' या सुखांनो या.' म्हणणारे रमेश देव काळाच्या पडद्याआड
उत्फुल्लतेचा झरा असलेले, सर्व प्रकारचे भूमिका लीलया साकारणारे सदाबहार अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते त्र्यांनव वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव, अभिनेते अजिंक्य देव आणि निर्माता - दिग्दर्शक अभिनय देव ही दोन मुले,सुना नातवंडे असा परिवार आहे. 30 जानेवारी रोजी त्यांनी कुटुंबियांसह वाढदिवस साजरा केला होता.
शहरी मध्यमवर्गीय नायकाचे स्वप्न रसिकांना दाखवणारे रमेश देव हे एक उत्तम कलावंत होते. त्यांचा नायक अनेक पिढ्यांना आपलासा वाटला, त्यांचा खलनायक ही गाजला. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांच्या विविध भूमिकांनी अमाप लोकप्रियता मिळवली. एकापेक्षा एक सुरेख गाणी हे त्यांनी पडद्यावर आपल्या उत्कट अभिनयाने अजरामर केली. एका पिढीच्या या नायकाने चित्रपट रसिकांच्या मनाचा पडदा पुरता व्यापुन ठेवला होता.
रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1926 रोजी अमरावतीमध्ये झाला त्यांचे पूर्वाश्रमी काही काळ राजस्थानातील जोधपूर चे ठाकुर होते. रमेश देव यांचे पणजोबा आणि आजोबा जोधपूर मधील राजवाडा उभारणीत इंजिनियर म्हणून सहभागी होते. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूरला बोलावून घेतले. रमेश देव यांचे आजोबा शाहू महाराजांचे मुख्य इंजिनियर होते. त्यांचे वडील कोल्हापूरमध्ये न्यायाधीश आणि महाराजांचे मुख्य सल्लागार होते. एका न्यायालयीन कामकाजात रमेश देव यांच्या वडिलांनी महाराजांना मदत केली होती त्यावेळी महाराज म्हणाले 'तुम्ही देवासारखे धावून आलात तुम्ही देव आहात तेव्हापासून देव हे नाव रूढ झाले'. रमेश देव यांचा विवाह प्रसिद्ध अभिनेत्री सीमा यांच्याबरोबर झाला व पडद्यावर आणि आयुष्यातही त्यांची जोडी जमली. वर्ष 1957 मध्ये 'आलिया भोगासी' या मराठी चित्रपटाद्वारे सीमा व रमेश देव यांनी प्रथम एकत्रित काम केले. त्यानंतर सहा वर्षानंतर एक जुलै 1963 रोजी त्यांचा विवाह झाला. सीमा या पूर्वाश्रमीच्या नलिनी सराफ त्यांची मुंबईत लोकलमध्ये भेट झाली.
रमेश देव यांचे वडील पृथ्वीराज कपूरचे फॅन होते. एकदा छोट्या रमेशला घेऊन पृथ्वीराज कपूर यांच्या सेटवर गेले होते. त्यावेळीही सेटवर काम करणाऱ्या छोट्या मुलाकडून दिग्दर्शकाचे समाधान होईना, तेवढ्यात त्यांचे लक्ष छोट्या रमेश कडे गेले. त्यांनी विचारले बेटा तू काम करणार का? छोट्या रमेशने होकार दिला व हेच त्यांचे चित्रपटसृष्टीतील पहिले काम मात्र त्यांनी लगेचच अभिनयाची सुरुवात केली नाही. त्यांनी नाटकात कामे केली.
महाविद्यालयात असताना भालजी पेंढारकर दिनकर पाटील अशा मान्यवरांशी त्यांचा परिचय झाला. 1947 मध्ये हौसेखातर रमेश देव यांनी पहिल्यांदा 'वाल्मीकी' या चित्रपटासाठी पहिल्यांदा तोंडाला रंग लावला. त्या चित्रपटात पृथ्वीराज कपूर होते. या छोट्या भूमिकेनंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले .पोलीस खात्यात नोकरी मिळवण्यासाठी त्यांची निवड झाली. भरतीसाठी ते तिकडे जाणार ही होते. लष्करात कॅप्टन असलेला त्यांचा एक भाऊ पुण्यात राहायला होता. रमेश देव त्याच्याकडे राहायला आले. एकदा सहज रेसकोर्सवर गेले असताना प्रसिद्ध दिग्दर्शक राजा परांजपे यांच्याशी त्यांची भेट झाली. परांजपे त्यावेळीही घोड्यांच्या शर्यतीत बरेच पैसे भरले होते. रमेश देव यांनी सहज म्हणून त्यांना एक घोड्यावर पैसे लावण्यास सुचविले. त्यावर पैसे लावल्यावर तो घोडा जिंकला. राजा परांजपे यांना अंदाजे सहा ते सात हजार रुपये मिळाले. त्यांनी खुश होऊन रमेश देव यांना चित्रपटात काम करण्याची विचारणा केली. हे देव यांचे पहिले व्यावसायिक काम.
'आंधळा मागतो एक डोळा'या चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली. त्यानंतर 'राम राम पाव्हणं', 'पाटलाचा पोर' अशा चित्रपटातून त्यांनी काम केले. अशोक ताटे यांच्या 'मंगळसूत्र' मध्ये त्यांनी भूमिका केली. 'अपराध', 'सुवासिनी', 'वरदक्षिणा', 'देवघर', 'भिंगरी', 'भैरवी', 'आधी कळस मग पाया', 'बाप माझा ब्रह्मचारी', 'एक धागा सुखाचा', 'क्षण आला भाग्याचा', 'प्रेम आंधळ असतं', 'सोनियाची पाऊले', 'आंधळा मागतो एक डोळा', 'येरे माझ्या मागल्या', 'राम राम पाव्हणं', 'या सुखांनो या', 'अवघाचि संसार', 'दोस्त असावा असा', 'सर्जा' अशा अनेक मराठी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या.
मराठी चित्रपटांसह हिंदीतही त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. राजश्री प्रॉडक्शनच्या गाजलेल्या 'आरती' मध्ये त्यांनी छोटी भूमिका केली. त्यानंतर 'मोहब्बत किसको कहते है' या चित्रपटात त्यांनी सहनायक केला. त्यानंतर 'लव अँड मर्डर' मध्ये त्यांना नायक होण्याची संधी मिळाली. ऋषिकेश मुखर्जींच्या गाजलेल्या 'आनंद' मध्ये त्यांनी अमिताभ बच्चन राजेश खन्नासह तेवढ्याच ताकदीने काम केले. पृथ्वीराज कपूर, राज कपूर ,दिलीप कुमार, आशा पारेख, हेमामालिनी ,जीनत अमान ,अशा कलाकारांसोबत त्यांनी काम केले.
त्यांनी 190 मराठी आणि 285 हिंदी चित्रपटात काम केले. याखेरीज त्यांनी तीस नाटकात काम केले असून त्यांचे सुमारे दोनशे प्रयोग झाले. अनेक वृत्तपट मालिकांमध्येही त्यांनी काम केले. जानेवारी 2013 मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. सन 2016 मध्ये आलेला 'घायल वन्स अगेन' हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
सन 1957 च्या सुमारास रमेश देव व सीमा या दोघांचीही रुपेरी कारकीर्द सुरू झाली 'आलिया भोगासी' चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची सीमा यांच्याशी पहिली भेट झाली आणि त्यानंतर एक जुलै 1953 ला त्यांचा विवाह झाला. रमेश आणि त्यांची पत्नी सीमा देव चित्रपटात असतील तर तो हिट होणार अशी खात्री असायची. रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ग्लॅमर मिळवून दिले. तरीही त्यांनी स्वतःला विशिष्ट परिघात अडकवून न घेता चौफेर मुशाफिरी केली. यांनी नायक,सहनायक,चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या. नायक म्हणून हिंदीत यशस्वी होऊ न शकल्याने त्यांनी खलनायकाच्या भूमिका केल्या. मराठी त्याच्या उलट झाले खलनायकी भूमिकातुन त्यांचा प्रवेश चित्रपट सृष्टीत झाला; पण नंतर ते नायक म्हणून लोकप्रिय झाले. नायक खलनायक रंग दिल्यानंतर 'सर्जा' या चित्रपटाची निर्मिती करून अजिंक्य देव हा नायक त्यांनी चित्रपट सृष्टीला दिला. सर्जाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, गोष्ट लग्नानंतरची, जेता चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली.
हिंदी मराठी शेकडो चित्रपटात काम करून आपले नाणे खणखणीत आहे हे त्यांनी वारंवार दाखवून दिले. अगदी वयाच्या सत्तरीत नंतरही मालिकांच्या दहा-बारा तासांच्या शिफ्टमध्ये ते कार्यरत असत. प्रामाणिकपणे, आपले काम चोख करणे ,दिलेली वेळ पाळणे यासाठी त्यांचे नाव आदराने घेतले जात होते. बदलत्या काळानुसार बदल अंगिकारून सतत तरुण राहण्याचा मंत्र त्यांनी आपलासा केला होता. रुपेरी पडद्यावरील सळसळते चैतन्य आता लोप पावले आहे. सगळ्यांचा लाडका देव आता 'देवाघरी' निघून गेला आहे….. रमेश देव यांना श्रद्धांजली………..!
रमेश देव यांची काही अजरामर गाणी
रमेश देव यांनी अत्यंत वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. त्यामध्ये खलनायक म्हणून त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या तसेच राजबिंडे नायक म्हणून हे ते रसिकांच्या आठवणीत राहतील. त्यांच्यावर चित्रित झालेले अनेक गीते अनेक दशकानंतरही आजही स्मरणात आहेत. 'सुर तेची छेडता', 'सांग कधी कळणार तुला' आणि 'स्वप्नात पाहिले मी'(अपराध), 'हसले आधी कुणी'….( मोलकरीण), नवीन आज चंद्रमा नसे राऊळी वा नसे मंदिरी….. (उमज पडेल तर), 'या सुखांनो या'....(या सुखांनो या), अशी अनेक गीते सदाबहार ठरली. वरदक्षिणा चित्रपटातील 'एक वार पंखावरूनी फिरो तुझा हात' या अजरामर गीताने ही रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. श्रमिक हो घ्या इथे विश्रांती... (ते माझे घर), मी तर आहे मस्त कलंदर, होणार तुझं लगीन होणार (दोस्त असावा असा) आधी गीतांमध्ये देव यांनी बहार उडवून दिली.
संदर्भ-
१. दिनांक 3 फेब्रुवारी २०२२ नागपूर येथून प्रकाशित महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र
२. दिनांक 3 फेब्रुवारी 2022 नागपूर येथून प्रकाशित लोकमत वृत्तपत्र
३. इतर माहिती आणि फोटो साभार गुगल
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा