रणफंदीची जात आमुची ! पार्ट 11

.
सकाळचा प्रहर होता. येसूने आंघोळ करून कक्षात प्रवेश केला. खिडकीजवळ तिला मोगली वेशभूषा असलेला आणि मोठी दाढी असलेला पुरुष दिसला.

येसूने लगेच भिंतीवर लटकवलेली तलवार हाती घेतली आणि ती ओरडली ,

" कोण आहेस तू ? खबरदार पुढे आलास तर. कोथळा बाहेर काढेल. " येसू म्हणाली.

तो व्यक्ती वळला.

" अग येसू , मी आहे. " मुरारबाजी आपल्या भारदस्त आवाजात म्हणाले.

" तुम्ही ?" येसू म्हणाली.

" हो. मीच. " मुरारबाजी म्हणाले.

" सकाळी सकाळी शत्रूंची वस्त्रे का घातली आहेस ? आणि ही दाढी ?" येसूने घाबरत विचारले.

मुरारबाजी हसले.

" हेरांसोबत मिळून एक गुप्त योजना बनवली आहे. "
मुरारबाजी म्हणाले.

" कसली योजना ?" येसू म्हणाली.

मुरारबाजी यांनी इकडे तिकडे बघितले. ते येसूजवळ आले.

" आम्ही काही माणसे सोबत घेऊन दिलेरच्या छावणीत प्रवेश करू आणि मग आम्ही तिथला दारुगोळा उडवणार. " मुरारबाजी म्हणाले.

" काय ?" येसू म्हणाली.

" घाबरू नकोस. आम्ही लगेच परत येतो. " मुरारबाजी म्हणाले.

" अहो पण उगाच हे वेडे धाडस का करताय ?" येसू म्हणाली.

" स्वराज्यासाठी. तुझ्या कानावर पडले नाही का की कुडतोजीरावांनीही मिर्झावर आक्रमण केले होते. " मुरारबाजी म्हणाले.

" हो. पण जीव धोक्यात टाकून ?" येसू म्हणाली.

" स्वराज्य धोक्यात आहे. माझ्यासारखे लाख मेले तरी चालतील पण स्वराज्य टिकले पाहिजे. मी येतो. काही बरेवाईट झाले तर हीच शेवटची भेट समजून घे. " मुरारबाजी म्हणाले.

येसूचे डोळे पाणावले.

***

मुरारबाजी वेषांतर करून काही हेरांसोबत मोगल छावणीत गेले. कसेबसे ते दारूगोळा असलेल्या ठिकाणी पोहोचले. दिलेरखानही तिथेच असावा आणि दारूगोळासोबत त्यालाही उडवावे अशी मुरारबाजींची इच्छा होती. पण दिलेरचे नशीब चांगले. नेमक्या त्याच वेळी तो नमाज पढायला गेला होता. असो. संधी साधून मुरारबाजींनी दारुगोळा नेस्तनाबूत गेला. सर्वत्र हाहाकार उडाला. आगीचा भडका उडाला. छावणीत सर्वांच्या मनात भयाने संचार केला. त्या गोंधळाचा वापर करून मुरारबाजी सुखरूप गडावर परतले.

इकडे येसूने रडून रडून डोळे सुजवले होते. दख्खन दरवाजाला तिच्या नजरा रोखल्या गेल्या होत्या. आज तिचे कुंकू संकटात होते. सकाळपासून देव पाण्यात होते. अखेरीत नौबती वाजल्या. गडावर आनंद पसरला. येसूचा जीव भांड्यात पडला. अंगात नवचैतन्य आले. ती उठली. तिने पतीचे औक्षण केले.
तिला तिच्या कुंकवाचा फार अभिमान वाटला.

***

इकडे दिलेर प्रचंड चिडला होता. दारूगोळ्याचे नुकसान झाले होते. पण ही घटना मराठ्यांनीच केली असावी असा त्याला ठाम विश्वास होता. मिर्झाराजेसमोर आपली फजिती झाली असे त्याला वाटले. त्याने प्रकरणाची कसून चौकशी केली. परंतु काहीच उत्पन्न झाले नाही. अखेरीस त्याने मस्तकावरची पगडी भूमीवर फेकली.

" जो पर्यंत मी हा किल्ला जिंकत नाही तोपर्यंत माझ्या डोक्यावर पगडी नसेल. " दिलेरचा आवाज विजेप्रमाणे आसमंतात घुमला.

क्रमश...

🎭 Series Post

View all