांना.." तिचे हात जोरात सोडत तो गाडीत जाऊन बसला..

त्याचे शब्द तिच्या भावनांचा सूड घेऊन गेले.. जो ती ही नेहमीच घ्यायची.. सुयशच्या भावनांचा.

स्वत: ला सावरत ती गाडीत बसली..

सुयशच्या आग्रहास्तव फ्रण्टसीटवर बसलेल्या आजी प्रज्ञाकडे पाहत म्हणाल्या,

" प्रज्ञा ठिक आहेस ना गं..? कुठे लक्ष होते..? वैदेही सोबत होती म्हणून निभावलं..? काळजी घेत जा पोरी.."

" आजी, आता ती एकदम ठिक आहे... वैदेहीचे तर तिने विशेष कौतुक केले.. काळजी करू नका.. घेईल ती काळजी.." आरश्यातून तिच्याकडे पाहत सुयश म्हणाला.

प्रज्ञाची नजर ही त्याच आरश्यातून त्याच्या नजरेला भिडली..

" आजी, ठिक आहे मी.. अँण्ड थँक्यु सो मच वैदेही. तुझ्यामुळे वाचले.. सुयश यु आर सो लकी.. वैदेही तुझी..." ती बोलतच होती की सुयशने मधेच शब्द घालत विषय बदलला..

" आजी, रात्री एक छोटेखानी पार्टी आहे.. फॉर्म हाऊसवर.. वैदेहीच्या वेलकमसाठी तिच्या मित्र मैत्रिणींनी अरेन्ज केलेली.. जर तुम्हांला हरकत नसेल तर प्रज्ञाला घेऊन गेलो तर चालेल का..? तिला सुखरूप घरी आणायची जबाबदारी माझी.. घरी तेवढं तुम्ही सांभाळा.." सुयश म्हणाला.

" अजिबात नाही.. मी येणार नाही.. पार्टी वैदेहीच्या फ्रेन्ड्सची आहे सो तुम्ही दोघे जा. माझं काय काम..? मी नाही येणार." प्रज्ञा स्पष्टपणे म्हणाली.

" ये असं काय गं प्रज्ञा.. तु पण माझी मैत्रिणच आहेस ना.. मी एकटी रात्री एका मुलासोबत.. नको गं.. तु सोबत रहा.. प्लिज.." तिला विनविण्या करत वैदेही म्हणाली.

" ये बाबांनो.. तुमच्या पार्टीचं मला काही कळत नाही.. पण वेळेत घरी येणार असाल तर जा.. प्रज्ञा जा तेवढीच सोबत वैदेहीला.." आजी म्हणाल्या..

प्रज्ञाने पुन्हा आरश्यात पाहिले.. त्याची तिच्यावर केंद्रित नजर जणू काही हेच सांगत होती की 'तु मला प्रॉमिस केले आहेस..'

शेवटी पुन्हा तिने होकार दिला... थोड्याच अंतरावर असलेल्या प्रज्ञाच्या घराजवळ त्याने गाडी थांबवली.

" चला रे पोरांनो घरी... जवळ आलात तर... तेवढंच आमचं घर पाहाल.." गाडीतून उतरत आजी म्हणाल्या..

" आजी, पुढच्या वेळेस नक्की.." वैदेही म्हणाली.

" मी आजीला घरापर्यंत सोडून येते.." गाडीतून उतरत प्रज्ञा म्हणाली.

" मी पण आलो थांबा.." म्हणत तो ही गाडीबाहेर आला.

आजीच्या हाताला पकडून सुयशने रस्ता क्रॉस केला.. प्रज्ञाही बरोबरच होती.

" सुयश, रात्री उशीर करू नका.. प्रज्ञाला वेळेवर घरी सोडा.. तोपर्यंत मी सांभाळते." चालत आजी म्हणाल्या.

" माझ्यावर विश्वास ठेवून निश्चिंत रहा.. आम्ही लवकरच येऊ.." सुयश म्हणाला.

" ठिक आहे.. मी जाईन इथून तुम्ही निघा.. नाहीतर कोणीतरी बघेल घरातुन.." आजी म्हणाल्या आणि दोघांना निरोप देता झाल्या.

" पण.." प्रज्ञा पुढचं बोलण्या आधीच सुयशने तिचा हात पकडला आणि माघारी वळला.. गाडीजवळ पोहचेपर्यंत हात सोडला नाही..

आजीच्या जागी फ्रण्ट सीटवर वैदेही येऊन बसली होती..

आपला हात सोडवत सुयशकडे न पाहता ती मागे जाऊन बसली.

गाडीत बसत तिघांनी मॉलकडे कूच केली.. रात्रीच्या पार्टीसाठी कपडे घ्यायचे होते वैदेहीला.. पार्टी वेयर सिलेक्ट करतांना भरपूर वेळ गेला.. शेवटी स्वत: साठी ड्रेस घेत वैदेहीने एक ड्रेस प्रज्ञासाठीही सिलेक्ट केला..

" प्रज्ञा, हा ड्रेस मस्त आहे.. छान दिसेल तुझ्यावर.. रात्री पार्टीसाठी.." वैदेही म्हणाली.

" अगं नको.. तिच्यामते तिच्यावर गुलाबी रंग शोभत नाही.. त्यापेक्षा तुच घेत.. तुला छान दिसेल.." सुयश म्हणाला.

" काहीही हा.. सुंदर दिसेल गं.. तु हाच घाल.." तिच्या अंगावर कपडे लावत वैदेही म्हणाली.

" हो नक्की..मी हाच घालणार. थँक यु सो मच वैदेही." आरश्यातून सुयशला पाहत प्रज्ञा म्हणाली.

तोच वैदेहीचा फोन वाजला.. फोनवर बोलायला म्हणून ती बाजूला गेली.. तोवर सुयशनेही स्वत: साठी कपडे चॉईस केले.. प्रज्ञाची मदत घेत.. पुन्हा फक्त सुयशबरोबर वेळ घालवतांना प्रज्ञालाही खूप छान वाटत होते.. तोच पंधरा मिनिटांत वैदेही आली.

" वैदेही, हे बघ हे कपडे चॉईस केलेत.." प्रज्ञाने निवडलेले कपडे दाखवत तो म्हणाला.

" ये नाही.. ह्यापेक्षा हे बरे वाटतात.." दुसरे कपडे दाखवत वैदेही म्हणाली.

" ओके बाई.. घे तुझ्या आवडीचं.." सुयश म्हणाला..

प्रज्ञाची निवड म्हणजेच सुयशची आवड असायची.. एरवी कपडे चॉईस करण्यासाठी त्याला ती हवी असायची पण आज त्याने जाणिवपूर्वक तिची निवड टाळली.. तिला छळायचा एक छोटासा क्षण ही तो वाया घालवत नव्हता.

" तुम्ही चला मी पैसे देऊन येतो.." बिल करण्यासाठी काऊंटरवर जात सुयश म्हणाल्या.

प्रज्ञा आणि वैदेही गाडीत जाऊन बसल्या..

" मग बोल प्रज्ञा.. कसा आहे तुझा मित्र..? चांगल्या वाईट सगळ्या सवयी ऐकायच्या आहेत मला.. " वैदेही म्हणाली.

" सुयश.. सुयश म्हणजे सळसळतं वादळ आहे आनंदाचं. अथांग आभाळ आहे माणुसकीचं... सुयश एक गोड कोडं आहे भावनांचं.. जितकं सोडवायला जाऊ तितकं गुंततो आपण त्याच्यात.. निळ्याशार सागरापरी निर्मळ आहे तो.. हळुवार वाहणाऱ्या वाऱ्यापरी अवखळ आणि अल्लड आहे तो..प्रसंगी पाठीशी खंबीर आधार देणारा हिमालयही आहे..तो खूप निरागस आहे गं. मस्ती, मज्जा, हसणं, खिदळणं ही तर त्याची अस्त्रे.. तो ही खुश राहतो आणि आपल्यालाही खुश ठेवतो.. ये पण तो तितकाच हळवा आहे गं.. डोळ्याच्या कडा क्षणात ओल्या होतात.. तो म्हणजे तोच आहे.. मनाला भिडणारा अन् भावणारा.." प्रज्ञा सलग बोलत होती न थांबता..

तोच तो आला.. 

"निघायचं का..?" गाडीत बसत तो म्हणाला.

" चुकीच्या वेळी आलास सुयश.. प्रज्ञा खूप काही सांगत होती तुझ्याविषयी." वैदेही म्हणाली.

" योग्य माणूस निवडला आहेस माझी माहिती मिळवायला.. ओके आता बोल कुठे जायचे.." तो वैदेहीला म्हणाला.

" कॅफे.. मोस्ट निडेड.." वैदेही म्हणाली.

 फ्रेशर्स कॅफे समोर गाडी पार्क करत ते आत गेले..

कॉफीचा आस्वाद घेऊन झाल्यावर पुन्हा वैदेहीचा फोन वाजला..

" सुयश, एक महत्त्वाचं काम आहे.. मला निघावं लागेल.. अर्ध्या तासात भेटते.." बॅग उचलत ती म्हणाली.

" एकटी कशी जाणार..? थांब मी पण आलो.. प्रज्ञा फक्त अर्ध्या तासाचा प्रश्न आहे.. तु थांब आम्ही आलोच.." म्हणत तोही तिच्यामागे निघून गेला.. प्रज्ञाला काहीही बोलायची संधी न देता..

त्यांना एकत्र जातांना पाहून प्रज्ञा पुन्हा दुखावली गेली.

" मला एकटे सोडून जायला सुयशला काहीच कसे नाही वाटले. प्रेम आहे म्हणे.... मी नाही बोलले आणि याचं प्रेम संपलही..शेवटी त्यानेही सुंदरतेलाच महत्त्व दिले.." स्वगत होत ती म्हणाली.

पुढचा अर्धा तास तसाच त्यांच्या प्रतिक्षेत गेला.. पण ते काही आले नाहीत.. कंटाळून तिने त्याला कॉल लावला.. पुढच्याच क्षणी त्याने कॉल कट केला.. एकदा नाही तर तीन वेळा तेच.. शेवटी तिने फोन ठेवून दिला.. आणि वाट पाहत तशीच बसून राहिली.

" काही प्रॉब्लेम नसेल ना..? वैदेही खूप घाईने गेली. सुयशही कॉल उचलत नाही.. मी उगाच त्याला दोष देत होते.." आपल्याच विचारांचा पश्चाताप करत प्रज्ञा स्वगत झाली.

तोच समोरून दोघेही अगदीच मनमोकळेपणाने हसत येतांना दिसले.

" प्रज्ञा, सॉरी हा.. मित्राची ओळख करून दिली होणाऱ्या नवऱ्याला त्यामुळे एवढा उशीर झाला.." सुयशकडे पाहत वैदेही म्हणाली.

" इट्स ओके.. तुम्ही एकत्र वेळ घालवणं महत्त्वाचं.. चला निघायचं.." म्हणत तिने बॅग उचलली..सुयशकडे न पाहताच ती गाडीत जाऊन बसली.

जे सुरु होतं ते तिच्या अगतिक मनाला आणखी दुखावून जात होतं पण तिच्याकडे पर्याय नव्हता.. मैत्रीसाठी नव्हे नव्हे प्रेमासाठी सारं सहन करत होती ती..

पुढचा पूर्ण वेळ वैदेहीला शहरातीत काही महत्त्वाची पर्यटन स्थळे दाखविण्यात गेला.. बघता बघता संध्याकाळचे सहा वाजले.. तयार होण्यासाठी म्हणून वैदेहीने ब्युटी पार्लरला जायचा हट्ट धरला.. एवढच काय प्रज्ञालाही पार्लरमध्येच तयार व्हायची गळ घातली..

प्रज्ञा रंगाने डावी असली तरी रुपाने उजवी होती.. मेकअपच्या टचने तिचं रुप आणखी खुललं.. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये तर ती खूपच सुंदर दिसत होती.. एखाद्या अप्सरेप्रमाणे.. वैदेहीही खूप सुंदर दिसत होती.. त्या तयार होऊन गाडीजवळ येताच सुयश क्षणभर हरपला..

" नक्की, तुम्हीच आहात ना..? स्वर्गातून अप्सरा आल्यासारख्या वाटल्या.." दरवाजाचा लॉक उघडत तो म्हणाला.

तिघेही मनमुराद हसले.. आणि पार्टी व्हेन्यु कडे कूच केली..

एका पॉप्युलर डेस्टिनेशनला पार्टी होती... वैदेहीच्या खूप जवळच्या मित्राने आयोजित केलेली..

गाडीतून बाहेर पडताच वैदेहीने फिल्मी अंदाजात सुयशच्या हातात हात देत आत प्रवेश केला.. त्यांची नकोशी जवळीक डोळ्यांत साठवत प्रज्ञाही आत गेली..

सगळचं कसं चकचकीत.. नभोमंडपातील चांदण्यांनी आरास मांडला होता जणू.. वैदेहीने प्रवेश करताच सगळ्यांनी टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत गेले..

" मीट अवर ब्राइड टु बी.." वैदेहीचा हात हातात घेत कुणी म्हणाले.

प्रज्ञा मागेच थांबली.. जवळ जायची तिची जराही इच्छा नव्हती..

वैदेही सगळ्या मित्र मैत्रिणींना सुयशची ओळख करून देत होती.. प्रज्ञा मात्र आतून तुटत होती..

" प्रज्ञा, चल ना.. तुझी ओळख करून देतो.." मागे तोंड करून उभ्या राहिलेल्या प्रज्ञाचा हात पकडत सुयश म्हणाला.

" तु आणि तुझी ब्राइड टु बी एकत्र राहणं महत्त्वाचं.. मी ठिक आहे इथेच तु जा.. एन्जॉय युवर मूमेंट.." हात सोडवत प्रज्ञा म्हणाली.

" आर यु शुअर.." सुयश म्हणाला.

तिने होकारार्थी मान हलवताच तो तेथून निघून गेला..

" लेट्स वेलकम अवर ब्राइड अँण्ड ग्रुम टुबी.. हाव आ डान्स.." कुणीतरी म्हणाले..

कानात कुणीतरी उकळतं तेल टाकावं असं काहीसं झालं होतं प्रज्ञाच्या बाबतीत.. तिने त्याला पाहण्याचे टाळले.. सगळच असहनिय होत होतं.. त्या कोंदट वातावरणातून निघून बाहेरच्या फ्रेश हवेत जावे या हेतूने ती उठली.. तोच लक्ष वैदेही आणि सुयशवर गेले.. त्यांना एकत्र डान्स करतांना पाहून तर प्रज्ञा पूर्णपणे हरली.. डोळ्यातील अश्रू रोखत तिने सरळ बाहेर धाव घेतली घरी जाण्यासाठी..

ती बाहेर पडली.. मोकळ्या हवेत स्वत: ला शांत करत क्षणभर थांबली.. डोळे पुसत निघणार तोच मागून सुयशने तिचा हात पकडला..

" प्रज्ञा, आत चल.. कुठे निघालीस..?" तो म्हणाला.

" सुयश माझा हात सोड.. वैदेहीला सोडून इकडे काय करतोस.." ती हात सोडवत म्हणाली.

" मी माझ्या मैत्रिणीला न्यायला आलो आहे.." हात आणखी घट्ट पकडत तो म्हणाला.

" ही मैत्रीण कधीच मागे सोडलीस तु.. अगदी दिवसभरात प्रेम विसरू शकतोस मग मैत्रीचं आयुष्य किती असणार..?" ती म्हणाली.

" कोण म्हणालं मी प्रेम विसरलो.? आणि का नको विसरू गं..? तुला आपलं प्रेम स्विकारायचच नसेल तर मी तरी काय करू..?" तिच्या जवळ जात तो म्हणाला.

" नाही हिंमत माझ्यात.. प्रेम स्विकारायची.. माझ्या रंगाची भीती वाटते.." ती म्हणाली.

" अजून तेच.. तुझं नाहीच आहे प्रेम माझ्यावर नाहीतर पुन्हा पुन्हा तेच उगाळत नसती बसलीस.. माझं रंगविरहीत प्रेम तुला कळलचं नाही.. आणि कधीच कळणार नाही.. थकलो मी आता.. जा तु घरी जा.." म्हणत त्याने तिचा हात सोडला..

त्याच्या हातुन सुटलेला हात तिला आता सहन झाला नाही.. ती पटकन त्याच्या कुशीत शिरली.

" आय लव्ह यु सुयश.. आय लव्ह यु सो मच.. वेड्यासारखं प्रेम करते रे तुझ्यावर.. वैदेहीला तुझ्या सोबत पाहून काळीज तुटतं माझं.. आज दिवसभर खूप सहन केलं मी.. पण आता नाही.. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे.. तु जवळ असल्यावर मी वेगळ्याच जगात असते रे.. त्या जगापासून दूर जायची हिंमत नाही.." त्याच्या हृदयाची वाढलेली धडधड साक्षीला घेत तिने स्वत: च्या भावना व्यक्त केल्या..

तिचा प्रत्येक शब्द त्याच्या कानाला सुखावत होता. तिचा केवीलवाणा स्पर्श मनाला आनंदून जात होता.. त्याने तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली..

काही वेळ एकमेकांत विसावत त्यांनी प्रेमाची परिपूर्ती साजरी केली..

तोच टाळ्यांचा आवाज कानावर पडताच ते भानावर आले.. त्याच्या मिठीतून बाहेर येत प्रज्ञाने डोळे टिपले.. 

" सुयश, मी चुकले.. माझ्यामुळे आपल्या नात्याला नाव नाही मिळालं.. माझ्यामुळेच तु वैदेहीसोबत लग्नाला तयार झालास.. पण माझ्या चुकीची शिक्षा तिला नको.. तु कर लग्न तिच्यासोबत.." प्रज्ञा बोलतच होती की त्याने तिच्या ओठांवर हात ठेवून तिला गप्प केले.. पुढच्याच क्षणी तो तिला घेऊन पार्टी हॉलमध्ये गेला..

समोरचं दृश्य पाहून ती अवाक् झाली आणि विस्मयाने सुयशकडे पाहत राहिली...

क्रमश:

*******************************************

लिखाणात चुका आढळल्यास क्षमस्व.

🎭 Series Post

View all