Feb 22, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

रम्य ते बालपण

Read Later
रम्य ते बालपण

        रम्य ते बालपण                                                                    खरच किती गमतीशीर आहे ना ??? लहानपणी मोठे असावे असे वाटते .... आणि मोठेपणी लहान... पण जर नीट अभ्यास केला तर लहानपण कधीच जात नाही..मोठे झाल्यावर आपल्या मुलांच्यात आपण आपले लहानपण शोधत असतो... आणि म्हातारपणी परत एकदा लहान होतो.                                               

          एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही.कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही. सर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याचा कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत. दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत. प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही...... त्या उडणार्‍या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत."
वपुंच्या वपूर्झा मधील ह्या ओळी वाचल्या अन् मन भुर्रकन काही वर्षे मागे गेलं...आणि सारं सारं बालपण आठवलं.

लाटेने कि काळाने नेला तो किनार्‍यावरचा वाळूचा किल्ला?
भोवर्‍याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला... 
हरवली कुठे तरी ती शाळेतली मुल्यशिक्षणाची वही,
इवलुश्या मार्कांच्या प्रगतीपुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही.... 
गेले कुठे ते चालताना "पॅकपॅक" आवाज करणारे पायातले बूट?
"मी नाही देणार जा माझं चॉकलेट" म्हणत आवळलेली ती घट्ट मुठ.... 
किती जिव्हाळा होता डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या उशीत?
ब्लँकेटहून जास्त उब होती त्या मायेच्या कुशीत... 
हरवला तो प्रेमाचा घास...."चिऊताई" दाखवत आईने भरवलेला...
घरात न सांगता लपवून लपवून भेळ खायचा तो प्लॅन ठरवलेला? 
गेले कुठे जत्रेतले ते गोड गोड म्हातारीचे केस? 
छोट्याशा बुटांची आईने बांधलेली ती सुटलेली लेस.... 
गेली कुठे ती मामाच्या गावी जाणारी झुकझुक गाडी?
हरवली कुठे ती क्रिसमस मधली झिंगलमॅनची पांढरी दाढी? 
धावत धावत ज्याचा पाठलाग केला तो धुरवाल्याचा धूर कुठे गेला?
शाळेत बडबड गीते गाताना एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला? 
झोपताना पाहिलेला तो चांदोमामा कुठे हरवला?
अ आ इ ई पाटीवर लिहिणारा तो खडू कुणी पळवला? 
कशाला आलं हे आपल्याला शहाणपण????
हरवलं त्यात ते सुंदर बालपण.......       

कधी इकडे कधी तिकडे भिरभिरणारे मन, 
    कधी दुखी कधी आनंदी कधी मजेचे क्षण. 
असंच लहानपण आज येऊन गेल मनात, 
     रमून गेलो कसं आलंच नाही ध्यानात. 

रम्य ते बालपण रम्य त्या आठवणी, 
    सुंदर माझं गाव येऊन गेल मनी. 
लहानपणीचे विविध खेळ मोकळा असायचा वेळ, 
   कोणी बनायचं धोनी,कोणी बनायचं गेल. 

खेळायचो क्रिकेट,लगोरी,विटीदांडू, 
 लोक म्हणायचे पोरांनो नका तुम्ही भांडू. 
कधी जायचो जांभळांना, कधी जायचो बोरांना,
   काजू-आंबे भरपूर आवडत असत पोरांना. 

जिथे असायची धमाल मस्ती ती आमची शाळा,
   खेळ असो अभ्यास सगळे व्हायचो गोळा. 
मुलगा-मुलगी,धर्म -जात नव्हता भेदभाव. 
  शाळेतील गुणी मुले म्हणत असायचं  गाव. 

टायर चालवणे,पोहायला जाणे नेहमीचेच आमचे उद्योग, 
  गोटया खेळणे, पत्ते खेळण्याचा होता वेगळाच रोग. 
कधी जायची सहल कधी वनभोजन, 
  वाट पाहायचो आम्ही कधी येतात सण. 

आता मात्र चित्र बदललं आहे सारं,  
   लोकांच्या कानात शिरलंय पैशाच वारं. 
आता मात्र कोणाकडे राहिला नाही वेळ, 
   लहानमुले गेम्समुळे विसरलेत आता खेळ. 

असे होते माझे रम्य ते बालपण, 
   पुन्हा-पुन्हा तिकडेच घेऊन जाते मन.

                            

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Adv. Shraddha Magar

Advocate

Happily life .. आयुष्य एकदाच आहे आनंदाने जगते... जिथे जाऊ तिथे स्वतः ची छोटी ओळख निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न...

//