रणफंदीची जात आमुची ! पार्ट 6

.
समिधा वाहिल्या जात होत्या. यज्ञाच्या पवित्र अग्नीज्वाला आकाशात उंचच उंच झेप घेऊ लागल्या. होमहवन चालू होते. ब्राह्मण मंत्रजप करत होते.

" पंडितजी , भवानीदेवीची आराधना झाली. आता शिवशंकराचे कोटीलिंगार्चने करायचे मनात आहे. "
मिर्झाराजे जयसिंह पूजा संपल्यावर म्हणाले.

" जशी आज्ञा. " पंडितजी म्हणाले.

" हुकूम , पण हे सर्व का ?" उग्रसेनने विचारले.

" शिवाजीराजे मोठे पुण्यवंत. त्यांचे पुण्यकर्म थोर. त्यांचा नायनाट करायचा असेल तर देवीदेवता प्रसन्न करायला हवेत. अफजलखानाची कथा ऐकली नाही का ? म्हणाला होता देवीला. बताओ तेरी करामत , बताओ तेरी अजमत. पुढे जे झाले तो इतिहास आहे. हे मराठे साधेसुधे बंडखोर नाहीत. शिवाजीराजे यांनी मराठ्यांच्या मनात स्वातंत्र्याची आग भडकवली आहे. काहीतरी दैवी शक्ती त्यांच्या पाठीशी आहे. " मिर्झाराजे म्हणाले.

" लढाई होमहवन करून जिंकली जात नाही मिर्झाराजे. " दिलेरखान तिथे येऊन तिरकस डोळे करत म्हणाला. 

" या दिलेरखान. " मिर्झाराजे जयसिंह उठत म्हणाले.

" औरंगाबादला कधी जायचे आहे ? आम्ही रणनीतीविषयी चर्चा करायला आलो होतो. " दिलेरखान म्हणाला.

" होय. उद्याच मुक्काम हलवू. औरंगाबादला पुढची छावणी पडेल. रणनीतीचे म्हणाल तर आम्ही ठरवले आहे की शिवाजीराजेंचा मुलूख उध्वस्त करायचा. रयत नासवायची. घरे जाळायची. शिवजीराजेंची खरी ताकद त्यांची रयत आहे. रयत रडू लागली की राजे शरण येतील. " मिर्झाराजे म्हणाले.

" मिर्झाजी , सिवा के किले है ही कितने ? चारपाच दिन मैं एक किला जित लेंगे. " दिलेरखान चुटक्या वाजवत म्हणाला.

" शाहिस्तेखानही असाच चुटक्या वाजवत होता. त्याची बोटे कापली गेली. " मिर्झाराजे म्हणाले.

" शाहिस्तेखान अतिशय आळशी आणि सुस्त सेनापती होता. चाकणचा किल्ला सोडला तर त्याची कमाई किती ? पण आपण ना अफजलखानसारखा गर्व करायचा ना शाहिस्तेखानसारखा आळशीपणा. मी तर गडही हेरलेत. कोंढाणा आणि पुरंदर. येतो. " दिलेरखान मुजरा करत म्हणाला.

दिलेरखान जाताच मिर्झाराजे जयसिंह उग्रसेनकडे बघू लागले.

" दिलेरखान शिपाईगिरीत माहीर आहेत. चिवट आहेत. पण राजकारण कमी जाणतात. या मोहिमेत यांना सांभाळणे तारेवरची कसरत असेल आमची. " मिर्झाराजे म्हणाले.

" बरोबर बोललात हुकूम. " उग्रसेन म्हणाला.

" उग्रसेन , आजच सिद्दी , पोर्तुगीज , फिरंगी , कुतुबशाही यांना पत्रे पाठवा. शिवाजीराजेला एकटे पाडायचे आहे. आदिलशाहवर आमचा विश्वास नाही. तो शिवाजीराजेला आतून मदत करू शकतो. विजापूरात आपले गुप्तहेर पेरून ठेवा. " मिर्झाराजे म्हणाले.

" जी हुकूम. " उग्रसेन मुजरा करत म्हणाले.

मिर्झाराजे जयसिंह यांना बुद्धिबळ खेळण्याची प्रचंड आवड होती. चार पावले पुढे जात त्यांनी बुद्धिबळातील राजाचा प्यादा उचलला.

" राजे , आम्ही तुम्हाला रणांगण आणि राजकारण दोन्ही ठिकाणी मात देऊ. " मिर्झाराजे म्हणाले.

***

" येसू , अग किती उशीर. आटप लवकर. " मुरारबाजींनी हाक मारली.

" आले आले. " येसू पदर सावरत आली.

" हातात काय आहे ?" मुरारबाजी म्हणाले.

" चार लाडू आऊसाहेबांसाठी. " येसू म्हणाली.

" अग कश्याला ?" मुरारबाजी म्हणाले.

" कश्याला म्हंजी ? त्यांना आवडतात माझ्या हातचे लाडू. " येसू म्हणाली.

" पुरंदरावर असताना एकदोनदा खाल्लं असेल आणि दोन शब्द कौतुकाचे बोलले असतील म्हणून काय लाडू प्रिय झाले ? त्या स्वराज्याच्या राजमातोश्री. आपल्या गरीबाच्या हातची चव लक्षात राहील व्हय ?" मुरारबाजी म्हणाले.

" तुम्ही द्या तरी. मी तर म्हणते शंभुराजेंसाठीही काहितरी घेऊन जावा. " येसू म्हणाली.

" स्वराज्याच्या युवराजांना आपण चाकर प्राण सोडून कोणतीच भेटवस्तू देऊ शकत नाही. तरीही घेईल एखादी नवीन तलवार. चल जातो मी. " मुरारबाजी म्हणाले.

" जातो नाही येतो म्हणावं. " येसू म्हणाली.

***

मुरारबाजी राजगडावर पोहोचले. सुरुवातीला ते आऊसाहेबांना भेटायला गेले. आठ वर्षाचे शंभुराजे आऊसाहेबांच्या शेजारी बसले होते. मुरारबाजींनी दोघांना मुजरा केला.

" शंभुराजे , हे मुरारबाजी देशपांडे. " आऊसाहेब म्हणाल्या.

" पुरंदरचे किल्लेदार. बरोबर ना ?" शंभुराजे म्हणाले.

" होय शंभुराजे. " आऊसाहेब म्हणाल्या.

" आपण आमच्या मातोश्रीचे मानलेले बंधू म्हणजे आमचे मामासाहेब. " शंभुराजे म्हणाले.

" युवराज , या सामान्य सेवकाला इतकी मोठी पदवी नका देऊ. " मुरारबाजी म्हणाले.

" स्वराज्यात रयत मालक आणि आपण सर्वच तिचे सेवक." आऊसाहेब म्हणाल्या.

" तुम्ही काय लपवत आहात मामासाहेब ?" शंभुराजे म्हणाले.

" होय मुरारबाजी. येसूने नक्कीच काहीतरी दिले असेल. "
आऊसाहेब म्हणाल्या.

" क्षमा असावी. तिने आऊसाहेबांसाठी लाडू पाठवले आहेत. आम्ही शंभुराजेंसाठी तलवार आणली आहे." मुरारबाजी म्हणाले.

मुरारबाजींनी सोबत आणलेल्या भेटवस्तू सुपूर्द केल्या.

" आम्हाला खूप आवडली आहे ही तलवार. ज्या गडावर आमचा जन्म झाला तिथे जाण्याची खूप इच्छा आहे. एकेदिवशी पुरंदरवर नक्की येऊ मामासाहेब. तेव्हा आपणच पूर्ण गड दाखवा आम्हाला. " शंभुराजे म्हणाले.

" जरूर. " मुरारबाजी म्हणाले.

" येसूला सांगा की लाडू नेहमीप्रमाणेच चविष्ट झाले आहेत. इतकी वर्षे झाली तरीही तिच्या हातची चव आमच्या जिभेवर रेंगाळत होती. आज तुम्ही हे लाडू आणून मन तृप्त केले. " आऊसाहेब म्हणाल्या.

" भाग्य या सेवकाचे आऊसाहेब. " मुरारबाजी हात जोडून म्हणाले.

" आता महाराजांना भेटा. जरूरी मसलत आहे. पण जेवण करूनच गडउतार होणे. " आऊसाहेब म्हणाल्या.

" जी आऊसाहेब. " मुरारबाजींनी मुजरा केला.

***

महाराजांनी आदिलशाही , कुतुबशाही आणि पोर्तुगीज यांना पत्रे पाठवली होती. त्याचविषयी मसलत करण्यासाठी पंतप्रधान मोरोपंत पिंगळे महाराजांच्या महालात आले होते.

" बोला मोरोपंत. काय खबर ?" मोरोपंताचा मुजरा स्वीकारत राजेंनी विचारले.

" पोर्तुगीज यांचा कल मुघलांकडे असेल. त्यांनी मैत्रीचा प्रस्ताव धुडकावून लावला. असेही आपले बलाढ्य आरमार त्यांच्या डोळ्यात खुपत आहे महाराज. कुतुबशाही यांची खंडणी औरंगाबादेत जमा होत आहे. म्हणून त्यांनाही मुघलांचे वैर नको. आदिलशाही खिळखिळी झाली आहे. स्वतःहून मुघलांचे वैर घेऊ इच्छित नाहीत ते. " मोरोपंत म्हणाले.

" स्वराज्य संपले की मुघलांची नजर याच शाह्यांवर असेल इतके साधे राजकारण कळत नाही यांना ? दक्खनवर दक्खनी लोकांनीच राज्य करावे ही आमची इच्छा होती. पण आता मिर्झाराजेंसोबत एकटेच झुंजू. " महाराज म्हणाले.

तेवढ्यात एक सेवक आला आणि म्हणाला ,

" महाराज , मुरारबाजी आले आहेत. "

महाराजांनी इशारा करत मुरारबाजींना आत बोलावले. मुरारबाजींनी मुजरा केला.

" मुरारपंत , स्वराज्यावर मोठे संकट कोसळणार आहे. उत्तरेहून मिर्झाराजे आणि दिलेरखान मोठे लष्कर घेऊन येत आहे. आपले स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी. कोंढाण्यावर राजा जसवंतसिंह याची हार झाली होती. म्हणून आम्हाला वाटते की मुघल तिकडे न जाता पुरंदर जिंकण्याचा प्रयत्न करतील. " महाराज म्हणाले.

" करू द्या की महाराज. मी जिवंत असेपर्यंत पुरंदरला धक्काही लागू देणार नाही हा शब्द आहे मुरारबाजीचा. " मुरारबाजी म्हणाले.

" शाब्बास. पुरंदर असा झुंजवा की स्वराज्याच्या प्रवेशद्वारावरच मुघलांचा आत्मविश्वास डळमळीत झाला पाहिजे. " महाराज म्हणाले.

" जी महाराज. तुम्ही पुरंदराची काहीही काळजी करू नका. " मुरारबाजी म्हणाले.

" आपल्यावर विश्वास आहे. उगाचच नाही आम्ही जावळीच्या वाघाला सीमेवरचा किल्ला दिला. आमचे निरीक्षण आहे की रणांगणावर तुम्ही बेभान होऊन लढतात. इकडचे तिकडचे तुम्हाला भान उरत नाही. तसे होऊ न देणे. अखंड सावध असणे. रणावर गाफील नसणे. " महाराज म्हणाले.

" महाराज , मोठ्या भाग्याने स्वराज्यासाठी लढण्याचे आणि प्राण वेचण्याची संधी मिळते. हनुमंताने जैसी लंका जाळली तसा हा मुरारबाजी मुघलांचा आत्मविश्वास मातीस मिळवेल हा शब्द आहे. " मुरारबाजी म्हणाले.

क्रमश..

🎭 Series Post

View all