रंग अनोख्या नात्याचे भाग 4

Gosht anokhya lagnachi


"रखमा आई. .. आबा कुठे आहेत?" घाबरलेली जानकी, निपचित पडलेल्या आनंदीकडे पाहत म्हणाली.
"ते मागल्या दरवाज्यानं शेताकडं गेल्यात. मी मोठा आवाज झाला म्हणून धावत आले तर, आनंदीबाई जिन्यावरून खाली पडताना दिसल्या. सावरायला गेले तर काही कळायच्या आतच खाली आल्या, म्हणून तुम्हाला बोलवायला आले जी."

इतक्यात विकासराव डॉक्टरसाहेबांना घेऊन आले. आनंदीला तपासून ते म्हणाले, "तसं काही फारसं काळजीच कारण नाही. कदाचित तोल गेला असेल आणि आपण उंचावरून खाली पडू या भीतीने बेशुद्ध झाल्या आहेत. मुका मार लागल्याने पाय थोडा दुखावल्यासारखा वाटतो. पण मी औषध लिहून देतो, ती वेळेवर द्या त्यांना." असे म्हणत डॉक्टर तिथेच बसून राहिले.

थोडयाच वेळात आनंदीने हळूहळू आपले डोळे उघडले. पुर्णपणे शुद्धीत आल्यावर तिला जाणवलं, 'अंग कमालीचं ठणकतयं आपलं.' होणाऱ्या वेदना तिच्या चेहेऱ्यावर उमटल्या. डॉक्टरांनी पुन्हा एकदा तपासून औषध दिली आणि उद्या येतो म्हणून ते निघून गेले.
तेवढ्यात आईसाहेब आल्याने विकासराव चटकन उठून खोलीबाहेर गेले.

"आनंदी ठीक आहात ना?" आईसाहेब आल्याने आनंदी उठायचा प्रयत्न करू लागली. पण पाठीत कळ असह्य झाल्याने पुन्हा झोपून राहिली. लक्ष्मीबाई आनंदीच्या डोक्यावरून हात फिरवत तिथेच कितीतरी वेळ बसून राहिल्या. तिला झोप लागली तशा बाहेर येऊन त्यांनी रखमाला हाक मारली.
"रखमा, आनंदी पडल्या कशा काय?"
"ते.. आपलं..म्या तर पडताना पाहिलं जी. बाकी काही माहित नाही मला." रखमा मान खाली घालून म्हणाली.

इकडे दादासाहेब आनंदीच्या खोलीत शिरले आणि तिला उठवायचा प्रयत्न करू लागले. आवाजाने जाग्या झालेल्या आनंदीला दादासाहेबांना समोर पाहून भीतीने घाम फुटला. ती कितीतरी मोठ्याने ओरडली.."आई..साहेब."
त्या हाकेसरशी लक्ष्मीबाई गडबडीने धावत आल्या.
"काय करताय हे विशाल? सोडा त्यांना." लक्ष्मी बाईंनी विशालरावांना मोठ्या प्रयत्नांनी बाजूला केलं आणि घाबरून आनंदी त्यांच्या कुशीत शिरली.
"आम्हीच.. ढकललं यांना खाली..आमच्याशी बोलायला तयार नव्हत्या या..मग आमचा राग अनावर झाला आणि आमचा थोडा धक्का बसला..यांना..इतकंच." कुत्सितपणे हसत दादासाहेब म्हणाले आणि जवळच्या खुर्चीचा आधार घेत ते तिथेच बसले. त्यांना धड उभारताही येत नव्हतं.
इतक्यात नुकत्याच आलेल्या यशवंतरावांनी विशालरावांना रागारागाने ओढत बाहेर नेलं आणि गार पाण्याची घागर त्यांच्या डोक्यावर ओतली.
"अजून काय काय पाहायला लावणार आहात तुम्ही विशालराव? ही असली औलाद पोटी असण्यापेक्षा आम्ही निपुत्रिक राहिलो असतो तर फार बरे झाले असते. परत जर आनंदीच्या वाटेला जाल तर याद राखा..आम्ही विसरून जावू तुम्ही आमचे ज्येष्ठ चिरंजीव आहात! आणि या घरातून धक्के मारून, बेइज्जतीने बाहेर काढू तुम्हाला. अरे तुमच्यापेक्षा विकासराव बरे. लहान असून सांभाळून घेतलयं त्यांनी आजवर तुम्हाला. थोडी तरी जाण ठेवा..आणि ही असली थेरं या क्षणापासून बंद व्हायला हवीत. नाहीतर गाठ आमच्याशी आहे."

"ह्या...त्या विकासने आमचं जिणं हराम केलं आहे. बघावं तेव्हा ज्याच्या त्याच्या तोंडी विकासचच नाव. लहान म्हणून त्यांना डोक्यावर बसवलं आहे सर्वांनी. सारं काही त्यांच्या मनासारखं व्हायलाच हवं! आमची आनंदी दुरावली आमच्यापासून त्यांच्याचमुळे. म्हणे आम्ही शुद्धीत नव्हतो. म्हणून काय आमच्या जागी हे उभे राहणार! यांना बघूनच घेतो हे नक्की." जाणाऱ्या आबांकडे पाहत विशाल दात -ओठ खात मनात चरफडत होते.

मध्यरात्री विकासराव आनंदीच्या खोलीत डोकावले. आईसाहेबांच्या जवळ ती शांतपणे झोपली होती. टक लावून तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहताना विकासरावांना कसेतरीच झाले. "दादासाहेबांमुळे यांना काय काय सहन करावं लागणार आहे! पण आता नाही. उद्या सकाळीच दादासाहेबांना सारं काही सांगून टाकू." तर इकडे विकासरावांची पाठ वळताच आनंदीने हळूच आपले डोळे उघडले.

सकाळी प्रतापराव आणि त्यांच्या आई रुक्मिणीबाईंच्या येण्याने वाड्यात एकच धांदल उडाली. कालच्या प्रकारामुळे रात्री जागरण झाल्याने सगळेच उशीरा उठलेले. आवरायच्या  गडबडीत सारे विसरून गेले, प्रतापराव आणि त्यांच्या आई जानकीला न्यायला येणार आहेत म्हणून. त्यांच्या येण्याने वाड्यात गडबड उडाली. लक्ष्मीबाई त्यांच्या सरबराईत गुंतल्या. त्यामुळे आनंदी जवळ बसायला कोणीच नसल्याने रुक्मिणीबाई तिच्या खोलीत गेल्या. आनंदी नुकतीच जागी झाली होती. कालपेक्षा तिला आज खूपच बरं वाटतं होत. रुक्मिणीबाईंना पाहताच ती हळूहळू उठून बसली. रुक्मिणीबाई प्रेमाने तिची विचारपूस करत बराच वेळ तिथे बसून राहिल्या. तर प्रतापरावही आनंदीची चौकशी करून गेले.

काही वेळातच प्रतापरावांची आणि विकासची छान मैत्री झाली. कालच्या प्रकारामुळे तणावपूर्ण बनलेले वातावरण प्रतापरावांच्या उमद्या स्वभावामुळे एकदमच निवळले. दुपारी हसत -खेळत जेवणं पार पडली. तसे प्रतापरावांना जाण्याचे वेध लागले. ते जानकीला गडबड करू लागले. पण माहेरहून जानकीचा पाय निघत नव्हता, ती जड पावलांनी आनंदीचा,साऱ्यांचा निरोप घेऊन जायला निघाली.  
जाताना प्रतापराव विकासरावांना प्रेमभराने मिठी मारत म्हणाले." राव..तुमचे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले हे माहीत आहे आम्हाला. मगाशी सर्वांच्या समोर मुद्दामच आम्ही हा विषय टाळला. पण जाता जाता इतकेच सांगतो, त्या श्रावणीसाठी वहिनींना अंतर देऊ नका. आम्हाला त्याचं योग्य वाटतात तुमच्यासाठी!"

जानकी आपल्या सासरी गेल्याने आनंदी एकटी पडली. 'त्यांना बरं वाटेपर्यंत या विषयावर काहीच बोलायचे नाही' असे ठरवून विकासरावांनी आपल्या व्यवसायात स्वतः ला गुंतवून घेतले. गाईच्या शेणीपासून विविध प्रकारची उत्पादने तयार करण्याचा व्यवसाय त्यांना अजून वाढवायचा होता. दादासाहेबांनी यात लक्ष घातले असते तर अवकळा आलेल्या या व्यवसायाची भरभराट नक्कीच झाली असती. आबा आता वयानुसार तसे थकले. शिवाय व्यवसायाबरोबरच शेतीकडे लक्ष देणे गरजेचे होते. आपसूकच व्यवसायाकडे त्यांचे थोडे दुर्लक्ष झाले. शहरात शिकून, नोकरी करून आलेल्या विकासरावांनी याकडे लक्ष देण्याचे ठरवले.

दोन दिवसांनी अचानक विठू आणि नर्मदा आल्याचे पाहून आनंदीला खूप आनंद झाला. नर्मदेच्या गळ्यात पडून ती स्फुंदत राहिली खूप वेळ. आनंदीची ही अशी अवस्था पाहून नर्मदेला गलबलून आलं.
लक्ष्मीबाईंकडे नर्मदेनं आनंदीला आपल्या घरी, माहेरी नेण्याची परवानगी मागितली. मात्र अजून देवदर्शन, देवीची ओटी भरण व्हायचं होतं. पण रीतीनुसार पाच परतवणीसाठी आनंदीने माहेरी जाणे रास्तच होते. शिवाय विकासरावही कामासाठी शहरात गेले होते आणि आधी आनंदी ची तब्येत सुधारणे महत्वाचे होते. मग आईसाहेबांनी परवानगी दिली आणि आनंदी आपल्या माहेरी आली.

विकासराव आज आनंदीला आपल्या मनातले सारे काही सांगणार होते, म्हणून काम आटोपून ते गडबडीने गावी आले. पण आनंदी माहेरी गेल्याने आपलं गुपित मनातच ठेवण्याशिवाय त्यांना पर्यायच नव्हता.

माहेरी येताच आनंदीला खूप बरे वाटले. आई, आजीकडून लाड करून घेण्यात, मैत्रिणींच्या घोळक्यात तिचे चार दिवस कधी निघून गेले तिचे तिलाच कळले नाही. त्यामुळे तिची तब्येतही आणखी सुधारली. पण राहून राहून तिला विकास रावांची आठवण बेचैन करत होती.

"लक्ष्मीपूजेला आपले 'नाव ' घेणारे, डॉक्टरांचे म्हणणे अस्वस्थ होऊन ऐकणारे, मध्यरात्री खोलीत येऊन डोकावून, आपल्याकडे टक लावून पाहणारे आणि आमच्या मनात दुसरेच कोणीतरी असेल तर?" असे म्हणणारे विकास.. नक्की त्यांच्या मनात काय आहे हे कळतच नाही. गेल्या दोन - तीन दिवसांत त्यांना धड पाहिले देखील नाही. मग बोलणे तर दुरचीच गोष्ट! त्यांना आठवण येत असेल का आपली? की त्यांच्या मनात दुसरीच कोणी... "
विचार करत करत आनंदीला कधी झोप लागली, कळालेच नाही.

इकडे विकासरावांची अवस्थाही वेगळीच झाली होती. आनंदीची आठवण त्यांना अस्वस्थ करत होती. "तिला न्यायला जावे तर आईसाहेब आणि आनंदीच्या माहेरची मंडळी काय म्हणतील? चारच दिवस झाले तोपर्यंत, तर जावई लगेच न्यायला आले आपल्या बायकोला!
छे..किती कानकोंडे होईल आपल्याला. शिवाय आपण आनंदीला आपल्या मनातले सांगितलेच नाही अजून. तिलाही आपली आठवण येत असेल का? काय विचार करत असेल ती आपल्याबाबतीत?" आपल्या विचारातच विकास झोपी गेले.

क्रमशः

🎭 Series Post

View all