रक्ताळलेली राखी ! पार्ट 1

.
स्पर्धा : जलद लेखन स्पर्धा


त्या दिवशी नारळी पौर्णिमा होती. दुपारचा प्रहर होता. देवगिरी गडाच्या पायथ्याशी जाधवांची छावणी पडली होती. म्हाळसाराणीने आपल्या पतीचे म्हणजेच राजे लखुजीराव जाधवांचे औक्षण केले. हाती तलवार दिली. राजे लखुजीराव जाधव हे सिंदखेडचे राजे आणि देवगिरीच्या यादवांचे थेट वंशज होते. निजामशाहीचे मोठे पराक्रमी सरदार. आपल्या अतुलनीय शौर्याने त्यांनी जाधवांना उर्जितावस्था प्राप्त करून दिली होती. वयाची सत्तरी ओलांडली तरीही मुखावर अजूनही तेज कायम होते. व्यक्तिमत्त्व रुबाबदार होते. नजरेत आणि वागण्याबोलण्यात एक वेगळाच बाणेदारपणा होता. त्यांनी पांढराशुभ्र अंगरखा घातला होता. कानात कर्णफुले होती. हिऱ्यामाणकांनी सजवलेली पगडी मस्तकावर शोभून दिसत होती. बोटांमध्ये रत्नजडित महागड्या अंगठ्या होत्या. गळ्यात पांढऱ्या मोत्यांचा लखलखीत हार चमकत होता. म्हाळसाराणीने गुलाबी साडी नेसली होती. निजामशाहने लखुजीराजेंना त्यांचेच जावई शहाजीराजे यांना कैद करायची जबाबदारी दिली होती. पण सुदैवाने शहाजीराजे आणि लखुजीराजे यांच्यात मैत्री झाली. एकीकडे भोसले-जाधव यांच्यातले वितुष्ट संपले या बातमीने म्हाळसाराणी आनंदी होत्या तरीही दुसरीकडे देवगिरीला आल्यापासून त्या अस्वस्थ होत्या. सकाळपासूनच अशुभ संकेत मिळत होते.

" अहो , आज सकाळपासून डावा डोळा फडफडत आहे. जर ही भेट टाळता आली तर ?" म्हाळसाराणी चिंतेच्या सूरात म्हणाल्या.

" तुम्ही राजे लखुजीराव जाधवांच्या पत्नी असूनही डोळे फडफडले म्हणून घाबरलात ? जिजी असती तर तुमच्या बालिशपणावर हसल्या असत्या. जाधवांच्या तलवारीचे पाणी चाखले नाही ऐसा इसम पूर्ण दख्खनेत सापडायचा नाही. आम्ही निजामशहाला भेटतो. राखी नजर करतो आणि लगेच येतो. फिकीर नसावी. मराठ्यांची औलाद आहे. भय रक्तात नाही. " लखुजीराव मिशीला पीळ देत म्हणाले.

" संगे कोण कोण येणार आहेत ?" म्हाळसाराणीने विचारले.

" आमचे पुत्र अचलोजीराजे , राघोजीराजे आणि नातू यशवंतराव असतील. " राजे लखुजीराव म्हणाले.

" यशवंतराव कशाला ?" म्हाळसाराणी म्हणाल्या.

" अहो , आता त्यांनाही दरबारातील चालीरीती कळायला हव्यात. चला जातो आम्ही. " लखुजीराव म्हणाले.

" जातो नाही. येतो म्हणावं. " म्हाळसाराणी म्हणाल्या.

लखुजीराव निघाले आणि म्हाळसाराणी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच बसल्या.

***

देवगिरीच्या किल्ल्यात मोठ्या रुबाबात लखुजीरावांनी पालखीतून प्रवेश केला. दरबारात जाण्यापूर्वी काही सरदारउमरावांचे मुजरे स्वीकारले. दरबारात प्रवेश करणार इतक्यात प्रवेशद्वारातच दोन भालेकऱ्यांनी लखुजीरावांना अडवले.

" तुमची ही हिंमत ? माहिती नाही आम्ही कोण आहोत ते ?" लखुजीराव विजेप्रमाणे कडाडले.

" दस्तुरखुद्द बादशहाने आदेश दिलाय. शस्त्रासह आत प्रवेश नाही. " एक भालेकरी घामाघूम होऊन धाडस करत म्हणाला.

नाईलाजाने लखुजीराव आणि बाकीच्यांनी आपापल्या तलवारी सुपूर्द केल्या.
लखुजीराव इतर जाधवांसोबत पुढे सरसावले. दरबारात तख्तावर बादशहा निजामशाह दाढीवरून हात फिरवत बसला होता. दोन दासी दोन्ही बाजूंनी त्याला हवा देत होत्या. लखुजीरावांनी आणि इतर जाधवांनी बादशहाला मुजरा केला.

" बादशहा का इकबाल बुलंद हो. आम्ही तुमच्यासाठी राखी आणली आहे. आम्हा हिंदूंसाठी राखी प्रेमाचे आणि बंधुभावाचे प्रतीक आहे जहाँपनाह. " राजे लखुजीराव म्हणाले.

" बहुत खुब. आम्ही तुमच्या निष्ठेवर खूप खुश आहोत लखुजीराव. आम्हालाही तुम्हाला काही नजराणा द्यायचा आहे. " निजामशहा म्हणाला.

क्रमश...

🎭 Series Post

View all