रंग माळियेला...( भाग १२ वा)

Love story of Pradnya and Suyash.. Exploring new horizon of love beyond the colour..

रंग माळियेला....( भाग १२ वा)

@ आर्या पाटील

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.

*******************************************

सुयशचा फोन ठेवला आणि प्रज्ञाही देवघराकडे वळली..

स्वत: च्या रूमपासून देवघराचं अंतर गोड संभाषणाची मनात पुन्हा उजळणी करतच पार झालं.. त्यामुळे देवपूजा करून रुममध्ये गेलेली आजीही तिला दिसली नाही.. 

प्रज्ञाची कळी चांगलीच खुलली होती.. विचारांच्या तंद्रीतच ती देवघरात पोहचली.. देव्हारा समईतील सांजवातीने चांगलाच उजळला होता.. अगरबत्तीचा मंदधुंद सुंगध वातावरण प्रसन्न करत होता. त्या सांजवातीप्रमाणे तिच्या चेहर्‍यावरील लालीही तिच्याच मनाला प्रकाशित करत होती. सुयशच्या मैत्रीचा मोहक सुगंध तिच्या मनाला प्रसन्न करत होता.. आपसुकच हात जोडले गेले... सुयशचं आपुल्या आयुष्यात असणं यासाठी तिने देवाचे आभार मानले.. अखंडित मैत्रीचं वरदान मागायलाही ती विसरली नाही.

देवघरातून काढता पाय घेत तिने आजीची रूम गाठली..

एव्हाना आजी सुयशने दिलेली भेटवस्तू उघडून त्यातील देवपूजेची प्रत्येक वस्तू प्रेमाने न्हाहाळत बसल्या होत्या..

" आजी आज लवकर आवरली गं देवपूजा.." रुममध्ये प्रवेश करत प्रज्ञा म्हणाली.

" देवपूजा बरोबर वेळेवर झाली पण माझी नात मात्र उशीरा आली.." आपल्या चश्म्यातून प्रज्ञावर कटाक्ष टाकत आजी म्हणाल्या..

" अगं एक महत्त्वाचा फोन होता त्यामुळे उशीर झाला.." नजर चोरत प्रज्ञा म्हणाली.

" ते कळलच कारण माझ्याजवळून गेलीस तरी भानावर नव्हतीस.." आजी म्हणाल्या.

" काहीतरीच आजी तुझं.." आजीच्या गळ्याभोवती हात गुंफत प्रज्ञा म्हणाली..

" अगं खरच मी रुममध्ये आली आणि तु देवघरात गेलीस.. आवाज देणार होते पण तुझी तंद्री नाही तोडाविशी वाटली. आनंद चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता माझ्या चिमणीच्या.. असा आनंदी चेहरा खूप कमी वेळा दृष्टीस पडतो गं.." तिच्या हातांवर हात ठेवत आजी म्हणाल्या.

" काही विशेष नाही.. एका जुन्या मैत्रीची नव्याने सुरवात झाली.. ते जाऊदे कस वाटलं गिफ्ट ?.. तसं कळवावं लागेल.." नकळतपणे ती बोलून गेली..

कदाचित आजीबरोबर असलेल्या मोकळ्या नात्यामुळेच तिला लपवता आलं नसेल.. आजी तिची सगळ्यात जवळची मैत्रीण होती.. तिच्या मनाला समजून घेणारी, तिच्या भावना जपणारी... अगदी लहानपणासून ते आजही..

" खूप छान आहेत सगळ्या गोष्टी.. त्याला नक्की कळव.." आजीही मोकळेपणाने बोलली.

" काय ?" अचंबित स्वरात प्रज्ञा म्हणाली.

" अगं हो.. काय नाव त्याचं सुयश ना... त्याला म्हणावं भेटवस्तू चांगल्या आहेत... आणि त्याने पाठवलेली चिठ्ठीही.." बॉक्समधील चिठ्ठी दाखवत आजी म्हणाल्या.

" काय चिठ्ठी? सुयशची ?.. कोणासाठी ? तो बरा आहे ना.." प्रश्नार्थक स्वरात म्हणत तिने चिठ्ठी हातात घेतली.

" चिठ्ठी माझ्यासाठीच आहे.. मला आमिष देत तुझी मैत्री कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे बहाद्दराचा... त्याच्या बहादुरीला दाद द्यावी लागेल.." आजी म्हणाल्या..

प्रज्ञाने हातातली चिठ्ठी उघडली आणि वाचून काढली.

हाय आजी,

मी सुयश... तुमच्या भांडखोर नातीचा नवा मित्र... म्हणजे खूप परिश्रम घ्यावे लागले ही मैत्रिण मिळविण्यासाठी.. पण प्रज्ञा म्हणजे लाखमोलाची असामी आहे.. रंगाने भलेही डावी असेल पण रुपवान मनाने उजवी आहे.. तुमच्याबरोबर तिचं असलेलं मैत्रीचं नातं लक्षात घेता तुम्ही तिच्या या मित्रालाही समजून घ्याल म्हणून हा प्रयत्न.. तिला आमची मैत्री मान्य आहे पण तिचं अखंडित असणं मान्य नाही.. अशी चांगली मैत्रिण गमावणं म्हणजे आयुष्यातील अनमोल क्षण गमावण्या सारखं आहे.. आजी प्लिज या मित्रासाठी तुमच्या मैत्रिणीची समजूत काढा.. तिची मैत्री खरच मनापासून हवी आहे मला..

या वेगळ्या आणि वेड्या धाडसाबद्दल क्षमस्व...

                                              सुयश.

" हा काय वेडा आहे का ?.. चिठ्ठी आणि तिही आजीला.." डोक्याला हात लावत प्रज्ञा म्हणाली.

" प्रज्ञा, सुयश चांगला मुलगा वाटला.. आणि एवढ्या कमी वेळात तुझ्याबरोबर मैत्री.. म्हणजे तु आपल्या विषयी एवढ्या मोकळेपणाने बोललीस म्हणजे तुमची चांगली मैत्री नक्कीच झाली असणार... आणि मला खात्री आहे तु योग्य तेच करणार... एरवी मैत्री म्हणजे तुझा सगळ्यात आपुलकीचा विषय.. अजूनही आठवते लहान असतांना जेव्हा तुला कोणीच मित्र मैत्रिण नव्हते केवढी रडायचीस तु.. मग आता काय झाले ?.. सुयश बरोबरची मैत्री का नाही जपायची?..." तिच्या डोक्यावर हात फिरवीत आजी म्हणाल्या.

" नाही गं आजी...मला जपायची आहे ही मैत्री... सुयश खूप चांगला मित्र आहे.. किंबहुना खूप चांगला माणूस आहे... स्मार्ट आहे पण निरागस, कर्तृत्वाने मोठा आहे पण मनाने बालिश, दुसऱ्यांच मन जपणारा आहे पण तेवढाच हळवाही.. चेहर्‍यावर धीटाई नेहमीच सजलेली पण पाण्याला घाबरणारं भित्र मन असलेला.. खूप गोड आहे गं तो.. त्याच्याबरोबर वेळ कसा गेला कळलाच नाही... त्याचा बालिशपणा मनाला भलताच आवडला.. त्याच्याबरोबर मैत्री करावी लागली नाही ती आपसुकच झाली... एवढे दिवस एकत्र होतो पण त्याने आमच्या मैत्रीचं पावित्र्य नेहमीच जपलं... खूप सुंदर आहे तो... तुझ्याभाषेत सांगायचे झाले तर एखाद्या हिरोसारखा.. त्याचा हसरा चेहरा मनाला भुरळ घालतो.. त्याचे बोलके डोळे माझ्यासारख्या मितभाषीकालाही बोलकं करतात.. अगं ते सोड त्याच्या गालावर पडणारी खळी... समुद्राला येणाऱ्या भरतीसारखी वाटते गं..

फक्त भीती वाटते त्याच्या चेहऱ्याच्या आणि मनाच्या सौंदर्याची सवय झाली तर... त्याच्या मैत्रीची सवय झाली तर..

हो भीती वाटते रंग आणि रुपाच्या परिमाणात आमची मैत्री मोजली गेली तर..

दुर राहून मैत्री जपलेली चालेल गं पण या अश्या कारणाने तुटलेली मैत्री आयुष्यभराची कटु आठवण देऊन जाईल." आजीच्या मांडीवर डोके ठेवत प्रज्ञा मोकळी झाली.

" ये वेडाबाई... मैत्री कोणत्याच परिमाणात मोजता येत नाही.. आणि आपली मैत्री मोजण्याचा हक्क आपण कुणाला का द्यावा ? तुला खात्री आहे ना सुयश एक चांगला मित्र,चांगला माणूस आहे मग बिनधास्त मैत्री जप.. मी तुझ्या सोबत आहे.. मैत्रीचा आनंद तुला जगण्याच्या खडतर प्रवासात किती मार्गदर्शक ठरला हे माझ्याशिवाय अजून कोणाला चांगलं माहित.. आणि एका चांगल्या मैत्रिणीची सुयशलाही गरज आहे.." तिच्या डोक्यावरून हात फिरवीत आजी म्हणाल्या..

" थँक यु आजी... यु आर माय बेस्ट फ्रेन्ड.." प्रज्ञा म्हणाली.

तोच " प्रज्ञा जेवायला ये पाहू.. आजीला पण सांग.." तिच्या आईने आवाज दिला.तसा देवपूजेच्या भांड्यांचा पसारा आणि मनात मांडलेल्या भावनांचा पसारा आवरत दोघींनीही रूममधून काढता पाय घेतला..

आजीच्या शब्दांनी तिला बळ दिले होते..

मैत्रीची सारी बंधने पाळत आणि जबाबदाऱ्या स्विकारत ती ही तयार झाली सुयशच्या मैत्रीत रमायला..

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दोघांनीही ऑफिस गाठलं...

मैत्री एका बाजूला आणि आपलं काम एकाबाजूला.. सुयशही आपल्या कामाप्रती निष्ठावान होता.. आणि उगाचच फोन करून त्याला आपली मैत्रीही गमावायची नव्हती.. प्रज्ञा जेवढी चांगली होती तेवढीच रोखठोक.. न पटणाऱ्या गोष्टी ती कधीच मान्य करत नव्हती.. तिला चांगलं ओळखणाऱ्या सुयशने ऑफिसमध्ये असतांना तिला अजिबात कॉल केला नाही.. मात्र लंच टाइममध्ये भेटीचा रिमाइंडर म्हणून कॅफेचा पत्ता आणि टाइम असलेला मॅसेज तिला सेन्ड केला..

तिनेही लंचटाईममध्ये तो रिसिव्ह केला.. "सॉरी मी नाही येऊ शकत.." हा रिप्लाय देत.

" मी वाट पाहेन.. यायचं की नाही तु ठरव." मॅसेज सेन्ड करून तो ऑफलाइन गेला.

प्रज्ञाचं मन मात्र तात्काळ ऑनलाइन झालं... जायचं की नाही जायचं या संभाषणात..

पाच वाजले आणि ती ऑफिसमधून निघाली.. रेल्वेस्टेशनला पोहचायला तिने ऑटो घेतली.. फ्रेशर्स कॅफेही त्याच मार्गात होतं..

" नको भेटायला उगा अजून गुंतायला होईल.." एक मन म्हणत होतं.

" दोन दिवसांपासून त्याला पाहिलं नाहीस.. एकदा घे भेटून.." दुसऱ्या मनाने कौल दिला.

फ्रेशर्स कॅफेचा बोर्ड दिसताच तिने रिक्षा थांबवायला सांगितली..

पाच मिनिटे रिक्षावाल्याने हुज्जतीत घालवले पण तिला कुठे पर्वा होती..

मनाची घालमेल आवरत ती कॅफेत पोहचली.. समोरच्या टेबलवर सुयश तिची वाट पाहत बसला होता.. व्हाइट कलरच्या कॅज्युअल शर्टमध्ये तो अजूनच देखणा दिसत होता..गालावर येणारी मोकळ्या केसांची बट मागे सारत.. लांब श्वास घेत ती त्याच्या दिशेने निघाली..

मित्रच होता ना तो फक्त मग जीवाची अशी घालमेल का ? श्वासांची अनियंत्रित गती का ? आणि हृदयाचं उगा जास्तीचं धडधडणं का ?.. फक्त मैत्री होती की मैत्रीच्या पलिकडल्या नात्याची नांदी होती ती ?...

तोच दारावरती खिळलेल्या त्याच्या नजरेनेही तिचा वेध घेतला.. जाग्यावरून उठून तो प्रज्ञापाशी पोहचला..

"मला माहित होते तु नक्की येणार.." तिचा हात हातात घेत तो म्हणाला..

तसा तिने हात मागे खेचला.

"सुयश.. आपण कॅफेमध्ये आहोत.. बसुया का ? मग बोलुयात.." आजूबाजूला पाहत ती म्हणाली.

" अॅम सॉरी... ये ना बसु यात की.." आपल्या टेबलाकडे वळत तो म्हणाला.

तिची चेअर सरकवणार तोच ति म्हणाली,

" सुयश,वी आर फ्रेन्ड्स.. सो ही फॉरमॅलिटी नको.. गोव्यात असतांना जसे भेटायचे तसे भेटणार असशील तर थांबते.. नाहीतर मी निघते.." ती म्हणाली.

हा दम फक्त सुयशला नव्हता स्वत: च्या मनालाही होता.

" ये बाई बस.. कोणतीच फॉरमॅलिटी अजिबात करत नाही.. बट थँक यु सो मच गं... बैचेन झालो होतो दोन दिवस. फक्त नंबरच तर मागितला होता पण तो ही दिलास नाही.. हो बाबा तु खूप व्हिआयपी आहेस पण आमच्यासारख्या बिच्चाऱ्या मित्रांनाही राहू द्या की आयुष्यात..एखाद्या अडगळीच्या कोपऱ्यात पडून.." आपल्या नेहमीच्या शैलीत तो म्हणाला.

" भेटला बाई एकदाचा माझा हरवलेला मित्र.. नक्कीच या मित्राला आता नाही जाऊ देणार.. खरच सुयश या दोन दिवसांत मी ही खूप मिस केली आपली मैत्री.. मग काय सगळे तर्क वितर्क बाजूला सारत मैत्रीला प्राधान्य दिले.. एका चांगल्या मित्राची प्रत्येकालाच गरज असते मग मी त्याला अपवाद कशी असेन.... ती म्हणाली.

" मग पुन्हा असं वागू नकोस.. कशाला नको ते तर्क आणि वितर्क..त्यापेक्षा सापेक्ष मैत्री जपूया की... ही खूप चांगली मैत्रीण कायमची हवी आहे मला.." तो आश्वासकपणे म्हणाला.

" बघ हा मधेच साथ सोडून देशील..." प्रश्न उपस्थित करत ती म्हणाली.

" शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यातली मैत्री अशीच जपेन. शब्द आहे माझा.. फक्त तु सोबत रहा.." तिच्या नजरेला नजर देत तो म्हणाला..

त्याची ती नजर तिला पुन्हा एकदा मैत्रीच्या पलिकडच्या नात्याची अनुभूती देऊन गेली..

" सर ऑर्डर प्लिज.." वेटरच्या बोलण्याने दोघेही भानावर आले.. कॉफीची ऑर्डर पुन्हा गप्पांमध्ये रंगले.. नेहमीसारखीच आजही त्यांच्या भेटीला गप्पांची भरती आली... अगदी संध्याकाळचे सात वाजले तरीही ते बोलतच होते... तोच प्रज्ञाचा फोन वाजला..

फोनच्या आवाजाने ती भानावर आली.. बाबांचा फोन होता.

" हॅलो बाबा पोहचते थोड्या वेळात.. आज उशीर होईल पोहचायला.." गोंधळलेल्या स्वरात ती म्हणाली.

" ठिक आहे... ये सावकाश." म्हणत त्यांनीही फोन ठेवला.

" सुयश, चल मला निघावं लागेल.. ट्रेन ही चुकली.. आता पोहचता पोहचता अजून उशीर होईल. बाबांना चैन पडणार नाही मी घरी पोहचेपर्यंत" बॅगेत मोबाईल ठेवत ती म्हणाली.

" खूप जीव आहे बाबांचा तुझ्यावर.." तिच्या धडपडीला एकटक बघत तो म्हणाला.

" हो आणि माझाही.." तीनेही उत्तर दिले.

" ये प्रज्ञा तुझ्या घरापासून अर्धा तासावर राहतो मी.. तुला सोडतो की... तसही ट्रेनने पोहचायला खूप उशीर होईल.. बाबा काळजी करत असतील.. आजीही वाट बघत असेल. बघ बाई तुला काही हरकत नसेल तर नाहीतर मी निघतो." मुद्दामहून विषय काढत तो म्हणाला..

"हो हो कळली तुझी नौंटकी...चल आता वेळेत घरी तरी सोड.. पण फक्त आजच हा.." तो म्हणाली.

" म्हणजे काय रोज कोण झेलेल तुला..? नको रे बाबा मी बरा नि माझी तनहाई बरी ?" नेहमीच्या रंगात येत तो म्हणाला..

बील भरून गाडीचा रस्ता धरला..

" बघ बाई तुच ठरव कुठे बसायचे ते ?" गाडीत बसत तो म्हणाला.

" हो हो कळलं.. चल जरा जास्तच सिरियस झाला आहेस..." फ्रण्टसीट वर बसत ती म्हणाली.

" मग तुझी मैत्री सांभाळायची असेल तर सिरियस व्हावचं लागेल." गाडी सुरु करत तो म्हणाला.

" आणि काय रे... ते पत्र काय होतं ? आणि ते पण आजीला.. दुसऱ्या कोणाला भेटलं असतं तर ?" मघाशी अर्धवट राहिलेला विषय पूर्ण करित ती म्हणाली.

" मग काय करणार ? तु ऐकायलाच तयार नव्हतीस.. मग आजीच काय तो आशेचा किरण वाटली.. दुसऱ्या कोणाला म्हणजे तुझ्या आईबाबांना ना ?.. अगं आपली मैत्री त्यांनाही कळली असती.. तुझ्या घरच्यांनी तुझा मित्र म्हणून मला मान्य केले असते का ?... बाबा रागावले असते का?" प्रश्न उपस्थित करित तो म्हणाला.

" अगदी तसं नाही... बाबा काही एवढ्या अपरिपक्व विचारांचे नाहीत.. पण असं अचानक...ते ही पत्र लिहून.. कदाचित पटलं नसतं... असं कोणी करतं का ?.." ती म्हणाली..

" जे कोणी करत नाही तेच मी करतो.. मी स्पेशल मटेरियल आहे बाबा..." तो म्हणाला..

प्रवासाचा तासाभराचा वेळ पुन्हा एकदा त्याच्या गप्पांमध्ये रंगून गेला..

" बस.. सुयश पुढच्या स्टॉपवर थांबव गाडी.. तिथून पाच मिनिटांवर आहे घर.." आपली बॅग घेत ती म्हणाली.

" कसली द्रुष्ट आहेस गं तु ? बिचारा मित्र सोडायला येतो.. त्याला घरी न्यायची.. चहापाणी विचारण्याची पद्धत असते.." गाडी स्टॉपवर थांबवत तो म्हणाला.

" तुला अशीच द्रुष्ट मैत्रीण हवी होती ना मग भोग आपल्या कर्माची फळं... बरं सावकाश जा.. बाय." गाडीतून उतरत ती म्हणाली.

" हो हो सावकाश जाईन.. पोहचल्यावर तुला मॅसेज करेन. काळजी करू नकोस.. बाय." काचेतून तो म्हणाला.

" तु नाही सुधारणार... चल जा आता." डोळे रोखत ती म्हणाली.

" आधी तु जा.. मग मी निघतो.." तो पुन्हा म्हणाला.

" आता हे काय ?.. खूप हट्टी आहेस तु.. बाय." म्हणत ति निघाली.

ती दृष्टीआड जाईपर्यंत तो तिला पाहत होता.. पुन्हा फिल्मी स्टाईलमध्ये केसांवर हात फिरवित त्याने समोरच्या आरशात न्हाहाळले.. आणि भेटीने भारलेल्या आणि गप्पांनी भरलेल्या मनाने घराचा रस्ता धरला..

क्रमश:

******************************************

लिखाणात चुका आढळल्यास क्षमस्व.

    

🎭 Series Post

View all