Login

मी कशाला आरशात पाहू ग भाग तीन (राखी भावसार भांडेकर)

Story Of A Dusky Girl


नीरज-"रमा आज आपल्या नवीन आयुष्याची, सहजीवनाची ही पहिली रात्र. पण या नात्यासाठी मी अजून मनाने तयार नाही. लग्नाचा हा प्रसंगच इतक्या अनपेक्षितपणे घडला की, तुला आणि मला विचार करायला फारसा वेळच मिळाला नाही. नवीन आयुष्य सुरू करताना आपण एकमेकांना आधी समजून घेऊया, पुरेसा वेळ एकमेकांना देऊया. उगीच अति घाई काही कामाची नाही. दिवसभराच्या दगदगीने मी फार थकलो आहे. तू ही थकली असशील. आराम कर."

आता रमा बिचारी काय बोलणार? तिने फक्त होकार भरला.

रमा -"हम्म."

रमासाठी पण हे नवीन नात स्वीकारणं जरा अवघडच होतं. खरंतर भावी जीवनसाथी म्हणून ज्याची तिने स्वप्न बघितली, त्यांनेच ऐनवेळी दगा दिला आणि नीरज त्यावेळी त्या क्षणी रमासाठी देवदूत ठरला. कदाचित म्हणूनच तिलाही या नवीन नात्यासाठी थोडा वेळ हवाच होता.

दुसऱ्या दिवशीपासून रमाचं एक नवीन आयुष्य सुरू झालं. लहानशा गावातून एका मोठ्या शहरात ती आली होती. सासरच्या चालीरीती नुसार, स्वतःच्या दैनंदिन जीवनात बदल करण्या प्रयत्न करत होती पण तिचे राहणीमान, बोलण्याचा लेहजा, भाषेतून मध्येच डोकावणारे गावठी शब्द त्यामुळे तिचा आणि निरजचा जास्त संवाद होत नव्हता. नीरज आणि तिचे नाते अजूनही फुले नव्हते. मीनाताई आणि माधवराव-निरजचे वडील मात्र रमाला समजून घेत होते. पण नेहा आजी आणि नीरज मात्र रमाशी फटकूनच वागायचे.

आजी आणि नेहा रमाला टोमणा मारायची एकही संधी सोडायच्या नाही, पण मीनाताई मात्र सर्व सांभाळून घेत.


नीरज -"किती वेळ आहे अजून? स्वयंपाक झाला नाही का? मला आज लवकर जायचंय ऑफिसमध्ये."

मीना -"रमा, निरज आलाय ग. ताट वाढत त्याचं."

रमा -"हाव,  वाढतो  लागलीच."


रमाच्या या  उत्तरावर नेहा आणि आजी फीदी फिदी हसायला लागल्या.


नीरज -"ही असली डाळ भाजी? या भाजीला कोणी भाजी म्हणेल का? पाणी भाजी आहे ही! डाळ एकीकडे पालक दुसरीकडे. एक तरी काम नीट करता येतं का हिला? कधी चटणी नुसती तिखट जाळ, तर कधी ताकात पाणीच पाणी."

नीरज जेवणाच्या ताटावर बसून रमावर आज खूपच चिडला होता. त्यात आजीने भर घातली.

आजी -"नाहीतर काय! काय पाहून हिला सून करून घेतली मीनाने काय माहिती? लग्न जुळवताना मीनाची वहिनी मारे सांगत होती आमची रमा घरकाम करण्यात अगदी हुशार आहे हो! स्वयंपाक तर छानच बनवते ती. हा असला स्वयंपाक?"

नेहा -"हो ना! रोज काय तर पालेभाजी!! कधी मेथी, कधी चवळीची पालेभाजी, पालक, चाकवत, आंबटचुका, शेपू,अंबाडी, लालमाठ जणू सृष्टीकरत्या ब्रह्मदेवाने सगळ्या पालेभाज्या केवळ रमा वहिनी साठी भूतलावर निर्माण केल्या आहेत."

रमा बिचारी स्वयंपाक घराच्या दारात उभं राहून आज्जे सासू आणि नवरा-नंणदेचे बोलणं ऐकून अगदी रडवेली झाली. तेवढ्यात मीना तिथे आली.

मीना -"सकाळी डाळ भाजी करिता रमाला मीच पालक चिरून दिला होता. घाईघाईत तो व्यवस्थीत शिजला नसेल म्हणून एवढं बोलण्याची गरज नाही. नेहा तुझ्या चेहऱ्यावर ज्या तारुण्यपिटीका आणि केसात कोंडा झाल्यामुळे तू बेजार झाली आहेस ना! त्या करिता ह्या पालेभाज्याच रामबाण उपाय आहेत. डाळ नाही नीरज ऑफिसमध्ये रोज रोज समोसे, बर्गर आणि पिझ्झा खाऊन तुला जो निद्रानाश आणि पोटाचा विकार जडलाय ना त्याकरिता पालेभाज्य उत्तम आहेत आणि आई, तुम्ही निदान वयाचा तरी विचार करायला हवा ना! या वयात चमचमीत, मसालेदार, चटकदार पदार्थ तुमच्या तब्येतीला आणि पोटाला मानवणार आहेत का? यापुढे पालेभाज्या आणि स्वयंपाक यावरून कुणीही रमाचे नाव घ्यायचे नाही समजलं? जे ताटात असेल ते सगळं संपवायचं!"

मीनाला कोणीही उलट उत्तर दिलं नाही.

मीना-"(मनाशीच विचार करत होती) दोन महिने झाले नाही लग्नाला आणि सगळे लागले तिच्या मागे हात धुवून. अरे मान्य आहे छोट्या खेडेगावातून आली आहे ती. दिसायला सर्वसाधारण पण, म्हणून काय झालं? तिच्या मनाचा कोणी विचारच करणार नाही का? आणि रंगरूप काय माणसाच्या हाती असतं का? सतत रमाच्या रंगाचा उद्धार! काही अर्थ आहे का याला?"

मीना मनाशीच विचार करता करता आजी, नेहा आणि नीरजला ताट वाढत होती. रमा स्वयंपाक घरातून गरम गरम फुलके आणून देत होती.

जेवण आटपून निरज ऑफिसला गेला. जाता जाता तो नेहाला कॉलेजमध्ये सोडणार होता. आजी पण बसल्या बसल्या टीव्हीचे वेगवेगळे सासु-सुना सिरीयलचे रिपीट एपिसोड पाहायला बसली.

तेवढ्यात माधवराव कोथिंबीर, ओला कांदा आणि काही भाज्या घेऊन आले.
मीना आणि माधवरावांना रमाने ताट वाढून दिले. माधवराव रमाचे कौतुक अगदी दिलखुलासपणे करत होते. मीनाने सकाळचा प्रसंग त्यांच्या कानावर घातला.

माधवराव -"डाळभाजी छान झाली आहे हो! फक्त पुढच्यावेळी पालक थोडा बारीक चिरला की, अगदी एकजीव होईल आणि नीरजला आवडेल. बरं मीना आता हिवाळा संपत आला आहे, तेव्हा सांबर वडीचा बेत होऊन जाऊ दे काय? ओला कांदा, ओला लसण आणि मस्त हिरवाकंच ताजा ताजा सांबार (कोथिंबीर) आणला आहे."

मीना -"बर बर करतो आम्ही दोघी. रमा चल तू ही ये आणि पटकन जेवून घे."


रमा पण जेवली आणि दुपारच्या उन्हात दोघी सासू-सुन गॅलरीत बसून कोथिंबीर निवडत गप्पा मारत बसल्या. संध्याकाळी छान कोथिंबिरीचा बेत झाला, तेव्हा मात्र आजी, नेहा आणि नीरज यांनी बोटं चाटून चाटून सांभारवाडीचा आस्वाद घेतला.

रोजच्या या दैनंदिन जीवनात रमा आणि नीरजच नातं आणि वागणं लक्षात यायला मीनाताईंना वेळ लागला नाही. शेवटी न राहून एकदा मीनाताई नीरजशी बोलल्याच.