रणफंदीची जात आमुची ! पार्ट 5

.


जहानआरा बेगम औरंगजेबाची बहीण होती. तीही तितकीच मुरब्बी राजकारणी आणि बुद्धिमान होती.

" राजे जयसिंह ?" तिने विचारले.

" होय. हा राजे जयसिंहच सिवाला पकडेल. " औरंगजेब हसत म्हणाला.

" पण तो तर हिंदू आहे. सिवाचा काही भरवसा नाही. जादूचेटूक करतो म्हणे. " जहानआरा म्हणाली.

" मालूम आहे. पण त्याची निष्ठा आमच्या चरणी आहे. तरीही आम्ही सावधगिरी म्हणून जयसिंहसोबत दिलेरखानाला पाठवणार. आता सह्याद्रीच्या सिंहाची शिकार राजस्थानचा वाघच करेल. " औरंगजेब म्हणाला.

" वाह. आता तो दिवस दूर नाही जेव्हा आलमगीरसमोर तो सिवा कैदी म्हणून उभा असेल. " जहानआरा दात खात म्हणाली.

तिच्या मुखावर तेज आले. आनंदी मुख घेऊन ती परत तिच्या दालनात गेली. तिची आवडती खोजा मुस्कान वाट पाहतच बसली होती.

" सुहान अल्लाह , मुखावर ही रौनक कशी ?" मुस्कानने विचारले.

" त्या सिवाला नामोहरम करण्यासाठी उद्या राजे जयसिंह आणि दिलेरखान रवाना होणार आहेत. " जहानआरा आनंदाने म्हणाली.

" अल्लाह गारद करे उस सिवा को. " खोजा मुस्कान टाळी वाजवत म्हणाली.

" आमीन. " जहानआरा म्हणाली.

संध्याकाळी खोजा मुस्कान चांदणी चौकच्या बाजारात आली. एक चांभार मुस्कानची वाटच बघत होता.

" ए काफिर चांभारा , माझी ही चप्पल शिवून दे. " मुस्कान टाळी वाजवत म्हणाली.

" देतो. तुम्ही तर चांदणी चौकचा नकाशा बनवणाऱ्या हिंदुस्थानच्या पाशाबेगम जहानआरा बेगमच्या आवडीच्या. तुमचे काम आधी करतो. " चांभार म्हणाला.

" तू तर कुठे कमी आहेस ? हे जूते राजपूती वाटत आहेत. राजे जयसिंहचे असावेत तसे. आणि हे जूते पठाणी दस्तुरखुद्द दिलेरखानसारखे वाटत आहेत. " मुस्कान टाळी वाजवत म्हणाली.

" तुम्हाला कस समजले ?" चांभाराने विचारले.

" या मराठी चपलांसमोर हे दोन जुते चालताना दिसले म्हणून ओळखले. येते मी. " मुस्कान टाळी वाजवत निघून गेली.

चांभार समजायचे ते समजला.

◆◆◆

एका राजमहालात मोठे देवघर होते. त्या देवघराच्या मधोमध मोठे शिवलिंग होते.

" ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय "

कुणीतरी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करत जप करत होता. वयोमानानुसार वृद्ध होता. पण शरीरयष्टी बळकट होती. चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. अनुभवामुळे आलेले निराकार भाव मुखावर स्पष्टपणे जाणवत होते. कपाळावर लाल टिळा होता. तो भक्तीत मग्न असतानाच कुणीतरी देवघरात प्रवेश केला.

" हुकूम , दिल्लीहून बादशहाचा पैगाम आहे. उद्या दरबारात हजर व्हावा म्हणताय. " तो हातात खलिता असलेला उग्रसेन म्हणाला.

हे ऐकताच शिवभक्तीत मग्न असलेल्या व्यक्तीने मान हलवली. हा व्यक्ती म्हणजेच आमेरचे राजे जयसिंह. अकबराची पत्नी जोधाबाई हिचा भाऊ भगवानदास यांचा मुलगा आणि हळदीघाटीच्या युद्धात सेनापती असलेले मानसिंग यांचे पंतू. राजा मानसिंग म्हणजे अकबराची प्रिय बायको राणी जोधाबाई ( काही ठिकाणी हिर कुंवर , हलकाबाई असे उल्लेख आहेत ) हिचा भाऊ राजा भगवानदास याचा मुलगा. म्हणजेच राजा मानसिंग राणी जोधाचा पुतण्या. स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर राजा मानसिंग नवरत्नपैकी एक बनले. मुघलांचे सेनापती बनले. हळदीघाटीच्या युद्धात अकबराने राजा मानसिंगला सेनापती म्हणून पाठवले. मानसिंगची बहीण मानबाई हीचा विवाह सलीमसोबत झाला. सलीम उर्फ जहांगीर याची मानबाई ही पहिली बायको.
मानसिंगचा पहिला पुत्र जगतसिंग अल्पावधीतच वारला. त्यामुळे मानसिंगनंतर सलीमने मानसिंगचा पुत्र राजा भाऊसिंग याला गादीवर बसवले. भाऊसिंगला पुत्र नसल्यामुळे जगतसिंगचा नातू राजा जयसिंह हे दहाव्या वर्षी गादीवर बसले. म्हणजे राजे जयसिंह हे मानसिंगचे पंतू ठरतात. श्रीरामाचे पुत्र कुश यांचे वंशज म्हणजे हे कच्छवाह राजपूत. त्यांचा पराक्रम तो काय वर्णावा ? काबुल , कंदाहार , बाल्ख-बदखशानपासून ते हिमाचल , दक्षिणेकडे गोंड इथपर्यंत त्यांची तलवार तळपली होती. दरबारात मोठा मान होता. मुघल घराण्याशी कुळाचार होता. वैवाहिक संबंध होते. आमेरहून राजे जयसिंह दिल्लीकडे निघाले. काय हा दुर्मिळ योगायोग म्हणावा ? महाराणा प्रतापला चिरडण्यासाठी अकबराचा सेनापती म्हणून मानसिंग निघाले आणि महाराणा प्रतापाचा " स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचा " वारसा चालवणारे शिवाजी महाराज यांना संपवण्यासाठी अकबराचे पंतू औरंगजेब याचे सेनापती म्हणून मानसिंगचे पंतू राजे जयसिंह जात होते.

◆◆◆

तिकडे एका लष्करी छावणीत पठाण दिलेरखान एका शिपायाला चाबकाने फटके देत होता.

" पेहरा देण्याचे काम असताना तू झोपत होता ? माझ्या फौजेत आळशीपणा चालत नाही. " दिलेरखान ओरडला.

" हुजूर , बादशहाचा खलिता आलाय. " एक शिपाई म्हणाला.

दिलेरखान याने तो खलिता वाचला आणि आनंदाने नाचू लागला.

" खुशीया अर्श पे होगे
  चर्चे फरश पे होंगे
   एक कर्ज अदा होंगा
   एक फर्ज अदा होंगा
   सितारो में भि चमक होंगी
   चांद भि चमकता होंगा
   कितनी खुशी होंगी जीस वक्त
  काफर सिवा हमारे कब्जे में होंगा ! " दिलेरखान म्हणाला.

◆◆◆

दुसऱ्या दिवशी दिवाण-ए-खासमध्ये मोठा दरबार भरला.

" दख्खनमधला बगावतखोर सिवा याने फक्त मामुजानचीच नाही तर मुघल सल्तनतचीच बोटे कापली. आलमगीरला सिवा हवाय. जिवंत किंवा मृत. हे काम आम्ही राजे जयसिंहवर सोपवत आहोत. " औरंगजेब म्हणाला.

" आम्हाला काहीच हरकत नाही. आलमगीर म्हणतील तेव्हा दक्षिणेकडे कूच करू आणि शिवाजीचा मुलूख उध्वस्त करू. " राजे जयसिंह म्हणाले.

" आम्ही तुम्हाला मोठे लष्कर देऊ. तोफखाना , हत्ती , घोडे , उंट देऊ. सेनापती दिलेरखानही तुमच्यासोबत जातील. " औरंगजेब म्हणाला.

" पण त्यांची काय गरज ?" राजे जयसिंह म्हणाले.

" आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. पण त्या सिवावर नाही. तो घातपात करू शकतो. म्हणून दिलेरखान तुमच्यावर येणारे प्रत्येक घाव अंगावर घेईल. " औरंगजेब म्हणाला.

" राजे जयसिंहच्या फौजेत असणे माझे भाग्य असेल. सिवाचे मुंडके तोडून आणतो. " दिलेरखान म्हणाला.

" आम्ही राजे जयसिंहला मिर्झा हा किताब देतोय. मिर्झा म्हणजे राजपुत्र. " औरंगजेब म्हणाला.

" आम्ही धन्य झालो. " मिर्झाराजे जयसिंह कुर्निसात करत म्हणाले.

दरबार बरखास्त झाला. औरंगजेबाने दिलेरखानाला बोलवून घेतले.

" दिलेर , तू अल्लाहचा बंदा. शिवाजी आणि मिर्झा दोघेही काफर. दोघांचा देव धर्म एक. तू मिर्झावर नजर ठेव. " औरंगजेब म्हणाला.

" जी जहापनाह. " दिलेर म्हणाला.

थोड्या दिवसात फौजा दक्षिणेकडे कूच करत निघाल्या.

क्रमश......

🎭 Series Post

View all