रक्ताचे नाते ( भाग दुसरा )

नातेवाईक होण्यासाठी रक्ताच्या नात्यांची गरज असते असं नाही. कित्येक नाती तर शब्दांच्या पलीकडली असतात.


रक्ताचे नाते ( भाग दुसरा )

विषय : नातीगोती

आईची तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती. केमोथेरपी ट्रीटमेंट तिला खूप त्रासदायक होत होती. शरीराचा असा एकही भाग नव्हता जिथे तिला वेदना होत नव्हत्या. शरीरातील रक्त दिवसेंदिवस कमी होत चाललं होतं. सारख्या उलट्या आणि जुलाब होत. जेवण तर जवळजवळ बंद झाले होते. त्यात सारखे जुलाब होवून ती इतकी थकली होती की तिला उठून बाथरूम पर्यंत जाण्याची देखील ताकद नव्हती.

शेवटी आई   अंथरुणाला खेळली. आम्ही तिच्यासाठी पॉट आणला. पण तो माझ्यासमोर द्यायला वडिलांना कसे तरी वाटत असे. आम्ही दोघेही संकोचत असू. अशावेळी भाभी धावून आल्या. म्हणाल्या,

" तुम्हाला दोघांनाही हे जमणार नाही. मी त्यांची सगळे सेवा करत जाईल. तुम्ही काळजी करू नका. परमेश्वर  त्यांना बरे करेल."

  खरोखरच त्या दिवसापासून भाभी ने आईची सेवा करण्याचा व्रत घेतलं. त्यांच्या घरातील सगळी काम आटोपून त्या आमच्या घरात येत. झाड लोट करून घर स्वच्छ करीत. नंतर आईला स्पंजीग करून स्वच्छ पुसून काढत. जरी तिला खायला जातं नसे तरी काही काही खायला करून आणत. तिला भरवत असतं.

नंतर तर आईला बोलता येणे देखील अशक्य झाल.  भाभीची सेवा चालूच होती . त्यांचे उपकार या जन्मात फेडता येणार नाही असा मला वाटायचं.

आई आजारी असल्यापासून आमच्या घरात कधी चूल पेटली नाही. दोन्ही वेळेस जेवण नाश्ता भाभी कंटाळा न करता आम्हाला वेळेवर आणून देत. त्यांचे मस्टर देखील त्यांच्यासारखेच दयाळू होते. त्यांचा मुलगा इरफान हा मला कधी एकट पडू देत नसे.  नेहमी माझ्या सोबत राही.

पुढे जसजशी आईची तब्येत ढासळु लागली. तेव्हा आम्ही नातेवाईकांना बोलवण्याचा निर्णय घेतला. आई त्यांच्या माहेरी एकुलती एक. तिच्या माहेरी फक्त तिचे दोन चुलत भाऊ आणि एक चुलत बहीण होती. आम्ही त्यांना फोन करून यायला सांगितलं. त्याचे दोन भाऊ खूप दूर राहत असल्यामुळे, त्या दोघांनाही येणं जमणार नव्हत. एक मावस बहीण होती. तिच्याकडे  तिची मुलगी बाळंतपणाला आल्यामुळे तिला यायला जमणार नव्हत. मला देखील दोन चुलत भाऊ होते. मोठे काका होते. भाऊ उभ्या उभ्या येऊन पाहून गेले. काकांना स्वतःलाच बरं नसल्यामुळे ते येऊ शकत नव्हते.

शेवटी आम्हीच तिघं घरात राहिलो होतो. आईला आता खूप भ्रम होत होते. ती हळूहळू कोणालाच ओळखेनाशी झाली. भाभी रात्रंदिवस तिच्या उशाशी बसून असे.

आई बाबांना म्हणाली,

" मला आता औषध देऊ नका. जस असेल तस मला शांतपणे राहू द्या. मला ही औषध सहन होत नाही." तिचं बोलणं ऐकल्यावरती बाबांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. माझ्या डोक्यावरून हात फिरवून आई मला म्हणाली," बाळा स्वतःची काळजी स्वतः घे कोणालाही त्रास देऊ नको. बाबांना सांभाळून घे. त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत." हे बोलताना आईला खूप त्रास होत होता. तरी ती बोलतं होती,

"आणि हो बाळा भाभीला कधी विसरू नको. ती तुझी आई आहे."

मला आईचे हे निरवा निरवीचे बोलणे थोडेसे विचित्र वाटत होते. त्या दिवशी आईच्या अंगात खूप ताप भरला होता. भाभी सतत तिचे अंग पुसून काढत होत्या. तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होत्या. आईच्या अंगातून आतून खूप आग होत होती. तिला ते सहन होत नव्हत. रात्रभर आम्ही जागे होतो.

रात्री मला झोपलो म्हणजे केव्हातरी झोप लागून गेली. मध्यरात्र झालेली होती. भाभीच्या मांडीवर आईचे डोके  होते. आईचे डोळे म्हटलेले होते. दुखणे पूर्णपणे थांबलेले होते. मला न सांगता मध्यरात्री केव्हातरी आई मला पोरका करून निघून गेली होती.

मी हंबरडा फोडला.

( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all