रंग अहिंसेचा

अहिंसा एक मानवता धर्म
कथेचे शिर्षक: रंग अहिंसेचा
विषय: अहिंसा एक मानवता धर्म
स्पर्धा: गोष्ट छोटी डोंगराएवढी

"हॅलो अजय कुठे आहेस? अरे तुझ्या चुलत्याने घरात घुसून तुझ्या आई वडिलांना बेदम मारहाण केली आहे. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे. तू त्वरित गावाला निघून ये." प्रसादने पटकन बोलून फोन कट केला.

अजय बॉसला सांगून घरी जाणाऱ्या पहिल्याच बसमध्ये बसला. पाच ते सहा तासांच्या त्या प्रवासात अजयच्या मनात असंख्य चांगले वाईट विचार येऊन गेले होते. गावी गेल्यावर आपल्यासमोर अजून काय वाढून ठेवले असेल? हा विचार करतच अजय गावी पोहोचला. प्रसाद अजयला बस स्टँडवर घ्यायला आला होता. अजय थेट हॉस्पिटलमध्ये गेला. एका बेडवर वडील व दुसऱ्या बेडवर आईला बघून त्याला प्रचंड यातना झाल्या. 

अजयने डॉक्टरकडे जाऊन आई वडिलांच्या तब्येतीची चौकशी केली. प्रसाद व त्याचे दोन तीन मित्र वेटींग एरियात बसलेले होते. अजय त्यांच्यापुढे हात जोडून म्हणाला,

"मित्रांनो मी तुमचा मनापासून आभारी आहे. मी गावात नसताना तुम्ही वेळेत माझ्या आई वडिलांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, म्हणून त्यांचे प्राण वाचले आहेत."

"अरे मित्र म्हणतोस आणि कसले आभार मानतोस. बरं मला एक सांग, आता पुढे काय करणार आहेस? तुझे चुलत्याला जास्त माज चढला आहे, त्याचा मोठा मुलगा पोलिसात असल्याने इथले पोलिस सुद्धा त्यांच्याच बाजूने आहेत. आम्ही तक्रार करायला गेलो होतो, पण त्यांनी तक्रार नोंदवून सुद्धा घेतली नाही. तुमची शेती हडपण्याचा त्यांचा प्लॅन आहे. तू एक आवाज दे, लगेच गावातील मुलं आपल्या सोबत येतील. हवंतर आपण आमदार साहेबांना भेटायला जाऊ. माझी त्यांच्याशी ओळख आहे. आपण त्यांचा माज मोडायला पाहिजे." प्रसादने सांगितले.

अजय शांतपणे म्हणाला,
"प्रसाद यातील मला काहीही करायचं नाहीये. आई बाबांना थोडं बरं वाटलं की, मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. मला लढून काहीही मिळवायचं नाहीये. मी जेवढं कमावतो, तेवढं मला पुरेसे आहे. मारामारी करणे, कोर्ट कचेऱ्या करणे मला पटत नाही."

प्रसाद चिडून म्हणाला,
"तू जर काका काकूंना घेऊन गेलास आणि काहीच केले नाहीतर, सगळे तुला पळपुट्या म्हणतील. आपल्याला फक्त त्यांनी जे केलंय त्याला उत्तर द्यायचं आहे. आपण स्वतःहून काहीच चुकीचं करत नाहीये."

"प्रसाद मला कोण काय म्हणतील? याची अजिबात चिंता नाहीये. माझी मनस्थिती चांगली रहावी, म्हणून मी हे करत आहे. तुला कदाचित आत्ता माझ्या बोलण्याचा अर्थ समजणार नाही, पण काही वर्षांनी नक्कीच समजेल." अजय.

प्रसाद व त्याचे मित्र चिडून निघून गेले. पुढील दोन ते तीन दिवसांनी अजयच्या आई वडिलांची तब्येत थोडी बरी झाल्याने अजय आपल्या आई वडिलांना शहरात घेऊन गेला. आपल्या घराची चावी प्रसादकडे ठेऊन गेला. अजय त्याच्या आई वडिलांना घेऊन गेल्यावर त्याच्या चुलत्याने सगळ्या शेतजमिनीवर ताबा मिळवला. प्रसादने अजयला वेळोवेळी फोन करुन समजावले, पण अजय आपल्या विचारांवर ठाम होता.

अजयचे आई वडील शहरात रुळले होते, त्यांना गावाकडची आठवण यायची, पण अजयने गावाकडे जायला नकार दिल्याने त्यांचा नाईलाज झाला होता. आपल्याला कधी गावाला जाऊन राहता येईल, हा विचारचं त्याच्या आई वडिलांनी मनातून काढून टाकला होता.

दोन वर्षांनी अजय मित्राला भेटण्यासाठी म्हणून हॉस्पिटलमध्ये गेला होता. तो हॉस्पिटल मधून बाहेर पडत असताना कॅश काऊंटर जवळ त्याचे दोन्ही चुलत भाऊ गयावया करत नजरेस पडले. अजय त्यांच्या जवळ जाऊन म्हणाला,

"काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का?"

अजयच्या दोन्ही चुलत भावांनी त्याच्याकडे बघितले. मग त्याचा पोलिस चुलत भाऊ म्हणाला,
"दादांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय, त्यांना हार्ट अटॅक आला होता. रिपोर्टस आल्यावर डॉक्टरांनी इमर्जन्सी ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितली आहे. सर्जरीचे सर्व पैसे ऍडव्हान्स भरायला सांगितले आहे. आम्ही दोघांनी खूप मोठ्या मुश्किलीने पैश्यांची जुळवाजुळव करुन सुद्धा दोन लाख रुपये कमी पडत आहेत. पूर्ण पैसे जमा केल्याशिवाय सर्जरी सुरु होणार नाही. आम्ही ह्यांना कळकळीची विनंती करत आहोत, पण हे लोकं ऐकतचं नाहीये."
 
"मॅडम पैसे ऑनलाईन ट्रान्सफर केले तर चालतील का?" अजयने कॅशिअर मॅडमला विचारले.

मॅडमने मान हलवून होकार दिल्यावर अजयने दोन अकाऊंट वरुन प्रत्येकी एक लाख रुपये ट्रान्सफर केले. अजय त्याच्या भावांकडे आपलं व्हिजिटींग कार्ड देत म्हणाला,
"हा माझा नंबर गुगल पे आणि फोन पे ला आहे. तुमच्याकडे जेव्हा पैसे येतील, तेव्हा ट्रान्सफर करा."

त्याचे भाऊ पुढे काही बोलण्याच्या आतच अजय तेथून निघून गेला. घरी गेल्यावर अजयने कोणालाच काही सांगितले नाही.

साधारणतः एका महिन्यानंतर एके दिवशी अजयचा चुलता व त्याचे दोन्ही चुलत भाऊ अजयच्या घरी आले. अजयने त्यांना घरात घेतले. चहा पाणी देऊन त्यांचे आदरातिथ्य केले.

अजयच्या आई वडिलांसमोर त्याचा चुलता हात जोडून म्हणाला,
"मला माफ करा. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. माझ्यामुळे तुम्हाला गाव सोडून यायला लागलं. मी तुम्हाला एवढी मारहाण केली होती, तरी मी मरणाच्या दारात असताना अजयने मदत केली. मी तुम्हाला दोघांना पुन्हा गावी घेऊन जायला आलो आहे. तुमची शेती तुम्हीचं करा. इथून पुढे मी तुम्हाला त्रास देणार नाही."

अजयच्या आई वडिलांनी अजयकडे बघितले, तेव्हा तो म्हणाला,
"दादा उद्या मी आई बाबांना घेऊन गावी येईल. तसंही आई बाबांना इथं करमत नव्हतचं." 

दुसऱ्या दिवशी अजय आई बाबांना घेऊन गावी गेला. अजयच्या चुलत भावांनी फटाके वाजवून सगळ्यांचे स्वागत केले. संपूर्ण गावासमोर अजयच्या चुलत्याने आपण केलेल्या वाईट कर्मांची कबुली देत माफी मागितली. 

प्रसाद हे सर्व लांबून बघत होता. अजयच्या पाठीवर थाप देत तो म्हणाला,
"मित्रा मानलं तुला. तुझा त्या दिवशी खूप राग आला होता. पण तू जे काही बोलला होतास त्याचा आज अर्थ कळाला."

यावर अजय म्हणाला,
"हे बघ प्रसाद आपणही मारामारी केली असती तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक उरला असता. हिंसा करुन काय मिळतं? काहीच नाही. पण अहिंसेने जग जिंकता येतं. तो वरचा आहे ना, तो आपल्या प्रत्येक कर्माची नोंद ठेवत असतो, तो बरोबर सगळ्यांची वेळ आणतो. त्यावेळी जर मी पोलिस केस केली असती, तर कोर्टाच्या चकरा माराव्या लागल्या असत्या. पैसा खर्च झाला असताच, पण मनस्थिती सुद्धा बिघडली असती."

'हिंसेचा विचार सोडून देणे
अहिंसेचा मार्ग अवलंबणे
अहिंसा एक मानवता धर्म
कायम त्याचे पालन करणे.'

©®Dr Supriya Dighe