रक्ताचे नाते ( भाग तिसरा )

नातेवाईक होण्यासाठी रक्ताच्या नात्यांची गरज असते असं नाही. कित्येक नाती तर शब्दांच्या पलीकडली असतात.


रक्ताचे नाते ( भाग तिसरा )

विषय : नातीगोती

दुःख मुक्त आईला आमच्या ताब्यात देउन भाभी रडतरडत त्यांच्या घरात निघून गेली.

आमच्या दुःखाला पारावार राहिला नाही. बाबांचा संसार अर्धाच झालेला होता.  माझ्या डोक्यावरच मायेचा छत्र नाही झालेलं होतं. दुःखाचा एकच डोंब उसळला. माझ्या सगळया संवेदना नष्ट झाल्या होत्या.

आजूबाजूचे सगळे लोक जमा झाले. कुणीतरी आईला एका चादरी वरती झोपवायला सांगितलं. कोणी नातेवाईकांना फोन केला. आईचा आजार दुर्धर असल्यामुळे जास्त वेळ शरीर ठेवू नका असा सल्ला काही लोक देत होते.

बाबांचे मोठे भाऊ आणि त्यांची दोन मुलं, त्यांच्या बायका जवळच राहात होते. ते निरोप पोहोचताच दोन तासात आले होते. आल्या आल्या त्यांनी मोठा हंबरडा फोडला. थोड्यावेळाने सगळं काही शांत झालं होतं

आमच्याकडे दुरून येणारे फक्त आईचे चुलत भाऊ आणि बहिणी होत्या. त्यामुळे त्यांची वाट पाहून खूप गरजेचं होतं.  वेळ जाता जात नव्हता. आईच्या अंगावर पांढरे कपडे पांढरी चादर पांघरलेली होती. डोक्याजवळ दिवा लावलेला होता. नाका काना मध्ये कापसाचे गोळे घातलेले होते. अगरबत्ती लावलेली होती. निलगिरीचा विचित्र वास आसपास पसरलेला होता. काही वयस्कर स्त्रियांनी आईच्या हाता पायाला तूप चोळण्यास सांगितले.

खरं म्हणजे काय करावं हे कोणालाच नीट माहीत नव्हतं. जो जे सांगेल ते ते मी करत होतो. सगळेजण आईच्या चुलत भावाची आणि बहिणीची वाट बघत होते.  थोड्यावेळाने तेही आले. आल्या आल्या पुन्हा रडारडीला सुरुवात झाली. सगळेजण आई कशी चांगली होती. संसार कसा काटकसरीने करत होती वगैरे आईचे गुणगान जात होते.

थोड्यावेळाने सगळी तयारी केली गेली आणि अहेवपणी , सगळी सौभाग्याची लेण लेऊन आई भरल्या घरातून निघून अनंताच्या वाटेवर, या भल्या मोठया जगात मला एकटेच सोडून निघून गेली. मी जागीच कोलमडून पडलो. तिच्यासमोर मडक्यामध्ये अग्नी घेऊन चालत राहिलो. जी आई  मला आता पर्यंत संसाराच्या तापातून वाचवत आली होती, त्या आईला मी माझ्या स्वतःच्या हाताने अग्नी दिला. आणि त्या अग्नीमध्ये ती होका चू न करता मुकाट्याने जळत राहिली. का कुणास ठाऊक मला रडूच येत नव्हतं.

बघता बघता एक एक दिवस पुढे सरकू लागला आमचं घर नातेवाकांनी भरलेलं होतं. दहाव्या दिवशी पिंडदान वगैरे कर्म सुरू झाली भटजींना बोलावलं गेलं होतं. काहीही न समजता मी यांत्रिकपणं सगळया क्रिया करतं होतो.

सगळे विधी पार पडले. चवदाव्याला गुरुजींनी सगळ्या नातेवाईकांना पिंडांच्या पाया पडायला बोलावले. एकेक करत एकेक नातेवाईक येत होते. पिंडांना नमस्कार करत होते. एकाएकी एक नातेवाईक म्हणाला,

" त्या बाईंना आत येवू देवू नका. त्या मुसलमान आहेत"

ते वाक्य शिषा सारखं माझ्या कानात पडलो आणि मी बघितलं दारात आलेली भाभी अपमानित होवून तिच्या घरात परत चालली होती. मी हंबरडा फोडला.  तिच्याकडे कमरेला मिठी मारत म्हटलं,

" भाभी, तुम्ही जर आमच्या घरात आल्या नाही. तर माझ्या आईला कधीच मुक्ती मिळणार नाही. कोणी काहीही म्हणो. पण तुम्ही आधी माझ्या घरात या."

माझ्या डोळ्यातले अश्रू घुसत त्या म्हणाल्या ,

"हो बाळा नक्की येईल. तुझ्या आईने तुला माझ्याच पदरात घातले आहे. आणि भाभीने दरवाज्यातूनच पिडांना दुरूनच नमस्कार केला. मला नक्की खात्री आहे .तो दुरून केलेला नमस्कार नक्की आई पर्यंत पोहोचला होता.

दुपारी सगळे आईचा प्रसाद म्हणून जेवत होते. तिकडं भाभी मात्र अश्रु ढाळत स्वतःच्या घरात एकटीच जेवत होती.

( समाप्त)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all