Login

रंग बदलत्या नात्यांचे भाग १

माधवीच्या त्यागाची एक अनोखी प्रेमकथा

भाग १

एका वैवाहिक स्त्रीच्या आयुष्यातला दुःखद क्षण... जेव्हा ती स्वतःच नऊ महिने पोटात सांभाळलेल्या पोटच्या गोळ्याला स्वतःपासून दूर करते.. अनाथ आश्रमात देते... कुणासाठी? तर तिच्या प्रेमासाठी...  तीचा त्याग...अन् हिच तर आहे तीची.. माधवीची एक अनोखी प्रेमकथा....



नव्हती मनाने कधीच अनाथ
असली नशिबाने जरी
कित्येक वादळ पेलत होती
एक सोज्वळ अन् गोड परी...

             पूर्वेला सूर्याची लाली पसरली होती. त्याची सोनेरी, पिवळी किरणे जणू तिलाच शोधत तिच्या चेहऱ्यावर येवुन पडली. तशी तिने हलकेच कूस बदलली. चिमण्यांचा चिवचिवाट जणू तिला उठण्यासाठी आर्जव करत होता. एक थंडगार वाऱ्याची झुळूक तिच्या गालाला स्पर्शून गेली. तस तिने डोळे किलकीले करुन बघितलं अन् ओठांवर एक गोड स्मितहास्य पसरलं. सकाळचे सहा वाजले होते. ती बेडवरून खाली उतरली अन् पायात चपला सरकवल्या. 

             तन, मन, धन अर्पित...
             तुझ्याच चरणापायी...
             रूप तुझे, स्वप्न तुझे...
            अंतराच्या ठायी ठायी...

अभंगाचे बोल तिच्या कानावर पडले तशी ती धावतच आवाजाच्या दिशेने गेली. त्या सकाळच्या प्रसन्न वातावरणाने तिला पुन्हा एक नविन ऊर्जा दिली. सुंदर नक्षीकाम असणाऱ्या त्या देव्हाऱ्याच्या मधोमध असणाऱ्या श्री कृष्णाची मूर्ती पाहून तिचे डोळे पाणावले. पण पुन्हा भावनांवर ताबा मिळवून तिने कटाक्षाने त्यांना रोखले.

        "आई".... एक नऊ वर्षाची गोड मुलगी तिच्याकडे धावतच आली तस दोन्ही हात पसरून तिने त्या मुलीला मिठीत घेतली.

           "अग मधू उठलीस? झोपायच ना अजून थोडावेळ. तसही आज सुट्टीच आहे." पूजा आटोपून गंगू मावशी आता किचन कडे निघाल्या होत्या तोच त्यांना मधू दिसली.

         "मावशी तुमचा आवाज किती गोड आहे हो. बस् ऐकत रहावा वाटतो. मग मी कस मिस करेन त्याला." मधूच्या बोलण्यावर गंगू मावशी खुदकन हसली.

        "आई, तुझ्याशी कट्टी." मनू लटक्या रागात गाल फुगवून बोलली अन् दोघीही हसायला लागल्या.

       "मधू... अग ही कधीची उठली आहे. नुसती मधेमधे लुडबुड करत असते. अन् राग तर बघ नुसता नाकावरच आहे अगदी बा..." गंगू . मावशी पुढे काही बोलणार तोच घाबरून मधूने त्यांच्याकडे पाहिलं अन् डोळ्यांनीच गप्प राहण्याचा इशारा केला. तस मावशींनी ओळखल अन् त्या पट्कन किचन मध्ये निघून गेल्या.

             "ओले, ओले माझे पिल्लू. खूप लागावल आहे का?" मधू दोन्ही गुढग्यावर तिच्या समोर बसून तिचे गोबरे गाल खेचते.

            "आई, परवा माझी बर्थडे पार्टी आहे सो मला तुझ्याकडुन गिफ्ट हवं आहे." मनू तिच्या गळ्यात हात टाकत बोलते.

        "बोल बाळा, काय हवं आहे तुला गिफ्ट. तू जे मागशील ते हाजिर." मधू अगदी आनंदाने म्हणाली.

        "बघ हा आई." मनू.
"हा, हा बोलिये जनाब" मधू.

"आई, माझ्या बर्थ डे ला माझे बाबा भेटतील?" मनू बोलली अन् मधू ने चमकून तिच्याकडे पाहिलं.

        "बाळा, हे काय बोलतेय तू"? मधूचे डोळे पाण्याने भरले होते. जणू काळजावर कित्येक वार झाले होते.

     "आई, किती दिवस तू मला प्रॉमिस करतेय की बाबा नक्की येतील पण अजून बाबा आले नाहीत." आता मात्र मधूच्या डोळ्यातलं पाणी ओसंडून वाहत होत.

         "बाळा, बाबा येतील नक्कीच एक दिवस पण कधी येतील माहित नाही. प्लीज मम्मा वर विश्वास ठेव" खर तर तिला कळत होत की आपण जाणून बुजून तिला खोटं आश्र्वासित करतोय पण यापुढे ती काहीच करु शकत नव्हती.

          "मनू, आई रडलेली तुला आवडत का?" गंगा मावाशी बाहेर येत विचारतात.

       "नाही आजी, मला माझी आई नेहमी आनंदी हवी आहे. माय मम्मा इज बेस्ट इन द वर्ल्ड" तस मधू तिला मिठीत घेते.
   
          "बस आता रडणं गाणं, चला फ्रेश व्हा दोघी आज मस्त फिरायला जाऊ बाहेर." गंगा मावशी बोलली आणि मनू ची कळी आनंदाने खुलली.

            माधवी चव्हाण... पेशाने डॉक्टर अन् तिथल्या लोकांसाठी देव माणूस होती. दिल्लीतील एका साध्या चाळीत ती, मनू अन् मावशी राहायच्या.कष्टाळू, स्वाभिमानी आणि एकनिष्ठ असणारी माधवी आता तीशी पार करत होती. गंगू आजी अन् तिची मुलगी मनू या दोघीच आता तिचं सर्वस्व होत्या. लहानपणीच आई देवाघरी गेली अन् पोलिस असणाऱ्या बाबांनी तिला लहानच मोठं केलं. पण एका मिशन मद्ये त्यांनाही जीव गमवावा लागला. तेंव्हा माधवी मेडिकल कॉलेजच शिक्षण घेत होती. परिस्थितीपुढे हतबल झालेल्या माधवीला गंगा मावशीने तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे जपल.

             जगासमोर स्वतःच दुःख विसरून जायची पण एकांतात माञ तीळतीळ तुटतं होती. तब्बल दहा वर्षे झाली ती त्याच्याविना जगत होती. फक्त मनू साठी. जणू शरीरातून प्राण निघून जावा तशीच तिची अवस्था झाली होती. पण केवळ तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहचली म्हणून ती त्याच्यापासून दूर झाली. आणि आता तरी तिला ठाम विश्वास होता की तो परत कधीच तिच्याकडे येणार नाही. दहा वर्षापूर्वी तिने त्या घरातून बाहेर पाय टाकला होता तेव्हापासून त्याची खबर देखिल तिला नव्हती. ती त्याच्यापासून दूर निघून आली होती. त्याच्या आठवणीतून, त्याच्या घरातून, त्याच्या आयुष्यातून... पण तो मात्र अजूनही तिच्या आठवणीत होता. इतकी वर्ष झाली पण कधीच त्याने तिची विचारपूस केली नाही, कधी शोध घेतला नाही की कधी एखादा फोन केला नाही. अन् याच विचारात, दुःखात ती होरपळून निघत होती.

             सकाळपासून तिचं डोकं जड झालं होतं. राहून राहून मनूचे शब्द तिच्या डोक्यात वार करत होते. आज सुट्टी असूनही तिला थकवा जाणवत होता. मनू अन् मावशी कधीच झोपल्या होत्या पण तिला झोप येत नव्हती. हळूच उठून ती बाल्कनीत येवून बसते. त्या थंडगार वाऱ्याच्या अन् चंद्राच्या शितल प्रकाशात तिच्या मनातल वादळ मात्र थैमान घालत होत. आठवणींची घौडदौड अखंड चालूच होती...

        भाव हृदयातले कुणा कळाले...
         कुणा कळाले शब्द अबोल हे...
           उरी पसारा आठवणींचा...
        का उगाच देई घाव मनाचे...
रंग बदलत्या नात्यांचे....
      रंग बदलत्या नात्यांचे....



        वर्षापूर्वीच तिचं एक परिपूर्ण फॅमिलीच स्वप्न त्या एका क्षणात उद्धवस्त झालं होत. त्याने जाणून बुजून तिची साथ सोडली होती कारण त्याला त्याची जबाबदारी अन् कर्तव्य महत्वाचं वाटतं होत...

फ्लॅशबॅक.....

         
               "मिस्टर अँड मिसेस देशमुख, एक डॉक्टर होण्याच्या नात्याने मला तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगणं गरजेचं आहे. माधवी तुमची बेबी सॅक खूप वीक आहे. तूम्ही गर्भ निर्माण करु शकता पण त्याला नऊ महिने कॅरी करु शकत नाही. त्यामुळे तूम्ही स्वतः बाळाला जन्म देऊ शकत नाही.आणि तुम्हाला जर बाळ हवं असेल तर यावर बरेचसे उपाय आहेत. जसं की सरोगसी, टेस्ट ट्यूब बेबी किंवा तूम्ही एखाद्या लहान बाळाला अडॉप्ट देखिल करु शकता." डॉ. जोशी बाई दोघांनाही बोलत होत्या पण  शंतनुच त्यांच्या बोलण्यावर लक्ष नव्हतच. त्याच्या डोक्यात ' तूम्ही बाळाला जन्म देऊ शकत नाही ' हेच वाक्य घुमत होत. तसाच लटपटत्या पावलांनी उठत तो बाहेर निघून जातो. त्याला तस जाताना पाहून माधवीच्या हृदयावर कितीतरी घाव झाले पण तिने स्वतःला सावरलं कारण तिला आता स्वतःहून जास्त त्याची काळजी वाटतं होती. ती तशीच उठून बाहेर जाऊ लागली पण तिचाही तोल जात होता. अंगात त्राण उरले न्हवते.

          एखाद्या वैवाहिक दाम्पत्याचा जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता असेल तर तो म्हणजे दोघांच्या प्रेमाची निशाणी या जगात घेवुन येणे, स्वतःचा अंश निर्माण करणे आणि साहजिकच माधवी आणि शंतनु दोघेही याला अपवाद नव्हते.

         " शंतनु प्लीज डोन्ट क्राय, आपण यातून काहितरी मार्ग काढू. प्लीज तूम्ही रडू नका. सायन्स किती पुढे गेलय, नक्कीच आपणही आई - बाबा होऊ." मधू शंतनुला धीर देत होती. खरंतर तीही आतून पूर्णपणे तुटली होती. खरंतर आई होण ते आईच प्रेम या सगळ्यांनाच ती पोरकी होती. ती जन्मतःच आई तिला देवाघरी सोडून गेली. त्यामुळं आजपर्यंत तिला कधी आईच प्रेम मिळालंच नाही. आपणही एक परिपूर्ण आई बनू हे तिचं स्वप्न धुळीत मिळालं होत.

            गेले पाच सहा दिवस शंतनु तिच्याशी एकाही शब्दाने बोलला नाही. त्याचा उदास चेहरा बघितला की तिचं काळीज तीळ तीळ तुटायच. तो ड्यूटीवर ऑफिस मध्ये देखील गेला नव्हता. शेवटी माधवीने जड मनाने एक निर्णय घेतला अन् त्याच्याशी बोलायचं ठरवलं...

क्रमशः....

(कोणता निर्णय घेतला असेल माधवीने? जाणून घेण्यासाठी वाचत रहा )