नेहा आज नाचतच घरात आली होती. साऱ्या घरभर ती तिच्या रमा वहिनीला शोधत होती. हॉलमध्ये सोफ्यावर बसून टीव्ही पाहणारी आजी तर नेहाचा आरडाओरडा ऐकून एकदम दचकलीच.
आजी -"काय बाई कराव ह्या पोरीचं? केवढ्याने ओरडतेस ग! घाबरले ना मी!!"
नेहा -"आजी नेहमी तूच घरातल्यांना घाबरवतेस! कधी बीपी लो करून, तर कधी शुगर वाढवून! मी काय तुला घाबरवणार?"
आजी -"हो का? म्हणे मी घाबरवते सगळ्यांना!" आणि तोंड वाकड करून आजीने च्याsक केलं.
दोघी आजी-नातीची अजून काही शाब्दिक चकमक होण्याआधी मीना- नेहाची आई तिथे आली.
मीना -"नेहा जरा हळू, किती हा आरडा-ओरडा!"
नेहा -"आज मी खूप खूप खूप खूप खुश आहे. तुला माहिती आहे आई, मी कॉलेजमधे त्या वृत्तपत्राच्या ब्युटी क्वीन स्पर्धेत ब्युटी क्वीन म्हणून निवडल्या गेली आहे. आय एम सो हॅपी! वहिनी कुठे आहे?"
मीना -"आता आराम करते आहे….अ ग ऐक तर जरा…… पण मीना काय सांगते आहे तिकडे नेहाचं लक्षच नव्हतं. नेहा सरळ रमाच्या खोलीत गेली. रमा पुस्तक वाचत होती. नेहाने दोन्ही हाताने रमाचे हात हातात घेतले आणि रमासह दोन गिरक्या घेतल्या. रमाला गच्च मिठी मारून, नेहा उत्साहात बडबड करत होती.
नेहा -"वहिनी, वहिनी थँक्यू सो मच! तुला माहिती आहे, मी कॉलेज मधल्या त्या वृत्तपत्राच्या ब्युटी क्वीन स्पर्धेत, ब्युटी क्वीन म्हणून सिलेक्ट झाले, अँड क्रेडिट गोज टू यु."
नेहाने, रमाला आणखी एकदा आपल्या हाताने गोल फिरवलं.
मीना -"अग जरा हळू आता दोन जीवांची आहे ती!"
नेहा -"म्हणजे?"
मीना -"म्हणजे तू आत्या होणार आहेस!"
नेहा -"अय्या हो! खरंच?"
मीना -"अगदी खरं!"
रमा मात्र लाजून चुर झाली होती.
नेहा -"वहिनी, वहिनी आय लव यू, अँड अँड थँक्स परत एकदा आणि हो आता दगदग करायची नाही, दादाच्या शब्दावर नाचायचं नाही, मस्त आराम करायचा."
मीना -"हो का? मग घरातली काम कोण करणार तू?"
नेहाला आता कुठे कळलं की, तिने काय म्हटलं.
नेहा -(स्वतःला सावरत, जरा घाबरत) "अग तसं नाही म्हणजे, ते टीव्ही, सिनेमात दाखवतात ना जड उचलायचं नाही, वाकायचं नाही, म्हणून."
मीना -"अच्छा, वहिणीची काळजी घ्यायची, वहिणीला मस्त आनंदात ठेवायचं हेही दाखवतात हो टीव्हीवर!"
नेहा -"हो नक्कीच. यु आर माय फेवरेट वहिनी. एक सांगू वहिनी तू सांगितल्याप्रमाणे मी मसालेदार, चमचमीत पदार्थ टाळले, रात्रीची जागरण बन्द केली, उगाच रासायनिक क्रीम, लोशनचा भडीमार माझ्या चेहऱ्यावर केला नाही, चहा कॉफी घेण्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवलं आणि छान, स्वच्छ, सकस, सात्विक आहार घेतला म्हणून माझा चेहरा आणि त्वचा अशी छान तुकतुकीत आणि सुंदर झाली. वहिनी यु आर ग्रेट. अँड वन्स अगेन आय लव यू सो मच."
नेहा तिच्या नादात स्वतःच्या खोलीत निघून गेली, आणि रमा तिच्या भूतकाळात रमली…..
रमा -" आई मला आता हे सहन होत नाही मी काय एखादी खेळण्यातली बाहुली किंवा मुकं जनावर आहे का की कोणीही यावं आणि माझ्या भावना चा चंदामेंदा करावा.माझा रंग सावळा आहे यात माझा काय दोष? सावळ्या मुलींना भावना नसतातच का ग? त्यांच्या मनाचा कोणी का विचार करीत नाही?"
आई -"रमा, नको इतकं मनाला लावून घेऊस. चल जेवून घे बरं!"
रमा -"कोणीही यावं आणि सावळ्या रंगावर काहीतरी खालच्या दर्जाचे बोलून जाव, नाहीतर एखादा घाणेरडा विनोद करावा, इतका वाईट असतो का ग काळा-सावळा रंग? गोरा रंग म्हणजेच सौंदर्य का?"
आई -"नको इतका जीवाला घोर लावून घेऊ, चल बरं आधी दोन घास खाऊन घे."