रणफंदीची जात आमुची ! पार्ट 2

.


सकाळचा प्रहर होता. राजे सदरेवर बसले होते. सोबत सरसेनापती माणकोजी आणि सोनोपंतदेखील होते. तेवढ्यात कान्होजी जेधे घाईत दरबारात आले आणि त्यांनी महाराजांना मुजरा केला.

" तातडीने आलात. वर्दी न देता. " महाराजांनी विचारले.

" राजे , अफजलखान जावळीत मोहीम उघडणार आहे. मला पत्र लिहिले. फौजेनिशी सामील व्हा म्हणतोय. " कान्होजी म्हणाले.

" कान्होजी काका , बिकट स्थिती आहे. शांत चित्त ठेवणे. त्या खानाला उत्तर पाठवा की तुम्ही जावळीत या मग आम्ही सामील होते. कर्नाटकात काही हिंदू राजे बंडखोरी करत आहेत. आदिलशाहची तब्येत खंगत चालली आहे. आमचा अंदाज आहे की बडी बेगम खानास परत बोलावून घेईल. " महाराज म्हणाले.

" जी. जसे तुम्ही म्हणताय तसेच करतो. " कान्होजी म्हणाले.

महाराजांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरला. अफजलखान कर्नाटक मोहिमेवर गेला आणि जावळी वाचली. चंद्रराव मोरे जावळीचा कारभार पाहू लागला.

रात्र झाली होती. चंद्ररावांनी मसलत करण्यासाठी काही खास लोकांना बोलावले होते. त्यात प्रधान हणमंतराव आणि सेनापती मुरारबाजी देशपांडे हेदेखील होते. मुरारबाजी देशपांडे यांचे मूळ गाव महाड तालुक्यातील किंजळोली होते. परंतू त्यांचे कितीतरी नातेवाईक मोऱ्यांच्या दरबारात कारभारी म्हणून रुजू होते. अंगाने धिप्पाड , निष्ठावान , तेजस्वी डोळे , पिळदार देहयष्टी असे मुरारबाजीचे रूप होते.

" इकडे आड तिकडे विहीर अशी गत झाली आहे आमची. तिकडे शिवाजी तर इकडे अफजल. दोघांना घास घ्यायचा आहे जावळीचा. " चंद्रराव मोरे चिंतेच्या सुरात म्हणाले.

" शिवाजीचे भय न धरणे. चार चौक्या नसलेले किल्ले जिंकले म्हणून कुणी राजा बनत नाही. अफजलखान जास्त घातक आहे. त्यांच्याशी संधान बांधणे. " हणमंतराव म्हणाले.

" शिवाजीराजे यांचे उपकार विसरून कैसे चालेल ? त्यांनीच दत्तक विधी संपन्न करवून दिला होता. आम्हास वाटते सध्या आदिलशाह आणि शिवाजी महाराज दोघांसी चौथाई देणे. पाच वर्षात सैन्य मजबूत करू आणि मग स्वतंत्रपणे राज्य करू. शहाजीराजे असेच करतात. आदिलशाहीला रक्कम देतात आणि स्वतःला स्वातंत्र्य राजे वदवून घेतात. " मुरारबाजी म्हणाले.

" हम्म. हणमंतराव , अफजलखानाकडे हातात रुमाल बांधून जाणे. आम्ही आदिलशाहीचे चाकर आहोत सांगणे. शिवाजीचे नंतर बघू. " चंद्रराव मोरे म्हणाले.

◆◆◆

म्हातारा आदिलशाह खोकलत होता. तेवढ्यात बडी बेगम आली आणि तिने आदिलशाहला पाणी दिले.

" हुजूरांसाठी एक चांगली बातमी आहे. जावळीचे मोरे शरण आले. बेटे अफजलची दहशत इतकी की मोहीम उघडण्यापूर्वीच हातात रूमाल बांधून आले. " बडी बेगम गुर्मीत म्हणाली.

" अच्छी बात है. आता आमचे दिवस सरत आहेत. सर्व कारभार तुम्हीच करावा. बेटा अली लहान आहेत. त्यांना गादीवर बसवून तुम्हीच सल्तनत चालवा. " आदिलशाह म्हणाला.

बेगम गालातल्या गालात हसली.

◆◆◆

रघुनाथपंत अत्रे यांनी महाराजांना मुजरा केला.

" तातडीने बोलावले. " रघुनाथांनी महाराजांना विचारले.

" खबरच तशी आहे. मोरे आदीलशाहीचे मोहरे बनले आहेत. " सोनोपंत अलंकारिक शैलीत म्हणाले.

महाराज मात्र क्रोधीत होते. रागाच्या भरात ते उठले.

" रघुनाथपंत , या चंद्ररावाला राजा आम्ही केला. तर हा आमच्याविरोधातच उचापती करत आहे. बिरवाडी टप्प्याखाली असलेल्या काही गावांचा अधिकार बाजी आणि मालोजी पाटील यांच्याकडे होता. ती गावे बळकावली. चिखलीचा रामाजी वाडकर याला सत्तेच्या नशेत ठार केले. मुलगा लुमाजी रोहिड खोऱ्यात शरण आला तर इथे घुसून ठार केले. शिलीमकरांना गुंजन मावळ्याचे देशमुखी जाणार ऐसे भय उत्पन्न केले. शेवटी आम्हास पत्र लिहून समाधान करावे लागले. " महाराज म्हणाले.

" उदरातील व्याधी. इलाज गरजेचा. आजच जावळीला निघतो. समजवतो. " रघुनाथपंत म्हणाले.

" भाषा मधाळ पण खडसावणे. " महाराज म्हणाले.

◆◆◆

मुसे खोऱ्यात एक विधवा स्त्री नदीतून पाणी घेत होती. तेवढ्यात कुणीतरी तिचा हात पकडला.

" सोड सोड. " ती किंचाळली.

" अग तू विधवा. तुझ्या प्रेमाची गरज मला पूर्ण करू दे की. रंगो म्हणतात मला. ये जवळ ये. " रंगो म्हणाला.

ओसाड प्रदेशात घेऊन जाऊन रंगोने त्या विधवा स्त्रीला निर्वस्त्र केले. तिची अब्रू लुटली. तिने आक्रोश केला पण ऐकणारे कुणीच नव्हते. वासनेची तहान भागवून रंगो निघून गेला.