नीरज -"नवीन प्रोजेक्टवर काम करतोय!"
मीना -"नवीन प्रोजेक्ट कि,रमा पासून लांब राहण्याचा बहाणा?"
नीरज -"सर्व माहिती असूनही मग का विचारतेस?"
मीना -"कारण मी तुझी आई आहे. त्या दिवशी लग्न पण लग्न मंडपात तू रमाचे पाणी ग्रहण केलंस, मग आता काय प्रॉब्लेम आहे?"
नीरज -"मला वेळ हवा आहे."
मीना -"कशासाठी? श्वेताला विसरण्यासाठी?"
नीरज -"आssईs"
मीना -"हळू बोल! सगळे झोपले आहेत. रमाला तू स्वतःचं नाव दिलं आहेस. अरे तिच्यासाठी तू देव झालास त्या दिवशी! आता असा अमानुषपणा करू नकोस! रमाचा स्वीकार कर नीरज."
नीरज -"मला श्वेताला विसरायला जरा वेळ लागेल."
मीना -"अरे श्वेताच तुझ्यावर प्रेम असतं, तर तिने अशा विचित्र अटी घातल्याच नसत्या! तिला आपलं भरलं घर नको होतं. स्वतःच्या आई-वडिलांना तिला सोडायचं नव्हतं आणि आम्हाला सोडून जाणं तुला शक्य नव्हतं. खरं तर श्वेताच्या घरी, घर जावई म्हणून राहणं तुझ्या मनाला पटत नव्हतं, म्हणूनच तू श्वेताला नकार दिलास. तेवढ्यात रमाच्या लग्नातला गोंधळ बघून, श्वेताला विसरण्यासाठी तू रमाला होकार दिला. हो ना?"
नीरज -" मला आता या विषयावर काहीच बोलय रात्र खूप झाली आहे, मला उद्या ऑफिस आहे. झोपतो मी."
नीरज स्वतःच्या खोलीत निघून गेला पण आईचे शब्द नीरजच्या जिव्हारी लागले होते. खर तर एक प्रकारे नीरजचे अंतर्मन त्या शब्दांनी ढवळून निघालं होतं, पण तरीही तो रमाचा स्वीकार मात्र करू शकत नव्हता.
मीनाने हळूहळ रमाची भाषा ही सुधारली. एके दिवशी दुपारी मीना-रमा गॅलरीत सांडगे करताना बोलत होत्या.
मीना -"रमा तुझ आणि नीरज काही बोलणं झालं का?"
रमा -"कशाबद्दल?"
मीना -"कशाबद्दल म्हणजे? लग्नाला वर्ष होत आलं. आता घरात पाळणा हलायला नको का?"
रमा या वाक्याने कावरी बावरी झाली. तिला काय उत्तर द्यावं ते सुचेना.
रमा -"म्हणजे आम्हाला थोडा वेळ…."
मीना -"आम्हाला की निरजला?"
रमाचं मन मीनाताईंनी ओळखलं.
मीना -"तुला श्वेता बद्दल काही माहिती आहे का?"
रमा -"हो मला त्यांनी त्याबद्दल सांगितलं आहे. माझं काही म्हणणं नाही त्याविषयी. भर लग्न मंडपात माझ्या बाबांची त्यांनी(नीरजने) लाज राखली, माझ्या सारख्या काळा सावळ्या मुलीला स्वतःचं नाव दिल, तुमच्या सारखे समंजस सासू-सासरे, छान घर, नवऱ्याचं नाव, सगळं सगळं मला मिळालं. माझ्यासारख्या सावळ्या मुलींची जिथे कोणी दखलही घेत नव्हतं, तिथं यांनी (निरजने) मला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं यातच त्यांचे मोठेपण आहे. मला आणखी काही नको."
मीना -"अगं वारंवार स्वतःच्या रंगाविषयी असं बोलू नकोस. कृष्णप्रिया द्रौपदी, विठ्ठलाची रखुमाई, आपल्या राष्ट्रपती, अर्थमंत्री, धावपटू पी. टी. उषा या साऱ्याच सावळ्या. रंगाने काही कर्तृत्व सिद्ध होत नाही. गुणांनी ते सिद्ध होतं. रमा, नीरज हा इतर मुलांसारखा नाही. त्याला त्याची जोडीदार केवळ स्वयंपाक करणारी नको आहे तर, तीने ही तिच्या आवडीच्या क्षेत्रात काहीतरी करावं, स्वतःचं नाव मिळवावं अशा स्वभावाचा तो आहे."
दिवसा मागून दिवस जात होते मीनाताईंनी रमाला विचारलं तिला काय शिकायला आवडेल?
रमा -"अक्का मला ब्युटीशियनचा कोर्स करायचा आहे. मी दिसायला काळी-सावळी म्हणूनच मला सौंदर्याचं फार आकर्षण आहे. मला इतरांना सुंदर तयार करायला आवडेल."
रमाची आवड लक्षात घेऊन माधवराव आणि मीनाताईंनी रमाला एका इंटरनॅशनल ब्युटी प्रॉडक्टच्या व्यवसायिक ब्युटी आणि मेकअप आर्टिस्टच्या कोर्सला ऍडमिशन घेऊन दिली. रमा मन लावून सौंदर्याचे धडे गिरवत होती. त्या कोर्समध्ये सौंदर्या सोबतच आहार-विहार यांचाही अभ्यासात समावेश होता.
चार महिन्यानंतर सोसायटीच्या संक्रांतीच्या स्नेहमीलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सोसायटीतील काही बायका भारतातील विविध प्रांतातल्या पारंपारिक वेशभूषा घालून उखाणे घेणार होत्या, पण ऐनवेळी त्यांचा मेकअप करणाऱ्या ब्युटिशियनचा अपघात झाला.
रमाने सगळ्या महिलांचा छान मेकअप करून दिला आणि तो कार्यक्रम फारच उत्साहात पार पडला. सोसायटीतल्या सगळ्यांनी रमाची तोंड भरून स्तुती केली. त्यावेळी नीरज रमाकडे कौतुक भरल्या आणि अभिमान युक्त नजरेने बघत होता. रमा विषयीच्या त्याच्या भावना बदलल्या. रमाचे कौतुक ऐकून निरजही कुठेतरी सुखावला आणि त्यात रात्री त्याने रमाला जवळ घेतलं.
नीरज -"रमा तुझ्या हातात इतकं सौंदर्य आहे हे मला माहितीच नव्हतं. सोसायटीतल्या लोकांनी तुझं कौतुक केलं! मला तुझा अभिमान वाटतो."
रमा-निरजच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली.
त्यानंतर काही दिवसात नेहाच्या कॉलेजमध्ये एका प्रस्थापित वृत्तपत्राची सौंदर्य स्पर्धा होती. पाच, सहा महिने नेहा त्याकरिता तयारी करत होती. नेहाच्या नेहमीच्या ब्युटिशियनने काहीतरी घोटाळा केला आणि नेहाच्या चेहऱ्यावर चुकीचं क्रिम लावल्यामुळे डाग आणि पुरळ उठले. त्यावेळी रमाच्या सल्ल्याने नेहाने डायट आणि सौंदर्य टिप्स अमलात आणल्या आणि ती ब्युटी क्वीन झाली.
रमाचे आता त्या शहरात एक मोठं ब्युटी सलून आहे. सौंदर्य जगतात रमा सौंदर्याचा ब्रँड आहे.
©® राखी भावसार भांडेकर
********************************************
वाचक हो आपल्या आजूबाजूला अनेक मुली आहेत, ज्यांना काळया-सावळ्या रंगाचा कधी ना कधी त्रास होतोच. पण मूळ भारतीय वर्ण गव्हाळ, सावळाच. या कथेच्या माध्यमातून अश्याच काळया-सावळ्या मुलींच्या भावना मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न मी केला आहे.