रक्ताळलेली राखी ! पार्ट 2

.


क्षणार्धात तीन सैनिक हातात चांदीच्या तीन ताटल्या घेऊन आले. निजामशाहने तिन्ही ताटल्यांवर हात ठेवून त्या लखुजीरावांना नजर केल्या. लखुजीरावांनी प्रत्येक ताटलीवरचे लाल रेशमी कापड बाजूला केले.
पहिल्या ताटलीत पांढरे शुभ्र कफन होते , दुसऱ्या ताटलीत हिरव्या बांगड्या होत्या आणि तिसरी ताटली रिकामी होती.

" या बांगड्या घाला , नाहीतर फोडा. " निजामशाह रागात म्हणाला.

" कोणासाठी बांगड्या आणि कोणासाठी कफन ? शहाजीराजे यांच्यासाठी की आमच्यासाठी ?" राघोजीराजे संतापून म्हणाले.

आपल्या पित्याचा असा अपमान राघोजीराजेंना सहन झाला नाही. पण लखुजीराजेंनी राघोजीराजेंकडे बघत नकारार्थी मान हलवली. राघोजीराजे शांत झाले.

" बच्चा है हुजूर. गुस्ताखी माफ. " लखुजीराजे म्हणाले.

" या रिकाम्या ताटलीत तुमचे नशीब आहे लखुजी. त्यात काय भरायचे ते तुम्ही ठरवा. " इतके बोलून निजामशाह तावातावाने पाय आपटत दरबारातून निघून गेला.

लखुजीराजेंना हा सर्व प्रकार अपमानास्पद वाटला. तरीही त्यांनी दरबारातील शिष्टाचाराप्रमाणे रिकाम्या तख्तालाच मुजरा केला. क्षणार्धात सर्व जाधवमंडळींना मारेकऱ्यांनी वेढले.

" आजोबा दगा. " ओठ दाबले की दूध निघेल इतक्या कोवळ्या वयात असलेले यशवंतराव किंचाळले.

यशवंतरावांना मारेकऱ्याने धरले होते. लखुजीरावांनी कमरेतून छुपी कट्यार काढून त्या मारेकऱ्याच्या दिशेने फेकली. सर्व मारेकरी जाधवांच्या अंगावर धावून गेले. कमरेतून छुप्या कट्यारी काढून सर्व जाधवमंडळी प्राणपणाने लढू लागली. हळूहळू लखुजीराव वगळता इतर सर्व धारातीर्थी पडले. लखुजीराव जबर जखमी झाले. रक्ताने त्यांचा पूर्ण देह माखला गेला. मस्तकावरची पगडी गळून पडली.

सिंहासनाजवळ येताच लखुजीराव विजेप्रमाणे गर्जले. त्यांचे ते रौद्ररूप पाहून सर्व मारेकरी दूर झाले.

" अरे सापांची औलादी तुम्ही , कितीही दूध पाजले तरीही डसणारच. या देवगिरीच्या तख्ताचे खरे वारस आम्ही. आम्ही रणभूमीवर रक्त गाळले म्हणून तुमच्या सल्तनती वाचल्या. आमच्या निष्ठेचे हे फळ भेटले ? लखुजीला पराभूत करेल असे रण भूतलावर नाही म्हणून तुम्ही कपट केले. पोरांनो , तुमच्या खुनाचा बदला घेण्यासाठी नव्हे सर्वांच्याच खुनाचा बदला घेण्यासाठी आणि आपल्या आयाबहिणींची अब्रू वाचवण्यासाठी कुणीतरी नक्की जन्माला येईल. आम्ही लखुजीराव जाधव आमच्याच रक्ताने अभिषेक करून या यादवांच्या गादीवर विराजमान होत आहोत. " लखुजीराव म्हणाले.

कुणीतरी मागून लखुजीरावांच्या पाठीवर सपासप वार केला आणि लखुजीराव यांनी प्राण त्यागले. पूर्ण दरबार रक्ताने माखला गेला होता. राजेंनी आणलेल्या राख्या एका कोपऱ्यात पडल्या होत्या. रक्ताने त्या पूर्णपणे भिजून गेल्या होत्या. यवन आपल्या रक्ताळलेल्या तलवारी हवेत भिरकावू लागले आणि त्यांनी जयघोष केला. जाधवांचे तेजस्वी मृतदेह पाहून त्यांना अधिकच चेव चढला होता. त्यांच्या डोळ्यात असुरी आनंद दिसत होता. खूप दुर्दैवी होता हा देवगिरीचा किल्ला. यादवांची राजकुमारी इथूनच दिल्लीकडे अल्हाहुदीन खिलजीच्या जनानखान्यात दाखल झाली. यादवांचा जावई हरपालदेव याचा मृतदेह याच किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर लटकत होता. परकीयधार्जिणे होता हा गड. आता याच किल्ल्यावर पुन्हा यादवांच्या वंशजांची निर्घृणपणे हत्या झाली. गडाच्या पायथ्याशी म्हाळसाराणीपर्यंत ही खबर पोहोचली. सोबत पुत्र बहादूरजी आणि लखुजीरावांचे बंधू जगदेवराव होते. गडावर चढाई करून जाधवांच्या सैनिकांनी मृतदेह मिळवली आणि सर्व जाधव कुटुंब सिंदखेडच्या दिशेने रवाना झाली.

क्रमश...

🎭 Series Post

View all