रक्ताळलेली राखी ! पार्ट 3

.



स्पर्धा : जलदकथा लेखन

म्हाळसाराणी उभ्या होत्या. बाजूला पंत उभे होते. धन्याचा मृतदेह पाहून पंतांनाही शोक आवरता आला नाही. पदराने आपल्या नेत्रातील आसवे पुसत म्हाळसाराणी यांनी पंतांकडे नजर रोखून धरली.

" पंत , माझ्या कुंकवाने आजन्म त्या निजामाची चाकरी केली. त्याचे उत्तम फळ मिळाले. बादशहाची निष्ठेने चाकरी केली की काय ओंजळीत पडते हे मराठे शिकतील आता. काय दोष होता माझ्या तरुण मुलांचा की इतक्या निर्घृणपणे त्यांची हत्या करवली ? पण पंत हा सुलतान दरबारातच मारला जाईल. निजामशाहीचे निसंतान होईल. निर्वंश होईल. कुणीच वारस उरणार नाही. हा एका पतिव्रतेचा शाप आहे. एका विधवेचा तळतळाट आहे. " म्हाळसाराणी म्हणाल्या.

चिता पेटल्या. पिवळया ज्वाला नभात उंचच उंच भराऱ्या घेऊ लागल्या. म्हाळसाराणीच्या नेत्रातून आसवांच्या धारा गळू लागल्या. क्षणार्धात सर्व होत्याचे नव्हते झाले होते. महाराष्ट्रातले एक शौर्यवान घराणे संपले होते. जिजाऊंचे माहेर संपले होते.

***

शिवनेरीवर जिजाऊंच्या नेत्रातही त्या चितेची आग धुमसत होती. ही खबर पोहोचताच महाराणी जिजाबाईंच्या दुःखाला पारावर उरला नाही. त्या शिवाई देवीच्या मंदिरात पोहोचल्या. आक्रोशाने त्यांनी घंटानाद केला.

" ऐकलीस का खबर ? आमचे माहेर संपले. देवगिरीवर आमच्या पित्याची आणि लहानग्या भावंडांची हत्या केली यवनांनी. तुझे काळीज पाषाणाचे बनले आहे का ? की बहिरी झाली आहेस तू ? तुला रयतेचे करुणारव ऐकू येत नाहीयेत का ? हिंदुकुश पर्वतापासून ते तंजावरपावेतो पसरलेल्या देशाची संस्कृती आज पायाखाली तुडवली जात आहे. आयाबहिणींची अब्रू वेशीवर टांगली जात आहे. कृष्णा बनून आलीसच ना द्रौपदीची लाज वाचवायला? मग आता ये ना. राम बनून रावणाला ठार कर. घे ना भद्रकालीचा अवतार आणि निष्पात कर साऱ्या असुरांचा. तुझ्या लेकरांच्या प्राणाला किड्यामुंग्याचीही किंमत उरली नाही ग. आता तरी दार उघड बाई. आता तरी दार उघड. " जिजाबाई आक्रोश करत होत्या.

कुणीतरी खांद्यावर हात ठेवला. जिजाबाईंनी वळून बघितले तर सासूबाई उमाबाई होत्या.

" आता आम्ही कधीच राखीपौर्णिमा आणि भाऊबीज साजरी करणार नाही सासूबाई. कधीच नाही. " जिजाबाईंनी हंबरडा फोडला. आभाळाचे काळीज चिरणारा हंबरडा.

" सावरा स्वतःला सुनबाई. गर्भातल्या बाळासाठी तरी. " मातोश्री उमाबाई सांत्वन करू लागल्या.

जिजाऊंना प्रसूतीवेदना जाणवू लागल्या. अखेरीस देवीने दार उघडले आणि शिवनेरीवर एक युगपुरुष अवतरला.

टीप :

1. सिंदखेडचे राजे लखुजीराव जाधव हे यादवांचे थेट वंशज आणि राजमाता जिजाऊ यांचे पिता.
2. हमीदखानसारख्या सरदारांनी निजामशाहचे कान भरले आणि त्यातूनच लखुजीराव यांची दरबारात हत्या झाली.
3. म्हाळसाराणीचा शाप खरा ठरला आणि दौलताबादची निजामशाही बुडाली. सर्व वारस कापले गेले. अगदी गर्भवती महिलांच्याही पोटावर तलवारीने वार करण्यात आले. पुढे शहाजीराजे यांनी दूरचा वारस ( मुरतुजा ) शोधून त्याला गादीवर बसवून साडेतीन वर्षे निजामशाही चालवली.
4. पण हा वारस मुघलांच्या हाती सापडला आणि पुन्हा निजामशाही कायमची संपली. आदिलशाही आणि मुघलांनी निजामशाहीचा प्रांत अर्धा अर्धा वाटला.
5. नानासाहेब पेशवे यांच्या काळात देवगिरीचा किल्ला पहिल्यांदा स्वराज्यात आला.
6. वाचकांनी हैदराबादची निजामशाही आणि दौलताबादची निजामशाही यात गल्लत करू नये.
7. धनाजी जाधव हे याच श्रीमंत लखुजीराजे जाधवांचे वंशज होय. त्यांचा सांभाळ जिजाऊंनी केला.
8. शिवकन्या रानुबाई यांचा विवाहदेखील जाधवांच्याच घराण्यात झाला होता.

श्रीमंत सरदार लखुजीराजे जाधव यांना मानाचा मुजरा??

©® पार्थ धवन


🎭 Series Post

View all