रणफंदीची जात आमुची ! पार्ट 1

.
दुपारचा प्रहर होता. राजगडावरच्या सदरेवरचे बरेचसे काम आटोपले होते. काही शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायचे होते. सोनोपंतांनी आदेश दिल्यावर ते शेतकरी पुढे आले आणि आपली व्यथा सांगू लागले.

" राजे , यावर्षी शेतसारा भरणे नाही होणार. " ते शेतकरी हात जोडून कळवळीने म्हणाले.

महाराज शांतपणे त्यांच्या समस्या ऐकत होते. रयतेविषयी त्यांच्या मनात विशेष कळवळा होता. चेहऱ्यावर सूर्यासारखे तेज , रेखीव दाढी , खोलवर असलेले नेत्रे , कपाळावर चंद्रकोर आणि मजबूत बांधा असलेला देह असे ते रूप होते. साक्षात महादेव कैलास सोडून सह्याद्रीवर अवतरला आहे असा भास होई. महाराज उठले. हात जोडणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातावर हात ठेवला.

" काही फिकीर न करणे. तुम्हाला शेतसारा माफ. तुमच्या गावात दुष्काळ पडलाय माहीत आहे सरकारला. पण पुढच्या वर्षी पावसावर विसंबून राहू नका. नदीला बांध घाला. सरकारकडून पैसे घ्या विहिरीसाठी. घाम गाळा आणि मोती पिकवा. तुम्ही अन्न पिकवतात म्हणून तर स्वराज्य चालते. लाचारीचे दिवस संपले. कुणी अधिकारी मनमानी किंवा लुटालूट करत असेल तर कानावर घालणे. स्वराज्यात कुणी राजा नसे वा रंक. तुमच्या भाजीच्या देठालाही धक्का लागणार नाही. " महाराज म्हणाले.

पुरुषाच्या कणखर देहाच्या आत एका माऊलीचे मायाळू हृदय शेतकऱ्यांना जाणवत होते. राजा म्हणजे उपभोगशुन्य स्वामी हे ते प्रत्यक्ष अनुभवत होते. महाराजांचे आभार मानून शेतकरी निघून गेले.
महाराजांनी सदरेवरील सर्व कामे आटोपली. तेवढ्यात एक सेविका तिथे आली.

" आऊसाहेबांनी बोलावले आहे. " ती म्हणाली.

महाराजांनी होकारार्थी मान हलवली आणि लगेच आऊसाहेबांच्या महालात निघाले. आऊसाहेब एका वृद्ध स्त्रीशी गप्पा मारत होत्या. त्या स्त्रीने पांढरी साडी घातली होती. महाराज आले.

" शिवबा , या माणकाई मोरे. जावळीहून आल्या आहेत. " आऊसाहेब म्हणाल्या.

महाराज चरणस्पर्श करण्यासाठी पुढे आले पण माणकाईबाईंनी अडवले.

" अहो , आता तुम्ही राजे आहात. " माणकाईबाई म्हणाल्या.

" आम्ही पृथ्वीलोक जरी जिंकले तरी तुमचे चरणस्पर्श करता येणार नाही इतके मोठे कधीच होऊ शकणार नाही. " महाराज म्हणाले.

माणकाईबाई हे ऐकून सुखावल्या.

" जिजाबाई , शिवबांनी जन्म घेऊन फक्त तुमचीच नाही तर पूर्ण सह्याद्रीची कूस धन्य धन्य केली आहे. " माणकाईबाई पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या.

" कैसे याद केले आजीसाहेब ?" महाराजांनी विचारले.

" राजे , दौलतरावांचे निधन झाले. जावळीला वारस नाही. आम्ही निपुत्रिक. आदिलशाह आणि अफजल जावळी घश्यात घालेल. " माणकाईबाई रडत म्हणाल्या.

" आमचे आबासाहेब शहाजीराजेंच्या मानलेल्या बहिणीला त्यांचा पुत्र वाऱ्यावर सोडेल असे का वाटते आपणास ? चिंता न करणे. दत्तक घेणे. आम्ही जिवंत असेपर्यंत जावळी आदिलशाहला गिळंकृत करू देणार नाही. आमचा गादीला पाठिंबा असणार." महाराज म्हणाले.

माणकाईबाईंनी महाराजांचे आभार मानले. जावळीच्या मोऱ्यांना " चंद्रराव " हा किताब होता. आदिलशाहीचे ते पिढीजात जहागीरदार होते. जावळीचा प्रदेश दुर्गम बेलाग असल्यामुळे सहसा मोऱ्यांच्या वाट्याला कुणीच जात नसत. महाराजांनी शिवथरकर मोऱ्यांपैकी येसाजी मोरे याला माणकाईबाईंस दत्तक देऊन गादीवर बसवले. त्यांना चंद्रराव किताब भेटला.

◆◆◆

आदिलशाहची बेगम गच्चीवर उभी राहून खालच्या कारंज्याकडे एकटक बघत होती. तेवढ्यात तिथे अफजलखान आला. धिप्पाड देहाचा , उंचापुरा , क्रूर असा तो अफजल सर्वाना कलियुगातील राक्षसच वाटत होता.

" बेटे अफजल , त्या विधवा राणीने शिवाशी हातमिळवणी करून दत्तक घेतले आहे. जावळी तुझ्या वाई प्रांताच्या हद्दीत येते ना. " बेगमने विचारले.

" जी बडीबेगमसाहेबा. " अफजलखान म्हणाला.

" मग जप्त कर. जावळी गिळंकृत कर. जावळी हाती आली की मावळ खोऱ्याचा घास घ्यायला पण वेळ लागणार नाही. आम्हाला त्या शहाजीच्या दोन्ही मुलांची मुंडके हवी आहेत. " बेगम दात खात म्हणाली.

" जी. आजच कान्होजी जेधेला पत्र पाठवतो. " अफजलखान म्हणाला.

क्रमश...

🎭 Series Post

View all