आई -"का नाहीये भूक? चल असा जेवणावर राग काढू नये."
रमा -"आई कंटाळली आहे मी या सगळ्याला. स्वतःचं असं प्रदर्शन अजून किती वर्ष मी लोकांसमोर मांडायचं आणि प्रत्येक वेळी ठरलेला नकार किती वेळा ऐकायचा मी? नाही सहन होत ग आता! आज सकाळी मुलाकडच्यांचा फोन आला होता आणि नेहमी प्रमाणे त्यांनी नकार कळवला. मी सगळं ऐकलं आहे.
आई -"रमा शांत हो. असं वैतागून काही होणार नाही. अग हिर्याची पारख फक्त जोहरीच करू शकतो. सर्वसामान्यांना ती दृष्टीच नसते. चल डोळे पुस आणि चार घास खाऊन घे."
आईने रमाची कशी-बशी समजूत काढली आणि प्रेमाने तिला जेवू घातलं.
तर ही गोष्ट आहे रमाची. एका काळया-सावळ्या मुलीची. जिच्या अंगी चांगले गुण तर होते, पण तिचा रंग मात्र सावळा होता, आणि स्वभाव अबोल. वारंवार रंगावरून हिणवल्याने तिचा आत्मविश्वास पण कमी झाला आणि रमा अधिकच शांत झाली. दोनद सारख्या पाच-सात हजार उंबरे असणाऱ्या गावात राहणार्या रमाने, तालुक्याला जाऊन बी.ए. केलं. सोबतच मेहंदी, रांगोळी, शिवणकाम, ब्युटी पार्लर असे लहान मोठे अनेक कोर्सही केले. पण तरीही तीचे लग्न काही जमत नव्हते.
गावातल्या गजानन महाराज पालखी सोहळ्यात महाराजांच्या दिंडीसमोर रमा अतिशय सुबक आणि सुंदर रांगोळ्या काढी, तेही अगदी काही मिनिटात की, पाहणाऱ्याचे भान हरपावे. पण तरीही तिच्या सुंदर रंगीत रांगोळ्यांच्या रेषा तिच्या लग्नाची रेख नाही बदलू शकल्या.
त्या नंतर काही दिवसातच तालुक्याच्या गावी पतसंस्थेत कनिष्ठ लिपिक म्हणून काम करणाऱ्या मुलाने रमाला पसंती दिली आणि रमाचे लग्न ठरलं.
रमालाही भावी जीवनाची ओढ लागली होती. वैवाहिक जीवनाची अनेक गोड स्वप्न तिने भावी जोडीदारसह रंगवली होती.रोज रात्री मोबाईल वर तास-तास भर बोलणं म्हणजे लग्नाळूंच्या जगातला अलिखित नियमच. याद्या झाल्या, नवरी नवरदेवाच्या लग्नाची खरेदी, कपडे, आंधण, मुहूर्त, देवीचा गोंधळ, कुळाचार झाला. रमाच्या मेहंदी भरल्या हातावर हिरवा चुडा शोभून दिसत होता. हळदीचा दिवस उगवला पण नवऱ्या मुलाकडून रमा करता हळद आलीच नाही. मुहूर्त चुकू नये म्हणून मध्यस्थांनी मध्यस्थी केली म्हणून, हळद तर आली, पण नवरा मुलगा ऐनवेळी गोफ, अंगठी आणि हिरो होंडासाठी अडून बसला. रमाचे वडील-सदाभाऊ अल्पभूधारक शेतकरी, मागचे सलग दोन वर्षे सततच्या ओल्या दुष्काळानं आणि अति पावसानं त्यांची शेत जमीन खरडल्या गेली होती. पिक विम्याचे पैसेही मिळाले नव्हते, त्यातच नवर्या मुलाच्या या अवास्तव मागण्या ऐकून अती ताण आल्याने,त्यांना अर्धंगवायूचा झटका आला आणि ते जागीच कोसळले.
लग्न घरी गोंधळ उडाला पण रमाची आत्या-मीना मात्र ऐनवेळी धावून आली आणि तिने बाजू सावरून घेतली. रमाच्या आत्याने नीरजला- तिच्या मुलाला गाडी काढायला लावली आणि भावाला लगेच दवाखान्यात नेलं. वेळीच उपचार झाल्याने रमाच्या वडिलांचा जीव वाचला, पण आता त्यांना रमाची काळजी लागली होती.
सदा भाऊ -"आक्का तू माझा जीव वाचवला पण आता ही काकण बांधलेली, हळद लागलेली माझी लेक कोण पदरात घेणार? कोणता चांगला मुलगा तिला स्वतःचं नाव देणार?
मीनाताईंनी नीरज कडे पाहिलं. निरजने हो-नाही असं काही उत्तर दिलं नाही. मीनाताईंना नीरजच्या गप्प राहण्यातच त्याचा होकार वाटला आणि अगदी अनपेक्षितरीत्या रमा-नीरज च लग्न साधेपणाने पार पडलं.
रमा, नव्या घरी, नव्या लोकांमध्ये, नव्या नात्यांमध्ये जमेल तसं जमवून घ्यायचा प्रयत्न करत होती. पण पहिल्याच रात्री नीरजने रमाला अगदी स्पष्टपणे सांगितलं की, तो या नव्या नात्याकरिता मनाने तयार नाही. रमाला स्विकारायला त्याला थोडा वेळ लागेल.
©® राखी भावसार भांडेकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा