Login

रणचंडी

.
सकाळचा प्रहर चालू होता. महाराणी तुळसाबाई महाराज यशवंतराव होळकर यांच्या चित्रासमोर उभ्या होत्या. महाराज यशवंतराव होळकर यांचा एक डोळा जायबंदी होता. तेव्हा चित्रकाराने मोठ्या युक्तीने हाती बंदूक घेऊन नेम धरत असलेल्या महाराज यशवंतरावांचे चित्र काढले होते. अश्याप्रकारे मोठ्या युक्तीने चित्रकाराने तो डोळा लपवला होता. तो प्रसंग आठवून महाराणी तुळसाबाई गालातल्या गालात हसल्या.

" महाराज , आम्ही सात वर्षे आपले राज्य सांभाळले. होळकरांचे राज्य फिरंग्यांच्या घश्यात नाही जाऊ देणार. तुमचे पुत्र मल्हारराव आता बारा वर्षाचे झाले आहेत. पुत्री भीमाबाई यांच्याबद्दल तर विचारूच नका. साक्षात रणचंडी आहे. आज सर्व फौज रणांगणावर उभी आहे शिवरायांचे स्वराज्य राखण्यासाठी. आता ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करू महाराज. मराठी राजमंडळ पुन्हा एकजूट करू. " महाराणी तुळसाबाई म्हणाल्या.

तेवढ्यात त्यांची दासी मैना दूध घेऊन आली. महाराणी तुळसाबाईंनी दूध ग्रहण केले. त्यांना चक्कर आली.

***

जेव्हा महाराणी तुळसाबाई भानावर आल्या तेव्हा समोर गाफुरखान , दासी मैना , माल्कम हा ब्रिटिश अधिकारी आणि काही ब्रिटिश सैनिक उभे होते.

" गद्दार. होळकरांचे मीठ खाल्ले आणि ब्रिटिशांची बाजू घेतोस. ऐसे कपट करताना लाज नाही वाटली ? इतिहासात तुला गद्दार म्हणून ओळखले जाईल. " महाराणी तुळसाबाई गर्जल्या.

" महाराणी , इतिहास जिंकणारे लिहितात. माल्कम साहेबांनी आधीच तुमच्या बदनामीचे सत्र चालवले आहे. त्यादिवशी धर्मा कुंवर तुम्हाला वाचवणार होता पण मी त्याला ठार करून त्याच्यावरच आरोप लावले. " गफुरखान म्हणाला.

" आमची मुलगी भीमाबाई तुम्हाला जेरीस आणेल. ही क्षिप्रा नदी साक्षी असेल तुळसाबाईच्या निष्ठेची. " महाराणी तुळसाबाई म्हणाल्या.

गफुरखानने सोन्याच्या नाण्यांनी भरलेली एक थैली दासी मैनाला दिली. माल्कम गालातल्या गालात कुत्सितपणे हसला. गफूरखानने एक तलवार अशी फिरवली की महाराणी तुळसाबाईचे शीर धडावेगळे झाले. त्या महाराणीचे दुर्दैव असे की कसलेच अंत्यसंस्कार न होता गफूरखानने त्यांचा देह क्षिप्रा नदीत फेकून दिला.

***

दुर्दैवाने होळकरी सैन्याला या हत्येची कसलीच कल्पना नव्हती. महिदपुरच्या रणाला वेगळीच शोभा आली होती. ब्रिटिश आणि होळकरांच्या छावण्या समोरासमोर होत्या व मधोमध क्षिप्रा नदी दुधडी भरून वाहत होती. अवघ्या वीस वर्षाच्या राजकुमारी भीमाबाई पुरूषी सैनिकी वेष घालून आपल्या छावणीत उपस्थित होत्या. चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. नेत्रांमध्ये भरतभूमीच्या स्वातंत्र्याचा निर्धार होता. त्यांनी एक मोठी लाकडी पेटी उघडली आणि त्यातल्या काही चीजवस्तू त्या पाहू लागल्या. सुरुवातीला एक लाकडी घोडा हातात घेतला. दौलतराव शिंदे यांनी महाराज यशवंतराव होळकर यांची पत्नी लाडाबाई आणि मुलगी भीमाबाई यांना कैदेत टाकले होते. कैदेत असताना लहानग्या भीमाबाई फार रडत. पण आई लाडाबाई तो घोडा खेळायला देऊन समजवत की तुमचे आबासाहेब नक्की येतील आणि आपल्याला मुक्त करतील. सात वर्षांनी यशवंतराव होळकर यांनी दौलतराव शिंदे व पेशव्यांचा पराभव केला व भीमाबाईसह इतरांची मुक्तता झाली. पितापुत्रीच्या भेटीचा क्षण तो काय वर्णावा ? दोघांचीही नेत्रे पाणावलेली होती. मग भीमाबाईंनी मंगळसूत्र हातात घेतले. धारचे संस्थानिक गोविंदराव बुळेसरकार यांच्यासोबत झालेला विवाह आठवला आणि दोनच वर्षांत आलेले वैधव्य आठवले. माहेरी परतली तेव्हा पित्याने उच्चारलेले शब्द भीमाबाईंच्या कानात घुमू लागले. " होळकरांची लेक आहेस तू. रडायचे नाही तर लढायचे. उद्यापासून तुमचे लष्करी शिक्षण सुरू करतोय. आम्हाला 1 लक्ष फौज गोळा करून कोलकत्ता जिंकायचे आहे. भरतभूमीला ब्रिटिशांच्या जाचापासून मुक्त करायचे आहे. त्यासाठी तुमची मदत हवी आहे. तुम्ही अश्वपरीक्षण , तोफांचा कारखाना आणि फौजभरतीचे काम पाहाल. पेटलवाडची जहागीरही तुम्हाला सुपूर्द करत आहोत. ज्या मातीसाठी तुमचे पती धारातीर्थी पडले तुम्ही त्याच मातीची सेवा कराल. " ज्या काळात स्त्रिया उंबरा ओलांडत नव्हत्या त्या काळात मुलीला लष्करी शिक्षण देणारा पिता लाभायला किती जन्माचे पुण्य लागत असेल हा विचार भीमाबाईंच्या मनात तरळून गेला. दुर्दैवाने महाराज यशवंतराव यांचे मेंदूच्या गाठीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर भीमाबाई स्वतः फौजभरतीचे काम पाहू लागल्या.

तेवढ्यात छावणीत बारा वर्षाचे मल्हारराव आले.

" ताईसाहेब , सर्वजण आपली वाट पाहत आहेत. एक गोष्ट विचारू. बाहेर काहीजण म्हणत होते की ब्रिटिश हनुमानाचे अवतार आहेत. ते कधीच हारत नाहीत. " मल्हारराव म्हणाले.

" मल्हारराव , याच ब्रिटिशांना आपल्या पित्याने सतरा वेळा हरवले आहे. ही पांढरी माकडे फक्त आपल्या भारताला लुटायला आली आहेत. ही आबासाहेबांची तलवार आपल्या जवळ असू द्या. आपण हत्तीवर आरूढ व्हा. " भीमाबाई म्हणाल्या.

" हो ताईसाहेब. आम्ही स्वतः सर्व गोष्टीवर लक्ष ठेवू. आपण काळजी न करणे. " मल्हारराव तलवारीला नमन करत म्हणाले.

भीमाबाईंनी चिलखत घातले. कमरेला तलवार लावली. कपाळावर तिलक लावले. मग त्या छावणीबाहेर पडल्या. सरदार तात्या जोग , सरदार हरिराव होळकर , सरदार भाऊसाहेब होळकर , सरदार मीर खान आणि गफूर खान या सर्वांनी भीमाबाई आणि मल्हारराव यांना मुजरा केला.

" जमलेल्या समस्त होळकरी सैनिकांनो , आजचे हे युद्ध वर स्वर्गात होळकरी गादीचे संस्थापक महाराज मल्हारराव होळकर , आजीसाहेब पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर आणि आपले महाराज आबासाहेब यशवंतराव होळकर बघत आहेत. इंदौरचे राज्य पूर्वजांनी रक्त सांडून मिळवले आहे. ते या पांढऱ्या माकडांना मिळू द्यायचे नाही. ही लढाई आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. अरे कसला तो बलाढ्य औरंगजेब , कसला तो अफजलखान त्या सर्व असुरांना यमसदनी पाठवणारी जात आहे आपल्या मराठ्यांची. त्यांच्यापुढे हे इंग्रज काय चीज ? सातासमुद्रापारहुन व्यापारी म्हणून आलेल्या या लोकांना देशावर राज्य करू द्यायचे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करा. आज रणांगणावर काळभैरव अवतरु द्या. हर हर महादेव. हर हर महादेव. " राजकुमारी भीमाबाई गर्जल्या.

पूर्ण फौजेत उत्साह संचारला.

***

कर्नल माल्कम , कमांडर टॉम्स हिस्लाप , मेजर हंट ब्रिटिश फौजेचे नेतृत्व करत होते. दुर्बिणीने कमांडर हिस्लापने होळकरी फौजेचे निरीक्षण केले.

" ही पुरूषी वेशभूषा घातलेली स्त्री कोण आहे ? तिच्या मुखावर विलक्षण तेज आहे. भारतीय स्त्रिया चूल आणि मूल सोडून रणांगणावर कसकाय ?" हिस्लाप म्हणाला.

एक भारतीय सैनिक पुढे आल्या.

" त्या महाराज यशवंतराव होळकर यांच्या वीरकन्या राजकुमारी भीमाबाई होळकर असाव्यात. होळकरशाहीत स्त्रियांचा प्रचंड आदर केला जातो. होळकरांच्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून राज्यकारभार चालवतात आणि गरज पडली तर रणांगणावरही उतरतात. " तो सैनिक म्हणाला.

हिस्लापला विलक्षण कौतुक वाटले.

***

थोड्या वेळाने युद्धाला तोंड फुटले. दोन्ही बाजूंनी तोफांचा मारा करण्यात आला. दोन्ही बाजूंनी रॉकेटही उडवले गेले. सरदार हरिराव होळकर हत्तीवर आरूढ होऊन युध्दाचे नेतृत्व करत होते. ब्रिटिशांनी त्यांचा हत्ती जखमी केला. तेव्हा ते जिवा नावाच्या अश्वावर आरूढ झाले. एका ब्रिटिशाने नेम धरून गोळी चालवली. ती गोळी जिवाने पायावर झेलली. नंतर हरीराव जखमी झाले. भीमाबाई अश्वावर आरूढ झाल्या. घोड्याची लगाम दातांमध्ये धरून आणि दोन्ही हातात तलवार घेऊन त्या शत्रूंना कापत सुटल्या. हंट भीमाबाईंना पाहण्यासाठी उत्सुक होता. आपली सैनिक तुकडी घेऊन तो भीमाबाईंच्या दिशेने गेला. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. भीमाबाईंचे शौर्य पाहून हंट आश्चर्यचकित झाला. भीमाबाईंनी त्याला पूर्णपणे जखमी केले. त्याच्या खांद्यातून रक्त वाहू लागले. उपचारासाठी हिस्लाप त्याला नेऊन गेला. भीमाबाईंनी युध्दात पराक्रम केला. दुपारी तीनवाजेपर्यंत होळकरी सैन्य जिंकत होते.

" आता या वीस वर्षाच्या मुलीपासून पराभूत व्हावे लागणार आपल्याला ?" हिस्लाप चिडून माल्कमला म्हणाला.

" नाही. हे भारतीय कितीही पराक्रमी असले तरी यांना फितुरीचा शाप आहे. " माल्कम कुत्सितपणे हसत म्हणाला.

त्या मोक्याच्या क्षणी गफूरखानसहित काही फितूर सरदार रणभूमी सोडून पळाले. लहानगे मल्हारराव होळकर सर्वाना अडवत होते. पुन्हा बोलवत होते. पण कुणीही वळले नाही. एका ब्रिटिशाने मल्हाररावांकडे असलेली महाराज यशवंतराव होळकर यांची शाही तलवार चोरली. ती तलवार आज लंडन म्युझियममध्ये आहे. फितुरीमुळे युद्धाची दिशा पलटली. तीन हजार विश्वासू पेंढारी सेना घेऊन भीमाबाईंनी अलोटच्या किल्ल्याकडे प्रयाण केले. सोबत मल्हारराव होळकर, हरिराव होळकर आणि इतर मंडळी होती.

***

" सर्वकाही संपले ताईसाहेब. आईसाहेब तुळसाबाईंची हत्या झाली. मातोश्री केसरबाईंनी आणि तात्या जोगने ब्रिटिशांसोबत तह केला. आपले सार्वभौमत्व आता उरले नाही. तिकडे पेशवे भोसले शिंदेही हरले. " मल्हारराव रडत म्हणाले.

" ऐसे रडू नका. लढाई अजून संपली नाही कारण आपण अजून जिंकलो नाही. पानिपतानंतर मराठे संपले असेच वाटले सर्वाना. पण दहा वर्षांनी परत दिल्लीवर भगवा फडकवला ना आपण ? छत्रपती शिवरायांचे वारस आहोत आपण. गनिमीकावा करू. ब्रिटिशांना वठणीवर आणू. " भीमाबाई विजेप्रमाणे कडाडल्या.

***

पुढे दोन वर्षे भीमाबाईंनी गनिमी कावा करून ब्रिटिशांना हैराण केले. एकदा तर चक्क माल्कमच्या छावणीवर हल्ला केला. माल्कम तिथून जीव वाचवून पळाला. भीमाबाईंचा पराक्रम माल्कमच्या डोळ्यात खुपत होता. भीमाबाईंनी सर्व राजांना खलिते धाडून मदत मागितली. पण ब्रिटिशांविरुद्ध लढायला कुणी तयार होईना. भीमाबाई कधी एका गावात तर कधी दुसऱ्या गावात असत. शेवटी हैराण झालेल्या माल्कमने काही पेंढारी लोकांना फितूर करून भीमाबाईंची माहिती काढली. शेवटी ब्रिटिशांनी भीमाबाईंना घेरले. भीमाबाई कैदेत अडकल्या. रामपूराच्या गढीत त्यांना कैदेत ठेवण्यात आले. रामपूराची जहागीर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव यांना राजपूतांकडून भेट म्हणून मिळाली होती. आजोबांच्या जहागीरीत नात कैदेत राहावी हे किती दुर्दैव. 28 नोव्हेंबर1858 साली भीमाबाईंचा कैदेतच मृत्यू झाला. याच काळात राणी लक्ष्मीबाईही युध्दात उतरल्या होत्या. राणी लक्ष्मीबाई यांना भीमाबाईंकडूनच प्रेरणा मिळाली होती.

***

तर ही होती एका वीरांगनेची गोष्ट. जन्म आणि मृत्यू दोघेही कैदेत. दुर्दैवाने आपल्याला क्वीन व्हिक्टोरिया शिकवली जाते पण पुत्रीला लढवय्या बनवणारा पिता आणि पित्याच्या स्वप्नासाठी लढणारी महाराज यशवंतराव- राजकुमारी भीमाबाई शिकवले जात नाहीत. मातीसाठी रक्त सांडणाऱ्या त्या रणचंडीला मानाचा मुजरा.