रंग माळियेला...( भाग १५ वा)

Love story of Pradnya and Suyash... Exploring new horizon of love beyond the colour..

रंग माळियेला.....( भाग १५ वा)

@ आर्या पाटील

सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक आहे.

*******************************************

गाडीने वेग धरला आणि त्याच्या आठवणींनाही भरती आली...

" प्रज्ञा, मामाच्या गावाची मजाच काही और होती गं.. कधी शाळा संपते आणि कधी गावाला जातो असे व्हायचे.." उत्साहात तो मनाला.

" कम अगेन... आपण तुझ्या मामाच्या गावाला जातोय.. सिरियसली.. म्हणजे निलयच्या आईबाबांना भेटायला.. दापोलीला... गुड डिसिजन सुयश... आय अॅम प्राउड ऑफ यु.." प्रज्ञा म्हणाली..

" ऑबवियसली क्रेडिट गोज टु यु ... तु जाणिव करुन दिली नसतीस तर माझं कर्तव्य कधीच कळलं नसतं मला.." तिच्याकडे पाहत सुयश म्हणाला..

" सुयश, खरं तर तु चांगला माणूस आहेस म्हणून तुला जाणिव झाली.. ते सोड.. तुझ्या मामाकडे कोण असतं..?" विचारणा करित प्रज्ञा म्हणाली.

" मामा मामी इकडे मुंबईलाच राहतात.. आजीआजोबा सुद्धा त्यांच्याकडेच असतात.. मामाचं घर बंदच असतं आता... मी ही खूप वर्षांनी चाललोय गं... खूप हिंमत करून.." गंभीर होत तो म्हणाला.

" मला तुझ्यासोबत पाहून कोणी तुझ्या आईला कॉल करून सांगितलं तर..?" शंका उपस्थित करित ती म्हणाली.

" सांगू दे बरचं होईल.. तसही मी सांगणार आहेच.. पण याची शक्यता कमीच आहे.. लहानपणी ती घटना घडल्यानंतर मी गावी गेलोच नाही त्यामुळे कोणी मला ओळखेल असे नाही वाटत.." तो म्हणाला.

दापोलीचा प्रवास तसा लांबचा पण विना कंटाळवाणा.. निसर्ग सौंदर्याने सजलेलं कोकण नयनांना भारावून सोडत होतं.. वळणावळणाचे रस्ते... गिरक्या घेत वर चढणारे तर कधी सर सर खाली येणारे. हिरवीशाल लेवून सजलेली लाल धरा, नजरेला भूळविणारे समुद्रकिनारे, ताडामाडाची बने, आंब्याच्या वनराया... आहाहा.. धरतीवरील स्वर्ग जणू..प्रज्ञा पहिल्यांदाच कोकणाचा हा सुंदर सहवास अनुभवत होती.. मन प्रसन्न झालं होतं.. घरी काहिच सांगितलं नाही याचं जरा ही रिग्रेट वाटत नव्हतं तिला.. किंबहुना सुयशवर असलेला विश्वास मनात कोणत्याच शंकेला थारा लागू देत नव्हता... 

अगदी अकराच्या सुमारास एका छोटेखानी हॉटेलवर नाश्ता करून त्यांनी पुन्हा कोकणचा रस्ता धरला.. अगदी दोनच्या सुमारास ते गावात येऊन पोहचले.. आता मात्र सुयशला भरून आले.. छोटा निलय, त्याच्या बरोबर घालवलेले ते सोनेरी क्षण डोळ्यासमोर नाचू लागले.. त्याच्या मामाच्या घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या निलयच्या घरचा रस्ता त्याने आठवणींचा आसरा घेऊन पार केलं.. लहानपणी जसं होतं तसचं होतं ते घर... फक्त एक बोलका वाडा आज मात्र ओसाड वाटत होता.. ज्या अंगणात त्याचं बालपण गेलं तेच अंगण आज हिरमुसलं होतं... जड पावलाने त्याने घरात प्रवेश केला.. घराच्या दर्शनी भागात मध्यावर निलयचा लहानपणीचा फोटो लावला होता.. टेबलावर हारफुलांनी सजवलेला त्याचा फोटो पाहून सुयशला पुन्हा त्या भयानक आठवणीने घेरले.. आजच्याच दिवशी समुद्राने निलयचा प्राण घेतला होता आणि सुयशला जीवनदान मिळाले होते.. आज निलयचं वर्षश्राद्ध होतं...

साश्रू नयनांनी सुयश चालत त्याच्या फोटोकडे निघाला.. नयनांतील अश्रूंमुळे आणि मनातील आठवणींमुळे त्याचे पाय अडखळत होते.. जीवाला जीव देणारा त्याचा मात्र त्याच्या जीवाला आयुष्यभराचा घोर लावून निघून गेला होता.. त्याच्या अडखळणाऱ्या पावलांना आपल्या हातांचा आधार देत प्रज्ञाने त्याला सावरलं.. तोच निलयच्या आईची नजर सुयशवर पडली.. जागेवरून उठत ती सुयशच्या दिशेने धावली..

" माझा निलय ... माझा निलय परत आला.. कुठे गेला होतास आईला सोडून..? रोज मरत होते रे तुला पाहायला... तुला माझी दया नाही आली का..?" भराभर सुयशच्या चेहर्‍यावर मातृत्वाच्या प्रेमाने मुके घेत निलयची आई म्हणाली..

तोच त्याचे बाबा तिला पकडत म्हणाले,

" सावर वसुधा, हा आपला निलय नाही.. निलय कधीच परत येणार नाही.. तो कधीच परत येणार नाही.."

त्यांच्या शब्दांनी निलयची आई भानावर आली.. अश्रू अनावर झाले आणि उभ्या जागी मटकन खाली बसत रडू लागली.. प्रज्ञाने त्यांना पकडले... त्यांना आसरा दिला..

त्यांची ही अवस्था पाहून सुयशलाही भरून आले.. तो ही त्यांच्याजवळ बसला..

" मावशी, शांत व्हा... स्वत:ला त्रास नका करून घेऊ.. हा सुयश.... निलयचा लहानपणीचा मित्र.." सुयशकडे पाहत प्रज्ञा म्हणाली..

" सुयश...." डोळे पुसत त्या म्हणाल्या.. त्यांच्या चेहर्‍यावर बारीकसं स्मितहास्य उमटलं.. त्यांनी सुयशला जवळ घेतले..त्याची द्रिष्ट काढत बोटे आपल्या चेहर्‍यावर मोडली.. त्याच्या डोक्यावर हात ठेवत त्या म्हणाल्या,

" आहो.. ऐकलत का आपला सुयश आहे हा... माझा दुसरा मुलगा.. तुम्हां दोघांना लोकं जुळे भाऊ म्हणायचे.. माझा निलयही तुझ्याचसारखा दिसला असता..."

निलयचे वडिलही जवळ सरकले.. सुयशच्या डोक्यावर हात ठेवत त्यानी डोळ्यांतले पाणी टिपले..

" आई बाबा... मला तुमचा निलयचा समजा... मला माफ करा.. मी इथे यायला खूप उशीर केला.. माझा मित्र गेला आणि आयुष्याच्या पुस्तकातून हे आवडीचं पान मी कायमचं फाडून टाकलं..आठवणी मात्र तशाच दरवळत होत्या.. पण पुन्हा इकडे यायची हिंमत झाली नाही.. वेळ माझ्या जखमेवर औषध ठरली पण तुमच्या जखमेचं काय..? निलय एकुलता एक.. त्यानंतर तुमचं सर्वात जास्त प्रेम माझ्यावर होतं याचाही विसर पडला.. निलय पश्चात मी माझ्या कर्तव्याकडे पाठ फिरवली.. मी माझ्या सख्या मित्राच्या आईवडिलांना पुन्हा एकदा पोरकं केलं... माफ करा मला.. पण आता नाही.. आतापासून हा तुमचा मुलगा तुम्हांला कधीच अंतर देणार नाही... तुम्ही माझ्याबरोबर चला.." निलयच्या आईच्या मांडीवर विसावत सुयश म्हणाला..

सुयशच्या डोक्यावरून हात फिरवितांना त्या अभागी माऊलीच्या मातृत्वाला समाधान मिळत होते.. डोळ्यातील अश्रू भराभरा त्याच्या केसांवर ओघळत होते आनंदाश्रू बनून..

" सुयश, तु आमचा निलयच आहेस.. ज्या दिवशी तो गेला आज त्याच दिवशी तुझ्यारूपात पुन्हा मिळाला.. आईची शुधा भागवलीस आज आणि या बापाला लेकाचा आधार दिलास.. निलय गेल्यानंतर सगळच थांबलं.. आम्ही जिवंत होतो पण जगत मात्र नव्हतो.. कोणताच दिवस त्याच्या आठवणींशिवाय गेला नसेल.. प्रत्येक आठवण आमच्या निर्धाराला ढासळून टाकायची.. वाटायचं मरावं, संपवावं स्वत: ला पण हिंमत होत नव्हती.. वर्षभर निलयची आई तर भ्रमिष्टासारखी वागायची.. खूप प्रयत्नांनी ती पूर्वीसारखी झाली.. पूर्वी प्रत्येक दिवस सणासारखा वाटायचा या वाड्यात पण निलय गेल्यानंतर कोणताच सण वाट्याला आला नाही या वाड्याच्या.. पण बाळा आज तु आलास आमच्या मनाला नवी उभारी देत.. जगण्याला बळ देत.. थकलेल्या या कुडीत नवसंजीवनी ओतत... तु आमच्यासोबत आहेस यापेक्षा मोठं सुख कोणतं... पण बाळा या वाड्याला, निलयच्या आठवणींना, त्याच्या बालपणाला सोडून नाही यायचे रे आम्हांला.. तु मात्र आठवणीत येत जा आम्हांला भेटायला.. आमचा निलय बनून..." निलयचे बाबा म्हणाले..

" पण तुम्ही माझ्यासोबत..." सुयश बोलत होताच की प्रज्ञाने त्याला अडवले..

" नक्की काका... सुयश तुम्हांला कधीच एकटं सोडणार नाही.. तुम्हांला भेटायला तो नक्की येईल.." निलयच्या आईचे डोळे पुसत प्रज्ञा म्हणाली..

" हो आई बाबा.. जेव्हा आणि जस जमेल मी येईन तुम्हांला भेटायला माझा शब्द आहे.." म्हणत त्यानेही बाबांचे डोळे पुसले..

निलयच्या आईवडिलांच्या चेहर्‍यावर समाधान फुलला.. त्याला कुरवाळित दोघांनी त्याला डोळ्यांत साठवले.. भरल्या नजरेने त्याने निलयच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं..

" आई, तुझ्या या लेकाला खूप भूख लागली आहे गं..?" पोटाकडे हात करत सुयश म्हणाला..

आज क्रित्येक वर्षांनी आई या शब्दांने त्यांचे पोट भरले होते.. या लेकाला कुठे ठेवू न कुठे नको असे काहीसे झाले त्या आईला.. अश्रू पुसून त्यांनी पदर खोचला.. आज नैवेद्यासाठी निलयच्या आवडीचे पदार्थ बनविले होते.. त्यांनी पटापट दोन ताटं केली.. फ्रेश होऊन प्रज्ञा आणि सुयश दोघेही जेवायला बसले.. प्रज्ञाने चोर नजरेने सुयशला खुणावले.. सुयशलाही खुणेचा अर्थ लागला..

" आई, लहानपणी जशी भरवायचीस तसं भरव ना.." लडिवाळपणे सुयश म्हणाला.

त्याच्या या शब्दानी निलयच्या आईला आवंढा आला.. पण क्षणात तो आवंढा गिळत त्यांनी ताट जवळ घेतलं.. सुयश ला घास भरविला.. क्षणाचा विलंब न करता त्यानेही घास उचलत तो त्यांना भरवला.. आता मात्र अश्रू अनावर झाले. घराला आज नव्याने जीव आला होता तो पाहून निलयच्या बाबांच्या डोळ्यांतूनही आनंदाश्रू ओघळले... आनंदाची देवाणघेवाण करत त्यांनी जेवण ओटापलं. सुयशला आपल्या मांडीवर निजवत त्यांनी आपल्या मातृत्वाला नव्याने उभारी दिली.. कितीतरी वेळ त्या दोघांच्या सोबत घालवत तो ही समाधानी होत होता..

संध्याकाळचे चार वाजले असतील.. पुन्हा परतीच्या प्रवासाला चार पाच तास लागणार होते त्यामुळे सुयश ने निघायची तयारी दाखवली... निलयच्या आईचा चेहरा एकदम पडला.. 

" सुयश आजच्या दिवस इथेच थांबून घे उद्या जा.. पोहचायला उशीरही होईल रात्री..." केविलवाण्या स्वरात निलयची आई म्हणाली.

"आई मी एकटा असतो तर थांबलो असतो पण प्रज्ञा सोबत आहे.. तिच्या घरच्यांना इकडे आल्याचे माहित नाही ते काळजी करतील.." उत्तर देत सुयश म्हणाला..

तसा त्यांचा मोर्चा प्रज्ञाकडे वळला.. प्रज्ञाचा हात हातात घेत त्या म्हणाल्या,

" प्रज्ञा, तु खूप गुणी मुलगी आहेस.. आज मला फक्त मुलगाच नाही तर एक मुलगी सुद्धा मिळाली आहे.... एका आईसाठी नाही का गं थांबणार.. आज क्रित्येक वर्षांनी एक आई आनंदी आहे तिच्यासाठी नाही का थांबणार..?"

" पण मावशी.. मी घरी सांगितलं नाही हो... घरचे काळजी करतील.. आणि आयत्या वेळी जर त्यांना कळलं मी इकडे आहे त्यांना वाईट वाटेल.." तिने उत्तर दिले..

" बेटा मी फोन करते तुझ्या आईला त्या हो म्हणाल्या तर थांबशील ना.." मार्ग सुचवत त्या म्हणाल्या..

त्यांच्या डोळ्यांतली अगतिकता पाहून तिला नाही म्हणण्याची हिंमत झाली नाही..

लागलिच त्यांनी प्रज्ञाच्या आईला फोन केला.. ठिकाणाची माहिती न देता तिथे थांबण्याची परवानगी मागितली.. मैत्रिणीच्या आई म्हणून फोन केलेला त्यांचा हट्ट प्रज्ञाच्या आईला मोडता आला नाही त्यांनीही परवानगी दिली..

किती आभाळभर आनंद झाला निलयच्या आईला..

" सुयश, प्रज्ञाला गाव नाही का दाखवणार..? जा तिला तुमच्या लहानपणीच्या आठवणींचा ठेवा दाखव.." निलयचे बाबा म्हणाले..

" वा! मला बघायला आवडेल.." प्रज्ञाही उत्साहाने म्हणाली.

" पण मलाच नाही जायचे.. गोड आठवणीही नको वाटतात.. इथल्या प्रत्येक कणाकणात निलय आहे.. त्याच्याशिवाय या आठवणीही निरर्थक आहेत.." सुयश म्हणाला.

" सुयश, आता तुच म्हणालास ना आठवणींच्या रुपात जिवंत ठेवायचे आहे निलयला.. मग त्या आठवणींपासून दूर नको पळूस.. मी तुझ्यासाठी इथे आले मग तु एवढंही करू शकत नाहीस माझ्यासाठी..?" प्रज्ञा म्हणाली..

" जा रे बाळा, तिचा हट्ट नको मोडूस.." निलयची आईही म्हणाली.

शेवटी सगळ्यांच्या हट्टापुढे सुयशने हार मानली आणि ते आठवणींचा मागोवा घ्यायला निघाले..

क्रमश:

*******************************************

लिखाणात चुका आढळल्यास क्षमस्व..

🎭 Series Post

View all